Saturday, 19 May 2018

#लमच्या

पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली हे जिल्हे झाडी पट्टी म्हणून ओळखले जातात. या भागात अतिशय दाट जंगल आहे. याच भागात चंद्रपुरजवळचे ताडोबा -अंधारी, उमरेड - करांडला, भंडाराजवळचे कोका - नागझिरा हे  व्याघ्रप्रकल्प प्रसिद्ध आहेत. दाट वनराईला झाडी म्हणतात. आणि हा भाग झाडीपट्टी म्हणून प्रसिद्ध आहे. येथल्या बोलीला झाडीबोली असे म्हणतात.

         या जिल्ह्यांना लागूनच असलेल्या मध्यप्रदेश, छत्तीसगड, आंध्रप्रदेश येथल्या भाषेचा प्रभाव स्थानिक मराठीवर पडलेला दिसून येतो. इथल्या भाषेत बरेचसे शब्द हिंदीतून आलेले आहेत. उच्चारसुद्धा हिंदीशी साधर्म्य साधून असतात. च ला च्य, ज ला ज्य, झ ला झ्य सामान्यपणे सगळीकडे उच्चारले जातात. बाहेरून येणा-या मराठी भाषिकाला ऐकताक्षणी हा फरक प्रकर्षाने जाणवतो.

           नवख्या मराठी भाषिकास वारंवार ऐकू येणारा एक सर्वसामान्य शब्द आहे...लमच्या !
       लमच्या, लमची हे शब्द एवढे रूढ झालेले आहेत की प्रत्येकाच्या बोलण्यात... प्रत्येक वाक्यात येत असतात.

---लमच्यानं अजून पैसे देल्ले न्हाई..

---- लमची ..गाडीबी बेज्या लेट हाये...

--- तुले सांगलो ना बे लमच्या ...उद्या ये म्हून...

--- हत् लमचं....आजई काई काम व्हत न्हाई...

--- आमदाराच्या मांगं मांगं कुत्र्यावानी फिरतेत लमचे...

                हा एवढा सार्वकालिक शब्द आला कुठून....?
मी भंडारा जिल्ह्यात नोकरीस लागलो आणि झाडीबोलीच्या अनेक शब्दांनी हैराण झालो. मुंबई, पुणे, खानदेश, कोकण सगळीकडे स्वैर संचारामुळे मला मराठीची सगळी रूपे अवगत झाली होती. पण हे फार विचित्र वाटत होते. हिंदीचा प्रभाव पदोपदी जाणवत होता. प्रचलित शब्दांची मूळ रुपे जाणून घेण्याची जिज्ञासा स्वस्थ बसू देत नव्हती. चिकाटीने मी त्यामागे लागलो.

          लमचा/लमची या शब्दाचे मूळ राजेशाहीत दडले आहे. राजाच्या राणीवशात अनेक राण्या असत. त्या व्यतिरिक्त दासी, बटीक यांच्याशी सुद्धा राजाचे संबंध असत. त्यांना राजापासून होणारे अपत्य दासीपुत्र, बटीकपुत्र मानले जात. इतिहासात याचे अनेक दाखले आहेत. त्यांच्या मुलांना ' बटकीचा' म्हणून संभावना केली जाई.

           मोगलकाळात दासींना लवंडी / लौंडी म्हटले जाई. दास, गुलाम यांना लौंडा/लवंडा म्हटले जाई. त्यामुळे दासींच्या मुलांमुलींना लवंडीचा / लवंडीची असे संबोधन मिळू लागले. कालांतराने हेच शब्द अपभ्रंश होऊन लमचा / लमची असे वापरले जाऊ लागले.
       
          *****      *****       *****

---हत् लमचं....येक घंटा टाईम लागला हे लिवाले....


                                         ***  सुरेश इंगोले. ***
#ब्येस_!!

भाषा हे संवादाचे माध्यम आहे. त्यांत नित्य नवी भर पडत असते. निरनिराळ्या भाषेतील शब्द कधी तत्सम कधी तद्भव स्वरुपात दाखल होत असतात. आपले अस्तित्व टिकवून ठेवतात.अशा निरनिराळ्या भाषेतील शब्दांनी आपली भाषा समृद्ध होत जाते.

     भारतावर राज्य करणा-या वेगवेगळ्या राज्यकर्त्यांनी आपापल्या भाषेतील शब्द प्राकृत मराठीत आणले. फारसी, उर्दू, इंग्रजी, फ्रेंच, पोर्तुगीज या भाषेतील कित्येक शब्द मराठीत दाखल झाले. रुजले, रुळले. प्रचलित झाले...रूढ झाले.

       आपल्या भाषेची गंमत ही की आपण मूळ शब्दांचा नीट उच्चार न करू शकल्यामुळे त्या शब्दांचे अपभ्रंश होऊन अर्थही बदलत गेले. आणि त्या बदललेल्या अर्थानेच ते शब्द आपण वापरतो.

            तर...... आजचा पहिला शब्द आहे ..ब्येस !
इंग्रजीतला BEST हा अतिशय.चांगला या अर्थाचा शब्द मराठीत सुरवातीला त्याच अर्थाने दाखल झाला. गो-या लोकांबरोबर स्थानिक उच्चशिक्षित, नंतर शिक्षित अशा लोकांनी हा शब्द वापरायला सुरवात केली.
... __ काय रे, किती मार्क मिळाले तिमाहीत ?
---- पंच्याऐंशी टक्के मिळाले अण्णा.
____ वा..वा...वा...बेस्ट ! अशीच प्रगती होऊ दे..

******         ******        ******       *******

_____ धोंडिबा, काय मग औंदा पीकपाणी कसं काय ?
______ तात्या, पाऊस चांगला येतोय. भरपूर पिकणार बरं शेती...
______ वा...वा... हे लई ब्येस व्हनार बरं... पोरीचं लगीन उरकतं की औंदा..

        हळूहळू ' ब्येस ' हा शब्द सामान्य जनमानसात एवढा रूढ झाला की तो बोथट होऊ लागला. त्याचा मूळ अर्थ नाहीसा होऊ लागला. आता ही उदाहरणे पहा....व ब्येस या शब्दाचे अर्थ पहा.....

___ काय गोविंदराव, काल शकूला पहायला मुलगा आला होता म्हणे... कसा आहे मुलगा ?
____ तेवढा काही साजरा न्हाई..पन ब्येस हाये...म्याटरीक झाला म्हंतेत...

_____ कशी झाली जवाई भाजी ? तुमाले आवडते म्हून केली खास..
_____ तशी ब्येस झाली...पन आमाशिक अयनी वाट्टे. तिखट मीठ कमी टाकलं वाट्टे तुमी....

____ कसा झाला आमच्या बालीचा डान्स ?
____ब्येस झाला....पन थे दुसरी पोरगी साजरी नाचत व्हती बॉ....!

*****
         आता मला सांगा...ब्येस चा हा अर्थ इंग्रजांना कळला असता तर .....
चुल्लूभर पानी में डूब के....खुदकुशी....केली असती ना !

++#पुढच्यावेळी_दुसरा_शब्द
                                                   ** सुरेश इंगोले **

Friday, 27 April 2018

#पुढच्यास ठेच_मागचा शहाणा

कुठल्या तरी कार्यक्रमाला जायचे होते. तयारी करून मित्राकडे गेलो. मला पाहताच त्याने खुंटीवरील कपडे काढले व घालू लागला. कपडे घालून होताच तो चपला घालणार तोच...

      .....त्याने अंगात काहीतरी संचारल्यासारखे थयथय नाचणे सुरू केले. आम्ही चकितच झालो. हे काय भलतेच ! तो अंगावरील कपडे ओरबाडू लागला. घाईघाईत शर्ट काढून फेकले. नाचत नाचतच पँट काढली आणि जोरजोरात झटकू लागला. ....आणि...पँटीतून एक पाल बाहेर पडली. ई...करीत सगळेच चित्कारले.

         त्याने पँट व शर्ट तीन तीनदा जोरजोरात झटकले.
" अरे, निघाली ना पाल ? आता काय तिची पिल्ले असतील का ?"  आम्ही त्याला हसत हसत टोकले.  पुन्हा कपडे चढवून तो आमच्यााबरोबर निघाला.

      ***
              या घटनेला कित्येक वर्षे लोटली.
आजही मी कपडे चढवताना आधी चांगले झटकून घेतो. सवयच लागली आहे जणू...न जाणो. ...एखादी पाल, किडा, झुरळ काहीतरी आत असले तर.....

                                  ***  सुरेश इंगोले. ***

Saturday, 10 March 2018

** आक्रित **

       आकाशात मळभ दाटून आले होते. पावसाचे दिवस नव्हते. मार्च महिन्यात थंडी कमी होत जाऊन उन्हाची तीव्रता वाढायला सुरुवात होते. विदर्भाचा उन्हाळा तसाही रखरखीतच. पण चैत्राची चाहूल मन उल्हसित करते. झाडांना नवीन पालवी फुटू लागते.

           पण कां कोण जाणे...या दोन तीन दिवसात वातावरण बदलले होते. कसे उदास वाटत होते.

             टाकीतले पाणी संपल्याची वर्दी आली. मी विहिरीवरचा मोटरपंप सुरू केला. आठ दहा मिनिटात टाकी भरते. पण पाचच मिनिटात विहिरीतून आवाज येऊ लागला. मी तडक जाऊन पाहिले. विहीर कोरडी पडू लागली होती. पंप उघडा पडला होता. पटकन पंप बंद केला. पोर्चमध्ये बसून विचार करू लागलो.

               या वर्षी मार्चमध्येच विहीर कोरडी होऊ लागली होती. पाण्याची पातळी खूप खोल गेल्याचे जाणवत होते. पूर्व विदर्भात ब-याच गावांमध्ये पाणी विकत घेतले जात असल्याच्या बातम्या कानावर येत होत्या. दक्षिण आफ्रिकेत पाण्याअभावी कित्येक गावे ओस पडू लागल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. ग्लोबल वार्मिंगचा विळखा आवळू लागल्याचीे जाणीव कासावीस करीत होती.

                रात्री जेवण झाल्यावर झोपण्यापुर्वी बातम्या पाहत होतो. ठिकठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष्य दाखवणा-या बातम्या पाहून मन विटून गेले. टीव्ही बंद करून झोपी गेलो.

                कसल्याशा कोलाहलाने जाग आली. काय झाले असावे हा विचार करीतच दार उघडले. पाहतो तर जागोजागी लोक घोळक्याने चर्चा करीत असलेले. चिंताक्रांत चेहरे पाहून मला कळेना काय झाले असे एकाएकी…..

                 पायात चपला घालून मी बाहेर आलो. मला पाहून एकजण पुढे आला.
-- काय झाले?...मी विचारले.
-- अहो सर, गावातल्या सर्व विहिरी रात्रीतून आटल्या.
-- काय? असे कसे शक्य आहे?
-- हो..सकाळपासून पाण्यासाठी धावाधाव सुरु आहे. कुठेच पाण्याचा थेंबही  मिळाला नाही. तुमची विहीर बघा विश्वास नसेल तर…

             मी लगबगीने विहिरीजवळ येऊन वाकून पाहिले. रात्रीतून चार पाच फूट पाणी आले असेल याची खात्री होती. पण हे काय? विहीर कोरडी ठक्क
होती. म्हणजे बातमी खरी होती तर….

            मला गरगरल्यासारखे झाले. हे देवा ! हे काय आक्रित घडते आहे...पाण्याअभावी तडफडून मारणार आहेस का सर्वांना….पाणी हेच जीवन मानतो आपण. हे जीवनच संपणार आता. पत्नी माझ्याजवळ येऊन बसली होती. तिला सर्व घटना कळल्या होत्या. कोणी कोणाला धीर द्यायचा हेच कळत नव्हते.

               टाकीत असलेले पाणी अत्यंत जपून वापरू या एवढाच निष्कर्ष तूर्तास निघाला होता. कसेबसे प्रातर्विधी व आन्हिके उरकून मी मोठ्या मुलास फोन लावला. येथले वर्तमान त्याला कसे कळवावे हा विचार करीत असतानाच तो घाब-या आवाजात बोलला,
“ अहो बाबा, आता तुम्हालाच फोन करणार होतो. एक भयंकर आक्रित घडलं आहे. रात्रीतून एकाएकी संपूर्ण शहरातील पाणी आटले आहे. पाण्यासाठी धावाधाव सुरु आहे. मी सकाळी वीस लिटरची कॅन आणली होती. बातमी कळल्यावर पुन्हा एखादी आणून ठेवावी म्हणून गेलो तर तो अडीचशे रुपये म्हणाला. “
“ मी त्यासाठीच फोन केला होता. येथेही तशीच परिस्थिती आहे. गावोगावी पाण्यासाठी धुमाकूळ सुरू आहे. आता भय्याला फोन करतो. तेथेही हंगामाच सुरू आसेल.”

         बराच वेळ आम्ही निष्फळ चर्चा करीत बसलो. थोड्या वेळाने मी मधल्या मुलाला फोन केला. बराच वेळ झाला तरी कोणी फोन उचलेना.
गाडी काढून त्याच्याकडे जायचा विचार करणार तोच लोकांनी रस्ते वाहतुक बंद पाडल्याच्या  बातम्या येऊ लागल्या. टीव्ही लावायची भीती वाटू लागली.

         सगळीकडे हाहाकार माजला होता. पाणी जनजीवनातून गायब झाले होते. पाण्यासाठी लोक काहीही करायला तयार झाले होते.

           अचानक फोन वाजला. भय्याचाच फोन होता. मी चटकन फोन कानाला लावला.
“ बाबा,” एवढेच बोलून तो गप्प झाला. रडवेला स्वर आणि भावना आवरण्याचा असफल प्रयत्न स्पष्ट जाणवत होता. मी त्याला इथल्या घटना सांगितल्या. तो बोलू लागला आणि तेथील विदारक परिस्थिती काळजाला घरे पाडू लागली. त्याच्या घरातील पाणी संपले होते व त्याची मुले पाण्यासाठी आकांत करीत होती. बाहेर पाणी मिळवण्याचा त्याने प्रयत्न केला. मोठ्या कसोशीने त्याला दीडशे रुपये देऊन एक बिसलेरीची बाटली मिळाली होती. घरी येताच दोन्ही मुलांनी तीवर झडप घातली व झटापटीत बाटली खाली पडून सांडली होती. मग धपाटे, ओरडणे या धांदलीत मोठ्या मुलाने उरलेली बाटली तोंडाला लावली होती. आता धाकट्याचा पाण्यासाठी आक्रोश सुरु होता. फोनमधून त्याचा तो आकांत ऐकवेना. पाणी घेऊन येतो असे सांगून मी फोन बंद केला. पत्नीने लगेच दोन-तीन बाटल्या मोठ्या पर्समध्ये टाकल्या. घराला कुलूप लावून मी स्कूटी बाहेर काढली.

          बाहेर रस्त्यावर सगळीकडे गर्दी, गोंधळ व झटापटी सुरु होत्या. गाडी चालवणे दुरापास्त झाले होते. कशीबशी वाट काढत होतो तेवढ्यात एका घोळक्याने गाडी अडविली. पाणी...पाणी...असे ते ओरडत होते. अनवधानाने पत्नीने पर्स पोटाशी घट्ट धरली. आणि घात झाला. एकाने झटक्यात पर्स ओढली. बाकीचे त्यावर तुटून पडले. तीनही पाण्याच्या बाटल्या त्यांच्या हाती लागल्या. आणि ओढाताणीत तीनही बाटल्या खाली पडून पाणी वाहू लागले. ते वाहणारे पाणी कोणी ओंजळीने प्यायचा प्रयत्न करू लागले. कोणी रस्त्यावरचे पाणी चाटू लागले.

       इकडे पत्नीने शेरू म्हणून टाहो फोडला आणि पाण्यासाठी हातपाय घासत ओक्साबोक्सी रडणारा शेरू डोळ्यासमोर येताच माझी शुद्ध हरपली……

        …...मी खडबडून उठून बसलो. शरीर थरथर कापत होते. मी माझ्याच बेडवर होतो. म्हणजे हे सारे स्वप्न होते तर….माय गॉड..!..मला सावरायला बराच वेळ लागला. पाण्याची धार पडत असल्याचा आवाज कानी आला व मी झटकन बाहेर आलो.

              सौ बेसिनजवळ ब्रश करीत होती व नळ सुरू होता. मी पुढे होऊन नळ बंद केला.
-- काय हो...काय झाले?
--- भांड्यात पाणी घेऊन दात घास . नळ सुरु ठेवू नकोस.
         ती फ्रेश होऊन येताच मी तिला माझे स्वप्न सविस्तर सांगितले. पाण्यासाठी तडफडणा-या शेरूचा भाग ऐकून ती शहारली.
“ यापुढे पाणी जपून वापरू या.,” ती खोल गेलेल्या आवाजात म्हणाली.

           एकाएकी बाहेर गलबला ऐकू येऊ लागला.
कसला गोंधळ आहे हे पाहण्यासाठी मी दार उघडले. लोक घोळक्या घोळक्याने चर्चा करीत होते. मला दाट शंका येऊ लागली. तेवढ्यात शेजारी लगबगीने विहिरीजवळ येऊन वाकून पाहू लागले. त्यांचा भकास चेहरा पाहून मी विचारले,” काय हो?”
“ दादा, टीव्हीवरच्या बातम्या पाहून मी घाबरून गेलो होतो. येऊन पाहिले तर विहीर साफ कोरडी. अहो, सा-या देशातले पाणी गडप झाले आहे. टीव्ही लावा…”
  पुढचे मला काहीच ऐकू आले नाही.

       …….         
                                      सुरेश इंगोले.
( It may happen one day. Be alert…! )

Saturday, 3 March 2018

दिल...
तुम्हारे रूखेपन से
आहत होकर
आँखों से
बहने लगता है...
मायूस होकर
हमसे
कहने लगता है...
" तुमसे अपना प्यार
  कहा नही जाता....
   हम से ये दर्द
   सहा नही जाता.....।"

                           सुरेश इंगोले

Tuesday, 27 February 2018

आम्ही प्रवासी घडीचे

प्रवास कधीच आणि कोणालाही चुकला नाही. सतत आपण कुठूनतरी कुठेतरी जात असतो. पृथ्वी, चंद्र, तारे हे खरे अविश्रांत प्रवासी. अथक चालणारे. गन्तव्यस्थान नसणारे. आपले गन्तव्य मात्र ठरलेले. घर ते कार्यालय ...शाळा, बाग, चित्रपटगृह, रंगमंदिर, मंडई....रोजचा प्रवास...

            लग्न, मुंज, बारसे, वाढदिवस, मरण, तेरावे...कितीतरी प्रसंगी प्रवास करावाच लागतो. निरनिराळ्या वाहनाने. दुचाकी, चारचाकी, बस, आगगाडी आणि विमानसुद्धा.. हल्ली प्रवासाला  कारण आणि साधन शोधावे लागत नाही. बाहेरचं जग खुणावत असतं. पहाड, दरी, हिरवाईने नटलेली सृष्टी, जगातली आश्चर्ये, जंगल, पशुपक्षी, सरोवर....निसर्ग साद घालत असतो..आपण हुंकार भरण्याची वाट पाहत !

            प्रवासाची तयारी करुन निघालो की सुखाचा प्रवास होण्यासाठी शुभेच्छांची बरसात होऊ लागते. हॅपी जर्नी, आपला प्रवास सुखाचा होवो, बॉन व्हॉयेज, आपकी यात्रा सुखमय हो इ.इ.
            प्रवासात असताना अधून मधून चौकशी करणारे फोन येतात. ख्यालीखुशाली विचारली जाते. क्षणाक्षणाची बित्तंबातमी देणारा भ्रमणध्वनी हा वर्तमानयुगाचा चमत्कार होय.

        ... पन्नास वर्षांपुर्वी किती वेगळी परिस्थिती होती ? प्रवासाची साधने तुटपुंजी होती. रेल्वे, बसगाड्या यांची संख्या फार कमी होती. जवळच्या ठिकाणी जायलासुद्धा खूप वेळ लागायचा. बाहेरगावी गेलेला माणूस परत घरी येईपर्यंत त्याची ख्यालीखुशाली कळत नसे. प्रवासाचे प्रसंग फार कमी येत. जवळचा प्रवास बैलगाड्यांनी केला जाई. पाचदहा मैलांचा प्रवास सायकलने होई. सारी नातलग मंडळी पंचक्रोशीच्या आतच राहायची. 

               दूरचा प्रवास करायचे प्रसंग क्वचितच येई. पण ते प्रसंग कायम लक्षात राहत. पेटी, होल्डॉल, वॉटरबॅग वगैरे सामान तयार असायचे. स्टेशनवर सोडायला बैलगाडी (दमणी) तयार असायची. आई हातावर दही घालायची. थोरांच्या पाया पडून होताच आजी पाठीवरून, गालावरून सुरकुतलेला हात फिरवत म्हणायची," बाबू, जपूून जाय. खिडकीच्या बाहेर हात नोको काढू. दारात नोको उभा राहू. बाहेरचं खाऊ नोको. डबा देल्ला हाये संगं. गावाले गेेल्यावर पत्रं टाकजो. जाय मा...सुखाचा राह्य.."
       
               सुखरूप पोहचल्याचे पत्र आठ दिवसांनी मिळायचे. तोवर इकडे सर्व व्यवहार सुरळीत चालायचे. कोणतेच अभद्र विचार कोणाच्याही मनात येत नसत. जगण्याला स्थैर्य होतं, सुरक्षितता होती. प्रवास खरोखर सुखाचा होत असे. त्यासाठी शुभेच्छा द्यायची गरज कोणालाच वाटत नसे.

            *   *    *    *     *    *     *     *      *    *

                आज आम्ही पुण्याहून नागपूरला जायला निघालो तेव्हा कुटुंबीय, शेजारी हॅपी जर्नीच्या शुभेच्छा देऊ लागले. ट्रॅव्हल्समध्ये बसल्यावर मुलाचा फोन आला. पोचताक्षणी फोन करा म्हणून सूचना मिळाल्या. त्यावरून हा सगळा प्रवासप्रपंच आठवला.

                                              ==+ सुरेश इंगोले  +===

राजभाषा मराठी

१९६६ मध्ये मराठीला राजभाषेचा दर्जा प्राप्त झाला आणि लगेचच सरकारी परिपत्रक आमच्या कार्यालयात येऊन धडकले. यापुढे कार्यालयाचे कामकाज मराठीतूनच व्हावे. आमचे संचालक श्री दारूवाला हे पारशी असल्यामुळे त्यांनी ते कदाचित न वाचताच आमच्या अवलोकनार्थ अग्रेषित केले. मी त्यावर मुद्दाम मराठीत स्वाक्षरी केली.
         मुंबईतील आमच्या कार्यालयाचे सगळे कामकाज इंग्रजीतच चालायचे. संचालकांशी संभाषण सुद्धा इंग्रजीतच करावे लागे. मराठीत कामकाज करणे म्हणजे कार्यालयीन पारिभाषिक शब्दांना पर्यायी शब्द शोधणे हे महाकठिण कर्म होते.
        मी आमच्या कार्यालयातला वयाने सर्वात लहान...केवळ एकोणीस वर्षांचा ! परिपक्वता आणि पोरकटपणा यांचे बेमालूम मिश्रण असलेला कर्मचारी.
        मी लगेचच सुटीचा अर्ज लिहिला. पारिभाषिक शब्दकोषाचा आधार घेऊन शुद्ध मराठीत अर्ज लिहून शिपायाकरवी पाठवून दिला. पारशीबावाची भंबेरी उडणार होती. हंगामा होणार होता. मी बोलावणे येण्याची वाट पाहू लागलो.
थोड्याच वेळाने शिपाई बोलवायला आला. मी आत गेलो.
(आता मला इंग्रजीचा आधार घ्यावाच लागेल.)
--What is this Mr. Ingole ?
-- Sir. Its my leave application.
-- Why didn't you write in English ?
--Sir, today we receive a circular mentioning the use of Marathi in daily routine work. So its my application in Marathi.
-- You know very well that I don't know Marathi.
-- Sir, please call Mr.Bhide to translate it. He is well educated among us.
      भिडे साहेबांना पाचारण करण्यात आले. दारुवाला साहेबांनी अर्ज त्यांच्याकडे टाकला.
      ते बराच वेळ अर्ज वाचत राहिले. माझ्याकडे करडी नजर टाकून म्हणाले," ही कोणती भाषा आहे ? "
      " मराठी.."
संचालक ?....Director
अंगुली मुद्रा केंद्र..?..Finger Print Bureau.
गुन्हा अन्वेषण विभाग ?..CID...Criminal Investigation Department.
माझा जबाब अशा पद्धतीने सुरु होता जणू मी फार मोठा गुन्हा केला होता.
पारिभाषिक शब्दांचे अर्थ विचारून झाल्यवर उरलेल्या अर्जाचा अर्थ सांगून जळजळीत नजरेने माझ्याकड पाहत भिडे साहेब निघून गेले.
             दारूवाला साहेब माझ्याकडे रोखून पाहत होते. अर्जावर स्वाक्षरी करीत ते म्हणाले, " Mr. Ingole, henceforth no Marathi..Only English."
---But Sir, the circular...."
--Forget it. I will send another circular tomorrow."

.........अशा त-हेने राजभाषेच्या परिपत्रकाचा त्याच दिवशी खून करण्यात आला. त्यानंतर बहुधा ते परिपत्रक बासनातच गुंडाळून राहिले असावे. कारण सीआयडी सहित सर्वच सरकारी कार्यालयांचे कामकाज आजतागायत इंग्रजीतूनच चालवले जात आहे. न्यायव्यवस्था हे याचे ज्वलंत उदाहरण आहे.
   
                                            **** सुरेश इंगोले ***