Monday, 16 March 2020

            *   रणरागिणी.  *

              होळीपासून मंजी आलीच नव्हती. चार दिवस वाट पाहून शेवटी परवा सौ.ने सगळी भांडी घासून घेतली. खूप दिवसांनी चाललेली भांडी घासायची तिची धडपड पाहून मी म्हणालो देखिल," परवापासून सांगतोय, की भांडी कमी आहेत तर लगेच घासून धुवून घे. पण ती आता तरी येईल म्हणून तू वाट पाहत बसलीस."

"मला वाटलं होतं येईल म्हणून. होळीपासूनच तिचा नवरा दारू पिऊन तिला त्रास देत असेल म्हणून आली नसेल."

" ती त्याचा प्रतिकारही करू शकत नाही. पाप्याचं पितर आहे नुसती." 
मी असे म्हणताच सौ लगेच म्हणाली, " म्हणजे तिने काय करावे ? नवऱ्यावर हात उगारावा का?"

" जो माणूस काही कमाई करीत नाही, बायकोच्या जीवावर नुसता बसून खातो, तिच्याच पैशाने दारू ढोसतो तो असून नसून काय फायदा? बायकोला मारणे, मुलांना मारणे आणि पैशाचा तगादा लावणे याशिवाय दुसरं करतो तरी काय तो ?"

   यावर सौ काही बोलली नाही. सगळ्या परिस्थितीची कल्पना होती आम्हाला.

आठ-दहा महिन्यांपूर्वी कुणाच्या तरी सांगण्यावरून ती काम मागायला आली होती. चौकशी केली असता कळले की ती याच गावची असून माझ्याच शाळेत शिकली आहे. मॅट्रिकपर्यंतच शिकल्यामुळे मी जरी तिला शिकवले नसले तरी ती मला ओळखत होती. तिचा नवराही गावातीलच होता व दोघांनी प्रेमविवाह केला होता. त्यांना एक दहा वर्षांची मुलगी व सहा सात वर्षांचा मुलगा होता. नवरा कोणत्या तरी कार्यालयात ड्रायव्हर म्हणून काम करीत होता.

तो दारू प्यायला लागला, दारूच्या आहारी गेला आणि घरात क्लेशाची ठिणगी पडली. त्याचा पगार दारूत जाऊ लागला आणि तिच्यावर घर चालवण्याची जबाबदारी आली. चार घरची धुणीभांडी करून ती घर चालवीत होती. पण मग त्याने दारूसाठी तिला पैसे मागायला सुरुवात केली. तिने नाही म्हटले तर मारायचा. ज्यांच्याकडे ती काम करायची त्यांच्याकडे पैसे मागायला हा जायचा. मग तिची ओढाताण व्हायची. धान्य, किराणा, भाजी इत्यादींसाठी पैसेच नसायचे. 

तिची संपूर्ण कहाणी ऐकल्यावर मी तिला काम देताना एक विचार मांडला. रकमेऐवजी वाणसामान घेऊन द्यायचे. म्हणजे तिच्या घरी मुले उपाशी तरी झोपणार नाही. तिने होकार दिला. 

ती माझ्याकडे काम करते हे त्याला माहीत होते पण मला ओळखत असल्याने तो पैसे मागायला स्वत: कधीच आला नाही.

मंजुळा फारच कृश होती. कुपोषित वाटायची. पण काम प्रामाणिकपणे करायची. एकदा मी सौ ला सांगत होतो,
" अगं, त्या गंगाने नवऱ्याला घरातून हाकलले आज."

" म्हणजे? असा कसा गेला तो ?" तिने विचारले," त्याने 
प्रतिकार नाही केला?"

" खूप पिऊन होता. धड उभा राहू शकत नव्हता. गंगाने धक्का दिल्यावर पडला तर उठणे मुश्किल झाले होते त्याला."

   कामे आटोपल्यावर मंजीला गंगाच्या घराकडे जातांना मी पाहिले. 

मागच्या महिन्यात मंजीच्या नवऱ्याची नोकरी गेली. दारू पिऊन कामावर गेल्यामुळे त्याला नोकरी गमवावी लागली. आता तो दिवसभर घरीच नशेत असायचा.

होळीच्या दिवशी खूप पिऊन मंजीच्या नवऱ्याने तमाशा सुरू केला. पैसे देत नाही म्हणून तिला अडकित्ता फेकून मारला. तिने स्वत:ला वाचवले तर तो तिच्या मुलाच्या डोक्याला लागला. खोक पडून रक्त वाहू लागले. दोघेही घाबरले होते. मुलाला दवाखान्यात नेऊन पट्टी बांधून आणले. 

   आता तरी मंजी कामावर येईल असे वाटले होते. पण ती आलीच नाही. 

   सकाळी मंजीची शेजारीण दवाखान्यात जात असताना सौ ला भेटली. तिच्याकडून कळाले की, मंजीने नवऱ्याला घराबाहेर हाकलले. या विधानावर विश्वास बसणे शक्य नव्हते. पण म्हणतात ना की बाई एकवेळ अबला असू शकेल पण एक आई आपल्या मुलांसाठी रणरागिणी बनू शकते. दुसऱ्या दिवशी पुन्हा तिच्या नवऱ्याने तिला मारायला सुरुवात केली तेव्हा तिच्या मुलाने बापाच्या कमरेला धरून ढकलले. बापाचा राग अनावर झाला आणि त्याने मुलाला मारण्यासाठी हात उगारला. त्यासरशी आवेशाने मंजीने नवऱ्याला जोराने ढकलले. तो उठायच्या आतच तिने काठी उगारली. आणि त्याला मारायला सुरुवात केली. धडपडत तो बाहेर पळाला. तिनेही नवऱ्याला तंबी दिली की घरात पाय ठेवायचा नाही. जेवायला ही मिळणार नाही. पुन्हा घराकडे फिरकायचे सुद्धा नाही. तिलाही माहित होते की बाहेर याचे थेरं कोणी खपवून घेणार नाही. आणि काही दिवसांनी सुतासारखा सरळ येईल.

   हे सगळे मला कळताच मी सौ ला म्हणालो की ती कामावर येईल तेव्हा तिला भरघोस बक्षिस देशील.

पोटच्या लेकरासाठी रणरागिणी बनलेल्या या मातेला मनोमन सलाम !

                 © सुरेश इंगोले.

Monday, 24 February 2020

#मराठीराजभाषादिन

    माझा मराठाचि बोलु कौतुके
    परि अमृतातेही पैजा जिंके !

     मराठीचा एवढा गौरव ज्ञानेश्वरांनी केला तो काय उगाचच..! संपूर्ण गीता त्यांनी प्राकृतात लिहिली. प्राकृत म्हणजे प्रकृतीनुसार बोलली जाणारी भाषा. पंचक्रोशीत बदलल्या जाणाऱ्या भाषेचे मूळ शेवटी मराठीच !

    आपल्या भाषेचा सार्थ अभिमान आपल्याला असावा. अन्य भाषेच्या सहवासात आपली भाषा रूप बदलते पण मूळ कायम असावे. फारसी, ऊर्दू, फ्रेंच, पुर्तगाली, इंग्रजी अशा अनेक भाषांचे आक्रमण आपल्या मराठीवर झाले. आज आपली मूळ भाषा एवढी बदलली आहे की शुद्ध मराठीत बोलू या म्हणून पैज लावली असता प्रत्येकजण हरत गेला. अन्य कोणत्या तरी भाषेचा शब्द ओठी यायचाच...

     आपल्या देशात लागलेले अनेक महत्त्वाचे शोध परकियांनी स्वत:च्या नावी केले. आपली संस्कृती महान असूनही आपण आजही परकियांचे अनुकरण करतो.

      तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो. आर्यांच्या कालखंडात एक अत्यंत हुशार मुलगा होता. त्यांचे नाव होते...जनार्दन आर्य !  त्याला सगळेजण "जनू" म्हणत.
   
      जात्याच प्रतिभावंत आणि बुद्धीमान असलेल्या जनूला राजाने हेरले. व राज्यकारभारात सामील करून घेतले. आपल्या बुद्धीमत्तेच्या जोरावर जनू अल्पावधीतच रयतेच्या गळ्यातील ताईत बनला. राज्याची भरभराट झाली. देशोदेशीचे राजे त्याचा सल्ला घेऊ लागले.  त्यांची कीर्ती दिगंतात पसरली. त्याचे नाव अजरामर झाले. प्रेमाने लोक त्याला जनू म्हणत तेव्हा तेच नाव रूढ झाले.

   जनूचे नावाने कालगणना सुरू करावी अशी मागणी होऊ लागली. त्याच काळात ग्रेगेरियन कॅलेंडरमध्ये जनूचे नाव समाविष्ट व्हावे यासाठी प्रयत्न केले गेले. त्याच्या नावाचा दबदबाच असा की वर्षाच्या पहिल्याच महिन्याला नाव जनूचे दिले गेले.

    #जनूआर्य या नावाने कॅलेंडर सुरू झाले. आजही सगळे जग जनू आर्यचे नाव घेते..

     आता तुमच्यावर इंग्रजी भाषेचा एवढा पगडा आहे की तुम्ही त्याला जानेवारी म्हणता. दुर्दैव तुमचे... दुसरं काय !!

             © सुरेश इंगोले

Tuesday, 17 September 2019

गगनभरारी घेत उडाले खग आकाशात
अंबर  घेई  द्विजगणांना  बाहुपाशात...
तू ही रे मानवा झेप घे कर्तृत्वाची छान
दिगंत लाभो कीर्ती तुजला वाढो तव शान..||

Monday, 15 July 2019

★  काटा  ★

काट्याच्या या अणीवर
ठेवले मी दोन्ही पाय
जगण्याच्या वेदनेला
नाही मिळत उपाय...।

काट्याच्याच अणीवर
उभा राहतो मी असा
ठणकत्या वेदनेचा
दिसू देत नाही ठसा...।

एक काटा ह्रदयात
असा सलत राहतो
वेदनेचा हा लंबक
सदा हलत राहतो.... ।

              ©सुरेश इंगोले..

Tuesday, 15 January 2019

★ हलणारं झाड  ★
                               ========

       तो असा काळ होता ज्यावेळी बऱ्यापैकी सुबत्ता होती. प्रत्येक हाताला काम मिळत होते. खूप सुधारणा झाल्या नव्हत्या. खेड्यापाड्यात वीज येऊन काही वर्षे लोटली होती. दळणवळणाची साधने मोजकीच होती. फाट्यावर एस.टी साठी दोन दोन तास वाट पाहावी लागे.

        खेड्यांची अवस्था फारशी चांगली नव्हती. आडगावी दोन चार कोस पायी चालत जावे लागे. सधन लोक घरच्या बैलगाडीने प्रवास करीत. रेंगी, छकडा, दमणी अशा ऐपतीनुसार गाड्या बाळगीत. खिल्लारी बैलांची जोडी असे. घरात नोकरचाकर असत. दूधदुभत्याची चंगळ असे. वीज आल्यापासून शेतात विहिरीवर मोटरपंप आले होते.

          आमचे गाव रसुलाबाद हे मुख्य रस्त्यापासून पश्चिमेकडून दोन किलोमीटर तर दक्षिणेकडून रेल्वेस्टेशनपासून आठ किलोमीटर अंतरावर होते. वर्धा जिल्ह्यातील एक छोटेसे गाव. भोवताल सदैव वाहणारे नाले. गाव तसे खोलात होते. अगदी जवळ गेले तरीही गाव दिसत नसे. नाला लागला की समजावे..गाव आले.

           मुंबई सोडून मी गावी आलो आणि विमा एजंट बनलो. गावोगावी फिरायचे. पॉलिसी मिळवायच्या. आणि प्रिमीयमची रकम भरायला वर्धा ऑफिसला जायचे. परत येताना बरेचदा रात्र व्हायची. गाड्या निघून गेल्या असल्या तर आठ किलोमीटर पायी चालत यायचे. घरी आल्यावर आई किंवा दादाजींच्या शिव्या खायच्या. त्याला कारणही तसेच होते. गावाच्या शिवेवर भुतं आहेत ही गावातल्या प्रत्येकाला खात्री होती. मी आजवर गावात राहत नसल्यामुळे मला याबद्दल माहिती नव्हती किंवा मी ती करूनही घेतली नव्हती. वैज्ञानिक दृष्टीकोन व शिक्षण यामुळे माझा यावर काडीचाही विश्वास नव्हता.

          एकदा वर्धेला प्रिमियम भरून परतायला उशीर झाला. संध्याकाळी भुसावळ पॅसेंजरने पुलगावला निघालो. योगायोगाने त्याच डब्यात माझा आतेभाऊ रमेश भेटला. गप्पांच्या ओघात त्याला विचारले की गावी कसे जाणार…
तो म्हणाला,” पुलगावला जाईन. तिथून आर्वीच्या गाडीने सोरट्याला उतरेन. तिथून रसुलाबादला पायी जाईन.”
   
  “ अरे पण आर्वीची गाडी पहाटे पाच वाजता सुटेल ना…”

  “ मग काय ? झोप होते छान गाडीत.”

  “ मग पुलगावहून पायी गेले तर काय होईल? अडीच कोस तर आहे.”
   
    “ एवढी तंगडेतोड कोन करंन…”

पायी जायला हा दाद देणार नाही याची मला खात्री पटली. मला अशी झोपमोड करायची नव्हती. अचानक माझ्या मनात एक विचार चमकून गेला. पुलगावच्या आधी कवठा नावाचे स्टेशन होते. तेथूनही रसुलाबाद आठ किलोमीटर होते. त्या रस्त्याने मी दोनतीनदा गावी गेलो होतो.

       गाडीची गती मंदावली तसा मी
म्हणालो, “.रमेश, कोणते स्टेशन आले रे?”

   “कवठा असंन.” असे म्हणत तो दारातून वाकून पाहू लागला. हळूहळू गाडी थांबली. एक प्रवासी उतरू लागला तसे मी त्याला खाली खेचले. त्यांना उतरू दे म्हणत त्याचा हात घट्ट धरून ठेवला. अशा आडगावी गाडी फक्त काही सेकंदच थांबते. रमेश गाडीत चढायला धावला पण मी त्याला घट्ट पकडून ठेवले होते. गाडी जाईपर्यंत मी त्याचा हात सोडला.नाही.

     गाडी निघून गेल्यावर त्याने मला खूप शिव्या घातल्या. मी नुसता हसत राहिलो. स्टेशनवरच झोपेन पण येणार नाही असा अडून बसल्यावर मी त्याला कारण विचारले. तेव्हा तो म्हणाला, “ गावच्या नाल्यापाशी एका झाडावर भूत हाये.”

     मी जोरजोराने हसू लागलो.

  “ असं भूतबीत काही नसते. मनाचे खेळ असतात सारे. “
असे म्हणून त्याला ओढत मी गावाच्या रस्त्याने चालू लागलो..
चालताना कोणाकोणाला त्या भुताने झपाटले याच्या गोष्टी तो सांगू लागला. मी त्या गोष्टीवरून त्याचे लक्ष दुसरीकडे वेधले जावे म्हणून मुंबईच्या फिल्मी ग्लॅमरच्या गोष्टी त्याला सांगायला सुरुवात केली.

   टिपूर चांदणं पडलं होतं. नीरव शांततेत आमच्या दोघांच्या पावलांचाच आवाज येत होता. गप्पांच्या नादात हळूहळू गाव जवळ आले. रस्त्याने वळण घेतले आणि रमेशचा आवाज बंद पडला.
चालताचालता त्याने माझा हात घट्ट धरला आणि थरथर कापू लागला.

     “ काय झालं रे?”
     “.गाव आलं.”
     “.मग?”
     “ म्या मनलं ना इथं भूत हाये म्हून…”
     “ कुठे आहे? तुला दिसले का? “
     “ नावराशीवर दिस्ते थे..”
     “ तुझ्या नावराशीवर दिसते का?”
     “ म्हाईत न्हाई.”
     “ माझ्या नावराशीवर नाही दिसत. तू काळजी करू नको. माझा हात घट्ट धरून ठेव. “
     “ तुले काय म्हाईत ?”
      “ अबे, माझा देवगण आहे. भुतं घाबरतात मला. चल !” असे म्हणून मी त्याला ओढत नेऊ लागलो. चालताना तो भिरभिर इकडेतिकडे पाहत होता. थोड्याच वेळात आम्ही नाल्याच्या काठाजवळ आलो.

      रमेश एकाएकी थबकला. भयभीत होऊन थरथर कापायला लागला.
     “ काय झालं रे?” मी त्याला गदागदा हरवले.

        त्याने एका झाडाकडे बोट दाखवले.
       झाड जोरजोरात हलत होते.

     “ अरे, वाऱ्याने हलतंय ते झाड.” मी बोलून गेलो.

     “ वारा कुठं हाये? बाकीचे झाडं कुठं हालून राह्यले?” तो थरथरतच म्हणाला. मी आजूबाजूला पाहिले. त्याच्या बोलण्यात तथ्य होते. वारा पडलेला होता. इतर झाडांची पानेही हलत नव्हती.

     माझ्या अंगावर सरसरून काटा आला.

   म्हणजे झाडावर नक्कीच काहीतरी असावे तर…
पण नेमके काय असेल ? भुतं खरोखर असतात का? कसे असते ते?

     माझ्याही अंगाला थरकाप सुटला. मती गुंग झाली. काही न सुचून मी एक दगड उचलला. रमेशने माझा हात धरला.
 
     “ गोटा नोको मारू..”
     “ कां बरं ?”
     “ असं म्हंतेत का थो गोटा पानी टाकून घासतेत आन् जसजसा थो झिजंन तसतसा मानूस झुरु झुरु मरतेत…”

        मी हसायला लागलो. “ असं कधी असते का रे..कसल्या भाकड गोष्टी वर विश्वास ठेवता तुम्ही लोक.” असे म्हणून मी तो दगड झाडाच्या दिशेने जोरात भिरकावला.
     झाड हलायचे थांबले.

   रमेश कान बंद करून खाली बसला. मी चमकलो. झाड हलायचं कां थांबलं….काही कळेना. मी दुसरा थोडा मोठा दगड उचलून ताकदीने झाडावर भिरकावला.

     आणि…..झाड पुन्हा जोरजोराने हलायला लागले. फांद्या वरखाली होऊ लागल्या. रमेश ताडकन उठला व त्याने घाबरून मला मिठी मारली. मी पुन्हा एक दगड मारला. आणि आता….

     झाडावरून हूप हूप असे विविध आवाज ऐकू येऊ लागले. सगळ्या फांद्यांवर उच्छाद सुरू झाला. या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारणारी माकडं पाहून मी सुटकेचा श्वास टाकला.

    रमेशची मिठी सोडवून मी त्याला अलग केले.
“ बघ, कुठे आहेत भुतं? माकडं आहेत झाडावर. त्यांच्या उड्या मारण्याने झाड हलत होते. भेकड लेकाचा….!” असे म्हणून मी  त्याला ओढत निघालो.
झाडाखालून जाताना रमेशने माझ्या हाताला झटका मारून हात सोडवला. व तो धूम पळत सुटला. मीही गावात शिरलो. घरी माझे नेहमीप्रमाणे स्वागत झाले. यावेळी दादाजींना मी सगळा किस्सा सांगून टाकला. त्यांचा कितपत विश्वास बसला कळले नाही.

       सकाळी आत्या मला शिव्या घालतच घरात शिरली. दादाजींनी तिला थोपवले तशी ती तावातावाने बोलू लागली.
“ थ्या रमशाले तुहं पोट्टं कवठ्याच्या रस्त्यानं रात्री घिवून आलं. नाल्याच्या चिचीच्या झाडावर भूत दिसलं म्हने. पोट्टं तापानं फनफनलं हाये. पार धोतर भरवून आलतं घरी.”
मी हात धरून तिला खाली बसवले. तिची समजूत काढली. देवघरातून उदबत्तीची राख आणून तिला देत सांगितले की “हा मंतरलेला अंगारा आहे. त्याच्या कपाळावर लावून अंगावरून उतरून टाक. लवकर आराम पडेल त्याला.”

       ती गेल्यावर दादाजींनी विचारले.” तुझा या गोष्टीवर विश्वास नाही ना.?”
  “ पण तिचा आहे ना..त्या विश्वासानेच त्याला आराम पडेल. मी तिला साधी उदबत्तीची राख दिली. कुठला अंगारा आणि कसलं काय…!”
           रमेश संध्याकाळ पर्यंत ठीक झाला. घरी आल्यावर मी त्याला म्हणालो, “ रमेश, आज रात्री वावरातून हुरडा आणायचा आहे. चालशील ना.. झाडाखालून जावं लागेल म्हणून विचारतोय.”
  तो चप्पल घेऊन माझ्यामागे धावला.


                                    ★★© सुरेश इंगोले ★★

     

Wednesday, 12 December 2018

★ #अरबांच्या_देशा ★★

@ अल्- जुबेल..(सौदी अरेबिया)

दम्मम एयरपोर्टवरून आम्ही अल्-जुबेलला निघालो. अंतर किमान शंभर किलोमीटर असेल. मोठमोठे सहा पदरी प्रशस्त रस्ते. रस्त्याच्या दुतर्फा झगझगीत दिवे. आणि ते ही पूर्ण रस्ताभर...अगदी अल्-जुबेलपर्यंत. ते गुळगुळीत रस्ते मला पचनी पडत नव्हते. खड्ड्यांच्या रस्त्यांची आम्हाला सवय. बरे, रहदारीचे नियम अत्यंत कडक. जागोजागी कॅमेरे लागलेले. गाड्यांचे स्पीड ठरलेले. कुठे नव्वद, शंभर तर कुठे एकशेवीस. मर्यादेबाहेर वेग वाढला की लगेच दंडाचा मेसेज मोबाईलवर हजर.
    शंभरच्या स्पीडने कार जात होती. रस्त्यावर तुरळक रहदारी होती. पराग म्हणाला,” बाबा, चालवता का कार ?”
“ नको रे बाबा, आम्हाला राईट हँड ड्राईव्हची सवय. ते स्टिअरिंग उलट वाटतं. उजव्या हाताला गिअरची सवय नाही. आणि एवढ्या स्पीडने गाडी चालवण्याची आता हिंमतही नाही.”
तो हसून म्हणाला,” येथे लहान कार्स दिसतही नाहीत. बाईक्स क्वचितच दिसतील. आणि हळू गाडी चालवणे म्हणजे मागच्या गाडीची धडक खाणे.”

     अल्-जुबेलमध्ये पराग जेथे राहतो तेथे बहुधा सर्वच भारतीय राहतात. त्यामुळे आपल्याच भागात असल्याचा फील येतो. तीन इमारतींना कंपाउंडने सुरक्षित केले आहे. तेथे सर्वजण आपले सणसमारंभ एकत्रितपणे साजरे करतात. सुट्यांमध्ये गेट-टुगेदर घेतात. आपल्या देशापासून आपण दूर आहोत या भावनेने त्यांच्यात एक जिव्हाळ्याचे बंध निर्माण झाले आहेत.

   दुसऱ्याच दिवशी आम्हाला भेटायला शेजारी येऊ लागले. बोलण्यातून परस्परांविषयीची आत्मीयता जाणवत होती. आम्हाला लवकरच त्यांनी आपल्यात सामावून घेतले. तेथे शुक्रवार व शनिवार साप्ताहिक सुटी असते. शुक्रवारी सर्वजण बाहेर गेट-टुगेदर साठी जातात. यावेळी दरीन बीचवर जायचे ठरले.


     सौदी अरेबिया हा देश वाळवंटात वसलेला आहे.तेथे पाण्याचे अत्यंत दुर्भिक्ष आहे. समुद्राचे पाणी प्रक्रिया करुन वापरले जाते. तेथे हिरवळ नाहीच. रस्त्याच्या दुतर्फा तुरळक झाडे दिसतात ती जाणीवपूर्वक लावलेली आहेत. अशा देशात बागेचा विचारही मनात येत नाही. पण दरीन बीचवर गेल्यावर मी आश्चर्याने थक्क झालो.

       समुद्राच्या किनाऱ्यावर एक भली मोठी बाग होती. हिरवळ,  मोठमोठी झाडे, मुलांचे खेळ, जागोजागी पार्किंग, स्वच्छतागृहे आणि सगळे नियोजनपूर्वक केलेले. स्वच्छता एवढी की गर्दी असूनही कुठेही एक कपटा देखिल नाही. मोठमोठे डस्टबिन्स जागोजागी ठेवलेले होते.

        बीचवर सर्वानी गप्पागोष्टी हास्यविनोद करीत छान दिवस घालवला. स्त्रियांना बुरखा आवश्यक असल्यामुळे बिचाऱ्यांना चेहऱ्यावर रंगरंगोटी शिवाय इतर कपड्यांची फॅशन करता येत नाही. सौ.ने खूप आवडीने साड्या व ड्रेस घेतले होते पण तिचा खूप विरस झाला. असो...जैसा देश वैसा भेस..!

       इथले मॉल्स खूप सुंदर, अवाढव्य व अत्याधुनिक आहेत. वेळ घालविण्याचे एक नित्याचे चैनीचे स्थान. त्यामुळे येथले मॉल्स फिरायला मजा येते. डॅशिंग कारमध्ये नातीच्या आग्रहावरून तेरा वर्षांनी बसलो. खूप मज्जा आली.

        सध्या सौदीला बरे दिवस येताहेत. नवीन राजा मोहम्मद बिन सुलतान थोडा आधुनिक विचारांचा असल्यामुळे स्त्रियांना काही अधिकार मिळताहेत. निवडणूक लढविण्याचा अधिकार, ड्रायव्हिंग करण्याचा अधिकार. मॉलमध्ये स्त्रिया काम करताना दिसताहेत. राजेशाहीचे एक बरे असते. लोक कायद्यांचे धाकाने पालन करतात. ज्या देशात कायदा पाळला जातो तेथील राज्यव्यवस्था उत्तम असते.
          

Tuesday, 27 November 2018

#अरबांच्या देशात..

    सौदी अरेबिया
सौदीला जाण्यासाठी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर लवकरच पोहोचलो. साडेनऊच्या फ्लाईटसाठी सहा साडेसहापर्यंत आत प्रवेश करावा म्हणून आम्ही बाहेरच फिरू लागलो आणि तेथील गर्दी पाहून दचकलोच. सगळे हजयात्री आबालवृद्ध तेथे फिरताना दिसले. ते आपल्यासोबत सौदीपर्यंत असणार हा विचार मनात येऊन इमिग्रेशन काउंटरला मोठमोठ्या रांगा असतील याची जाणीव झाली. आम्हाला सोडायला आलेल्या सारंगला अर्धा तास तरी बाहेर थांब असे बजावून आम्ही आत प्रवेश केला.

       बोर्डिंग पासच्या काउंटरला मोठ्या रांगा होत्याच. आम्ही रांगेत लागताच एका रक्षकाने आम्हाला बाजूला बोलावले. रिकाम्या काउंटरवर त्याने आमचा नंबर लावला. बोर्डिंग पास लगेच मिळाला. ज्येष्ठ नागरिक असल्याचा हा लाभ अप्रत्याशित होता. हाच अनुभव इमिग्रेशन काउंटरला देखिल आला. पंधरा मिनिटातच सारंगला फोन केला. तो चकितच झाला. त्याला फोनवरच निरोप दिला.

       दोन तास फोनवर परिचितांशी निरोपाचे बोलण्यात घालवले. साडेनऊला विमानाने उड्डाण केले. पराग, प्रियांका व आमची नात ऋग्वेदा दम्मम एअरपोर्टवर घ्यायला येणार होते. विमान वेळेआधीच पोचले तेव्हा परागला फोन करून कळवले. तो नुकताच विमानतळावर पोहोचला होता. म्हणाला, “ बाबा, लोक उतरण्याची घाई करून इमिग्रेशन काउंटरला गर्दी करतील.”
“ मी अशी घाई करणार नाही. कारण एकतर आम्ही अगदी मागे बसलोय. उतरायला वेळ लागणारच आणि झपाट्याने चालूही शकणार नाही. जे होईल ते बघू या. आम्ही बाहेर येईपर्यंत वाट पहा.”

       आमच्या सोबत एक ट्रॉलीब्याग होती. सर्वात शेवटी आम्ही दोघे कॉरिडॉर पार करू लागलो. चालताना सोयीचे व्हावे म्हणून मधे मधे रनिंग एस्कलेटर्स होते. थकणाऱ्या पावलांना तेवढाच आराम. त्यावर उभे राहिल्यावर सौ. ब्यागजवळ उभीच राहिली. मी मात्र त्यावरूनही चालत जावून पुढे तिची वाट पाहू लागलो..

       एस्कलेटर संपताच मागून बुरखा घातलेली एक स्त्री झपाट्याने पुढे झाली व आमची ब्याग उचलून चालू लागली. सौ एकदम ओरडली, “ ये हमारी ब्याग है।” मी क्षणभर अवाकच झालो. लगेच तिला आडवा होत बायकोला म्हणालो, “अरे, वो तुम्हें मदद कर रही होगी। मैडम, ये हमारी बैग है।” तिच्या हातून मी बैग काढून घेतली. ती झटकन पुढच्या बुरखाधारी बायांमध्ये मिसळून गेली. आता तिला काय ओळखणार, कप्पाळ !

       इमिग्रेशन काउंटरला अपेक्षेप्रमाणे गर्दी होतीच. आम्ही एका रांगेत लागलो. सफेद चोगा घातलेले अरबी वेशधारी कर्मचारी रांगेतील लोकांना सूचना देत फिरत होते. एकाचे आमच्याकडे लक्ष गेले. तो अरबी भाषेत काहीतरी बोलला. मला काही कळले नाही. तो परत उद्गारला, “ फस्टाईम ?” काही क्षणातच कळले की तो आमची पहिलीच वेळ आहे का हे विचारत होता. मी मान डोलावली. त्याने आम्हाला बोलावून एका रिकाम्या काउंटरला पाठवले.  दोन तीन मिनिटात आम्ही मोकळे झालो. ब्यागेज काउंटरवरून सूटकेसेस घेऊन बाहेर येत असताना ‘ आई..बाबा..’अशा हाका मारत ऋग्वेदा धावत येऊन बिलगली. आश्चर्य व्यक्त करून पराग म्हणाला, “एवढ्या लवकर कशी सुटका झाली?”
          त्याला फष्टाईम चा किस्सा सांगताना माझे बुरखाधारी प्रियंकाकडे लक्ष गेले. मी आजूबाजूला पाहिले. आणि सगळे माझ्या लक्षात आले..
              माझी बायको वगळता सर्वच स्त्रिया बुरख्यात होत्या.
तिच्यामुळेच त्या अरबाने आमचे फष्टाईम ओळखून आमची सुटका केली होती…. कदाचित तिला पाहूनच त्या स्त्रीने ब्याग पळवण्याचे धाडस करून पाहिले असेल…

        आता आजपासून बायकोला बुरख्यात पाहायची सवय करावी लागेल….

                       # © सुरेश इंगोले