Tuesday 13 October 2015

एकत्र कुटुंब पद्धतीचे फायदे

थारेपालट :=
                         भर दुपारच्या उन्हाने जीवाची काहिली होत होती. कुलरच्या समोर बसले तरच गार हवा लागत होती. इतरत्र वातारणातली तप्तता जाणवत होतीच. रुपाने घाम पुसत केबिनमध्ये प्रवेश केला.खुर्चीवर बसून ती आधी गार पाणी प्यायली. मग तिने घरी फोन लावला. ब-याच वेळाने नलिनीने फोन उचलला.
" नलू, किती वेळ लावलास फोन उचलायला ? कुठे गेली होतीस ?  " तिने चिडून विचारले.
" ताई ! तन्मय बाबाला आणायला गेले होते शेजारी... फोनची घंटी ऐकून परत आले." नलिनी म्हणाली.
" आला का तन्मय ?"
" नाही. तो खेळण्यात रमलाय. यायलाच तयार नाही."
" नवीनच खूळ शिरलंय याच्या डोक्यात. बरं मी आल्यावर बघते. लक्ष ठेव त्याच्यावर." रुपाने फोन कट केला. त्याचवेळी आशिश दार ढकलून आत आला.
" काय रुपा, वैतागलेली दिसतेस ?" त्याने हसत विचारले.
" अरे, काय रे हा तुमच्या नागपूरचा उकाडा ! कसे राहता रे तुम्ही येथे ? मी तर सहा महिन्यात कंटाळले बाबा. कसे काढेन मी येथे काही वर्षे ?" रुपा वैतागून म्हणाली.
" होईल गं सवय हळूहळू. इथला कडक हिवाळा अनुभवला, आता उन्हाळ्याचा अनुभव घे. मग पावसाळ्याचा...."
" कसले टोकाचे ऋतु आहेत रे इथले...! हिवाळ्यात कडाक्याची थंडी...आता ४२ / ४५° चे ऊन..माय गॉड..! " रुपा बोलत असतानाच आशिश हसू लागला. " तुमच्या पनवेलचे वातावरण मीही अनुभवले आहे. फरक तर पडणारच. बरं, शेजारी कसे आहेत ? जात असतेस की नाही त्यांच्याकडे ?"
" चांगले आहेत. मी उगीचच गैरसमजुतीने एवढे दिवस अलिप्त राहिले. थँक्स हं आशिश. "
" चालतं गं...देर आये दुरुस्त आये...तन्मयला आवडतं का त्यांचं घर ?"
" आवडतं ? अरे तो तेथेच असतो नेहमी. बरं नाही वाटत रे...त्यांना काय वाटेल ?"
" काही नाही वाटणार .लहान मुलांनी भरलं घर आहे ते. बरं ...उद्या शेखरला घेऊन जेवायला ये. संध्याकाळी विद्या फोन करीलच तुम्हा दोघांनाही " आशिश उठत म्हणाला. ती काही बोलणार तोच ' नो कमेंटस् ' म्हणत तो बाहेर पडला.
          × × × ×
                   
             आशिश हा शेखर व रुपाचा मित्र होता. मुंबईला शिकत असताना रुपा व आशिश वर्गमित्र होते. कॉम्प्युटर सायन्समध्ये दोघांनीही एकदमच पदवी घेतली होती. आशिशच्या नागपुरी भाषेला सुरवातीला सगळे हसत. पण हळूहळू तो रुळला होता. शेखरचे बी.टेक.पूर्ण होताच त्याला दुबईला जॉब ऑफर मिळाली. रुपाशी लग्न करूनच दुबईला जावे असे शेखरला वाटले. त्याने आशिशच्या मदतीने सगळे जुळवून आणले. शेखरच्या आई बाबांचा आशिशवर खूप जीव होता. त्याचा स्वभावच लाघवी होता.
              रुपा उच्च मध्यमवर्गीय आईबापाची एकुलती एक मुलगी होती. लाडात वाढलेली, जिद्दी, एककल्ली ! त्याउलट शेखर भरल्या कुटुंबातून आला होता. पनवेलला त्यांचा मोठा वाडा होता. आजी, आजोबा, आई वडील, दोन काका, काकू, आणि भावंडं....चुलत भावंडांची लग्ने झाली होती, त्यांची लहान मुले....असे सगळे एकत्र राहत. हसणे, खिदळणे, रुसवे फुगवे, थट्टा मस्करी, रागावणे ,भांडणे या सगळ्यातून सारे कुटुंब एका अतूट नात्याने बांधले गेले होते. लहान मुलांच्या बागडण्याने सगळा वाडा फुलून येत असे.
          आशिशच्या मध्यस्थीने शेखर व रुपाचे लग्न झाले. रुपा या घरात आली. तिला या वातावरणाची सवय नव्हती. प्रत्येकाला स्वतंत्र बेडरुम असले तरी रात्र सोडली तर दिवसभर एकमेकाशी बोलायलाही संधी मिळत नसे. रुपा फारशी कोणात मिसळत नसे. तिला घरातील नाती सुद्धा कळत नव्हती. तिला लवकरात लवकर हे घर सोडावेसे वाटत होते. दुबईच्या संधीने तिची वाट मोकळी केली.
           दुबईत दोन वर्षे काढल्यावर ते पुन्हा मुंबईत आले. पुन्हा त्या वाड्यात राहावे लागेल म्हणून ती नाराज होती पण तन्मयची चाहूल लागली होती. तिचे लाड कौतुक पुरवणे सुरु झाले, तशी ती सुखावली.
              तन्मयच्या जन्मानंतर काही काळ तिला जड गेला. शेखरला ऑफिसच्या कामानिमित्त जर्मनीला जावे लागले. सहा महिने तो तेथे होता. त्या सहा महिन्यात तिला घरच्यांशी जुळवून घेणे फार जड जाऊ लागले.
            ती बरेचदा माहेरीच राहत असे. तिच्या एककल्ली स्वभावाची आता सर्वांनाच कल्पना आली होती.
         दोनच वर्षांनी शेखरला नागपूर ब्रँचचा हेड म्हणून संधी मिळाली. तो नागपूरला निघून गेला. रुपा माहेरीच होती. ती सासरी राहायला तयारच नव्हती.
           एक दिवस तिला आशिशचा फोन आला. त्याने तिच्यासाठी जॉब पाहिला होता. ती आनंदून गेली. तिने लगेच नागपूरची तयारी केली.
                         ×××××××××××
  आशिशच्या मदतीनेच त्यांना रामदासपेठेत एक चांगले घर मिळाले. पण रुपा कधी कोणाशीही मिळून मिसळून वागत नसे. आशिशने तिला नेहमी म्हणत असे," अगं, जरा शेजा-यांशी बोल, ओळखी काढ..त्यामुळे तुला व तुझ्या कुटुंबाला करमेल.." त्यावर ती म्हणायची, " छी: ! अरे काय ती त्यांची भाषा...त्यांचे मोठ्या आवाजात बोलणे...पोरांच्या शिव्या व त्यांचे खेळ....शी:!  मी तर माझ्या तन्मयला शेजारच्या पोरांत मिसळूच देत नाही."
" आम्ही नागपूरकर जरा मोकळ्या स्वभावाचे असतो. अघळपघळ बोलणे...वागणे.. ! पण तू तर आम्हाला तुच्छतेनंच झिडकारलं... एकदा शेजारी थोडे संबंध वाढव मग त्यांचा शेजारधर्म बघ...."
" नको रे बाबा, इकडची भाषाच माझ्या अंगावर काटा आणते.."
" नाही रुपा ! असे म्हणू नकोस ! प्रत्येक भागात एक अस्सल प्रादेशिक भाषा असते. तिचेच आपल्यावर खरे संस्कार असतात. पुस्तकी भाषा आपण शाळेत शिकतो. महाराष्ट्रभर संवादाचे माध्यम जरी पुस्तकी भाषा असली तरी आपले संस्कार मूळ भाषेतच आपल्यावर झालेले असतात. आई, बाबा, काका, काकू, आजी, आजोबा सगळ्यांशी आपले जिव्हाळ्याचे नाते असते. या जिव्हाळ्याने, आपुलकीने घर आपल्याला बांधून ठेवते, लळा लावते." आशिश भावनावश होऊन म्हणाला होता.
          एकदा आशिशकडे शेखर व रुपा जेवायला आले होते. आशिशच्या मुलाचे ...कैवल्यचे व तन्मयचे चांगले मेतकूट  जमेल असे वाटले होते पण घडले भलतेच. कैवल्यची सारी खेळणी तन्मयने हिसकावून घेतली. तो कैवल्यला खेळूच देईना. शेखर रागावला. रुपा चिडून मारायला धावली. तिला आशिशने आवरले.
" अरे, हा नेहमी असाच वागतो. आपली कोणतीही वस्तु कोणालाच देत नाही. शेअरींग नाहीच याच्याकडे.." रुपा चिडून म्हणाली.
" सोप्पं कारण आहे रुपा. तो एकटाच असतो म्हणून एकलकोंडा झालाय. त्याच्या वयाच्या मुलांमध्ये तो राहू लागला की आपोआपच शेअरींग येईल त्याच्यामधे."
" मी काय म्हणते रुपाताई... तुम्ही आता दुस-या बाळाचा विचार करा. म्हणजे तन्मयला खेळायला एक बाळ येईल." विद्या हसून म्हणाली तशी रुपाने तिला धपाटा घातला. सगळे हसू लागले.
                           ×××××××××××××
    आशिशने रुपाला एकदा बळजबरीने तिच्या शेजारी नेले. घर फार मोठे होते त्यापेक्षाही घरातील सर्वांची मने फार मोठी होती. डॉक्टर काका फारच प्रेमळ होते. काकू तर खूपच लाघवी होत्या. त्यांचा मुलगा महेश शेखरच्याच वयाचा होता. तो आणि त्याची बायको मनाली दोघेही डॉक्टर होते. स्वभावाने खूप चांगले. अगदी थोड्या वेळातच रुपा त्या कुटुंबात मिसळून गेली. एवढे दिवस आपण त्यांच्यापासून फटकून राहिल्याची तिला खंत वाटू लागली. आताशा रोज ती त्यांच्याकडे जाऊ लागली. महेश व मनालीशी तिचे छान सूत जुळले. डॉक्टर काका तन्मयशी व त्यांचा नातू सुहृदशी खूप खेळायचे. तन्मय तेथे रोज खेळायला येऊ लागला.
                           ××××××××××××
.........शेखर सोबत रुपा घरी आली. तन्मय अजूनही शेजारीच होता. फ्रेश होऊन दोघेही डॉक्टरकाकांकडे आले. तन्मय व सुहृद समोर बरीच खेळणी पडली होती व प्रत्येक खेळणे दोघेही एकमेकांना देत होते. रुपाचा विश्वासच बसेना. तन्मय आणि शेअरींग ?
       रुपाने काकांना सारं सांगितलं. काका हसले. दोघांनाही जवळ बसवून ते म्हणाले, " तुम्ही दोघेही कामावर जाता व बाळाला मोलकरणीवर सोपवता. त्याच्यावर संस्कार कोणाचे होतील ? तुम्हाला त्याच्याशी खेेळायला किती वेळ मिळतो ? बाळ जन्माला येतं कुटुंबात..वाढतं कुटुंबात..त्याच्यावर आपल्याच कुटुंबाचे संस्कार होतात. एकत्र कुटुंब असलं की बाळ सुरक्षित असतं. त्याला सर्वांचं प्रेम मिळतं. त्याला प्रेमाचं महत्व कळतं. आजी आजोबांसाठी नात किंवा नातू म्हणजे दुधावरची साय असते. स्वत:च्या जीवापाड ते त्यांना जपतात. त्यांच्यावर भरभरुन प्रेम करतात. तुमचा मुलगा या गोष्टीपासून वंचित राहतो असं नाही वाटत तुम्हाला ?"
" काका, आमची चूक आम्हाला कळतेय पण काही इलाज नाही. आता तुम्हीच त्याचे आजोबा होऊन त्याला वळण लावलंत. खरंच हे आम्ही कधीच विसरु शकणार नाही." शेखर सद्गदित होऊन म्हणाला.
डॉक्टरकाकांनी त्याच्या पाठीवरुन हात फिरला.  रुपा कसल्या तरी विचारात गढलेली होती. ते जायला निघाले तसा तन्मय आजोबांना बिलगला. तो त्यांना सोडीना. सर्वांना हेलावणारा प्रसंग होता तो.
                 रात्री आशिशकडे जेवायला गेल्यावर हा सगळा प्रसंग शेखरने त्याला सांगितला. आशिशने तन्मयकडे पाहिले. तो कैवल्यशी खेळण्यात गुंतला होता.
   " रुपा, कसला विचार करतेस ?" आशिशने तिला विचारले.
   " शेखर, आशिश...मला खरंच पश्चाताप होतोय. पनवेलच्या घरात माझं मन रमेना. आई बाबांशी मी तुटक वागायचे. काका, काकू किंवा इतर सारेच मला परके वाटायचे. पण तन्मयच्या वेळी त्या सगळ्यांनी माझी केवढी काळजी घेतली. ....मला .....मला परत जायचंय...पनवेलला.... सगळ्यांची माफी मागायचीय..." रुपा रडू लागली.
  आशिशने तिच्या खांद्यावर थोपटले. " रुपा, तुला नागपुरला जॉब मिळवून देण्याबाबत मला काकांनी....शेखरच्या बाबांनीच फोन केला होता. तुझी द्विधा मन:स्थिती त्यांना कळली होती. "
ती अधिकच रडू लागली. हे पश्चातापाचे अश्रू होते. एकत्र कुटुंबाचे महत्व तिला पटले होते. " शेखर, आपण कधी जायचे पनवेलला ?"  तिने विचारले तसा तो हसला.
" बघतो, मी बदलीचाच प्रयत्न करतो." शेखर म्हणाला.
आशिश समाधानाने हसला.
" बरं, रुपा एक सांग....तुम्ही दोघेही तन्मयला घरी शेरू म्हणून कां हाक मारता ?"
दोघेही मनमोकळे हसले.
" अरे, शेखरचा ' शे ' आणि रुपाचा ' रु ' मिळून आम्ही त्याला शेरु म्हणतो."
सर्वजण जोरजोरात हसू लागले.
                                    •••••••
                                        सुरेश पुंडलिकराव इंगोले
                                          शहापुर. . जि. भंडारा. 
                                         .   9975490268