Tuesday, 27 December 2016

**  आंब्याचे  झाड  **

            एखादी गोष्ट सहजगत्या घडून जाते. त्यात काही योजकत्व नसते. घर बांधल्यावर पुढे फार मोठी जागा उपलब्ध असल्यामुळे एक आंब्याचे झाड मधोमध लावले होते. ते जसजसे मोठे होत गेले तसतशा त्याच्या खालच्या फांद्या छाटून त्याला एक आकार येत गेला.
              या पंधरा वर्षात त्याचं रुपांतर एका डेरेदार वृक्षात झालं. खालच्या फांद्या अशा विस्तारल्या की लहान मुले देखिल त्यांच्यावर खेळू बागडू शकतात.
              झाडाचा विस्तार एवढा झाला की इतर झाडांनी हळूहळू काढता पाय घेतला. आता राजासारखा तो एकटाच दिमाखात बहरत असतो, फुलत असतो. सर्व फळांचा राजा असलेला हा आंबा फेब्रुवारी ते जूनपर्यंत सर्वांना आकर्षित करीत असतो. मल्लिका जातीचे आकाराने मोठे असलेले फळ सर्वगुणसंपन्न आहे. त्याच्या कैरीचे लोणचे, आमचूर पावडर व गुळांबा खायला मिळतो तर पिकल्यावर दोन- तीन आंब्यांच्या गोड रसात कुटुंबाची चंगळ होते.

             घरी येणारे मित्र मंडळी घरात बसून गप्पा मारण्यापेक्षा अंगणात आम्रवृक्षाखाली बसून फोटो काढत हास्यविनोदात रमून जातात.
              मागच्या आठवड्यात फेसबुक मैत्रीतून जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झालेली मंडळी पिकनिक व ग्रेट भेट म्हणून घरी आली. शशांक व मीनल गिरडकर, प्रवीण व नीलांबरी कलाल, कांचन मडके, वसुधा वैद्य, वीणा डोंगरवार व वंदना देशभ्रतार आवर्जून भेटायला आले. घरात थोडावेळ बसून सगळे अंगणात आले. जणू आंब्याचे झाड त्यांना खुणावत होते. गप्पा, चेष्टा-मस्करी, हास्यविनोद यांनी आवार फुलून गेले. सर्वांनी खूप फोटो काढले त्यात आंब्याचे झाड ' सेलिब्रिटी ' सारखे मिरवीत होते.

            काल आमचे परममित्र श्री. शानूजी पंडित सहकुटुंब घरी आले. फेसबुकच्या आभासी जगातून ते आमच्या कुटुंबाचा घटक कधी झाले ते कळलेच नाही. कौटुंबिक हास्यविनोदात खूप रमलो आम्ही. झाडाने जणू साद घातल्याप्रमाणे सगळे त्याच्याभोवती पिंगा घालू लागले. त्यांचा नातू परत जायला तयार नव्हता एवढा जिव्हाळा हे घर...हे झाड लावतं व परत परत यायची ओढ निर्माण करतं....

           आम्हाला माणसं जमवण्याची व टिकवण्याची प्रेरणा या घराने...या आम्रवृक्षाने दिली हे त्याचे आमच्यावर उपकारच !
ज्याच्या ऋणात आम्हाला सदैव राहायला आवडेल ते हे आमचे
               आंब्याचे झाड !!  

                                               ***  सुरेश इंगोले. ***

Sunday, 25 December 2016

         
         ** आर डी  **
     आज पक्याची काही खैर नव्हती. एकतर त्याची चामडी सोलून निघेल किंवा हात पाय तरी मोडला जाईल अशी पारावरच्या टोळभैरवांची खात्री होती. कारण त्याने रवीशी पंगा घ्यायचे ठरविले होते.

      रवी त्या एरीयाचा गुंड होता. उंच, धिप्पाड, काळासावळा...हातभट्टीच्या दारूची ने-आण करणे, मटका-सट्टा खेळणे, छोट्या मोठ्या सुपा-या घेणे अशी कामे करुन त्याने आपली दहशत निर्माण केली होती. सगळेजण त्याला टरकून असत.

    पक्या कॉलेजात शिकत होता. देखणा, मिष्किल स्वभावाचा, खोडकर...पण सर्वांचा आवडता. शब्दांशी खेळणे त्याला आवडायचे. मित्रांना तो बीजे, टीपी, जेके, एमडी अशा नावांनी बोलवायचा. प्रचलित शब्दांना नवनवी रुपे देण्याचा त्याला छंद होता.

     पक्या नसल्यामुळे पारावर स्तब्धता होती पण तो दिसताच चैतन्याची लहर पसरली जणू. बीजे उर्फ भाावड्या ओरडला...पीके आला रे...
    पक्याने लगेच नोटबुक मांड्यासमोर धरले. ' पीके म्हणजे आमीरखान नव्हे... तू लेका...प्रकाश काळे..' सगळे हसले.
" कां उशीर केलास ?"
" अरे त्या शेळके काकांना घर दाखवले. म्हटलं, प्रत्येक बेडरूमला एबीसीेएल आहे. तर ते म्हणाले, एबीसीएल तर बंद पडली...अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड. मी म्हटलं...अहो काका.. एबीसीएल म्हणजे अटॅच्ड बाथरुम कम लॅट्रीन...." सगळे हसू लागले.
"ही एक रुम वेगळी कां असे विचारल्यावर सांगितले की तेथे नाईक एकटाच राहायचा पण इतर रुममध्येसुद्धा आपले सामान ठेवायचा. पक्का बीडीओ होता. म्हणून त्याच्या खोलीला वेगळे केले. तर म्हणाले, बीडीओ असूनही....
मी लगेच म्हणालो, ओ काका ! बीडीओ म्हणजे ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर नव्हे, भटाला दिली ओसरी..."
' आयला पक्या, तू कोणालाही फिरवतोस यार...'

      पक्याचा छंद सर्वांना माहीत होता. बीपी वाढलाय असं कुणी सांगितलं की बीपी खाऊ नका म्हणायचा. तो कन्फ्यूज होई मग हा सांगे...बीपी म्हणजे ब्रेड पकोडे....

         आज तो पारावर आल्याबरोबर सर्वांनी त्याच्याकडे रवीबद्दल तक्रार केली. तो कसा सगळ्यांना छळतो वगैरे...
" पक्का रानडुक्कर आहे साला..." पक्या बोलला. सगळ्यांनी त्याची री ओढली.
' आयडिया ! आपण त्याचं नावंच रानडुक्कर ठेवू. त्याच नावाने त्याला हाक मारू. ओके ?'
' स्वत:ची हाडं खिळखिळी करुन घ्यायची आहेत का ?'
' गपा रे...त्याला आरडी म्हणायचे...रानडुक्कर..त्याला कळणार नाही व आपल्याला म्हटल्याचे समाधान लाभेल.'
' नको रे बाबा...त्याला संशय येईल.'
'ठीक आहे. मी सुरुवात करतो.' असे म्हणून पक्या निघाला. रवी कोणाशी तरी तावातावाने बोलत होता.

.....  ....
         " काय आरडी..कसं काय ?" त्याच्या पाठीवर थाप मारत पक्या बोलला.
रवी गर्रकन वळला. "काय म्हणालास ?' त्याने डोळे वटारले.
" आर डी." पक्या शांतपणे म्हणाला." आजपासून आम्ही सर्वांनी तुला आरडी म्हणायचे ठरवले आहे. काय दोस्तांनो ?"
    सगळे चिडीचूप...
" काय टेरर आहे यार तुझं. कोणी बोलायलाही घाबरतं. एकाच एरीयात राहतो म्हटल्यावर मिळून मिसळून राहायला हवं ना.."
रवीला कसला तरी संशय आला. हे बेणं सरळ नाही हे त्याला ठाऊक होतं. त्याने पक्याचे बखोट धरले व दातओठ खाऊन बोलला..." आरडीचा अर्थ सांग आधी.."
  आता सगळेच टरकले होते. ती वेळ येऊन ठेपली होती.
पक्याने त्याचा हात झटकला. आणि शांतपणे म्हणाला, " हे बघ...तू आपल्या एरीयाचा भाई आहेस. दादा आहेस. रवी दादा. आजपासून आम्ही तुला रवी दादा म्हणजेच आरडी म्हणायचे ठरवले आहे.  काय दोस्तांनो....,"
हो.......सगळे एका सुरात
' चला तर मग म्हणा... आपला भाई कोण..?'
"आर डी...!" सगळे एकासुरात ओरडले..मनातल्या मनात ' रानडुक्कर' म्हणत.....

                      ***  सुरेश इंगोले.  ***

Wednesday, 21 December 2016

सहज सुचलेलं.....मनातलं.....

                 सोशिकपणाबद्दल आम्ही भारतीय विश्वप्रसिद्ध आहोत......कोई शक ?

           प्राचीन काळापासून अनेक राजे आलेत...अन्याय करुन गेलेत. आम्ही निमूट सहन केले.

           शक आले, हूण आले, मंगोल,मोगल, पोर्तुगीज आले.
फ्रेंच आले, इंग्रज आले...
           
            आम्ही उदार मनाने त्यांना आपले राज्य दिले. आपल्यावर अत्याचार करण्याची परवानगी दिली. त्यामुळे सोशिकपणा वाढतो हे जगाला दाखवून दिले.

           मग आम्हाला वाटले...परक्यांचा अत्याचार पाहिला, साहिला....आता आपल्यांचाच अत्याचार सहन करून पाहू.

           परक्यांना हुसकावून आम्ही आपले राज्य स्थापन केले.
आणि त्यांच्या अत्याचारासाठी सज्ज झालो.

           कायदा-नियम धाब्यावर बसवून, निरनिराळ्या क्लृप्त्या लढवून मनमानी करण्याची अनेक तंत्रे शोधली जाऊ लागली.
अनेक आमिषे दाखवून आवळा देऊन कोहळा काढण्याची किमया केली जाऊ लागली.

          ..... आणि आम्ही निमूटपणे सहन करीत आलो.
         
          आजही तेच सुरू आहे.

           आम्ही पै-पैशासाठी दिवसभर रांगेत उभे राहतो. पैसा मागच्या दाराने करोडोंच्या संख्येत मूठभरांच्या खिशात जातो.

           आम्ही हीन - दीन होऊन मंदिरात माथे टेकवून नवसाला जवळ असले-नसले पैसे पेटीत टाकतो. मंदिराच्या कोषागारात अब्जावधी रुपये, सोने-नाणे, हिरे-जवाहिर अगदी बेहिशेबी पडलेले असतात.

            आम्हाला अजूनही असं वाटत असतं की यातून चांगले काही तरी निष्पन्न होईल.

           अच्छे दिन येतील...

         .... नाहीतरी सोशिकपणाबद्दल आम्ही विश्वप्रसिद्ध आहोतच....

                                 *** सुरेश इंगोले ***

Sunday, 23 October 2016

                   **  तिची  पर्स  **

                                          लेखक :  सुरेश इंगोले


           ' मनोहर रेगे ' दाराबाहेरून आवाज व टकटक ऐकू आली. रेगे काकांनी दार किलकिले करुन पाहिले. बाहेर कुरियरवाला उभा होता. दार पूर्ण न उघडताच त्यांनी कुरियर घेतले. सही करुन कागद परत दिला. दार बंद करुन त्यांनी लखोटा फोडला. त्यात काही फोटो व अनुरागचे पत्र होते. फोटो पाहून त्यांनी वीणाकाकूंना हाक मारली. पदराला हात पुसत त्या किचनमधून बाहेर आल्या.

        " अनूचे कुरियर का ? काय म्हणतो तो ? आली का एखादी मुलगी पसंत त्याला ?' टेबलवर फोटोंची चळत पाहून त्यांनी उत्सुकतेने प्रश्न विचारायला सुरुवात केली.

           रेगेकाका गंभीर मुद्रेने पत्र वाचत होते. त्यांच्या चर्येकडे लक्ष जाताच त्या थबकल्या.

           " त्याला एकही मुलगी पसंत नाही. त्याला ह्यातल्या कुणाशीच लग्न करावयाचे नाही." असे म्हणून त्यांनी पत्र काकूंकडे सोपवले. काकू पत्र वाचू लागल्या.


               अनुराग त्यांचा एकुलता एक मुलगा. त्याच्याइच्छेप्रमाणे त्यांनी त्याला शिकविले. मुलगा डॉक्टर व्हावा असे यांना वाटत होते. त्याला इंजिनिअर व्हायचे होते. त्याने पुण्यातच जॉब करावा असे यांचे मत होते. त्याने बंगलोरला जास्त स्कोप आहे म्हणून तेथील जॉब स्वीकारला होता. प्रत्येकाला स्वतंत्र मत असतं व त्या मताचा आदर करावा असे संस्कार घरातच होते. मुलगा चांगला कमावतोय व स्थिर होतोय असे दिसताच शिरस्त्याप्रमाणे त्याच्या विवाहाची यांना घाई सुटली.

                  योगायोगाने त्याची पुण्यातच बदली झाली व तो आपल्याजवळ राहणार याचा दोघांनाही आनंद झाला होता. रेगेकाका बँकेतून निवृत्त झाले तेव्हा त्यांनी अनुरागजवळ लग्नाचा विषय काढला. त्याने हसून टाळले होते. दोन वर्षे निघून गेली पण त्याने लग्नाचे मनावर  घेतले नाही.

        तेवढ्यात त्याला कंपनीच्या कामाकरिता कॅनडाला जावे लागले. तो तेथे तीन वर्षे राहणार होता. यावेळी त्याने लग्नाला संमती दर्शविली तेव्हा दोघांनाही आनंद झाला. वधूसंशोधन सुरु झाले व निवडक मुलींचे फोटो त्याला यांनी पाठवले होते.


               काकूंनी पत्र वाचून संपवले. दोघेही बराच वेळ नि:शब्द बसून राहिले. मोबाईलच्या काळात पत्र हेच मुळी अप्रूप होते. ऑनलाईन मॅट्रिमोनीच्या काळात मुलींचे फोटो पाठवणे हेही जुनाटच होते. पण अनुरागने मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी योग्य साधन निवडले होते.

                 ..... त्याचे एका मुलीवर निस्सिम प्रेम होते. दोघांनीही लग्नाच्या आणाभाका घेतल्या होत्या. दोघांनीही घरी सगळे सांगून परवानगी घेण्याचेही ठरविले होते. तेवढ्यात कॅनडाला जायची संधी आली. दोघांनीही परदेशात राहण्याची स्वप्ने रंगविली होती. जायच्या आदल्या दिवशी तिची भेट झाली तेव्हा एका छोट्याशा गोष्टीवरुन दोघांचा वाद झाला. त्याचे म्हणणे होते की सुरवातीला आपण दोघे वर्षभर राहू. दुस-या वर्षी आईबाबांना घेऊन येऊ. तिने ठामपणे सांगितले की आईबाबांना सोबतच घेऊन जाऊ.

          पत्राच्या शेवटी त्याने लिहिले होते की कॅनडाला आल्यावर त्याने तिला कितीदा फोन केला. मेसेजेस केले पण तिने कधी उत्तर दिले नाही. नंतर तिचा फोनच बंद केला होता.

भारतात आल्यावर तिला समक्ष भेटून जाब विचारल्याशिवाय तो कोणताही निर्णय घेणार नव्हता......


             बराच वेळाने रेगे काकाकाकू भानावर आले.

दोघेही एकमेकाकडे पाहून हसले.

     " एका शब्दाने सांगितले नाही अनूने." काकू म्हणाल्या.

" तुझ्यावर गेलाय् तो. तू तरी कुठे चटकन व्यक्त होतेस ?" काका म्हणाले.

" एवढे नाही बरं का ! अहो, एवढं पत्रात मन मोकळं लिहूनही त्याने त्या मुलीचे नाव,पत्ता,माहिती काही दिली का ?"

" बरं...आज उद्या त्याचा फोन किंवा व्हिडिओ कॉल येईलच तेव्हा विचारू." काका म्हणाले.  

      काकूंनी काकांचा हात हाती घेतला व म्हणाल्या," अहो, पण पोर लाघवी दिसत्ये. आत्तापासून आपली काळजी तिला. आपल्याला सोबत घेऊन जाण्यासाठी भांडली अनूशी."

      दोघेही समाधानाने हसले.

" चला, आता बाहेर जाऊ. थोडी भटकंती. एखादे नाटक नाहीतर सिनेमा पाहू. तुझ्या आवडीच्या हॉटेलमध्ये जेवण करू. चालेल ? " काका खुर्चीतून उठत म्हणाले

" चालेल काय धावेल..." काकूंनी हसत दुजोरा दिला.


           ... दोघेही मनसोक्त भटकले. भेळ, पाणीपुरी खाल्ली. नाटकाची तिकिटे न मिळाल्यामुळे दोघांनीही सिनेमा पाहिला. हॉटेलात जेवण करून निघाले तेव्हा रात्रीचे दहा वाजून गेले होते. बराच वेळ पाऊस पडत होता.
   बरीच वाट पाहिल्यावर एकदाची रिक्षा मिळाली. बाहेर काळाकुट्ट अंधार होता. रस्त्यावरचे दिवे अंधुकसे मिणमिणत होते. पावसाची हलकी रिपरिप सुरूच होती.


            एका वळणावर रिक्षा वळली. तिच्या उजेडात समोरच्या बसस्टॉपवर काकूंचे लक्ष गेले. सात आठ माणसे उभी होती. त्या रांगेच्या शेवटी एक तरुण मुलगी कुडकुडत  होती. काकूंनी रिक्षा थांबवली.

          " अहो, ती मुलगी एकटीच दिसते बिचारी. रात्र खूप झाली आहे. तिला घेऊ या का रिक्षात ? तिच्या घरी सोडून देऊ." काकूंनी विचारले. काकांनी मान डोलावली.

           काकूंनी तिला हाक मारली. " अगं ए बाळ, ये इकडे."

तिने रिक्षात कोण आहे याचा अंदाज घेतला. मग ती रिक्षाजवळ आली. " ये, बैस.. कुठे जायचंय् तुला ? आम्ही सोडतो." तिने मान डोलावली. ती अंग चोरून बसली. रिक्षा सुरु झाली.

       " नाव काय गं तुझं ?"

      " छकुली..." ती  मुक्तपणे हसली. " घरी मला सगळे छकुलीच म्हणतात. "

       " घरी कोण कोण आहेत तुझ्या ?"

     " आई व अण्णा आहेत ना. वाट बघत असतील माझी."

     " हो ना ! बरीच रात्र झाली आहे. बस आलीच नाही का बराच वेळची ?"

     " नाही ना..  रिक्षा थांबवा येथे. मला उतरायचे आहे."

रिक्षा थांबली. ती खाली उतरली. " कुठे आहे तुझे घर ? "

काकूंनी विचारले तसे तिने एका घराकडे अंगुलीनिर्देश करुन घर दाखवले.

       बैठे घर होते. फाटकाजवळ प्राजक्त फुलला होता. घरावरही ' प्राजक्त ' असे सुबक नाव कोरले होते आणि दिव्याच्या उजेडात चमकत होते. ती त्यांना धन्यवाद देऊन फाटकाकडे वळली. रिक्षा पुढे निघाली. दोन तीन वळणे घेऊन रिक्षा त्यांच्या इमारतींच्या आवारात शिरली. दोघेही उतरले तोच काकूंचे लक्ष गेले. " अहो, पोर तिची पर्स विसरली येथे."

    " अरे, घाईघाईत विसरली वाटते. ठेव तुझ्याजवळ. उद्या नेऊन देऊ. तू नीट पाहिलेस ना तिचे घर ?-"

   काकूंनी मान डोलावली. रिक्षाचे भाडे चुकवून दोघेही कुलूप उघडून घरात आले.

          अनुरागच्या लग्नाचे व भावी वधूचे स्वप्न पाहत त्यांनी रात्र घालवली.

सकाळ रोजच्यासारखी पार पडल्यावर काकांना तिच्या पर्सची आठवण झाली.

    " अगं, त्या छकुलीची पर्स नेऊन द्यायची आहे ना ? " त्यांनी काकूंना विचारले.

   " अय्या, हो ना ! विसरलेच की...जेवणे आटोपली की जाऊ या."

          रेगे काका काकूंना घरून निघायला चार वाजलेच. तिची पर्स घेऊन त्यांनी खाली येऊन रिक्षा बोलावली.

काकूंनी घर नेमके ओळखले. प्राजक्त विसरणे शक्यच नव्हते.

फाटक उघडून त्यांनी आत प्रवेश केला. दारावरची घंटा वाजवली.

            जड पावलांनी कोणीतरी येत असल्याचे जाणवले. दार उघडले. दारात एक साठीचे गृहस्थ उभे होते. चर्येवरुन ते खूप थकलेले दिसत होते.

            " कोण हवंय् ? "

         " छकुली..." काकू बोलल्या. '' येथेच राहतेय ना ती ?"

     त्या गृहस्थाने विचित्र नजरेने त्यांच्याकडे पाहिले.

दारातून बाजूला होत त्यांनी या दोघांना आत घेतले.

एव्हाना त्यांची पत्नी बाहेर आली होती.

   " ही दोघं छकुलीकडे आलीयेत..." त्यांनी पत्नीला सांगितले. त्यांनी सोफ्याकडे इशारा करीत बसायला सांगितले.

   " काय काम होतं ?'

 " छकुलीची पर्स द्यायची होती " काकूंनी पर्स पुढे करीत सांगितले .

दोघेही चमकले. छकुलीच्या आईने पर्स हिसकल्यासारखी ओढून घेतली.

   " कुठे भेटली तुम्हाला ?' त्यांनी पर्सची झिप उघडत विचारले.

" कोण ?   छकुली ? " काकूंनी विचारले.

" अहो पर्स..."

" छकुली विसरली काल रिक्षात ..."

" क्काय.?" तिचे आईवडील जोरात ओरडले.

" होय .."

" काल ? कसं शक्य आहे ?"

" म्हणजे ?..काल ती आमच्या रिक्षात बसली. येथे उतरली तेव्हा पर्स विसरुन गेली. मी घर लक्षात ठेवले होते म्हणून आज परत द्यायला आलो आम्ही." काकूंनी एका दमात सारे सांगून टाकले.

      तिच्या पर्समधून तिचे आयकार्ड दिसताच तिची आई धाय मोकलून रडू लागली. तिचे वडीलांनीही रुमाल काढून डोळ्यांना लावला. रेगे काका काकू विस्मयाने त्यांच्याकडे पाहू लागले.

   " काय हो ? हा काय प्रकार आहे ? काल छकुली रात्री घरी आली होती ना.. आई अण्णा वाट बघत असतील म्हणाली. " रेगे काकांनी विचारले.

      आता अण्णाही रडू लागले. रडता रडता त्यांनी भिंतीकडे पाहिले आणि ते पुन्हा उमाळा येऊन रडायला लागले. नकळत काका काकूंची नजर भिंतीकडे गेली. आणि......


            ... दोघेही दचकले. एकटक भिंतीकडे पाहू लागले. आणि पाहता पाहता थरथर कापू लागले.


              भिंतीवर छकुलीचा फोटो टांगला होता. हसतमुख....निरागस....आणि त्या फोटोला हार घातला होता.
.... बराच वेळ दोघेही सुन्न बसून होते. भानावर येऊन काकूंनी थरथरत काकांचा हात धरला.

     " म्हणजे.... काल ती सोबत....होती.....नव्हती...."

काकांनी अण्णांच्या खांद्यावर थरथरता हात ठेवला. त्यांच्या शरीरातला कंप अण्णांना जाणवला.

  " मला नीट उलगडून सांगा. " काकांनी काकुळतीने विचारले.

    काही क्षण नि:शब्दतेत गेले. मग अण्णा बोलू लागले.

          " दोन महिन्यापुर्वी ती खूप आनंदात होती. कारण विचारलं तर काही सांगेना... मग सांगेन म्हणाली. एकुलती एक असल्यामुळे आम्ही तिला लाडात वाढवले. तिच्या इच्छा पूर्ण केल्या. खूप सालस, विचारी व समंजस होती. आम्ही तिच्या कलानेच घ्यायचो. पोरगी प्रेमात पडली की काय असे वाटायचे. पण स्वत:हून सांगेल म्हणून शांत राहिलो."

      अण्णांनी एक खोल नि:श्वास सोडला. फोटोकडे पाहून डोळे टिपले.

   " दोन महिन्यापुर्वी ती लवकर घरी आली नाही म्हणून तिला फोन केला तर आज उशीर होईल, वाट पाहू नका ...म्हणाली. पण रात्रीचे दहा वाजायला आले तेव्हा आमचा धीर सुटला. तिला बरेचदा फोन केला पण फोन स्वीच ऑफ येत होता. मी लगेच शेजारच्या चिंटूला घेऊन तिला शोधायला निघालो.

एके ठिकाणी खूप गर्दी दिसली. ..."

         अण्णा हमसून हमसून रडायला लागले. काका त्यांच्या पाठीवर थोपटू लागले. थोडे शांत झाल्यावर ते पुढे बोलू लागले.

     " तिथे एक अपघात झाला होता. प्रेत छिन्नविच्छिन्न झाले होते. काहीही ओळख लागत नव्हती. आम्ही तेथून पोलीस स्टेशनला गेलो. तक्रार नोंदवली. काही वेळाने पोलीस आम्हाला तेथेच घेऊन गेले. आम्हाला काही वस्तू दाखवल्या गेल्या. त्यातली छकुलीची घड्याळ, कर्णफुले, तिच्या नावाचे पदक असलेली चेन व चपला ओळखू आल्या. ती दिसलीच नाही. पोस्टमॉर्टेम नंतर ज्या शवाला अग्नी दिला ते तिचेच होते की नाही कोणास ठाऊक......!"

      बराच वेळ शांततेत गेला.

     " छकुलीची पर्स मिळालीच नव्हती. त्यात तिचे फोटो, मोबाईल आणि इतर ओळखपत्रे होती. कुणी लांबवली असेल असे पोलीस म्हणत होते. आजूबाजूला शोध घेतला पण पर्स मिळाली नव्हती. .....आणि...आज तुम्हाला ही पर्स घेऊन तिनेच पाठवले...."


.....  छकुलीची आई किती तरी  वेळ ती पर्स उराशी धरून रडत होती. रेगे काका काकू अजूनही धक्क्यातून सावरले नव्हते.

           तिच्या आईने पर्समधून एकेक सामान काढायला सुरुवात केली. तिचे फोटो, क्रेडिट - डेबिट कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, एका मुलाचा फोटो.....तिच्या आईने फोटो निरखून पहायला सुरुवात केली.

        " अहो, छकुलीने पसंत केलेला मुलगा असेल का हा ? तिने काही सांगितले नव्हते. "

  अण्णांनी त्यांच्या हातून फोटो घेतला. ते फोटो पाहत असताना रेगेकाकांचे त्याकडे लक्ष गेले. ते एकदम दचकले. त्यांनी तो फोटो जवळजवळ हिसकावूनच घेतला. आणि तो पाहताच ते ओरडले, " अरे, हा तर आमच्या अनुरागचा फोटो." काकू अनुरागच्या फोटोकडे पाहून थक्क झाल्या.

     

          चौघेही एकमेकांकडे पाहत राहिले.....


 न सांगता ब-याच गोष्टींचा उलगडा होत गेला. पर्सच्या निमित्ताने तिने दोन कुटुंबांना जवळ आणले होते. ज्या दिवशी अनुराग कॅनडाला जायला निघाला त्याच दिवशी तिचा अपघात झाला होता. कदाचित ती त्याला सोडायला एयरपोर्टवर जायला निघाली असेल. कदाचित आदल्या दिवशी झालेल्या वादामुळे तिची मन:स्थिती चांगली नसेल..कदाचित....

       पण हे सगळे प्रश्न आता अनुत्तरित होते. मोबाईल बॅटरी संपल्यामुळे डिसचार्ज झाला होता. म्हणून कोणाचेच कॉल लागत नव्हते.


         अण्णांशी बोलण्यासाठी रेगेकाका शब्दांची जुळवाजुळव करू लागले....


                                      ** सुरेश इंगोले **

                                       शहापुर = भंडारा 

Saturday, 2 July 2016

** तुही  जात  कंची ? **

     जन्मत:च जी आपल्याला चिकटते आणि जी जन्मभर जात नाही ती ' जात.'
   
     अगदी शाळेत दाखल झाल्यापासून तो नोकरीतून निवृत्त होईपर्यंत ती आपला पिच्छा सोडत नाही.

    जातीवर निवडणुका लढल्या - लढवल्या जातात. जातीसाठी आरक्षण....जातीसाठी ऑनर किलिंग.....जातीमुळे स्पृश्य-अस्पृश्य, दलित - सवर्ण हे भेदाभेद. त्यातही भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात सतराशे साठ जाती.

    कशा निर्माण झाल्या या जाती ?  त्यांत उच्च - नीच हे भेद कां पडले ? त्याचे एवढे अवडंबर कां माजविले जाते ...आणि ते ही विवाह संबंधात..?

       ..... वास्तविक वेदकाळात चातुर्वर्ण निर्माण झाले सामाजिक गरज म्हणून.. जसजशा गरजा निर्माण झाल्या तसतशा त्या पूर्ण करणारे कोणी ना कोणी पुढे येऊ लागले. ज्याला ज्या कामात रस होता, गती होती तो ते काम कौशल्याने करु लागला.  वस्तुविनिमयाच्या काळात आपण बनविलेल्या वस्तु इतरांना देऊन त्यांच्याकडील गरजेच्या वस्तु प्राप्त करणे हे जगण्याचे साधन होऊ लागले.
             अशावेळी ज्या एका बुद्धीमान व्यक्तीने पुढाकार घेतला त्याने प्रत्येकाचे कौशल्य जाणून कामांची विभागणी केली. गरजेच्या वस्तु तयार होऊ लागल्या. त्या त्या वस्तूंच्या नावावरुन त्या तयार करणा-याला संबोधन दिले जाऊ लागले.
       मडकी बनविणारा कुंभकार...कुंभार, चामड्याच्या वस्तु बनविणा-याला चर्मकार...चांभार, सोन्याचे अलंकार बनविणारा सुवर्णकार...सोनार, कपडे विणणारा विणकर...कोष्टी, लाकडी वस्तु बनविणारा सुतार, बागकाम करणारा बागवान...माळी, शेती करणारा कृषिवल...कुणबी.....अठरापगड कामे...अठरापगड नावे.
  हीच नावे नंतर जात म्हणून चिकटली.
   
        ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र या चातुर्वर्णामुळे केवळ कामाची विभागणीच केली गेली होती. विशेष म्हणजे कोणतेही काम क्षुद्र किंवा उच्च प्रतीचे नव्हते. ब्राम्हणांनी पौरोहित्य करावे, क्षत्रियांनी समाजरक्षणाचे कार्य करावे, वैश्यांनी प्रत्येकाच्या गरजा भागवाव्या तर शूद्रांनी समाजाच्या  आरोग्याचे रक्षण करावे. घाण उचलणे, मेलेले ढोर उचलणे किंवा जी कामे करताना किळस येईल ती कामे जर इतर कोणी करीत असेल तर त्याचे सामाजिक आरोग्य रक्षणाचे कार्य उलट महान होय.

         पण नंतर याच जाती बनल्या. त्यातून स्पृश्य - अस्पृश्य भेद निर्माण झाले.

        आज परिस्थिती काय आहे ? आपल्याला चिकटलेल्या या जाती आपण पाळतो तर आपण खरोखर तीच कामे करतो काय ?
           कामावरून जाती निर्माण होत असतील तर या कालबाह्य जातींचा त्याग करुन नवीन जाती निर्माण कां होऊ नये ?

     ...... दहा वर्षापुर्वी माझ्या ज्येष्ठ चिरंजिवाचे लग्न झाले. ईटीव्ही हैद्राबादला तो वृत्तनिवेदक म्हणून कार्यरत होता. तेथीलच एक निवेदिका आम्हाला आवडली. मुलाला विचारून तिच्या पालकांशी संवाद साधला. आम्ही सर्व हैद्राबादला जमलो. मने जुळली....संबंध जुळला. आणि त्याच बैठकीत लग्न जमले. हैद्राबादला एंगेजमेंट, कोल्हापूरला रजिस्टर्ड लग्न व शहापूरला रिसेप्शन असा कार्यक्रम ठरला.
             
             एवढे सगळे ठरल्यावर व्याही श्री वैद्य म्हणाले, ' अहो ! पण तुम्ही आम्हाला आमची जात विचारलीच नाही.."
            मी हसून म्हणालो, " मला माहीत आहे, तुमची जात अभियंता....इंजीनियर तर माझी जात प्राध्यापक...त्याहीपेक्षा आपल्या मुलांची जात जुळली ना...! दोघेही पत्रकार आहेत.. इतर काही जाणून घ्यायची माझी इच्छा नाही.'
           
       आणि विवाह पार पडला........

         आज आपण जे काम कुटुंब पोसण्याकरिता करतो तिलाच जात मानली तर बिघडले कुठे ! नवीन जाती निर्माण होतील.
             अधिका-यापासून कारकुनापर्यंत.... मालकापासून कामगारापर्यंत....शेतक-यापासून मजुरापर्यंत....उद्योगधंद्यातील प्रत्येक घटकापर्यंत.... अनेक जाती निर्माण होतील.

            पण हा भेदाभेद तरी संपेल. तो संपणे ही काळाची गरज आहे.

        समाजात तेव्हाच ' अच्छे दिन ' येतील. !!

                                  **** सुरेश इंगोले *****

Thursday, 30 June 2016

तुझा एक अलवार स्पर्श
            अजूनही मन शहारते ....!
तुझ्या सान्निध्याचा भास
             अवघी काया मोहरते....!
शिशीरातही फुलतो वसंत
              वठलेले मन बहरते......!
 तुझ्या साथीने मनपाखरु
               मुक्त होऊनी विहरते....!

सुरेश इंगोले.....
तुझा एक अलवार स्पर्श
            अजूनही मन शहारते ....!
तुझ्या सान्निध्याचा भास
             अवघी काया मोहरते....!
शिशीरातही फुलतो वसंत
              वठलेले मन बहरते......!
 तुझ्या साथीने मनपाखरु
               मुक्त होऊनी विहरते....!

सुरेश इंगोले.....