Thursday, 21 June 2018

        ★ भूकंप ★


      मुंबईला नोकरी करीत असताना मी दादरला राहत असे. रोज 9.35 च्या लोकलने व्हीटीला जात असे. माझा रुम पार्टनर होता सुधाकर मुदलियार. माझ्या दुप्पट वयाचा. मी विशीचा तर तो चाळिशीचा. फार प्रेमळ होता. माझ्यावर त्याचा फार जीव. वय वाढले पण राहायची सोय नसल्यामुळे बिचारा लग्न करू शकत नव्हता. गर्लफ्रेंडसोबत त्याला दादरच्या चौपाटीवर मी बरेचदा पाहिले होते. पण मी मुद्दाम त्यांच्या समोर जात नव्हतो. एकदा मी दिसल्यावर त्याने हाक मारून बोलावले व तिची ओळख करून दिली होती. त्याला साजेशीच होती ती. काळी सावळी पण रेखीव. ख्रिश्चन होती बहुधा. फ्रेनी होते तिचे नाव. दोघेही घराच्या विवंचनेत असायचे.

         तो बहुधा रोजच आंटीच्या गुत्त्यावर जायचा. मला याची जाणीव नव्हती.. एकदा रात्रीचे दहा वाजून गेले तरी तो आला नाही. मी काळजीने चौकशी केली तेव्हा शेजारचा चंदू मला गुत्त्यावर घेऊन गेला. मला पाहून सुधाकर भडकला. मला कशाला आणले म्हणून चंदूला रागावला. तुझ्याच काळजीने तो बेजार झाला असे चंदूने सांगताच त्याने मला तेथेच मिठी मारली. आपली काळजी करणारे कुणीतरी आहे या भावनेने तो बराच बदलला.

        एकदा माटुंगा - दादर दरम्यान दोन लोकलची टक्कर झाली. हाहाकार माजला. मी त्याच लोकलने व्हीटीला.जायचो. रेल्वे रुळांवरून चालत जात आम्ही काही सहप्रवासी अपघातस्थळी पोचलो. तेथील द्रुष्य भयानक होते. प्रेतांचा खच पडला होता. पोलीस, बाजूच्या झोपडपट्टीतले लोक प्रेताच्या खिशातला ऐवज, घड्याळ, दागिने काढून प्रेताला ढिगावर फेकून देत. पाहूनच अंगावर काटा आला. मी ऑफिसला गेलोच नाही. कर्णोपकर्णी बातमी पसरताच सुधाकर काळजीत पडला. मी त्याच लोकलने जायचो हे त्याला माहीत होते. त्याने माझ्या ऑफिसला फोन लावला. मी ऑफिसला आलोच नाही व काही निरोपही नाही हे कळताच तो कामावरुन तडक दादरला रुमवर आला. दार वाजले तसा मी उठलो व दार उघडले. मी समोर दिसताच त्याने एक माझ्या कानाखाली लावली व शिव्या देऊ लागला. मी गालावर हात ठेवून ऐकत राहिलो. अपघात पाहून मला जबरदस्त धक्का बसला होता. घरापासून, आईवडील भावंडापासून शेकडो मैल दूर आपली चौकशी करणारे कोण आहे या विचाराने मन विषण्ण झाले होते. सुधाकरच्या मायेपोटी मारलेल्या फटक्याने मी भारावलो व त्याला मिठी मारून रडू लागलो.

        ऑफिसमधील माझे जिवलग मित्र अर्थात विदर्भातले… डोंबिवलीला रेल्वे क्वार्टरमध्ये एक खोली किरायाने घेऊन राहू लागले. दत्तूने वहिनींना व मुलीला आणले. अल्पावधीतच अंजूने मला खूप लळा लावला. वहिनींच्या हातचे घरगुती जेवण मला खुणावू लागले. मग माझा मुक्काम दादरला कमी व डोंबिवलीला जास्त होऊ लागला. गजूने त्याच्या बायकोला माहेरी पाठवल्यामुळे मी त्याच्या रुमवर राहू शकत होतो. त्यामुळे मी आता डोंबिवलीत जास्त रमू लागलो.

        दादरच्या रुमवर एक लोखंडी पलंग होता. तो रुममालकाचा होता व रुममालक माझा गाववाला असल्यामुळे त्याने तो मला वापरायला दिला होता. सुधाकर त्याची पथारी खाली टाकत असे. पण ज्या दिवशी मी डोंबिवलीला मुक्कामाने जायचो त्या दिवशी सुधाकर पलंगावर झोपायचा. डोंबिवलीला जाताना त्याला सांगून जायचे हा अलिखित नियम बनला होता.
          
      डिसेंबर 1967 ची घटना. ऑफिस सुटताच मी, गजू व दत्तू व्हीटीला निघालो. धावतपळत एका डब्यात निवांत जागा पकडली. गाडीने भायखळा सोडले व एकाएकी दत्तूने मला सांगितले की आज वहिनीनी श्रीखंड केले आहे. गोड पदार्थ हा माझा वीक पॉईंट..दोघेही आग्रह करू लागले.
“ अरे, पण मी सुधाकरला कळवले नाही ना..” मी अयशस्वी प्रयत्न केला. पण शेवटी श्रीखंडाचा विजय झालाच..रात्री मस्त जेवण झाले. अंजूला थोपटून झोपवून दिल्यावर मी गजूच्या रुमवर झोपायला आलो.

       रात्री दोनच्या सुमारास गाढ झोपेत असताना एकाएकी फळीवरली भांडी धडाधड आमच्या अंगावर पडली. मी दचकून.. घाबरून उठून बसलो. वीज गेली होती. बाहेर गलका ऐकू येत होता. मी गजूला गदगदा हालविले. पण तो ढिम्म हलायला तयार नव्हता. तसेही त्याला लाथ घातल्याशिवाय तो उठतच नसे..शेवटी लाथ मारून उठवले व दोघेही बाहेर आलो. रेल्वे कॉलनीतले सगळेजण घाबरुन मोकळ्या जागी गोळा झाले होते. भूकंपाचा जोरदार धक्का बसल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्याच क्षणी पुन्हा एक जबर धक्का बसला व आम्ही जागीच हेलपाटलो. पहाट होईपर्यंत आम्ही बाहेरच होतो.  

       दुस-या दिवशी सगळीकडे भूकंपाच्याच बातम्या. कोयनानगरला तीव्र स्वरूपाचा भूकंप झाला होता. त्याचे क्षेत्र मुंबईपर्यंत पसरले होते. ऑफिसमध्ये असताना दुपारी साडेबाराच्या सुमारास पुन्हा एक सौम्य धक्का जाणवला होता.

       पाचच्या सुमारास मी दादरला रुमवर आलो. जिना चढत असतानाच जाणवले की प्रत्येक जण माझ्याकडे विस्मयचकित नजरेने बघतो आहे. शेजारी राहणारे भाटकर मला म्हणाले देखिल…”सुरेशभाई, शंभर वर्षांचे आयुष्य आहे तुम्हाला.” काय झाले मला काही कळेना..माझ्या रुममध्ये बघ्यांची गर्दी जमली होती. माझ्या छातीत धस्स झाले. काही विपरीत तर घडले नाही ना...मला पाहताच गर्दीने मला जागा करून दिली. सुधाकरचे माझ्याकडे लक्ष जाताच मला विळखा घालून तो आवळू लागला. जणू मी त्याला सोडून जाणार होतो. प्रत्येक जण पलंगावर पाहत होता. माझे तिकडे लक्ष गेले आणि मी मटकन खालीच बसलो.

        पलंगावर उशीच्या मधोमध छताचा मोठ्ठा तुकडा...दहा पंधरा किलो वजनाचा.. पडला होता. पलंगाचा तेवढा भाग पोचा पडून  दबला होता. जो कोणी तेथे झोपला असता त्याच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला असता.

          अचानक डोंबिवलीला गेल्यामुळे मी बचावलो होतो. ...आणि सुधाकरला मी न कळवल्यामुळे तो पलंगावर झोपला नाही म्हणून तोही बचावला होता…

       अखेर देव तारी त्याला.।।।।।।।।


                               ★ .सुरेश इंगोले ★

No comments:

Post a Comment