Friday 25 December 2020

एका दगडाची गोष्ट

            * एका दगडाची गोष्ट *


परवा अचानक एक कार घरासमोर उभी राहिली. त्यातून एक कुटुंब बाहेर पडले. नवरा, बायको आणि दोन मुले..साधारण चौदा ते सोळा वयाचे.  फाटक उघडून ते आत येऊ लागले. पण ते कोण आहेत हे माझ्या काही लक्षात येत नव्हते. त्या माणसाचा चेहरा कधीतरी पाहिल्यासारखे वाटत होते.


" नमस्कार सर. ओळखलंत मला.?" त्याने हसून विचारले.

 मी नकारार्थी मान हलवली. 

" या, आत या. बसा.." 

मी त्यांना घरात घेऊन आलो. 

मी खुर्चीत बसताच त्याने मला वाकून नमस्कार केला. पाठोपाठ बायको व मुलांनी सुद्धा पायावर डोके ठेवून नमस्कार केला. मला अवघडल्यासारखे झाले. 

"अरे, काय हे! " असे काहीसे पुटपुटताच तो म्हणाला, " सर, तुम्ही आमचे भाग्यविधाता आहात. हा तुमचा मान आहे."

" मी खरंच तुम्हाला ओळखलं नाही." मी दिलगिरी व्यक्त केली.

" सर, मी विनोद...विनोद लांजेवार !  तुम्ही रिटायर व्हायच्या दोन वर्षे आधी शिक्षक म्हणून लागलो होतो. आपला सहवास तसा कमीच लाभला."

" अरे हो, आठवले. मला वाटतं, मी रिटायर झाल्यावर तुम्ही सुद्धा नोकरी सोडून गेल्याचे कळले होते."

" हो सर! गावाशेजारच्या शाळेत एक जागा निघाली होती. आपल्या शाळेतून अतिरिक्त झाल्यावर तेथे सामावून घेतले गेले.एकदा तुम्ही माझी मायेने चौकशी केली होती. कां कोण जाणे, पण मी तुमच्याजवळ मनमोकळेपणाने व्यक्त झालो होतो."


मला काही आठवत नव्हते. माझ्या चेहऱ्यावर तसे भाव दिसताच तो पटकन म्हणाला, " आठवतं सर ? तुम्ही मला एक दगड दिला होता. त्याला देवघरात ठेवायला सांगितले होते. रोज त्याची पूजा करायला सांगितली होती. "


एकाएकी माझ्या डोक्यात प्रकाश पडला. माझ्या चेहऱ्यावर हसू उमटले. 

* * * *


   नदीकाठी किंवा समुद्रावर फिरायला गेल्यावर तिथले वाळूतले रंगीबेरंगी दगड व शंख-शिंपले गोळा करायचा मला छंद होता.  घरातल्या शोकेसमध्ये, नकली फुलांच्या पितळी कुंड्यांमध्ये ते दगड, शंख, शिंपले मी रचून ठेवले होते. हिरवे, करडे, काळे, पांढरे असे ते दगड छान दिसायचे. 

     एकदा विनोद शाळेतून माझ्या घरी आला. तो चिंतेत वाटत होता. मी आत्मीयतेने विचारले तसे तो स्वतः:विषयी, बायको व आई-वडिलांविषयी सांगू लागला. घरची परिस्थिती अगदीच वाईट नव्हती. शेतीचे उत्पन्न बऱ्यापैकी येत होते. त्यालाही शिक्षणसेवक म्हणून नियमित, कमी कां होईना, पगार मिळत होता. पण इतरांशी तुलना करताना त्याच्या मनावर निराशेचे सावट दिसत होते. त्याची बायको सतत आजारी असायची. डॉक्टरांनी तिला कोणताच आजार नाही हे निक्षून सांगितले होते. त्याला सकारात्मक ऊर्जेची गरज होती.

"आपल्याजवळ जे नाही त्याचा विचार करून चिंता करीत बसण्यापेक्षा जे आहे  ते ज्याच्याजवळ नाही त्याच्याशी तुलना करून पहा. समाधान मिळेल. " हे सांगत मी त्याला अनेक उदाहरणे दिली. त्याला ते पटल्यासारखे वाटले. त्याच्यासारख्या पापभीरू व देवभोळ्या माणसावर एक प्रयोग करावा असे वाटून मी कुंडीतला एक हिरवा दगड घेतला. त्याला धुवून साफ करून विनोदला देत सांगितले," हा दगड देवघरात ठेव. मनोभावे त्याची पूजा कर. मनात कधीही निराशेचे विचार येणार नाहीत. सगळं चांगलं होईल. मात्र याबद्दल कोणालाही काहीही सांगायचं नाही. नाहीतर   त्याचा प्रभाव नष्ट होईल."

  मी त्याला हे काय आणि कां सांगितले हे मलाच क्षणभर कळले नाही. गंमत म्हणून एक प्रयोग केला होता आणि तो अंगलट येऊ नये म्हणून खबरदारी घेतली होती एवढे मात्र खरे..!

* * * *


" सर, खरंच तुमचे उपकार मानावे तेवढे कमीच आहेत. तुम्ही दिलेल्या दगडाची आम्ही रोज पूजा करतो. काही दिवसातच आम्हाला त्याची प्रचिती येऊ लागली. विद्याला बरं वाटू लागलं. ती हुरूपाने कामं करू लागली. मी पूर्ण वेळ शिक्षक बनलो. पगार भरपूर वाढला. शेतीला मी पैसा पुरवू लागलो. बोअरवेलमुळे शेतीला बरकत आली. काय आणि किती सांगू सर...!

या दहा बारा वर्षात ज्या काही विपत्ती आल्या होत्या त्यावर आम्ही सहज मात करू शकलो. मागच्या वर्षी आम्ही चौघे मॉरिशसची सहल करून आलो. आज नागपूरला जात असताना आपली प्रकर्षाने आठवण झाली. "

   त्या चौघांशी गप्पा मारत असताना जाणवले की यांना सत्य सांगण्यात काही हशील नाही. कधी कधी अज्ञानातही सुख असते. त्यांच्या बाबतीत जे काही घडत गेले ते त्यांच्या मनाच्या सकारात्मकतेमुळे. आयुष्यात एकदा सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारला की जगणं सोपं होतं. 


चिंता, संकटं, अडचणी, व्याधी हे सगळे प्रत्येकाच्याच नशीबात आहेत. पण माझं कसं होईल या विचाराने हातपाय गाळून बसण्यापेक्षा यातूनही काही चांगलंच होईल हा दृष्टिकोन ठेवला तर जगण्याला, लढण्याला बळ मिळतं..


निरोप घेताना विनोद हळूच म्हणाला," सर, एक विनंती आहे. विद्याचा भाऊ..माझा शालक..अशाच गंभीर परिस्थितीत आहे. त्याच्यासाठी एक दगड मिळेल का? आम्ही त्यालाच काय, कोणालाच याबाबत काही सांगितले नाही. विद्यानेच सुचवले म्हणून..."


त्यांच्या खांद्यावर हात ठेवून मी म्हणालो," असा कोणताही दगड आता माझ्याकडे नाही. असे समजा की तो एकमेव होता जो तुमच्या स्वाधीन केला होता. तुमचे सगळे चांगले होत आहे तेव्हा आता तोच दगड त्याला द्या. बघा, तुम्हीच विचार करा.."


* * * 

सारांश हाच....की निराशेत असणाऱ्या प्रत्येकाने असा कोणताही एक दगड मनोभावे देवघरात ठेवून त्याची पूजा केली तर निश्चितच फरक पडेल.

करून पहायला काय हरकत आहे....?


       © सुरेश इंगोले.


Monday 14 December 2020

चकवा

 

चकवा

‌    सिताराम बुढ्यानं म्हशीले गोठ्यात बांधून तिच्याम्होरं चारा टाकला. पाठीवरून हात फिरौला. गळ्याले खाजवू लागला तशी म्हशीनं मान फिरवून त्याच्या हाताले चाटनं सुरू केलं.

" खाय माय पोटभर....तुहं पोट भरंन तं आमचं पोट भरंन. तुह्यावरंच आता हे घर चालते माय.." बुढ्यानं असं म्हंताच म्हशीनं रेकून त्याले जवाब देल्ला. मुक्या ढोराहिले मानसाचं मन बरोबर वाचता येते.

सिताराम बुढ्यानं वसरीत यिवून पागोटं काहाडलं आन् मंदाले आवाज देल्ला. तशी मंदा पान्याचं भांडं घिवून आली.

पानी पेता पेता बुढ्यानं चवकशी केली.

" का म्हंते जवाई ?  काई निरोप आल्ता का? कवा येते घ्या ले? "

" नाव नोका घिवू त्या लोभी मान्साचं..." मंदा फनकाऱ्यानं घरात निंगून गेली.

बुढा डोक्शाले हात लावून बसला.
***
   तिगस्ता मंदाले पाहाले काचनूरचे पाव्हने आलते. पोरगा साजरा व्हता उच्चीपुरा. बारावी शिकला व्हता. आंगानं धडधाकट. घरी चार एकर वावर होतं. त्याच्या बहिनीचं लगन झालतं...पोराचे मायबाप गरीब वाटले व्हते पन त्याचा मावसा मात्र जहाल होता.

पोरापोरीची पसंती झाल्यावर हुंड्यासाठी त्या मावशानं लय घाईस आनलं. पोराचा बाप महिपती पाटील याले तं तोंड उघडू न्हाई देल्लं..मावसा तुयशीराम राहून राहून पोराच्या.. शिरपतीच्या कानात पुटपुटे. आन् हुंड्याचा आकडा वाढवत ने.

सिताराम बुढा माळकरी मानूस पन वेव्हारात
पक्का. त्यानं रोखठोक सांगितलं..
"हे पाहा, तुयशीरामबुवा...जेवढी आयपत हाये थे सारं कबूल केलं. अंगठी, गोफ, कपडेलत्ते सारं रीतीरिवाजानं ठरलं. आता फटफटी काई आपल्या बजेटात न्हाई. हां, पोरीच्या नावानं एक एकर शेत हाये ते तिले देऊन टाकतो. पाहा ज्यमत असंन तं.."

तुयशीराम शिरपतीच्या कानी लागला. थोडीशी खुसुरफुसुर झाली. मंग मावसाजी बोलले," ठीक हाये. एक एकर पोराच्या नावानं करून द्या. उडवून टाकू बार!"

" आता पोरगीच पोराले देऊन राह्यलो ना. तिच्या नावाचं शेत शिरपतरावालेच हुईन का न्हाई..."

   सिताराम बुढ्यानं मंदा आन् शिरपतचं धूमधडाक्यात लगंन लावून देल्लं. सिताराम बुढ्याचं पोरगं शहरात शिकाले होतं. लगनात खूप राबला संज्या. मंदा काचनूरले गेली, संज्या वर्धेले गेला आन् बुढा बुढी दोगंच बेढोन्यात शेतीत राबू लागले. घरी दोन गायी आन् यक म्हैस व्हती. बुढाबुढीनं म्हशीचं नाव दुर्गा ठिवलं व्हतं...

माहेरपनाले आलेली मंदा काही बोलेच नाही तं बुढाबुढी इचारात पडले. रखमा बुढीनं तिले खोदूखोदू इचारलं तवा तिनं सांगितलं का तिचा नवरा भल्ला लोभी माणूस हाये. त्याले उडवाले फक्त पैसे पायजे. महिपती पाटलाशी त्याचे नेहमी खटके उडत राह्यते. घरच्या वावरात तं पाय ठेवत न्हाई शिरपती. मले म्हंते, तुह्या नावाचं वावर माह्या नावावर करून दे. थे विकून मले फटफटी घ्या ची हाये.. त्याहिच्या सोभावाले घरचेच कटायले हायेत.

***

दोन वरसं झाले. मंदाले पोरगा झाला. तिच्या बायतपनात एक गाय ईका लागली. घरची परिस्थिती पाहून संज्यानं वर्धेत एक काम धरलं. आपल्या शिक्षनाचा खर्च त्यानं बुढ्यावर यिऊ न्हाई देल्ला. एकडाव दोस्तासंगं संजू गावाले आलता. वापस जातांना मंदाले भेटून जावं म्हनून थो काचनूरले गेला. भावाले पाहून मंदा लय हरकली. तिच्या सासऱ्यानं मुक्कामाचा आग्रह केला. पन दोघालेही अंधार पडाच्या आत वर्धेले पोहचाचं होतं.  तिसऱ्याच दोस्ताची फटफटी आनली होती ते वापस कराची होती. चहापानी घेऊन निंगनार तेवढ्यात शिरपती घरी आला. दारात फटफटी पाहून तो चकरावला. संज्याशी काई जास्त बोलला नाही. रामराम घेऊन संज्यानं फटफटी सुरू केली तवा शिरपतीच्या डोयात आग दिसत होती. दुसऱ्याच दिवशी त्यानं मंदाले आन् मनोजले बेढोन्याले आनून घातलं. फटफटी भेटंन तं काचनूरले घिवून जाईन न्हाई तं राहा इथंच असं म्हनून तो चाल्ला गेला.

***
घरातून मनोजले आनून मंदानं बुढ्याजवय देल्लं. बुढ्यानं त्याले कडीवर घेतलं आन् तो गनेशाच्या दुकानाकडं निंगाला. आता गोया, चाक्लेट खा ले भेटंन म्हनून नातू खुश झाला.

अंधार पडाले आला तसा घरी जा साठी सिताराम बुढा नातवाले घेऊन उठला. तं मंदा बोंब ठोकतच दुकानाकडं आली.
" आन्याजी, मनोजचे बाबा आपली म्हैस घेऊन गेले. कोनाचंच आयकलं न्हाई वो. मी आडवी झाली तं मलेई ढकलून देल्लं." ढोपराचं रगत पुसत रडत रडत मंदा बोलली.
बुढा सन्नं झाला. त्याचे हातपाय गयाठले. तो मटकन खालीच बसला.
या महामारीनं साऱ्याहिले घरात बसौलं होतं. कामधंदे बंद होते. खा प्या चे वांधे होते. सहा महिन्यानं कारखाना पुन्हा सुरू झाला म्हनून संज्या वर्धेले गेला होता. घरी बसून तो ही कटायला होता. आता या जवायाच्या मांगं कोनाले धाडाव..म्हशीले घेऊन कुठं गेला अशीन जवाई काय म्हाईत...?

पोरीले आन् नातवाले घेऊन बुढा घरी आला. वसरीत डोक्याले हात लावून बसला. बुढी डोयाले पदर लावून बसली व्हती. गावातले लोक डोकावून जात होते.

मानकराचा हनमंता सायकलवर आला. सायकल भिंतीले लावत बोलला," आन्याजी, म्या जवायाले लय रोखन्याची कोशिस केली.  मनलं, बेढोन्याच्या जंगलात चकवा हाये. फालतू जीव जाईन.  चाला वापस. पन तुमच्या दुर्गीनं त्याहिले ओढत जंगलात नेलं."
हे आईकल्याबरूबर बुढीनं आन् मंदानं गयाच काहाडला. दोगी बी बोंबलाले लागल्या तसा बुढा त्याहिच्यावर खेकसला.

पोलिसपाटलानं पाठवलेले दोन तगडे गडी अर्ध्या राती हात हालवत वापस आले. मंदाच्या डोयाले धाराच लागल्या. सारेच जागे होते. साथ कराले आलेले शेजारी इथं तिथं कलंडले.

पहाट झाली. सारे आडवेतिडवे पसरले होते. मंदाले जाग आली.  तिनं दूरवर पाह्यलं आन् मोठ्यानं ओरडली....
" आन्याजी, आपली दुर्गी आली. "
तसे सारे पटापट उठले.  साऱ्याहिनं तिकडं पाह्यलं..दुर्गी हंबरत रेकत घराकडे धावत येत होती. तिच्या मांगं मांगं शिरपती हेलपाटत येताना दिसला. साऱ्याहिच्या जिवात जीव आला.
दुर्गी धावतच गोठ्यात शिरली. रेडकाजवय जाऊन चाटाले लागली. रातपासूनचा पान्हा दाटला होता. रेडकू ढुसन्या देत दूध पिऊ लागला.

दोगातिगाहिनं जवायाले हात धरून खाटेवर बसंवलं..मंदानं पानी आनून देल्लं तसं शिरपतीनं झटका मारून पान्याचा गिलास फेकला. तसा भिवा जवायापाशी येऊन बसत बोलला, " बाई, पानी नोको दाखवू काही येळ...रातभर चकव्यानं त्याहिले पानीच दाखौलं असंन..जवाई, काय काय झालं समदं सांगा बरं..."
भिवा शिरपतीच्या पाठीवर हात फिरवत धीर देत ईचारू लागला. शिरपती आता सावरला होता. त्यानं हळूहळू सांगाले सुरवात केली.

आर्वी तालुक्यात बेढोन्याचं जंगल चांगलंच दाट हाये. पन्नास साठ वरसाआंधी वाघाची शिकार कराले शिकारी या जंगलात फिरे. आता वाघ हाये का नाही  माहित नाही  पन जंगल अजूनई दाटच हाये.
     दुर्गीनं शिरपतीच्या हाताले झटका मारून गावचा रस्ता धरला  तसा  शिरपतीनं दोर धरून जवयची काठी उचलली  आन् तिले काचनूरच्या दिशेनं ओढत निऊ लागला. जंगलात घुसल्यावर अंधार आनखीनच गडद झाला. नुसतं चालनं चालनं ..पाय थकले पन रस्ता काई दिसे न्हाई. शिरपतीचा घसा कोड्डा पडला. थो पानी पानी कराले लागला. दुर्गीचा दोर हातात असूनही कोनीच कोनाले ओढत नोहतं. अचानक मांगं आवाज आला. पाह्यलं तं एक मानूस त्या बाजूले हात दाखवत पानी हाये म्हनून सांगत होता. घसा सुकलेला शिरपती त्याच्या मांगं निंगाला. थोड्या दूरवर पान्याचा तलाव दिसला. शिरपतीनं दुर्गीचा दोर आपल्या हाताले बांधला अन् तो पानी प्या ले तलावाच्या काठावर झुकला. जसं त्यानं वाकून तलावातल्या पान्याले हात लावला तशी त्याच्या पाठीवर जोरदार लाथ बसली. तोल जाऊन शिरपती पान्यात पडला. नाकातोंडात पानी जाऊन तो आदमुसा झाला तेवढ्यात दुर्गीनं मानेले जोर लावून शिरपतीले पान्याभायेर ओढलं. हाताले दोर बांधला असल्यानं शिरपती आपसूकच भायेर आला. थो चांगलाच घायबरला होता.
जरासाक सावरल्यावर त्यानं आजूबाजूले पाह्यलं. पन तिथं कोनीच नोव्हतं..शिरपतीनं दुर्गीच्या गयाले मिठी मारली आन् ढसढसा रडाले लागला.

गयाठून गेलेला शिरपती दुर्गीच्या आसऱ्यानं सही सलामत घरी पोहोचला होता. रखमा बुढीनं चूल पेटवली.  समद्याहिसाठी चहा ठिवला.  मीठ-मोहरी-मिर्च्यानं शिरपतीची दीठ काहाडली. मंदा शिरपतीले घरात घिवून गेली. तिचा हात धरुन शिरपती बराच येळ रडत व्हता.

एकाएकी तो उठला. गोठ्यात जाऊन दुर्गीले कवटायून रडला. दुर्गी त्याच्या हाताले चाटू लागली. वसरीत यिवून तो बुढाबुढीच्या पाया पडला आन् दोन्ही हात जोडून बोलला,
" आन्याजी, माय...आजवर लय वाईट वागलो मी. पोरगा समजून माफ करा. आता मी घरच्या वावरात काम करीन. मंदाले अन् मनोजले काई कमी पडू देणार न्हाई..." पुढं त्याले बोलनं जमलं न्हाई. तो ढसढसा रडाले लागला.

बुढ्यानं त्याले उठवून जवय बसवलं आन् पाठ थोपटत बोलला," आमचा सोन्यासारखा जवाई आमाले वापस भेटला. समदं पावलं...मंदे, आज पुरन टाक बाई...साजरं गोडाधोडाचं बनवा..."

        ***        ***         ***

                © सुरेश इंगोले