Sunday, 19 February 2017

काल गजानन महाराज प्रगटदिनानिमित्त सौ ला मंदिरात जायचे होते. संध्याकाळी चिरंजीव कॅब करुन पर्वतीच्या पायथ्याशी असलेल्या मंदिरात घेऊन गेले. चिकार गर्दी होती. मुख्य मंदिराच्या गर्भगृहात पोचायला पन्नास मिनिटे लागली.
                 
                  गर्भगृहाच्या बाहेर फोटो काढू नये अशी सूचना लिहिली होती. आत प्रवेश करताच उजव्या बाजूला दोन जण मोबाईलने व्हिडिओ शूटिंग करताना दिसले. स्वयंसेवक पुढे पुढे सरकण्याच्या वारंवार सूचना करीत होता. त्याचे तिकडे लक्ष नव्हते की मुद्दाम दुर्लक्ष करीत होता तोच जाणे...

                   मी त्याला ऐकू जाईल एवढ्या आवाजात सौ ला म्हणालो, " अगं ही पाण्याची बाटली पकड जरा. मला मूर्तीचे फोटो घ्यायचे आहेत." मी खिशातून मोबाईल काढण्यासाठी हात घातला तोच तो म्हणाला," अहो काका ! फोटो काढायला मनाई आहे. "
" कुणाला ? मला एकट्याला ?"
" अहो सर्वांनाच... '
" मग ते काय आहे?" मी अंगठा खांद्यावरून मागे नेत विचारले.
              त्याचे तिकडे लक्ष गेले तेव्हा तो जोरात ओरडून 'बंद करा हो मोबाईल ' असे त्यांना म्हणाला. पण त्यांचे शूटिंग सुरूच होते. मी त्या स्वयंसेवकाकडे रोखून पाहिले. त्याने नजर चुकविली.

              आम्ही जवळ पोचलो. सौ पूजा करणार तोच बाजूच्या दारातून पांढरा शुभ्र कुर्ता पायजमा व जाकिट घातलेली व डोक्यावर फरची टोपी घतलेली व्यक्ती हातात पूजेचे ताट घेऊन सरळ मूर्तीसमोर आली. त्याच्यामागे दोघे चेले होते.
         " अहो, काय हे !" मी पुजा-याला विचारले. " एक तासापासून आम्ही रांगेत उभे आहोत. हे मधेच कसे घुसतात ?''
    " ओ काका, त्यांना प्रचाराला जायचंय " एक चेला म्हणाला.
 पुजा-याने त्याचे ताट घेऊन पूजा केली. फरच्या टोपीने डोके टेकवले.
  " एक तास रांगेत उभे राहून यांनी पूजा केली असती तर या गर्दीला त्यांचा आदर वाटला असता. फुकाफुकी मतांची संख्या वाढली असती."मी बोललो.जाताजाता एका चेल्याने माझ्याकडे रोखून पहिले.
      रांगेतल्या एका ज्येष्ठ नागरिकाने आपली खंत दाखवली. "आताच हा उर्मटपणा आहे तर निवडून आल्यावर बघायलाच नको."

          बाहेर पडेपर्यंत मन विषादाने भरून गेले होते.
फाटकाजवळ फुगे विकणारे होते. नातीसाठी एक फुगा घेतला. त्या म्हातारीला पन्नासची नोट दिली. मला सुटे देण्यासाठी ती बटवा उपसू लागली. दहाच्या तीन व पन्नासची एक नोट अशा चार नोटा तिने मला दिल्या. मी तिच्याकडे पाहून हसलो.
" हिसाब नही आता ? या नोट नही समझते ? पचास की नोट क्यों वापस दे रही हो ?" तिला पन्नासची नोट परत करुन मी दहाची नोट घेतली...

              आता मन हलके हलके वाटत होते. परततांना मी कॅबमध्ये निवांत रेलून बसलो व डोळे मिटून घेतले...

                                              ***  सुरेश इंगोले  ***

Sunday, 22 January 2017

## जलिकट्टू ##

       सहज या भागात आलोच तर प्रमोदची भेट घ्यावी म्हणून त्याच्या घरात डोकावलो. " मिश्राजी है क्या ?" म्हणत घरात प्रवेश केला.
        नवरा बायकोचे भांडण सुरु होते. तो तिला बोलत होता. ती उलट उत्तरे देत होती. आल्या पावली परतायचे म्हणून मी वळलो तोच माझ्या कानावर पडले," आप हमेशा मुझे जलिकट्टू सुनाते हो।"
        माझ्यावर नजर जाताच दोघांचाही सूर जरा निवळला.
" जलिकट्टू नही पगली...वह तो सांडों का खेल है। तुम्हे जलीकटी सुनाता हूँ...ऐसा कहना था।"
        " देखा भाईसाहब, खुद ही कुबूल कर रहे है कि ये मुझे हमेशा जलीकटी सुनाते है।"

       प्रमोद मिश्राचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. त्याच्या खांद्यावर हात ठेवत मी म्हणालो, " बीवी को नीचा दिखाना मुश्किल ही नही, नामुमकिन है।"

                                           ## सुरेश इंगोले ##

Wednesday, 11 January 2017

जीवन खूप सुंदर आहे.
 
          जीवनाकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टीकोन भिन्न असू शकतो. एखाद्या प्रसंगाकडे आपण कोणत्या दृष्टीने बघतो त्यावर ते अवलंबून असते.

          काल नागपूरला मित्राला काही काम होते. मी सोबत होतो. नागपूरला सगळीकडे सिमेंटचे रस्ते बनविण्याचे काम चालू आहे. त्याला जेथे जायचे तेथे गाडी जात नव्हती म्हणून त्याने चौकातच बाजूला गाडी लावली. त्याने दहा मिनिटांत येतो म्हटल्यामुळे मी गाडीतच बसून होतो.

           सहजच आजूबाजूला पाहू लागलो. दुकानांमध्ये हल्ली शुकशुकाटच असतो. नोटबंदीचा परिणाम असावा. मात्र पतंजलीच्या दुकानात ब-यापैकी गर्दी होती. एका जोडप्याने आपल्या तीन-चार वर्षांच्या मुलीला बिस्कीटचा पुडा दिला होता. ती बिस्कीट खात खात बाहेर आली. फुटपाथच्या कडेला कोणा मजुराची दोन लहान मुले खेळत होती. ती मुले सुद्धा तीन आणि पाच-सहा वर्षांची असावीत. लहान तीन वर्षाचा मुलगा शेजारच्या हॉटेलकडे बोट दाखवून मोठ्या मुलाला काहीतरी सांगत होता. मोठ्या मुलाने त्याला धपाटा घातला. तो भोकाड पसरून रडायला लागला.

                  बिस्किट खाणा-या मुलीचे त्याच्याकडे लक्ष गेले. ती बराच वेळ त्या दोघांकडे पाहत होती. तिने दुकानाकडे नजर टाकून आपल्या आईवडिलांकडे पाहिले. मग ती खाली उतरून त्या मुलांकडे आली. तिने त्या रडणा-या मुलाला एक बिस्किट दिले. त्याने झटक्यात ते हिसकून तोंडात टाकले. ती मुलगी गोड हसली. दोन्ही मुलेसुद्धा हसू लागली. तिने आता मोठ्या मुलाला सुद्धा एक बिस्कीट दिले. धाकट्याला आणखी एक दिले. तिघेही हसत हसत बिस्किटे खाऊ लागली.

                हे निर्व्याज, निरागस हास्य पाहून माझ्याही चर्येवर हास्य फुलले. मी कौतुकाने त्यांच्याकडे पाहत होतो तेवढ्यात त्या मुलीची आई तरातरा आली आणि तिने तिच्या पाठीत एक धपाटा घातला. तिचा हात धरून तिला दुकानाकडेे नेले. ती काय बोलत होती हे मला ऐकू आले नाही.

                 एवढ्यात त्या दोन मुलांची आईही तेथे आली. मोठ्या मुलाने तिला काहीतरी सांगितले. त्याबरोबर तिनेही धाकट्याच्या पाठीत धपाटा घातला. मोठ्याने त्या मुलीकडे संकेत केला. तिच्याकडे पाहत त्या बाईने धाकट्याला पोटाशी घेतले.

                 गाडीचे काच बंद असल्यामुळे मला कोणाचेच बोलणे कळले नाही. पण......
मनात विचारांनी गर्दी केली.  आपण आपल्या मुलांवर संस्कार करतो. त्यांनी ते पाळावे याकडे कसोशीने लक्ष देतो. मग अशा प्रसंगाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा असावा...

                 त्या दोन्ही आयांनी कोणता निकष लावला असेल या प्रसंगाकडे बघण्याचा ?

                                        ***  सुरेश इंगोले  ***

Friday, 6 January 2017

***  नागपूरचा सी.ए.रोड नेहमीच गजबजलेला असतो. त्यातही संध्याकाळची वेळ म्हणजे लगीनघाई...ऑफिस सुटलेले लोक, क्लास सुटलेली मुले-मुली, ट्रॅफिक सिग्नलवर पुढे घुसण्याची घाई....उगाच या रस्त्याने आलो ही खंत निर्माण करणारी स्थिती...
            प्रत्येक सिग्नलला थांबावे लागल्याने चिडचिड झाली होती. अग्रसेन चौकातून मी गाडी पाचपावलीकडे वळवली. आता रस्त्याला सिग्नल नसल्यामुळे..किंवा बंद असल्यामुळे गर्दी वाढली. कशीबशी वाट काढत पुढे जात असताना सायकलवर तो दिसला.
              सायकलच्या कॅरिअरवर बसलेला सात-आठ वर्षांचा मुलगा. पस्तिशीतला हडकुळा, परिस्थितीने गांजलेला माणूस नेट लावून पॅडल मारीत होता व तो मुलगा कावराबावरा होऊन, घाबरून मागे माझ्या गाडीकडे पाहत होता. गाडी आत्ता धडकेल व आपण गाडीखाली येऊ ही मूर्तिमंत भीती त्याच्या चेह-यावर स्पष्ट दिसत होती.......

             ..... मला एकाएकी माझे बालपण आठवले. हाच प्रसंग थोड्याफार फरकाने तेव्हा घडला होता. मी सात-आठ वर्षांचाच असेल. वर्धेला मोठ्या मामांसोबत सायकलने निघालो होतो. बोरगाव - देवळीकडे जाणा-या पुलावर नेहमीच गर्दी असते.  पुलावर सायकल आल्यावर मामा नेट लावून पॅडल मारू लागला. सायकल कशीबशी वर सरकू लागली. तेवढ्यात मागून एक कार आली. मी दचकलो. ती आता सायकलला धडकणार म्हणून मी जाम घाबरलो. 'मामा..गाडी...मामा...गाडी..' असे ओरडू लागलो.
मामाचा श्वास फुलला होता. तो उतरू शकत नव्हता. तेवढे अंतर पार करणे गरजेचे होते. कारचा हॉर्न वाजू  लागला. ...आणि आता खिडकीतून डोके बाहेर काढून त्याने शिव्या द्यायला सुरवात केली.
  " दिखता नही क्या पीछेसे कार आ रही है... अपन फटीचर सायकल हटा..नही तो ठोक दूँगा ** "
मला कार धडकण्याची भीती तर होतीच पण कारवाल्याचा माजोरीपणा, सायकलवाल्याला क्षुद्र लेखण्याची वृत्ती ही त्याही वयात मनात खोलवर रुजली होती.....

     ......   माझ्या कारसमोरच्या सायकलवरील त्या मुलाच्या चर्येवरील ती भीती  भूतकाळ आठवून गेली. मी त्या मुलाकडे हसून पाहिले. नजरेने त्याला आश्वस्त केले. त्याच्या सायकलमागे माझी कार हळूहळू जाऊ लागली. आता गर्दी संपली होती. सायकलने वेग घेतला होता. मी बाजूने कार पुढे घेऊ शकत होतो. पण अजूनही मी मुद्दाम कार सायकलमागेच ठेवली होती.
                 तो मुलगा आता हसत होता. आपल्या सायकलने कारला जिंकल्याचा आनंद त्याच्या चर्येवर फुलला होता. पुढच्या वळणावर ती सायकल वळली. त्या मुलाने मागे वळून पाहिले. मी हात हलवला तसा त्यानेही गोड हसून हात हलवला.

                               ***   सुरेश इंगोले  ***

Tuesday, 27 December 2016

**  आंब्याचे  झाड  **

            एखादी गोष्ट सहजगत्या घडून जाते. त्यात काही योजकत्व नसते. घर बांधल्यावर पुढे फार मोठी जागा उपलब्ध असल्यामुळे एक आंब्याचे झाड मधोमध लावले होते. ते जसजसे मोठे होत गेले तसतशा त्याच्या खालच्या फांद्या छाटून त्याला एक आकार येत गेला.
              या पंधरा वर्षात त्याचं रुपांतर एका डेरेदार वृक्षात झालं. खालच्या फांद्या अशा विस्तारल्या की लहान मुले देखिल त्यांच्यावर खेळू बागडू शकतात.
              झाडाचा विस्तार एवढा झाला की इतर झाडांनी हळूहळू काढता पाय घेतला. आता राजासारखा तो एकटाच दिमाखात बहरत असतो, फुलत असतो. सर्व फळांचा राजा असलेला हा आंबा फेब्रुवारी ते जूनपर्यंत सर्वांना आकर्षित करीत असतो. मल्लिका जातीचे आकाराने मोठे असलेले फळ सर्वगुणसंपन्न आहे. त्याच्या कैरीचे लोणचे, आमचूर पावडर व गुळांबा खायला मिळतो तर पिकल्यावर दोन- तीन आंब्यांच्या गोड रसात कुटुंबाची चंगळ होते.

             घरी येणारे मित्र मंडळी घरात बसून गप्पा मारण्यापेक्षा अंगणात आम्रवृक्षाखाली बसून फोटो काढत हास्यविनोदात रमून जातात.
              मागच्या आठवड्यात फेसबुक मैत्रीतून जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झालेली मंडळी पिकनिक व ग्रेट भेट म्हणून घरी आली. शशांक व मीनल गिरडकर, प्रवीण व नीलांबरी कलाल, कांचन मडके, वसुधा वैद्य, वीणा डोंगरवार व वंदना देशभ्रतार आवर्जून भेटायला आले. घरात थोडावेळ बसून सगळे अंगणात आले. जणू आंब्याचे झाड त्यांना खुणावत होते. गप्पा, चेष्टा-मस्करी, हास्यविनोद यांनी आवार फुलून गेले. सर्वांनी खूप फोटो काढले त्यात आंब्याचे झाड ' सेलिब्रिटी ' सारखे मिरवीत होते.

            काल आमचे परममित्र श्री. शानूजी पंडित सहकुटुंब घरी आले. फेसबुकच्या आभासी जगातून ते आमच्या कुटुंबाचा घटक कधी झाले ते कळलेच नाही. कौटुंबिक हास्यविनोदात खूप रमलो आम्ही. झाडाने जणू साद घातल्याप्रमाणे सगळे त्याच्याभोवती पिंगा घालू लागले. त्यांचा नातू परत जायला तयार नव्हता एवढा जिव्हाळा हे घर...हे झाड लावतं व परत परत यायची ओढ निर्माण करतं....

           आम्हाला माणसं जमवण्याची व टिकवण्याची प्रेरणा या घराने...या आम्रवृक्षाने दिली हे त्याचे आमच्यावर उपकारच !
ज्याच्या ऋणात आम्हाला सदैव राहायला आवडेल ते हे आमचे
               आंब्याचे झाड !!  

                                               ***  सुरेश इंगोले. ***

Sunday, 25 December 2016

         
         ** आर डी  **
     आज पक्याची काही खैर नव्हती. एकतर त्याची चामडी सोलून निघेल किंवा हात पाय तरी मोडला जाईल अशी पारावरच्या टोळभैरवांची खात्री होती. कारण त्याने रवीशी पंगा घ्यायचे ठरविले होते.

      रवी त्या एरीयाचा गुंड होता. उंच, धिप्पाड, काळासावळा...हातभट्टीच्या दारूची ने-आण करणे, मटका-सट्टा खेळणे, छोट्या मोठ्या सुपा-या घेणे अशी कामे करुन त्याने आपली दहशत निर्माण केली होती. सगळेजण त्याला टरकून असत.

    पक्या कॉलेजात शिकत होता. देखणा, मिष्किल स्वभावाचा, खोडकर...पण सर्वांचा आवडता. शब्दांशी खेळणे त्याला आवडायचे. मित्रांना तो बीजे, टीपी, जेके, एमडी अशा नावांनी बोलवायचा. प्रचलित शब्दांना नवनवी रुपे देण्याचा त्याला छंद होता.

     पक्या नसल्यामुळे पारावर स्तब्धता होती पण तो दिसताच चैतन्याची लहर पसरली जणू. बीजे उर्फ भाावड्या ओरडला...पीके आला रे...
    पक्याने लगेच नोटबुक मांड्यासमोर धरले. ' पीके म्हणजे आमीरखान नव्हे... तू लेका...प्रकाश काळे..' सगळे हसले.
" कां उशीर केलास ?"
" अरे त्या शेळके काकांना घर दाखवले. म्हटलं, प्रत्येक बेडरूमला एबीसीेएल आहे. तर ते म्हणाले, एबीसीएल तर बंद पडली...अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड. मी म्हटलं...अहो काका.. एबीसीएल म्हणजे अटॅच्ड बाथरुम कम लॅट्रीन...." सगळे हसू लागले.
"ही एक रुम वेगळी कां असे विचारल्यावर सांगितले की तेथे नाईक एकटाच राहायचा पण इतर रुममध्येसुद्धा आपले सामान ठेवायचा. पक्का बीडीओ होता. म्हणून त्याच्या खोलीला वेगळे केले. तर म्हणाले, बीडीओ असूनही....
मी लगेच म्हणालो, ओ काका ! बीडीओ म्हणजे ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर नव्हे, भटाला दिली ओसरी..."
' आयला पक्या, तू कोणालाही फिरवतोस यार...'

      पक्याचा छंद सर्वांना माहीत होता. बीपी वाढलाय असं कुणी सांगितलं की बीपी खाऊ नका म्हणायचा. तो कन्फ्यूज होई मग हा सांगे...बीपी म्हणजे ब्रेड पकोडे....

         आज तो पारावर आल्याबरोबर सर्वांनी त्याच्याकडे रवीबद्दल तक्रार केली. तो कसा सगळ्यांना छळतो वगैरे...
" पक्का रानडुक्कर आहे साला..." पक्या बोलला. सगळ्यांनी त्याची री ओढली.
' आयडिया ! आपण त्याचं नावंच रानडुक्कर ठेवू. त्याच नावाने त्याला हाक मारू. ओके ?'
' स्वत:ची हाडं खिळखिळी करुन घ्यायची आहेत का ?'
' गपा रे...त्याला आरडी म्हणायचे...रानडुक्कर..त्याला कळणार नाही व आपल्याला म्हटल्याचे समाधान लाभेल.'
' नको रे बाबा...त्याला संशय येईल.'
'ठीक आहे. मी सुरुवात करतो.' असे म्हणून पक्या निघाला. रवी कोणाशी तरी तावातावाने बोलत होता.

.....  ....
         " काय आरडी..कसं काय ?" त्याच्या पाठीवर थाप मारत पक्या बोलला.
रवी गर्रकन वळला. "काय म्हणालास ?' त्याने डोळे वटारले.
" आर डी." पक्या शांतपणे म्हणाला." आजपासून आम्ही सर्वांनी तुला आरडी म्हणायचे ठरवले आहे. काय दोस्तांनो ?"
    सगळे चिडीचूप...
" काय टेरर आहे यार तुझं. कोणी बोलायलाही घाबरतं. एकाच एरीयात राहतो म्हटल्यावर मिळून मिसळून राहायला हवं ना.."
रवीला कसला तरी संशय आला. हे बेणं सरळ नाही हे त्याला ठाऊक होतं. त्याने पक्याचे बखोट धरले व दातओठ खाऊन बोलला..." आरडीचा अर्थ सांग आधी.."
  आता सगळेच टरकले होते. ती वेळ येऊन ठेपली होती.
पक्याने त्याचा हात झटकला. आणि शांतपणे म्हणाला, " हे बघ...तू आपल्या एरीयाचा भाई आहेस. दादा आहेस. रवी दादा. आजपासून आम्ही तुला रवी दादा म्हणजेच आरडी म्हणायचे ठरवले आहे.  काय दोस्तांनो....,"
हो.......सगळे एका सुरात
' चला तर मग म्हणा... आपला भाई कोण..?'
"आर डी...!" सगळे एकासुरात ओरडले..मनातल्या मनात ' रानडुक्कर' म्हणत.....

                      ***  सुरेश इंगोले.  ***

Wednesday, 21 December 2016

सहज सुचलेलं.....मनातलं.....

                 सोशिकपणाबद्दल आम्ही भारतीय विश्वप्रसिद्ध आहोत......कोई शक ?

           प्राचीन काळापासून अनेक राजे आलेत...अन्याय करुन गेलेत. आम्ही निमूट सहन केले.

           शक आले, हूण आले, मंगोल,मोगल, पोर्तुगीज आले.
फ्रेंच आले, इंग्रज आले...
           
            आम्ही उदार मनाने त्यांना आपले राज्य दिले. आपल्यावर अत्याचार करण्याची परवानगी दिली. त्यामुळे सोशिकपणा वाढतो हे जगाला दाखवून दिले.

           मग आम्हाला वाटले...परक्यांचा अत्याचार पाहिला, साहिला....आता आपल्यांचाच अत्याचार सहन करून पाहू.

           परक्यांना हुसकावून आम्ही आपले राज्य स्थापन केले.
आणि त्यांच्या अत्याचारासाठी सज्ज झालो.

           कायदा-नियम धाब्यावर बसवून, निरनिराळ्या क्लृप्त्या लढवून मनमानी करण्याची अनेक तंत्रे शोधली जाऊ लागली.
अनेक आमिषे दाखवून आवळा देऊन कोहळा काढण्याची किमया केली जाऊ लागली.

          ..... आणि आम्ही निमूटपणे सहन करीत आलो.
         
          आजही तेच सुरू आहे.

           आम्ही पै-पैशासाठी दिवसभर रांगेत उभे राहतो. पैसा मागच्या दाराने करोडोंच्या संख्येत मूठभरांच्या खिशात जातो.

           आम्ही हीन - दीन होऊन मंदिरात माथे टेकवून नवसाला जवळ असले-नसले पैसे पेटीत टाकतो. मंदिराच्या कोषागारात अब्जावधी रुपये, सोने-नाणे, हिरे-जवाहिर अगदी बेहिशेबी पडलेले असतात.

            आम्हाला अजूनही असं वाटत असतं की यातून चांगले काही तरी निष्पन्न होईल.

           अच्छे दिन येतील...

         .... नाहीतरी सोशिकपणाबद्दल आम्ही विश्वप्रसिद्ध आहोतच....

                                 *** सुरेश इंगोले ***