Wednesday, 12 December 2018

★ #अरबांच्या_देशा ★★

@ अल्- जुबेल..(सौदी अरेबिया)

दम्मम एयरपोर्टवरून आम्ही अल्-जुबेलला निघालो. अंतर किमान शंभर किलोमीटर असेल. मोठमोठे सहा पदरी प्रशस्त रस्ते. रस्त्याच्या दुतर्फा झगझगीत दिवे. आणि ते ही पूर्ण रस्ताभर...अगदी अल्-जुबेलपर्यंत. ते गुळगुळीत रस्ते मला पचनी पडत नव्हते. खड्ड्यांच्या रस्त्यांची आम्हाला सवय. बरे, रहदारीचे नियम अत्यंत कडक. जागोजागी कॅमेरे लागलेले. गाड्यांचे स्पीड ठरलेले. कुठे नव्वद, शंभर तर कुठे एकशेवीस. मर्यादेबाहेर वेग वाढला की लगेच दंडाचा मेसेज मोबाईलवर हजर.
    शंभरच्या स्पीडने कार जात होती. रस्त्यावर तुरळक रहदारी होती. पराग म्हणाला,” बाबा, चालवता का कार ?”
“ नको रे बाबा, आम्हाला राईट हँड ड्राईव्हची सवय. ते स्टिअरिंग उलट वाटतं. उजव्या हाताला गिअरची सवय नाही. आणि एवढ्या स्पीडने गाडी चालवण्याची आता हिंमतही नाही.”
तो हसून म्हणाला,” येथे लहान कार्स दिसतही नाहीत. बाईक्स क्वचितच दिसतील. आणि हळू गाडी चालवणे म्हणजे मागच्या गाडीची धडक खाणे.”

     अल्-जुबेलमध्ये पराग जेथे राहतो तेथे बहुधा सर्वच भारतीय राहतात. त्यामुळे आपल्याच भागात असल्याचा फील येतो. तीन इमारतींना कंपाउंडने सुरक्षित केले आहे. तेथे सर्वजण आपले सणसमारंभ एकत्रितपणे साजरे करतात. सुट्यांमध्ये गेट-टुगेदर घेतात. आपल्या देशापासून आपण दूर आहोत या भावनेने त्यांच्यात एक जिव्हाळ्याचे बंध निर्माण झाले आहेत.

   दुसऱ्याच दिवशी आम्हाला भेटायला शेजारी येऊ लागले. बोलण्यातून परस्परांविषयीची आत्मीयता जाणवत होती. आम्हाला लवकरच त्यांनी आपल्यात सामावून घेतले. तेथे शुक्रवार व शनिवार साप्ताहिक सुटी असते. शुक्रवारी सर्वजण बाहेर गेट-टुगेदर साठी जातात. यावेळी दरीन बीचवर जायचे ठरले.


     सौदी अरेबिया हा देश वाळवंटात वसलेला आहे.तेथे पाण्याचे अत्यंत दुर्भिक्ष आहे. समुद्राचे पाणी प्रक्रिया करुन वापरले जाते. तेथे हिरवळ नाहीच. रस्त्याच्या दुतर्फा तुरळक झाडे दिसतात ती जाणीवपूर्वक लावलेली आहेत. अशा देशात बागेचा विचारही मनात येत नाही. पण दरीन बीचवर गेल्यावर मी आश्चर्याने थक्क झालो.

       समुद्राच्या किनाऱ्यावर एक भली मोठी बाग होती. हिरवळ,  मोठमोठी झाडे, मुलांचे खेळ, जागोजागी पार्किंग, स्वच्छतागृहे आणि सगळे नियोजनपूर्वक केलेले. स्वच्छता एवढी की गर्दी असूनही कुठेही एक कपटा देखिल नाही. मोठमोठे डस्टबिन्स जागोजागी ठेवलेले होते.

        बीचवर सर्वानी गप्पागोष्टी हास्यविनोद करीत छान दिवस घालवला. स्त्रियांना बुरखा आवश्यक असल्यामुळे बिचाऱ्यांना चेहऱ्यावर रंगरंगोटी शिवाय इतर कपड्यांची फॅशन करता येत नाही. सौ.ने खूप आवडीने साड्या व ड्रेस घेतले होते पण तिचा खूप विरस झाला. असो...जैसा देश वैसा भेस..!

       इथले मॉल्स खूप सुंदर, अवाढव्य व अत्याधुनिक आहेत. वेळ घालविण्याचे एक नित्याचे चैनीचे स्थान. त्यामुळे येथले मॉल्स फिरायला मजा येते. डॅशिंग कारमध्ये नातीच्या आग्रहावरून तेरा वर्षांनी बसलो. खूप मज्जा आली.

        सध्या सौदीला बरे दिवस येताहेत. नवीन राजा मोहम्मद बिन सुलतान थोडा आधुनिक विचारांचा असल्यामुळे स्त्रियांना काही अधिकार मिळताहेत. निवडणूक लढविण्याचा अधिकार, ड्रायव्हिंग करण्याचा अधिकार. मॉलमध्ये स्त्रिया काम करताना दिसताहेत. राजेशाहीचे एक बरे असते. लोक कायद्यांचे धाकाने पालन करतात. ज्या देशात कायदा पाळला जातो तेथील राज्यव्यवस्था उत्तम असते.
          

Tuesday, 27 November 2018

#अरबांच्या देशात..

    सौदी अरेबिया
सौदीला जाण्यासाठी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर लवकरच पोहोचलो. साडेनऊच्या फ्लाईटसाठी सहा साडेसहापर्यंत आत प्रवेश करावा म्हणून आम्ही बाहेरच फिरू लागलो आणि तेथील गर्दी पाहून दचकलोच. सगळे हजयात्री आबालवृद्ध तेथे फिरताना दिसले. ते आपल्यासोबत सौदीपर्यंत असणार हा विचार मनात येऊन इमिग्रेशन काउंटरला मोठमोठ्या रांगा असतील याची जाणीव झाली. आम्हाला सोडायला आलेल्या सारंगला अर्धा तास तरी बाहेर थांब असे बजावून आम्ही आत प्रवेश केला.

       बोर्डिंग पासच्या काउंटरला मोठ्या रांगा होत्याच. आम्ही रांगेत लागताच एका रक्षकाने आम्हाला बाजूला बोलावले. रिकाम्या काउंटरवर त्याने आमचा नंबर लावला. बोर्डिंग पास लगेच मिळाला. ज्येष्ठ नागरिक असल्याचा हा लाभ अप्रत्याशित होता. हाच अनुभव इमिग्रेशन काउंटरला देखिल आला. पंधरा मिनिटातच सारंगला फोन केला. तो चकितच झाला. त्याला फोनवरच निरोप दिला.

       दोन तास फोनवर परिचितांशी निरोपाचे बोलण्यात घालवले. साडेनऊला विमानाने उड्डाण केले. पराग, प्रियांका व आमची नात ऋग्वेदा दम्मम एअरपोर्टवर घ्यायला येणार होते. विमान वेळेआधीच पोचले तेव्हा परागला फोन करून कळवले. तो नुकताच विमानतळावर पोहोचला होता. म्हणाला, “ बाबा, लोक उतरण्याची घाई करून इमिग्रेशन काउंटरला गर्दी करतील.”
“ मी अशी घाई करणार नाही. कारण एकतर आम्ही अगदी मागे बसलोय. उतरायला वेळ लागणारच आणि झपाट्याने चालूही शकणार नाही. जे होईल ते बघू या. आम्ही बाहेर येईपर्यंत वाट पहा.”

       आमच्या सोबत एक ट्रॉलीब्याग होती. सर्वात शेवटी आम्ही दोघे कॉरिडॉर पार करू लागलो. चालताना सोयीचे व्हावे म्हणून मधे मधे रनिंग एस्कलेटर्स होते. थकणाऱ्या पावलांना तेवढाच आराम. त्यावर उभे राहिल्यावर सौ. ब्यागजवळ उभीच राहिली. मी मात्र त्यावरूनही चालत जावून पुढे तिची वाट पाहू लागलो..

       एस्कलेटर संपताच मागून बुरखा घातलेली एक स्त्री झपाट्याने पुढे झाली व आमची ब्याग उचलून चालू लागली. सौ एकदम ओरडली, “ ये हमारी ब्याग है।” मी क्षणभर अवाकच झालो. लगेच तिला आडवा होत बायकोला म्हणालो, “अरे, वो तुम्हें मदद कर रही होगी। मैडम, ये हमारी बैग है।” तिच्या हातून मी बैग काढून घेतली. ती झटकन पुढच्या बुरखाधारी बायांमध्ये मिसळून गेली. आता तिला काय ओळखणार, कप्पाळ !

       इमिग्रेशन काउंटरला अपेक्षेप्रमाणे गर्दी होतीच. आम्ही एका रांगेत लागलो. सफेद चोगा घातलेले अरबी वेशधारी कर्मचारी रांगेतील लोकांना सूचना देत फिरत होते. एकाचे आमच्याकडे लक्ष गेले. तो अरबी भाषेत काहीतरी बोलला. मला काही कळले नाही. तो परत उद्गारला, “ फस्टाईम ?” काही क्षणातच कळले की तो आमची पहिलीच वेळ आहे का हे विचारत होता. मी मान डोलावली. त्याने आम्हाला बोलावून एका रिकाम्या काउंटरला पाठवले.  दोन तीन मिनिटात आम्ही मोकळे झालो. ब्यागेज काउंटरवरून सूटकेसेस घेऊन बाहेर येत असताना ‘ आई..बाबा..’अशा हाका मारत ऋग्वेदा धावत येऊन बिलगली. आश्चर्य व्यक्त करून पराग म्हणाला, “एवढ्या लवकर कशी सुटका झाली?”
          त्याला फष्टाईम चा किस्सा सांगताना माझे बुरखाधारी प्रियंकाकडे लक्ष गेले. मी आजूबाजूला पाहिले. आणि सगळे माझ्या लक्षात आले..
              माझी बायको वगळता सर्वच स्त्रिया बुरख्यात होत्या.
तिच्यामुळेच त्या अरबाने आमचे फष्टाईम ओळखून आमची सुटका केली होती…. कदाचित तिला पाहूनच त्या स्त्रीने ब्याग पळवण्याचे धाडस करून पाहिले असेल…

        आता आजपासून बायकोला बुरख्यात पाहायची सवय करावी लागेल….

                       # © सुरेश इंगोले

Thursday, 20 September 2018

नातू अंगणात खेळत होता.
मी पोर्चमध्ये झोपाळ्यावर बसून पेपर वाचत होतो.
बाहेरच्या गेटजवळ गाडी थांबली तसा नातू ओरडला,
"बाबा, डॉक्टर काका आले."
" ये रे चहा घ्यायला.!" मी हात हालवून त्याला बोलावले.
"नाही काका, घाई आहे" म्हणत त्याने एक पत्रिका शौर्यजवळ दिली व गाडी पलटवून निघून गेला.
   शौर्य पत्रिका घेऊन आला. तेवढ्यात सौ बाहेर आली.
" कोण आले होते? कसली पत्रिका आहे?" तिने विचारले.
" अगं, डॉक्टरच्या मुलाचा वाढदिवस आहे. तोच आला होता पत्रिका घेऊन.." पत्रिका वाचत मी तिला माहिती दिली.
" अरे....बाहेरच्या बाहेरून गेला. घरात आलाही नाही." सौ म्हणाली.
तसा शौर्य म्हणाला, " अगं...बाबा रोज apple खातात नं."
"मग काय झालं?" ती म्हणाली.
" म्हणून डॉक्टर काका घरात येत नाहीत. An apple a day, keeps doctor away."

           मी व सौ एकमेकांच्या तोंडाकडे पाहत राहिलो.

हे आजकालचे पोट्टे ना....कुठला कुठं संबंध लावतील..काही नेम नाही.

                                     ©सुरेश इंगोले.

Saturday, 1 September 2018

श्रावण

आषाढाचा विरतो पडघम
लयीत करतो पाऊस नर्तन
हिरवळलेल्या सृष्टीवरती
हळुच आगमन करतो श्रावण..।
   भारतीय पंचांगातील बाराही महिन्यांना एक वलय आहे. चैत्रातल्या वसंतोत्सवापासून तो फाल्गुनातल्या पानगळीपर्यंत प्रत्येक महिना आपली एक अमीट छाप सोडून जातो. त्यातही श्रावणाची लीला अगाध आहे. चातुर्मासाची सुरुवात करुन देणारा हा महिना सर्वच दृष्टीने अविस्मरणीय असतो.

      मुख्य सणांचा प्रारंभच या महिन्यापासून होतो. सुरुवात श्रावणी सोमवारपासून होते. नागपंचमी, रक्षाबंधन, गोकुळअष्टमी या सणांनी उत्सवप्रियतेला चालना मिळते. खरी मजा येते ती गोकुळ अष्टमीच्या दहीहंडीला.

     आमच्या लहानपणी आजच्यासारखा गोविंदांचा माहौल नव्हता. पण शम्मीकपूरचा ‘ ब्लफमास्टर ‘ चित्रपट प्रदर्शित झाला आणि ‘ गोविंदा आला रे आला ‘ या गाण्याने धूम मचवली.. गावोगावी सार्वजनिक दहीहंडीच्या शर्यती लावणे सुरू झाले. गावोगावी आखाडे होतेच. आखाड्यातल्या तरुणांनी सराव सुरू केला.

        मी आर्वीला असताना तेलंगराय मोहल्ल्यातल्या एका आखाड्यात जायचो. इच्छा नसतानाही तीर्थरूपांच्या धाकाने काही काळ मी आखाड्याच्या वस्तादाच्या कानपिचक्या खाल्ल्या आहेत. 1963 मध्ये ब्लफमास्टर आला...गाजला तेव्हा मी नागपूरला कॉलेजमध्ये शिकत होतो. रक्षाबंधनाच्या निमित्ताने आर्वीला आलो तेव्हा मित्रांनी मला आखाड्यात नेले. तेथे दहीहंडी फोडण्यासाठी रिंगणात सराव सुरू होता. मी चकित झालो. तीन चार थर रचून होताच सगळे धडाधड पडत. हंडी फोडणारा मुलगा चढू लागला की सारे थर कोसळत.

      वस्तादचे माझ्याकडे लक्ष जाताच ते म्हणाले,” अरे, हा बारका आहे. याला चढवा वर.” मी जाम टरकलो.  विरोध करून पाहिला. पण वस्तादपुढे काही चालणार नव्हते. माझाही सराव सुरू झाला. तीन थर रचून होताच मी वर चढताना आपला जीव वाचवत यशस्वी प्रयत्न केला. सर्वांनी टाळ्या वाजवल्या.

       गोकुळ अष्टमीला आमच्या मोहल्ल्यातल्या दहीहंडीसाठी आमच्या आखाड्याचे गोविंदा जमले. एकावन्न रुपयांचे बक्षीस होते. दोन तीन प्रयत्न अयशस्वी झाल्यावर एकदाचे तीन थर लागले. मला इशारा करण्यात आला. मी कमरेला शेला बांधून
धडधाकट तरुणांच्या खांद्यावर पाय रोवत वर वर चढू लागलो. गाणी कर्कश आवाजात तर बँड जोरजोरात वाजत होता. मला खाली पाडण्यासाठी बरेच प्रयत्न चालू होते. मी माझे लक्ष हंडीवर केंद्रित केले व शेवटच्या थरावर उभा राहण्याच्या  प्रयत्नात डगमगू लागलो. लोकांचा गोंगाट वाढला. आता आपण पडल्याशिवाय राहत नाही याची खात्री होताच मी उसळून हंडी टांगलेला दोर पकडला. दोराला हिसका बसताच माझे पाय लटपटले. आणि धडाधड थर कोसळले. मी दोराला लटकून लोंबकळत राहिलो.

          क्या सीन होगा बॉस..? आजच्यासारखे मोबाईल असते तर किती व्हिडीओ शूट झाले असते.

          त्या काळी मी खरेच बारका होतो. नाहीतर दोर तुटून खाली आपटून हातपाय मोडून घेतले असते. त्याही अवस्थेत माझे लक्ष हंडीवरील एकावन्न रुपयांकडे लागले होते. मी एका हाताने लटकून दुसऱ्या हाताने हंडी उपडी केली. त्यावरच्या दोन नोटा, पन्नास व एक रुपयांच्या मुठीत घट्ट धरुन ठेवल्या. तोवर मला उतरवण्यासाठी परत थर रचण्यास सुरुवात झाली होती. मी यशस्वीपणे खाली उतरू शकणार होतो. पण…..

           अचानक माझे लक्ष घोळक्याकडे गेले. आणि आमचे तीर्थरूप तेथे दिसले. घाबरून माझा हात सुटला आणि मी थर रचणाऱ्या मुलांच्या अंगावर येऊन पडलो. सारे आडवेतिडवे कोसळले..

           कोणीतरी मला उचलले. कपडे झटकत मी पाहिले. तीर्थरूप माझी पाठ थोपटत होते. मला हायसे वाटले. एकावन्न रुपयांची वाटणी करताना मोठा पाच रुपयांचा वाटा मला मिळाला. त्यापेक्षाही वडील रागावले नाहीत याचा आनंद फार मोठा होता.

            पुढे 1966 मध्ये मी मुंबई येथे नोकरीला लागलो असताना गोविंदांची.पथके हंडी फोडताना पाहून ही घटना आठवायची.

           तेव्हापासून श्रावण माझ्याकरीता अविस्मरणीय झाला.

                   ★★ सुरेश इंगोले ★★

Wednesday, 29 August 2018

#श्रावणस्पर्धा5
#चित्रचारोळी1

भरले मोदकाचे ताट
माझ्या गणरायासाठी
किती आसुसून पाहे
ओठंगून माझ्या पाठी....।

              ★  सुरेश#श्रावणस्पर्धा5
#चित्रचारोळी2

अतिप्रीय मोदक असे गणेशास फार
उडवू कसे हळुच ते, करी तो विचार
मातेस बेत कळला, हसली मनी ती
हे लाड पूर्ण व्हावे….असते सुनीती ||
               ★  सुरेश इंगोले। ★ इंगोले  ★

Monday, 27 August 2018

चित्रचारोळी1

नाही अन्न नाही वस्त्र
घर  पडलं  गहाण...
लेक माझा गिरवतो
मेरा भारत महान....।
           ★ सुरेश इंगोले  ★

चित्रचारोळी2

गरिबी पाचवीला पुजलेली
सारी स्वप्ने मनात कुजलेली
उष्ट्या अन्नावर पोसतो हा देह
सोडू नको पोरा शिक्षणाचा मोह…||
          ★ सुरेश इंगोले  ★

Friday, 24 August 2018

#श्रावणस्पर्धा#
#चित्रचारोळी२#

प्रतिमूर्ति तू होउन माझी
बसला देवाच्या दारी....
मुखवट्यांच्या जगात या
पाषाणाला मोलच भारी..||

          ★ सुरेश इंगोले  ★