Tuesday 27 December 2016

**  आंब्याचे  झाड  **

            एखादी गोष्ट सहजगत्या घडून जाते. त्यात काही योजकत्व नसते. घर बांधल्यावर पुढे फार मोठी जागा उपलब्ध असल्यामुळे एक आंब्याचे झाड मधोमध लावले होते. ते जसजसे मोठे होत गेले तसतशा त्याच्या खालच्या फांद्या छाटून त्याला एक आकार येत गेला.
              या पंधरा वर्षात त्याचं रुपांतर एका डेरेदार वृक्षात झालं. खालच्या फांद्या अशा विस्तारल्या की लहान मुले देखिल त्यांच्यावर खेळू बागडू शकतात.
              झाडाचा विस्तार एवढा झाला की इतर झाडांनी हळूहळू काढता पाय घेतला. आता राजासारखा तो एकटाच दिमाखात बहरत असतो, फुलत असतो. सर्व फळांचा राजा असलेला हा आंबा फेब्रुवारी ते जूनपर्यंत सर्वांना आकर्षित करीत असतो. मल्लिका जातीचे आकाराने मोठे असलेले फळ सर्वगुणसंपन्न आहे. त्याच्या कैरीचे लोणचे, आमचूर पावडर व गुळांबा खायला मिळतो तर पिकल्यावर दोन- तीन आंब्यांच्या गोड रसात कुटुंबाची चंगळ होते.

             घरी येणारे मित्र मंडळी घरात बसून गप्पा मारण्यापेक्षा अंगणात आम्रवृक्षाखाली बसून फोटो काढत हास्यविनोदात रमून जातात.
              मागच्या आठवड्यात फेसबुक मैत्रीतून जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झालेली मंडळी पिकनिक व ग्रेट भेट म्हणून घरी आली. शशांक व मीनल गिरडकर, प्रवीण व नीलांबरी कलाल, कांचन मडके, वसुधा वैद्य, वीणा डोंगरवार व वंदना देशभ्रतार आवर्जून भेटायला आले. घरात थोडावेळ बसून सगळे अंगणात आले. जणू आंब्याचे झाड त्यांना खुणावत होते. गप्पा, चेष्टा-मस्करी, हास्यविनोद यांनी आवार फुलून गेले. सर्वांनी खूप फोटो काढले त्यात आंब्याचे झाड ' सेलिब्रिटी ' सारखे मिरवीत होते.

            काल आमचे परममित्र श्री. शानूजी पंडित सहकुटुंब घरी आले. फेसबुकच्या आभासी जगातून ते आमच्या कुटुंबाचा घटक कधी झाले ते कळलेच नाही. कौटुंबिक हास्यविनोदात खूप रमलो आम्ही. झाडाने जणू साद घातल्याप्रमाणे सगळे त्याच्याभोवती पिंगा घालू लागले. त्यांचा नातू परत जायला तयार नव्हता एवढा जिव्हाळा हे घर...हे झाड लावतं व परत परत यायची ओढ निर्माण करतं....

           आम्हाला माणसं जमवण्याची व टिकवण्याची प्रेरणा या घराने...या आम्रवृक्षाने दिली हे त्याचे आमच्यावर उपकारच !
ज्याच्या ऋणात आम्हाला सदैव राहायला आवडेल ते हे आमचे
               आंब्याचे झाड !!  

                                               ***  सुरेश इंगोले. ***

Sunday 25 December 2016

         
         ** आर डी  **
     आज पक्याची काही खैर नव्हती. एकतर त्याची चामडी सोलून निघेल किंवा हात पाय तरी मोडला जाईल अशी पारावरच्या टोळभैरवांची खात्री होती. कारण त्याने रवीशी पंगा घ्यायचे ठरविले होते.

      रवी त्या एरीयाचा गुंड होता. उंच, धिप्पाड, काळासावळा...हातभट्टीच्या दारूची ने-आण करणे, मटका-सट्टा खेळणे, छोट्या मोठ्या सुपा-या घेणे अशी कामे करुन त्याने आपली दहशत निर्माण केली होती. सगळेजण त्याला टरकून असत.

    पक्या कॉलेजात शिकत होता. देखणा, मिष्किल स्वभावाचा, खोडकर...पण सर्वांचा आवडता. शब्दांशी खेळणे त्याला आवडायचे. मित्रांना तो बीजे, टीपी, जेके, एमडी अशा नावांनी बोलवायचा. प्रचलित शब्दांना नवनवी रुपे देण्याचा त्याला छंद होता.

     पक्या नसल्यामुळे पारावर स्तब्धता होती पण तो दिसताच चैतन्याची लहर पसरली जणू. बीजे उर्फ भाावड्या ओरडला...पीके आला रे...
    पक्याने लगेच नोटबुक मांड्यासमोर धरले. ' पीके म्हणजे आमीरखान नव्हे... तू लेका...प्रकाश काळे..' सगळे हसले.
" कां उशीर केलास ?"
" अरे त्या शेळके काकांना घर दाखवले. म्हटलं, प्रत्येक बेडरूमला एबीसीेएल आहे. तर ते म्हणाले, एबीसीएल तर बंद पडली...अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड. मी म्हटलं...अहो काका.. एबीसीएल म्हणजे अटॅच्ड बाथरुम कम लॅट्रीन...." सगळे हसू लागले.
"ही एक रुम वेगळी कां असे विचारल्यावर सांगितले की तेथे नाईक एकटाच राहायचा पण इतर रुममध्येसुद्धा आपले सामान ठेवायचा. पक्का बीडीओ होता. म्हणून त्याच्या खोलीला वेगळे केले. तर म्हणाले, बीडीओ असूनही....
मी लगेच म्हणालो, ओ काका ! बीडीओ म्हणजे ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर नव्हे, भटाला दिली ओसरी..."
' आयला पक्या, तू कोणालाही फिरवतोस यार...'

      पक्याचा छंद सर्वांना माहीत होता. बीपी वाढलाय असं कुणी सांगितलं की बीपी खाऊ नका म्हणायचा. तो कन्फ्यूज होई मग हा सांगे...बीपी म्हणजे ब्रेड पकोडे....

         आज तो पारावर आल्याबरोबर सर्वांनी त्याच्याकडे रवीबद्दल तक्रार केली. तो कसा सगळ्यांना छळतो वगैरे...
" पक्का रानडुक्कर आहे साला..." पक्या बोलला. सगळ्यांनी त्याची री ओढली.
' आयडिया ! आपण त्याचं नावंच रानडुक्कर ठेवू. त्याच नावाने त्याला हाक मारू. ओके ?'
' स्वत:ची हाडं खिळखिळी करुन घ्यायची आहेत का ?'
' गपा रे...त्याला आरडी म्हणायचे...रानडुक्कर..त्याला कळणार नाही व आपल्याला म्हटल्याचे समाधान लाभेल.'
' नको रे बाबा...त्याला संशय येईल.'
'ठीक आहे. मी सुरुवात करतो.' असे म्हणून पक्या निघाला. रवी कोणाशी तरी तावातावाने बोलत होता.

.....  ....
         " काय आरडी..कसं काय ?" त्याच्या पाठीवर थाप मारत पक्या बोलला.
रवी गर्रकन वळला. "काय म्हणालास ?' त्याने डोळे वटारले.
" आर डी." पक्या शांतपणे म्हणाला." आजपासून आम्ही सर्वांनी तुला आरडी म्हणायचे ठरवले आहे. काय दोस्तांनो ?"
    सगळे चिडीचूप...
" काय टेरर आहे यार तुझं. कोणी बोलायलाही घाबरतं. एकाच एरीयात राहतो म्हटल्यावर मिळून मिसळून राहायला हवं ना.."
रवीला कसला तरी संशय आला. हे बेणं सरळ नाही हे त्याला ठाऊक होतं. त्याने पक्याचे बखोट धरले व दातओठ खाऊन बोलला..." आरडीचा अर्थ सांग आधी.."
  आता सगळेच टरकले होते. ती वेळ येऊन ठेपली होती.
पक्याने त्याचा हात झटकला. आणि शांतपणे म्हणाला, " हे बघ...तू आपल्या एरीयाचा भाई आहेस. दादा आहेस. रवी दादा. आजपासून आम्ही तुला रवी दादा म्हणजेच आरडी म्हणायचे ठरवले आहे.  काय दोस्तांनो....,"
हो.......सगळे एका सुरात
' चला तर मग म्हणा... आपला भाई कोण..?'
"आर डी...!" सगळे एकासुरात ओरडले..मनातल्या मनात ' रानडुक्कर' म्हणत.....

                      ***  सुरेश इंगोले.  ***

Wednesday 21 December 2016

सहज सुचलेलं.....मनातलं.....

                 सोशिकपणाबद्दल आम्ही भारतीय विश्वप्रसिद्ध आहोत......कोई शक ?

           प्राचीन काळापासून अनेक राजे आलेत...अन्याय करुन गेलेत. आम्ही निमूट सहन केले.

           शक आले, हूण आले, मंगोल,मोगल, पोर्तुगीज आले.
फ्रेंच आले, इंग्रज आले...
           
            आम्ही उदार मनाने त्यांना आपले राज्य दिले. आपल्यावर अत्याचार करण्याची परवानगी दिली. त्यामुळे सोशिकपणा वाढतो हे जगाला दाखवून दिले.

           मग आम्हाला वाटले...परक्यांचा अत्याचार पाहिला, साहिला....आता आपल्यांचाच अत्याचार सहन करून पाहू.

           परक्यांना हुसकावून आम्ही आपले राज्य स्थापन केले.
आणि त्यांच्या अत्याचारासाठी सज्ज झालो.

           कायदा-नियम धाब्यावर बसवून, निरनिराळ्या क्लृप्त्या लढवून मनमानी करण्याची अनेक तंत्रे शोधली जाऊ लागली.
अनेक आमिषे दाखवून आवळा देऊन कोहळा काढण्याची किमया केली जाऊ लागली.

          ..... आणि आम्ही निमूटपणे सहन करीत आलो.
         
          आजही तेच सुरू आहे.

           आम्ही पै-पैशासाठी दिवसभर रांगेत उभे राहतो. पैसा मागच्या दाराने करोडोंच्या संख्येत मूठभरांच्या खिशात जातो.

           आम्ही हीन - दीन होऊन मंदिरात माथे टेकवून नवसाला जवळ असले-नसले पैसे पेटीत टाकतो. मंदिराच्या कोषागारात अब्जावधी रुपये, सोने-नाणे, हिरे-जवाहिर अगदी बेहिशेबी पडलेले असतात.

            आम्हाला अजूनही असं वाटत असतं की यातून चांगले काही तरी निष्पन्न होईल.

           अच्छे दिन येतील...

         .... नाहीतरी सोशिकपणाबद्दल आम्ही विश्वप्रसिद्ध आहोतच....

                                 *** सुरेश इंगोले ***

Sunday 23 October 2016

                   **  तिची  पर्स  **

                                          लेखक :  सुरेश इंगोले


           ' मनोहर रेगे ' दाराबाहेरून आवाज व टकटक ऐकू आली. रेगे काकांनी दार किलकिले करुन पाहिले. बाहेर कुरियरवाला उभा होता. दार पूर्ण न उघडताच त्यांनी कुरियर घेतले. सही करुन कागद परत दिला. दार बंद करुन त्यांनी लखोटा फोडला. त्यात काही फोटो व अनुरागचे पत्र होते. फोटो पाहून त्यांनी वीणाकाकूंना हाक मारली. पदराला हात पुसत त्या किचनमधून बाहेर आल्या.

        " अनूचे कुरियर का ? काय म्हणतो तो ? आली का एखादी मुलगी पसंत त्याला ?' टेबलवर फोटोंची चळत पाहून त्यांनी उत्सुकतेने प्रश्न विचारायला सुरुवात केली.

           रेगेकाका गंभीर मुद्रेने पत्र वाचत होते. त्यांच्या चर्येकडे लक्ष जाताच त्या थबकल्या.

           " त्याला एकही मुलगी पसंत नाही. त्याला ह्यातल्या कुणाशीच लग्न करावयाचे नाही." असे म्हणून त्यांनी पत्र काकूंकडे सोपवले. काकू पत्र वाचू लागल्या.


               अनुराग त्यांचा एकुलता एक मुलगा. त्याच्याइच्छेप्रमाणे त्यांनी त्याला शिकविले. मुलगा डॉक्टर व्हावा असे यांना वाटत होते. त्याला इंजिनिअर व्हायचे होते. त्याने पुण्यातच जॉब करावा असे यांचे मत होते. त्याने बंगलोरला जास्त स्कोप आहे म्हणून तेथील जॉब स्वीकारला होता. प्रत्येकाला स्वतंत्र मत असतं व त्या मताचा आदर करावा असे संस्कार घरातच होते. मुलगा चांगला कमावतोय व स्थिर होतोय असे दिसताच शिरस्त्याप्रमाणे त्याच्या विवाहाची यांना घाई सुटली.

                  योगायोगाने त्याची पुण्यातच बदली झाली व तो आपल्याजवळ राहणार याचा दोघांनाही आनंद झाला होता. रेगेकाका बँकेतून निवृत्त झाले तेव्हा त्यांनी अनुरागजवळ लग्नाचा विषय काढला. त्याने हसून टाळले होते. दोन वर्षे निघून गेली पण त्याने लग्नाचे मनावर  घेतले नाही.

        तेवढ्यात त्याला कंपनीच्या कामाकरिता कॅनडाला जावे लागले. तो तेथे तीन वर्षे राहणार होता. यावेळी त्याने लग्नाला संमती दर्शविली तेव्हा दोघांनाही आनंद झाला. वधूसंशोधन सुरु झाले व निवडक मुलींचे फोटो त्याला यांनी पाठवले होते.


               काकूंनी पत्र वाचून संपवले. दोघेही बराच वेळ नि:शब्द बसून राहिले. मोबाईलच्या काळात पत्र हेच मुळी अप्रूप होते. ऑनलाईन मॅट्रिमोनीच्या काळात मुलींचे फोटो पाठवणे हेही जुनाटच होते. पण अनुरागने मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी योग्य साधन निवडले होते.

                 ..... त्याचे एका मुलीवर निस्सिम प्रेम होते. दोघांनीही लग्नाच्या आणाभाका घेतल्या होत्या. दोघांनीही घरी सगळे सांगून परवानगी घेण्याचेही ठरविले होते. तेवढ्यात कॅनडाला जायची संधी आली. दोघांनीही परदेशात राहण्याची स्वप्ने रंगविली होती. जायच्या आदल्या दिवशी तिची भेट झाली तेव्हा एका छोट्याशा गोष्टीवरुन दोघांचा वाद झाला. त्याचे म्हणणे होते की सुरवातीला आपण दोघे वर्षभर राहू. दुस-या वर्षी आईबाबांना घेऊन येऊ. तिने ठामपणे सांगितले की आईबाबांना सोबतच घेऊन जाऊ.

          पत्राच्या शेवटी त्याने लिहिले होते की कॅनडाला आल्यावर त्याने तिला कितीदा फोन केला. मेसेजेस केले पण तिने कधी उत्तर दिले नाही. नंतर तिचा फोनच बंद केला होता.

भारतात आल्यावर तिला समक्ष भेटून जाब विचारल्याशिवाय तो कोणताही निर्णय घेणार नव्हता......


             बराच वेळाने रेगे काकाकाकू भानावर आले.

दोघेही एकमेकाकडे पाहून हसले.

     " एका शब्दाने सांगितले नाही अनूने." काकू म्हणाल्या.

" तुझ्यावर गेलाय् तो. तू तरी कुठे चटकन व्यक्त होतेस ?" काका म्हणाले.

" एवढे नाही बरं का ! अहो, एवढं पत्रात मन मोकळं लिहूनही त्याने त्या मुलीचे नाव,पत्ता,माहिती काही दिली का ?"

" बरं...आज उद्या त्याचा फोन किंवा व्हिडिओ कॉल येईलच तेव्हा विचारू." काका म्हणाले.  

      काकूंनी काकांचा हात हाती घेतला व म्हणाल्या," अहो, पण पोर लाघवी दिसत्ये. आत्तापासून आपली काळजी तिला. आपल्याला सोबत घेऊन जाण्यासाठी भांडली अनूशी."

      दोघेही समाधानाने हसले.

" चला, आता बाहेर जाऊ. थोडी भटकंती. एखादे नाटक नाहीतर सिनेमा पाहू. तुझ्या आवडीच्या हॉटेलमध्ये जेवण करू. चालेल ? " काका खुर्चीतून उठत म्हणाले

" चालेल काय धावेल..." काकूंनी हसत दुजोरा दिला.


           ... दोघेही मनसोक्त भटकले. भेळ, पाणीपुरी खाल्ली. नाटकाची तिकिटे न मिळाल्यामुळे दोघांनीही सिनेमा पाहिला. हॉटेलात जेवण करून निघाले तेव्हा रात्रीचे दहा वाजून गेले होते. बराच वेळ पाऊस पडत होता.
   बरीच वाट पाहिल्यावर एकदाची रिक्षा मिळाली. बाहेर काळाकुट्ट अंधार होता. रस्त्यावरचे दिवे अंधुकसे मिणमिणत होते. पावसाची हलकी रिपरिप सुरूच होती.


            एका वळणावर रिक्षा वळली. तिच्या उजेडात समोरच्या बसस्टॉपवर काकूंचे लक्ष गेले. सात आठ माणसे उभी होती. त्या रांगेच्या शेवटी एक तरुण मुलगी कुडकुडत  होती. काकूंनी रिक्षा थांबवली.

          " अहो, ती मुलगी एकटीच दिसते बिचारी. रात्र खूप झाली आहे. तिला घेऊ या का रिक्षात ? तिच्या घरी सोडून देऊ." काकूंनी विचारले. काकांनी मान डोलावली.

           काकूंनी तिला हाक मारली. " अगं ए बाळ, ये इकडे."

तिने रिक्षात कोण आहे याचा अंदाज घेतला. मग ती रिक्षाजवळ आली. " ये, बैस.. कुठे जायचंय् तुला ? आम्ही सोडतो." तिने मान डोलावली. ती अंग चोरून बसली. रिक्षा सुरु झाली.

       " नाव काय गं तुझं ?"

      " छकुली..." ती  मुक्तपणे हसली. " घरी मला सगळे छकुलीच म्हणतात. "

       " घरी कोण कोण आहेत तुझ्या ?"

     " आई व अण्णा आहेत ना. वाट बघत असतील माझी."

     " हो ना ! बरीच रात्र झाली आहे. बस आलीच नाही का बराच वेळची ?"

     " नाही ना..  रिक्षा थांबवा येथे. मला उतरायचे आहे."

रिक्षा थांबली. ती खाली उतरली. " कुठे आहे तुझे घर ? "

काकूंनी विचारले तसे तिने एका घराकडे अंगुलीनिर्देश करुन घर दाखवले.

       बैठे घर होते. फाटकाजवळ प्राजक्त फुलला होता. घरावरही ' प्राजक्त ' असे सुबक नाव कोरले होते आणि दिव्याच्या उजेडात चमकत होते. ती त्यांना धन्यवाद देऊन फाटकाकडे वळली. रिक्षा पुढे निघाली. दोन तीन वळणे घेऊन रिक्षा त्यांच्या इमारतींच्या आवारात शिरली. दोघेही उतरले तोच काकूंचे लक्ष गेले. " अहो, पोर तिची पर्स विसरली येथे."

    " अरे, घाईघाईत विसरली वाटते. ठेव तुझ्याजवळ. उद्या नेऊन देऊ. तू नीट पाहिलेस ना तिचे घर ?-"

   काकूंनी मान डोलावली. रिक्षाचे भाडे चुकवून दोघेही कुलूप उघडून घरात आले.

          अनुरागच्या लग्नाचे व भावी वधूचे स्वप्न पाहत त्यांनी रात्र घालवली.

सकाळ रोजच्यासारखी पार पडल्यावर काकांना तिच्या पर्सची आठवण झाली.

    " अगं, त्या छकुलीची पर्स नेऊन द्यायची आहे ना ? " त्यांनी काकूंना विचारले.

   " अय्या, हो ना ! विसरलेच की...जेवणे आटोपली की जाऊ या."

          रेगे काका काकूंना घरून निघायला चार वाजलेच. तिची पर्स घेऊन त्यांनी खाली येऊन रिक्षा बोलावली.

काकूंनी घर नेमके ओळखले. प्राजक्त विसरणे शक्यच नव्हते.

फाटक उघडून त्यांनी आत प्रवेश केला. दारावरची घंटा वाजवली.

            जड पावलांनी कोणीतरी येत असल्याचे जाणवले. दार उघडले. दारात एक साठीचे गृहस्थ उभे होते. चर्येवरुन ते खूप थकलेले दिसत होते.

            " कोण हवंय् ? "

         " छकुली..." काकू बोलल्या. '' येथेच राहतेय ना ती ?"

     त्या गृहस्थाने विचित्र नजरेने त्यांच्याकडे पाहिले.

दारातून बाजूला होत त्यांनी या दोघांना आत घेतले.

एव्हाना त्यांची पत्नी बाहेर आली होती.

   " ही दोघं छकुलीकडे आलीयेत..." त्यांनी पत्नीला सांगितले. त्यांनी सोफ्याकडे इशारा करीत बसायला सांगितले.

   " काय काम होतं ?'

 " छकुलीची पर्स द्यायची होती " काकूंनी पर्स पुढे करीत सांगितले .

दोघेही चमकले. छकुलीच्या आईने पर्स हिसकल्यासारखी ओढून घेतली.

   " कुठे भेटली तुम्हाला ?' त्यांनी पर्सची झिप उघडत विचारले.

" कोण ?   छकुली ? " काकूंनी विचारले.

" अहो पर्स..."

" छकुली विसरली काल रिक्षात ..."

" क्काय.?" तिचे आईवडील जोरात ओरडले.

" होय .."

" काल ? कसं शक्य आहे ?"

" म्हणजे ?..काल ती आमच्या रिक्षात बसली. येथे उतरली तेव्हा पर्स विसरुन गेली. मी घर लक्षात ठेवले होते म्हणून आज परत द्यायला आलो आम्ही." काकूंनी एका दमात सारे सांगून टाकले.

      तिच्या पर्समधून तिचे आयकार्ड दिसताच तिची आई धाय मोकलून रडू लागली. तिचे वडीलांनीही रुमाल काढून डोळ्यांना लावला. रेगे काका काकू विस्मयाने त्यांच्याकडे पाहू लागले.

   " काय हो ? हा काय प्रकार आहे ? काल छकुली रात्री घरी आली होती ना.. आई अण्णा वाट बघत असतील म्हणाली. " रेगे काकांनी विचारले.

      आता अण्णाही रडू लागले. रडता रडता त्यांनी भिंतीकडे पाहिले आणि ते पुन्हा उमाळा येऊन रडायला लागले. नकळत काका काकूंची नजर भिंतीकडे गेली. आणि......


            ... दोघेही दचकले. एकटक भिंतीकडे पाहू लागले. आणि पाहता पाहता थरथर कापू लागले.


              भिंतीवर छकुलीचा फोटो टांगला होता. हसतमुख....निरागस....आणि त्या फोटोला हार घातला होता.
.... बराच वेळ दोघेही सुन्न बसून होते. भानावर येऊन काकूंनी थरथरत काकांचा हात धरला.

     " म्हणजे.... काल ती सोबत....होती.....नव्हती...."

काकांनी अण्णांच्या खांद्यावर थरथरता हात ठेवला. त्यांच्या शरीरातला कंप अण्णांना जाणवला.

  " मला नीट उलगडून सांगा. " काकांनी काकुळतीने विचारले.

    काही क्षण नि:शब्दतेत गेले. मग अण्णा बोलू लागले.

          " दोन महिन्यापुर्वी ती खूप आनंदात होती. कारण विचारलं तर काही सांगेना... मग सांगेन म्हणाली. एकुलती एक असल्यामुळे आम्ही तिला लाडात वाढवले. तिच्या इच्छा पूर्ण केल्या. खूप सालस, विचारी व समंजस होती. आम्ही तिच्या कलानेच घ्यायचो. पोरगी प्रेमात पडली की काय असे वाटायचे. पण स्वत:हून सांगेल म्हणून शांत राहिलो."

      अण्णांनी एक खोल नि:श्वास सोडला. फोटोकडे पाहून डोळे टिपले.

   " दोन महिन्यापुर्वी ती लवकर घरी आली नाही म्हणून तिला फोन केला तर आज उशीर होईल, वाट पाहू नका ...म्हणाली. पण रात्रीचे दहा वाजायला आले तेव्हा आमचा धीर सुटला. तिला बरेचदा फोन केला पण फोन स्वीच ऑफ येत होता. मी लगेच शेजारच्या चिंटूला घेऊन तिला शोधायला निघालो.

एके ठिकाणी खूप गर्दी दिसली. ..."

         अण्णा हमसून हमसून रडायला लागले. काका त्यांच्या पाठीवर थोपटू लागले. थोडे शांत झाल्यावर ते पुढे बोलू लागले.

     " तिथे एक अपघात झाला होता. प्रेत छिन्नविच्छिन्न झाले होते. काहीही ओळख लागत नव्हती. आम्ही तेथून पोलीस स्टेशनला गेलो. तक्रार नोंदवली. काही वेळाने पोलीस आम्हाला तेथेच घेऊन गेले. आम्हाला काही वस्तू दाखवल्या गेल्या. त्यातली छकुलीची घड्याळ, कर्णफुले, तिच्या नावाचे पदक असलेली चेन व चपला ओळखू आल्या. ती दिसलीच नाही. पोस्टमॉर्टेम नंतर ज्या शवाला अग्नी दिला ते तिचेच होते की नाही कोणास ठाऊक......!"

      बराच वेळ शांततेत गेला.

     " छकुलीची पर्स मिळालीच नव्हती. त्यात तिचे फोटो, मोबाईल आणि इतर ओळखपत्रे होती. कुणी लांबवली असेल असे पोलीस म्हणत होते. आजूबाजूला शोध घेतला पण पर्स मिळाली नव्हती. .....आणि...आज तुम्हाला ही पर्स घेऊन तिनेच पाठवले...."


.....  छकुलीची आई किती तरी  वेळ ती पर्स उराशी धरून रडत होती. रेगे काका काकू अजूनही धक्क्यातून सावरले नव्हते.

           तिच्या आईने पर्समधून एकेक सामान काढायला सुरुवात केली. तिचे फोटो, क्रेडिट - डेबिट कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, एका मुलाचा फोटो.....तिच्या आईने फोटो निरखून पहायला सुरुवात केली.

        " अहो, छकुलीने पसंत केलेला मुलगा असेल का हा ? तिने काही सांगितले नव्हते. "

  अण्णांनी त्यांच्या हातून फोटो घेतला. ते फोटो पाहत असताना रेगेकाकांचे त्याकडे लक्ष गेले. ते एकदम दचकले. त्यांनी तो फोटो जवळजवळ हिसकावूनच घेतला. आणि तो पाहताच ते ओरडले, " अरे, हा तर आमच्या अनुरागचा फोटो." काकू अनुरागच्या फोटोकडे पाहून थक्क झाल्या.

     

          चौघेही एकमेकांकडे पाहत राहिले.....


 न सांगता ब-याच गोष्टींचा उलगडा होत गेला. पर्सच्या निमित्ताने तिने दोन कुटुंबांना जवळ आणले होते. ज्या दिवशी अनुराग कॅनडाला जायला निघाला त्याच दिवशी तिचा अपघात झाला होता. कदाचित ती त्याला सोडायला एयरपोर्टवर जायला निघाली असेल. कदाचित आदल्या दिवशी झालेल्या वादामुळे तिची मन:स्थिती चांगली नसेल..कदाचित....

       पण हे सगळे प्रश्न आता अनुत्तरित होते. मोबाईल बॅटरी संपल्यामुळे डिसचार्ज झाला होता. म्हणून कोणाचेच कॉल लागत नव्हते.


         अण्णांशी बोलण्यासाठी रेगेकाका शब्दांची जुळवाजुळव करू लागले....


                                      ** सुरेश इंगोले **

                                       शहापुर = भंडारा 

Saturday 2 July 2016

** तुही  जात  कंची ? **

     जन्मत:च जी आपल्याला चिकटते आणि जी जन्मभर जात नाही ती ' जात.'
   
     अगदी शाळेत दाखल झाल्यापासून तो नोकरीतून निवृत्त होईपर्यंत ती आपला पिच्छा सोडत नाही.

    जातीवर निवडणुका लढल्या - लढवल्या जातात. जातीसाठी आरक्षण....जातीसाठी ऑनर किलिंग.....जातीमुळे स्पृश्य-अस्पृश्य, दलित - सवर्ण हे भेदाभेद. त्यातही भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात सतराशे साठ जाती.

    कशा निर्माण झाल्या या जाती ?  त्यांत उच्च - नीच हे भेद कां पडले ? त्याचे एवढे अवडंबर कां माजविले जाते ...आणि ते ही विवाह संबंधात..?

       ..... वास्तविक वेदकाळात चातुर्वर्ण निर्माण झाले सामाजिक गरज म्हणून.. जसजशा गरजा निर्माण झाल्या तसतशा त्या पूर्ण करणारे कोणी ना कोणी पुढे येऊ लागले. ज्याला ज्या कामात रस होता, गती होती तो ते काम कौशल्याने करु लागला.  वस्तुविनिमयाच्या काळात आपण बनविलेल्या वस्तु इतरांना देऊन त्यांच्याकडील गरजेच्या वस्तु प्राप्त करणे हे जगण्याचे साधन होऊ लागले.
             अशावेळी ज्या एका बुद्धीमान व्यक्तीने पुढाकार घेतला त्याने प्रत्येकाचे कौशल्य जाणून कामांची विभागणी केली. गरजेच्या वस्तु तयार होऊ लागल्या. त्या त्या वस्तूंच्या नावावरुन त्या तयार करणा-याला संबोधन दिले जाऊ लागले.
       मडकी बनविणारा कुंभकार...कुंभार, चामड्याच्या वस्तु बनविणा-याला चर्मकार...चांभार, सोन्याचे अलंकार बनविणारा सुवर्णकार...सोनार, कपडे विणणारा विणकर...कोष्टी, लाकडी वस्तु बनविणारा सुतार, बागकाम करणारा बागवान...माळी, शेती करणारा कृषिवल...कुणबी.....अठरापगड कामे...अठरापगड नावे.
  हीच नावे नंतर जात म्हणून चिकटली.
   
        ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र या चातुर्वर्णामुळे केवळ कामाची विभागणीच केली गेली होती. विशेष म्हणजे कोणतेही काम क्षुद्र किंवा उच्च प्रतीचे नव्हते. ब्राम्हणांनी पौरोहित्य करावे, क्षत्रियांनी समाजरक्षणाचे कार्य करावे, वैश्यांनी प्रत्येकाच्या गरजा भागवाव्या तर शूद्रांनी समाजाच्या  आरोग्याचे रक्षण करावे. घाण उचलणे, मेलेले ढोर उचलणे किंवा जी कामे करताना किळस येईल ती कामे जर इतर कोणी करीत असेल तर त्याचे सामाजिक आरोग्य रक्षणाचे कार्य उलट महान होय.

         पण नंतर याच जाती बनल्या. त्यातून स्पृश्य - अस्पृश्य भेद निर्माण झाले.

        आज परिस्थिती काय आहे ? आपल्याला चिकटलेल्या या जाती आपण पाळतो तर आपण खरोखर तीच कामे करतो काय ?
           कामावरून जाती निर्माण होत असतील तर या कालबाह्य जातींचा त्याग करुन नवीन जाती निर्माण कां होऊ नये ?

     ...... दहा वर्षापुर्वी माझ्या ज्येष्ठ चिरंजिवाचे लग्न झाले. ईटीव्ही हैद्राबादला तो वृत्तनिवेदक म्हणून कार्यरत होता. तेथीलच एक निवेदिका आम्हाला आवडली. मुलाला विचारून तिच्या पालकांशी संवाद साधला. आम्ही सर्व हैद्राबादला जमलो. मने जुळली....संबंध जुळला. आणि त्याच बैठकीत लग्न जमले. हैद्राबादला एंगेजमेंट, कोल्हापूरला रजिस्टर्ड लग्न व शहापूरला रिसेप्शन असा कार्यक्रम ठरला.
             
             एवढे सगळे ठरल्यावर व्याही श्री वैद्य म्हणाले, ' अहो ! पण तुम्ही आम्हाला आमची जात विचारलीच नाही.."
            मी हसून म्हणालो, " मला माहीत आहे, तुमची जात अभियंता....इंजीनियर तर माझी जात प्राध्यापक...त्याहीपेक्षा आपल्या मुलांची जात जुळली ना...! दोघेही पत्रकार आहेत.. इतर काही जाणून घ्यायची माझी इच्छा नाही.'
           
       आणि विवाह पार पडला........

         आज आपण जे काम कुटुंब पोसण्याकरिता करतो तिलाच जात मानली तर बिघडले कुठे ! नवीन जाती निर्माण होतील.
             अधिका-यापासून कारकुनापर्यंत.... मालकापासून कामगारापर्यंत....शेतक-यापासून मजुरापर्यंत....उद्योगधंद्यातील प्रत्येक घटकापर्यंत.... अनेक जाती निर्माण होतील.

            पण हा भेदाभेद तरी संपेल. तो संपणे ही काळाची गरज आहे.

        समाजात तेव्हाच ' अच्छे दिन ' येतील. !!

                                  **** सुरेश इंगोले *****

Thursday 30 June 2016

तुझा एक अलवार स्पर्श
            अजूनही मन शहारते ....!
तुझ्या सान्निध्याचा भास
             अवघी काया मोहरते....!
शिशीरातही फुलतो वसंत
              वठलेले मन बहरते......!
 तुझ्या साथीने मनपाखरु
               मुक्त होऊनी विहरते....!

सुरेश इंगोले.....
तुझा एक अलवार स्पर्श
            अजूनही मन शहारते ....!
तुझ्या सान्निध्याचा भास
             अवघी काया मोहरते....!
शिशीरातही फुलतो वसंत
              वठलेले मन बहरते......!
 तुझ्या साथीने मनपाखरु
               मुक्त होऊनी विहरते....!

सुरेश इंगोले.....

Monday 11 April 2016

चिमखडे बोल.....

   पाहुणे जायला निघाले. निरोप द्यायला सगळे बाहेर आले. पण घाई कोणालाच नव्हती. सुनंदा एका बाजूला सौ.सोबत माहेरच्या गोष्टीत रमली. माझा मुलगा व सून त्यांच्या मुलाशी व सुनेशी गप्पा मारत होते. मुले झाडाभोवती शिवाशिवी खेळत होती. मी व पाहुणे बोलत बोलत टेरेसवर आलो.

     संध्याकाळचे सोनेरी ऊन पसरले होते. भोवतालचे दृष्य पाहून सुभाषरावांच्या चेह-यावर प्रसन्नता उमटली.  " वा सर ! निसर्गाच्या सान्निध्यात राहायला मिळण्यासारखे भाग्य आम्हा शहरी लोकांना कुठून मिळणार ?"
मी हसलो. त्यांच्या खांद्यावर हात ठेवत म्हणालो, ' येथे घर बांधायला सर्वांचाच विरोध होता. मुलांना शहरात राहायला हवे होते. बायकोला एवढे मोठे घर नको होते. मोठ्या घराचे काम तिच्याने होत नव्हते. मी येथे वीस वर्षे भाड्याच्या घरात काढली. दोन खोल्यांच्या लहान लहान घरात अडचणी सोसत मुलांना वाढवले. तेव्हाच मनाशी खूणगाठ बांधली होती की जेव्हा स्वत:चे घर बांधीन तेव्हा मोठे प्रशस्त बांधीन."
    " तुमची इच्छा पूर्ण झाली म्हणायची. "
   " सर्वांचा विरोध पत्करून मी हे घर बांधले. वास्तुपूजनाला येणा-या सर्वच लोकांनी जेव्हा घर व परिसराची प्रशंसा सुरु केली तेव्हा घरातला विरोध मावळला."
   
    आम्हाला पाहून सगळेच टेरेसवर आले.  मुले अवती भवती बागडू लागली. आमच्या संभाषणात भाग घेत सौ म्हणाली, " खरेच आधी माझा विरोध होता. पण यांना कर्मभूमी सोडायची नव्हती. येथे सगळे जिव्हाळ्याचे लोक आहेत. अडीनडीला धावून येतात."
" ताई, सर्वात महत्वाचे म्हणजे मुले काही तुमच्यासोबत राहणार नव्हती. नोकरीधंद्यानिमित्ताने दूर कोठेतरी जाणारच होती ना !" सुभाषराव म्हणाले.
" हो ना ! निवृत्त आयुष्य निवांत काढण्यासाठी याहून दुसरा मार्ग नाही असे मला वाटते. आता सणांच्या निमित्ताने तीन ही मुले आपापल्या कुटुंबासह येतात. घर आनंदाने नाचू लागतं. पुढच्या वेळी जेव्हा मुले येतील तोपर्यंत सगळ्या स्मृती घर जपून ठेवतं. तुम्हाला सांगतो सुभाषराव....घराला मन असतं. घर माया लावतं. ओढ लावतं. त्याच ओढीने मुंबई असो की सौदी असो, मुलं घरी येण्याचे प्लॅनिंग करतात. पुन्हा पुन्हा येतात. खूप बरं वाटतं."

      मी जरा जास्तच भावुक झालो होतो. वातावरणाला हलके करण्यासाठी सुभाषरावांनी विषय बदलला.

" बाकी काही म्हणा सर, येथून आजूबाजूचे दृष्य अगदी नयनरम्य दिसते. एका बाजूला नॅशनल हायवे नं. ६ वरुन सतत सुरु असणारी वाहनांची वर्दळ, उत्तर आणि दक्षिणेकडे असणा-या टेकड्या...समोर पसरलेली भातशेती... वा ! केवळ अप्रतिम ..."

     सर्वजण टेकड्यांकडे बघू लागले. मधेच सुभाषरावांचा मुलगा म्हणाला, " अरे इतर टेकड्यावर झाडे व किती छान हिरवळ आहे. ही एकच टेकडी कां बरं बोडकी आहे ? "
माझा सहा वर्षांचा नातू शौर्य चटकन म्हणाला,-" काका, ती रिकामटेकडी आहे."

    सर्वजण खळखळून हसू लागले.

                               ....... सुरेश इंगोले.

Thursday 7 April 2016

वेशीवर पावसाच्या
आल्या सरीवर सरी
चिंब भिजले झोपडे
डोळे कोरडेच तरी ॥

Monday 4 April 2016

वो  कौन  था ?

            दोन तीन वर्षापुर्वीची गोष्ट.  मुंबईहून नागपूरला यायला निघालो तेव्हा मुलाचा फोन आला ," बाबा, मी आवश्यक कामासाठी अमरावतीला जात आहे मित्रासोबत. कार नागपूरला आत्याकडे ठेवली आहे." आम्ही दोघेही नागपूरला सकाळी ९.०० वाजता उतरलो. बहिणीकडे गेल्यावर तिने काही लवकर जाऊ दिले नाही. जेवण, आराम, गप्पा यातच दिवस गेला. संध्याकाळी दोघेही कारने शहापूरला जायला निघालो.

             अवघा ५० कि.मी.चा प्रवास. त्यातच नागपूर - भंडारा चौपदरी रस्ता झालेला. तरी संध्याकाळची गर्दीची वेळ असल्यामुळे नागपूरबाहेर पडायला सहा वाजले. एकदा हायवेला लागल्यावर गाडी सुसाट सोडली. एफ एमवर मस्त गाणी लागलेली. बायकोला गमतीने म्हटले, " काय मग ? लाँग ड्राईव्हचा फील येतोय ना ! "
ती हसून म्हणाली, " पन्नास किलोमीटर....लाँग ड्राईव्ह...छान ! "

            अर्धा रस्ता पार होईपर्यंत अंधार गडद झाला. सुसाट वेगातल्या गाडीला एकाएकी जोरात झटका लागला. गाडी डिव्हायडरला धडकलीच असती पण...... कशीबशी कंट्रोल झाली व हेलकावत बाजूला थांबली. बराच वेळ बसूनच राहिलो. छातीची धडधड कमी होताच खाली उतरलो. मागचे उजवीकडचे चाक बसले होते. स्टेपनी बदलणे भाग होते. पण मदतीला कोणीच नव्हते. स्टेपनी, जँक सगळे बाहेर काढून ठेवले. थोडा प्रयत्नही करून पाहिला. पण स्क्रू एवढे टाईट होते की हलायलाच तयार नव्हते.  ती खाली उतरली होती. तिला म्हटले, " तू गाडीतच बसून रहा. आतून दार बंद करुन घे. मी मदतील कोण भेटतो का ते पाहतो."

            ती आधी तयारच नव्हती. आजूबाजूला दाट झाडे व माकडांचा हैदोस सुरु होता.  रहदारी सुद्धा तुरळक होती. ती गाडीत बसताच मी आधी समोर गेलो. तिकडे कोणीच नव्हते. मग मागे आलो. परत तिला धीर देऊन मागच्या बाजूला डिव्हायडर ओलांडून रस्ता पार केला. थोड्या अंतरावर एक पेट्रोल पंप दिसला. तेथे एक झोपडी होती. बाहेर टायर वगैरे ठेवलेले होते. मोठ्या उमेदीने मी तेथे गेलो. एक विशीतला पोरगा दिसताच मी त्याला सगळी आपबीती सांगितली. " मालक बाजारमें गये है सब्जी खरीदने. ये छोडके मै कैसे आ सकता हूँ ?" मी त्याला मदतीची विनंती करताच तो तयार झाला. झोपडीचे दार टेकवून तो माझ्यासोबत आला. गाडीपाशी येताच तिने आवाज दिला. ती खूपच घाबरली होती.

            त्याने ताकदीने स्क्रू काढून स्टेपनी बदलली. डिकीत चाक व सामान ठेवून म्हणाला, " साब, स्टेपनी जल्दी बना लेना. वो टायर कमजोर है. " तो जायला निघाला तसा मी खिशात हात घातला. खिशात पाचशेचीच नोट होती. मी त्याला म्हणालो, " मुन्ना, तुम गाडी में बैठो. मै तुम्हे पेट्रोल पंप पर छोडता हूँ. तुम्हे पैसै भी तो देने है."
   " नही साब, पैसे नही होना. मँडमजी डर रही है. आप जल्दी निकल जाईये." एवढे बोलून तो झपझप डिव्हायडर ओलांडून अंधारात नाहीसा झाला. मला फार चुटपुट लागून राहिली. कार स्टार्ट करून मी पुढे निघालो. माझी चुकचुक ऐकून ती म्हणाली, " तुम्ही नेहमीच तर नागपूरला जात असता. मुद्दाम गाडी थांबवून त्याला पैसे देऊन टाका. बिचारा देवासारखा धावून आला." आता स्पीडवर कंट्रोल आले होते. सावकाश घरी पोचलो.

               दोन तीन दिवसांनी मित्रासोबत नागपूरला जायचा योग आला. वडोदा गांव येताच मला त्याची आठवण झाली. मी मित्राला पेट्रोल पंपजवळ गाडी थांबवायला सांगितली. खाली उतरून मी त्या झोपडी जवळ गेलो. दार बंद होते. आजूबाजूला कोणीच नव्हते. पेट्रोल पंपवर जावून चौकशी केली तेव्हा कळले की तेथे कोणी मुलगा काम करीत नाही. पंक्चर दुरुस्तीवाला गावी गेला होता. मी परतलो.
             ........ नागपूरला जाताना अजूनही त्या पेट्रोल पंपजवळ येताच मला त्या मुलाची आठवण येते. तो कोण होता हे गूढ काही उकलले नाही. फक्त त्याच्या दीर्घायुष्याची कामना करण्याशिवाय माझ्याकडे दुसरा कोणता पर्याय आहे ?

                                                                            *****  सुरेश इंगोले  *****

Sunday 27 March 2016

काल क-हांडला जंगलात वाघांनी भेटीस बोलावले होते. सकाळी लवकर या म्हणूनही बजावले होते. पण आपण सुस्त.... म्हणूनच मस्त !
सकाळी साडेसातला जंगलात प्रवेश केला. समोरून येणा-या वाहनातील पोरी खूपच excited झाल्या होत्या. दोन वाघ भेटले म्हणून कॅमे-यातील फोटो दाखवीत होत्या. आम्ही उत्साहाने पुढे गेलो.
पण वाघोबा आम्ही वेळ न पाळल्यामुळे नाराज होऊन सखीला घेऊन जंगलात निघून गेले होते. मनधरणी, विनवणी कशालाही न जुमानता....
      चलता है यार.... बेटर लक नेक्स्ट टाईम !
ही आपली मनोवृत्ती.....वाघांची नाही बरं....!
त़्यांची वेळ पाळावीच लागते. नाही तर मग सांबर, मोर, गरुड यांच्यावर भागवावे लागते. आम्ही शार्दूलचरण पादुकांचे [ वाघाच्या पावलांच्या ठशाचे] दर्शन घेऊन ...बड़े बेआबरू होकर....परतलो.

                                सुरेश इंगोले....

Saturday 5 March 2016



                           अजि म्या भूत पाहिले...
                            -------------------------

                         दिवाळीच्या दिवसात मुंबईहून सुलागलेहर्ध्याला आलो होतो. काही कामासाठी व मित्रांना भेटण्यासाठी नागपूरला आलो. मित्र काही सोडीनात. पण जाणे भाग होते. रात्री ८.०० च्या गाडीने निघालो. मधे सिंदी(रेल्वे) स्टेशन लागले. मला ताईची आठवण आली. ताई म्हणजे माझी धाकटी मावशी. सिंदी पासून तीन किलोमीटरवर तिचे खेडेगाव होते. कसलाही विचार न करता मी सिंदीला उतरलो. विशीचे वय. अंगात तारुण्याची रग. बेदरकार वृत्ती.
               
                         स्टेशनबाहेर येऊन टपरीवर चहा पीत काही वेळ घालवला. मग सावकाश गावात आलो. ताईच्या गावाचा रस्ता आठवत नव्हता. सुमारे सहा-सात वर्षांपुर्वी तिच्या  लग्नाच्या वेळी ते गाव पाहिले होते. पळसगाव(बाई). गावाला लागून असलेली नदी. नदीच्या काठावर मंदीर. बांधून काढलेला घाट. सगळे आठवत होते.

                         मी एका पानाच्या गादीवाल्याला पळसगावचा रस्ता विचारला. त्याने आधी घड्याळ पाहिले. मग माझ्याकडे रोखून पाहिले. " पँसेंजरनं आले काय बाबू ?" त्याने विचारले. मी मान हलवली. " मंग आतापावतर कुठी व्हते ?" मला त्याच्या आगावूपणाचा भारी राग आला. "कां ?" तरी मी विचारले. " तो कपड्याचा बेपारी मघाच गेला ना. सोबती पाहत होता." त्याने मला रस्ता दाखवीत विचारले, " सिंदीत कोनी न्हाई का वयखीचं ? सकायी गेले अस्ते."
"नाही हो. सकाळी मला वर्धेला परत जायचे आहे." असे म्हणून मी त्याने दाखवलेल्या रस्त्याने चालू लागलो. बहुधा अष्टमीची रात्र होती. चंद्राचे टिपूर चांदणे पडले होते. त्या आल्हाददायक वातावरणात उल्हसित मनानेे मी गाणे गुणगुणत रस्त्याला लागलो. रात्रीचे दहा वाजायला आले होते. सुनसान रस्ता असूनही मनात कोणतेही विचार नव्हते. त्यामुळे सावकाश चालत मी गावाच्या जवळ आलो. एक वळण आले. आणि ......

                       पुढे आमराई लागली. आंब्याचे दाट बन. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी झाडे. अगदी एकमेकात मिसळलेली. आमराईत शिरलो आणि एकदम अंधारल्यासारखे झाले. चंद्राचा उजेड दिसेनासा झाला होता. मी शहारलो. आणि  मला अचानक आठवले. या आमराईत भुताटकी असल्याचे ऐकले होते. अरे बापरे !  म्हणूनच तो पानवाला रात्रभर थांबण्याचा आग्रह करीत होता तर....
                 मला दरदरून घाम फुटला. आता काय करायचे ?  परत फिरायचे की पुढे जायचे.....परत दोन कि.मी.जाण्यापेक्षा एवढी आमराई पार केली की लगेच गाव होते. किंकर्तव्यमूढ अवस्थेत काही क्षण गेले. शेवटी मनाचा हिय्या केला. सगळा धीर एकवटला. दीर्घ श्वास घेऊन मी भराभर चालायला सुरवात केली. माझ्याच पावलांचा आवाज ऐकू येऊ लागला. ' वाजे पाऊल आपुले...म्हणे मागे कोण आले..' खरेच.! छ्या : !! भुताटकी वगैरे काही नाही. पण हे काय......

                      समोर एक आकृती हलत होती. अगदी मधोमध. खाली काही नाही. वरही काही नाही. म्हणजेच पायही नाहीत व डोकेही नाही. फक्त मधे पांढरे पांढरे हलत होते. माझी पाचावर धारण बसली. हातपाय गळाल्यासारखे झाले. पुन्हा अवसान गोळा करून मी जोरात ओरडलो, "ए, कोण आहे रे ? थांब. थांब !"
              ती आकृती जोरजोरात हलायला लागली व एकदम दिसेनाशी झाली. च्यायला ! नक्कीच भूत आहे. अचानक गायबच झाले की. एकाएकी मी धावायला लागलो. कसेही करुन एवढा रस्ता पार करायला हवा. गाव गाठायलाच हवे. मनात राम राम म्हणत मी जोरात धावू लागलो. एक वळण आले व आमराई संपली. पुढे नदी संथपणे वाहत होती. चंद्राच्या शीतल लख्ख उजेडात सगळे स्पष्ट दिसू लागले.

               मी हातपाय धुवून फ्रेश झालो. नदी ओलांडून वर आलो. जवळच ताईचे घर होते. दार वाजवले. काकांनी दार उघडले. मी दिसताच ताईने शिव्या द्यायला सुरवात केली. स्वागताचा हा प्रकार मला नवीनच होता. काकांनी तिला आवरले. " आधी त्याला जेवायला घाल. सकाळी बोलू"
               मी जेवून थोड्याच वेळात गाढ झोपी गेलो. सकाळी काकांनी मला हलवून उठवले.
" काय झाले ?" मी विचारले.
" तुला काल तुझ्या मावशीने शिव्या घातल्या होत्या कारण आमराईत भुताटकी आहे. काल आमच्या गावातल्या कापड दुकानदाराला भूत बाधले. सगळा गाव गोळा झालाय त्याच्या घरासमोर " काकांनी सांगितले. मी ताडकन उठून बसलो.

       " काका, मला त्यांच्या घरी घेवून चला. मला भुताची भेट घ्यायचीय्." मी काय बोलतोय हे काकांना काही कळले नाही. आम्ही त्यांच्या घरी गेलो. घरासमोर चिक्कार गर्दी होती. लोक आपापसात बोलत होते. सगळीकडे भुताच्याच गोष्टी. आम्ही घरात गेलो. लोकांनी आम्हाला जागा करुन दिली.
      " तुम्हाला भूत कुठे व कसे दिसले सांगता का ?" मी विचारले. " मी ही रात्रीच आलो."
तो उठून बसला. थरथर कापत सांगू लागला," आमराईत बराच दूर चालत आल्यावर मला मागून भुताने आवाज दिला. ' ए कोण आहे? थांब.' मी माग पाहिले तर पांढरी आकृती हलत होती. खाली वर काहीच नाही." तो परत किंचाळला.
          मी हसू लागलो. सगळे माझ्याकडे विचित्र नजरेने बघू लागले.
मी त्यांच्या शेजारी खाटेवर बसलो. त्यांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणालो, " काका, भूत वगैरे काही नाही. आपण दोघांनी एकमेकांना पाहिले. "
" नाही हो ! भूतच होते ते. पाय नाही डोके नाही...."
" मलाही तसेच दिसले होते. पाय नाही डोके नाही...वास्तविक अंधारात पाय व डोके दिसले नाही. फक्त पांढरे कपडे तेवढे दिसत होते." माझा युक्तीवाद बहुतेक सर्वांना पटलेला दिसत होता.
" आवाज दिल्यावर आकृती जोरात हलत होती ना !" त्याने मान हलवली.
" कारण तुम्ही पळू लागले होते व मी तुमच्या मागे धावू लागलो होतो. "
...... आता सारेच हसू लागले होते.

                                                                              ..**.. सुरेश इंगोले..**..

Wednesday 17 February 2016

                      *  घाटातला    देवदूत.  *
                      ===============

                 वकील साहेब अकोल्याहून नागपूरला जायला निघाले तेव्हाच चार वाजायला आले होते. आज उशीर होणार नक्कीच ! शिवाय त्यांचा सहकारी आज येऊ शकला नव्हता. उद्या हायकोर्टात महत्वाची केस होती. ते एकटेच कार ड्राईव्ह करीत सुसाट निघाले होते. मधे कुठे थांबायची त्यांची इच्छा नव्हती. तळेगांवचा घाट लागला आणि  गाडी झटके मारू लागली. ऐन घाटाच्या अवघड वळणावर गाडीने आचके दिले.  गाडी बाजूला घेऊन ते खाली उतरले.  गाडीचे बॉनेट उघडून त्यांनी पाहिले. कार खूप गरम झाली होती. तसंही त्यांना गाडीचं काहीच तंत्रज्ञान माहीत नव्हतं. अंधार पडला होता. तुरळक वाहतुक सुरु होती. त्यांनी एकदोन वाहनांना हात देऊन पाहिला. पण त्या अवघड वळणावर कोणी थांबायला तयार नव्हते. काय करावे त्यांना काही सुचेना.
                  तेवढ्यात बाजूच्या दरीतून घाट चढून कुणीतरी रस्त्यावर आले. जवळ आल्यावर तो एक पंचविशीतला तरुण असल्याचे वकीलसाहेबांना दिसले. गोरापान, साधारण उंचीचा, मागे वळवलेले काळेभोर केस, सरळ नाक आणि हसतमुख चेहरा. त्याला पाहून त्यांना एकदम हायसे वाटले.
" काय साहेब, गाडी बिघडली वाटते ?" त्याने हसून विचारले.
" होय रे बाबा ! काय झाले काही कळत नाही. मला त्यातले काही कळतही नाही. " वकील साहेब हताशपणे उद्गारले.
" मी पाहू का ? " त्याने अदबीने विचारले.
" अरे वा ! उपकार होतील रे बाळा..." ते आनंदाने म्हणाले.
" उपकार कायचे त्याच्यात साहेब ? आपलं कामच आहे हे..तुम्ही दूर उभे राहा साहेब. "असे म्हणून त्याने त्याच्या खिशातून अवजारं काढली व तो कामाला लागला. वकील साहेबांनी खिशातून सिगारेटचे पाकीट काढले तोच तो म्हणाला, " साहेब, प्लीज सिगारेट नका पेटवू. मला वास सहन होत नाही." त्यांनी पाकीट खिशात ठेवून दिले. ते सहज त्याच्याशी गप्पा मारू लागले. त्याचे नाव संजय होते. थोड्याच वेळात त्याने कार स्टार्ट करायला सांगितली. वकीलसाहेबांनी कार सुरू केली. ती सुरू होताच त्यांना आनंद झाला. ते खाली उतरले व त्यांनी पाकीट काढून काही पैसै दत्याला देऊ केले. तो नम्रतेने नकार देऊन दरीकडे जाऊ लागला.  "अरे संजय, तू राहतोस कुठे ? चल, मी तुला सोडतो ना " त्यांनी विचारताच तो सहज म्हणाला, " माझी येथे खालीच झोपडी आहे." दरी उतरून तो नाहीसा झाला.
              वकील साहेबांनी पुढे प्रवास सुरु केला. घाट उतरताच सारवाडी गाव लागले. त्यांनी गाडी थांबवली. एका हॉटेलमधे येऊन त्यांनी चहाची ऑर्डर दिली. हॉटेलमालक बोलघेवडे होते. त्यांनी चौकशी करयला सुरवात केली. वकील साहेबांनी गाडी घाटात बिघडल्याचे सांगताच ते म्हणाले, " मग कशी दुरुस्त झाली ?" " एक तरुण मुलगा आला व त्याने चटकन दुरुस्त केली." त्यांनी असे म्हणताच हॉटेल मालकांनी त्याचे वर्णन करुन म्हटले, " संजय नाव होते का त्याचे ?"
" होय हो ! फार गुणी मुलगा. सालस स्वभावाचा. एक पैसा सुद्धा घेतला नाही. "
" खरेच गुणी मुलगा होता बिचारा... कोणाचेही काम करायचा. नेहमी हसत राहायचा."
"म्हणजे..." वकीलसाहेबांनी दचकून विचारले.
" बाजूच्या कारंजा गावातला होता तो. क्लीनर म्हणून ट्रकवर लागला. सगळी कामं शिकून घेतली त्यानं."
" होता म्हणजे.....?" वकील साहेबांचा आवाज घशातच विरला.
" दोन वर्षांपुर्वी घाटात त्याच ठिकाणी त्यांचा ट्रक उलटला व दरीत कोसळला. कोणीच वाचले नाही."
वकीलसाहेबांना दरदरून घाम फुटला. म्हणजे...... म्हणजे ....तो.... संजयचे भूत ....!
हॉटेल मालकांनी वकीलसाहेबांना पाणी पाजले. धीर दिला. " बघा साहेब, आजही तो तेथे एखादी गाडी बिघडली तर दुरुस्त करुन देतो. कधी कोणाला त्रास दिला नाही. तुम्ही घाबरू नका. त्याने तुम्हाला मदतच केली आहे. "
वकील साहेबांनी हॉटेल मालकांना एका ड्रायव्हरची सोय करायला सांगितली. ते आता गाडी चालविण्याच्या मन:स्थितीत नव्हतेच.
        रात्रभर ते दचकून उठत होते. सकाळी जरा फ्रेश वाटताच त्यांनी मित्राला कळवून प्रेस कॉन्फरन्स बोलावली व सर्व वृत्तांत कथन केला.
        दुस-या दिवशी सर्व वृत्तपत्रात ही बातमी छापून आली.

( १९६२-६३ मधे घडलेली सत्यघटना.)


                                                                  ----  सुरेश इंगोले ------

Monday 15 February 2016

** घरकुल **

 आज मी खरेच अवाक् झालोय्. !
सर्वसामान्यांप्रमाणे जीवन घालवणारे आपण ....शिकतो, नोकरी किंवा उद्योग करतो. लग्न करतो, कुटुंबाच्या रहाटगाडग्यात गुंतवून धेतो. काळजी, संकटे, ओढाताण या फे-यातून काही आनंदाचे क्षण शोधण्याचा प्रयत्न करतो. शरीर धडधाकट असतं. मन, बुद्धी शाबूत असते. त्या दृष्टीने आपण श्रीमंत असतो.
         पण .... शरीराच्या एखाद्या अवयवाला अपंगत्व आले तर काही अंशी कुटुंबावर अवलंबून असतो. असे अपंग शिक्षण, प्रशिक्षण व सहाय्याद्वारे स्वावलंबी होऊ शकतात.
             परंतु ' मतिमंदां ' च्या बाबतीत ' समजणं ' ही प्रक्रियाच नसते. त्यामुळे ते पालकावर सर्वस्वी अवलंबून असतात. तीव्र मतिमंदत्व असेल तर त्यांना जगविण्याची जबाबदारी पालकांवर येते. अशावेळी आई वडील नसले तर.... त्यांचा सांभाळ इतर नातलग कसोशीने करु शकत नाही.
                डोंबिवलीत 'खोणी ' या गावी अशा मतिमंद व्यक्तींचा सांभाळ तहहयात करण्यासाठी पालकांनी एकत्र येऊन ' अमेय पालक संघटना ' ही संस्था स्थापन केली आहे. शासनाकडून कोणतेही अनुदान न घेता सुजाण व सहृदय हितचिंतकांच्या पाठबळावर सुरु आहे.
              आज ' कुबेर ' स्नेही चंदूकाका सीएम जोशी यांच्यामुळे मला या ' घरकुलाला' भेट देण्याचा योग आला. आणि मी खरेच धन्य झालो. मतिमंदांच्या विश्वात डोकावण्याची, त्याना जाणून घेण्याची संधी प्राप्त झाली.
                 उजाड माळरानावर अथक परिश्रमाने आज नंदनवन फुलले आहे. प्रशस्त इमारत, अतिशय नीटनेटका परिसर, फळझाडे, फुलझाडे, बाग मन मोहून घेते.
          अविरत सेवा देणारे श्री अशोक वल्लभदास यांनी पूर्ण इमारत व परिसर फिरून दाखवला. तिथल्या मुलामुलींना पाहून, भेटून  मी स्तिमित झालो. अतिशय स्वच्छ, नीटनेटके आणि शिस्तबद्ध वागणे पाहून मला सामान्यांशी तुलना करण्याचा मोह आवरला नाही. त्यांचे स्वच्छ टॉयलेट पाहून मला सार्वजनिकच नव्हे तर इतर कोणत्याही संस्थेतल्या टॉयलेटची आठवण आली.
       मुदपाकखाना, भोजनगृह पंचतारांकित टापटिपीचे ! काही विद्यार्थ्यांना स्वत:च्या हाताने जेवताही येत नाही. तिथलीच एक मतिमंद मुलगी त्याला आपल्या हाताने भरवीत होती. ते पाहून माझे डोळे पाणावले. काका, काका करीत मुले बिलगत होती तेव्हा जाणवले की यांना फक्त मायेचा ओलावा हवा आहे. काही मुले तिशी, चाळिशी ओलांडलेली सुद्धा आहेत. प्रथम दाखल होणारा प्रकाश शेनोलीकर म्हणतो की ही इमारत मी बांधली तेव्हा त्याचे कौतुक वाटते कारण भूमीपूजनाची पहिली कुदळ त्याने मारली असते. येथल्याच एका मुलीने चित्रपटात काम केले म्हटल्यावर तुम्हाला ती व तो चित्रपट आठवला असेलच....
                खरंच मित्रांनो.... आपल्या भेटीने या मुलांना एक वेगळाच आनंद व समाधान मिळते. आपण आपल्या मुलांना यांना भेटायची, यांचे आयुष्य जाणायची एक संधी द्या. मला खात्री आहे की तुम्ही तुमच्या मुलांवर दुपटीने प्रेम करु लागाल.
       
सुरेश इंगोले**

Saturday 13 February 2016

व्हेलेन्टाईन डे.

अगदी ठरवून
ठराविक दिवशी
ठरलेलं
किंवा न ठरलेलं
प्रेम
करायला
...... हृदयात आवेग असतो ?
की नुसताच
                  भोग असतो ?

उथळ प्रेमाचे प्रदर्शन करायला
मात्र
' व्हेलेन्टाईन डे ' चा योग असतो.


* सुरेश इंगोले *

Wednesday 10 February 2016

होस्टेल लाईफ

*  होस्टेल लाईफ  *
                               -------------------

     होस्टेल लाईफची मजाच काही और असते. ज्याने ते अनुभवले तो पुढील आयुष्यात परिपक्व होतो. माझे कॉलेजचे पहिलेच वर्ष. होस्टेलचेही पहिलेच वर्ष. आर्वीसारख्या लहानशा गावातून आम्ही सात जण नागपूरला शिकायला आलो. शालेय जीवनात अभ्यासाबरोबर दांडगाई सुद्धा भरपूर केली होती. त्यामुळे बुजरेपणा नव्हताच.

           पहिल्याच दिवशी रुमपार्टनरने मला रँगिंगची कल्पना दिली होती. पण आम्ही शिताफीने सीनियर मुलांशी अदबीने, प्रेमाने वागून त्यांची मने जिंकली होती. रोज एक दोघांचा नंबर लागायचा. वाट्टेल ते प्रकार केले जायचे. आमची मात्र सुटका होत असे. पण फायनलच्या एका बिहारी मुलाच्या हे लक्षात आले.

           एक दिवस त्याने मला हाक मारून मधल्या चौकात उभे केले. सगळे गोळा झाले होते.
" चल, कान पकडके मुर्गा बन जा."  त्याने फर्मान सोडले.
" मुझे नही आता मुर्गा बनना."
" क्यों ? स्कूल में कभी मुर्गा नही बना क्या ?"
" नही , कभी नौबतही नही आयी. मुर्गा कैसे बनते है, तुम बनके दिखाओ."
अनवधानाने त्याने उकिडवे बसून पायातून हात घालून कोंबडा बनून दाखवले. सगळे खदखदा हसू लागले. आपली फिरकी घेतली गेली हे त्याच्या लक्षात आले. तो चिडून मला मारायला धावला तसे त्याला सीनियर्सनी धरले. " छोड दे उसे. सीधासादा बच्चा है "
" फिर उसे कभी छेडना मत." दुस-याने त्याला बजावले.
पण...... त्याने मनात डूख धरून ठेवला. कॉलेजच्या आवारात त्याने एकदोनदा मला पकडण्याचा प्रयत्न केला पण माझी सात आठ जणांची गँग पाहून थबकला. याचा सोक्षमोक्ष लावावा म्हणून एकदा आम्ही त्याला वॉर्निंग दिली. पण त्याला स्वत:च्या फजितीचा वचपा घ्यायचाच असेल, त्याने मला त्रास द्यायचे थांबवले नाही.

           मार्च महिन्यात आमची अभ्यासाची जागरणे सुरू झाली. तो रोज रात्री आमच्या खोलीत येऊन दूध पिऊन टाकायचा. मग आम्हाला काळा चहा प्यावा लागे. एक दिवस माझ्या मित्राने मला भांग आणून दिली. दुधाच्या ग्लासात भांग टाकून काजू बदाम वगैरे टाकून ग्लास झाकून ठेवला. नित्याप्रमाणे त्याने दूध पिऊन टाकले. आणि मधल्या चौकातल्या एका खाटेवर झोपला.
          रात्री दोनच्या सुमारास आम्ही उठलो. त्याच्या अंगावरचे सर्व कपडे काढले. एक चादर पांघरून त्याला खाटेला दोराने घट्ट बांधले. ती खाट चौघांनी उचलून वर टेरेसवर नेऊन टाकली. आणि रुममध्ये येऊन झोपलो.

           सकाळी खूप गलका ऐकू येऊ लागला. आम्ही उठून बाहेर आलो. तो सर्वांना कपडे मागत होता. त्याला सोडवू देत नव्हता. एकदोघांनी त्याची चादर हटवून पाहिली आणि हास्याचा जो धबधबा कोसळू लागला की सारे होस्टेल त्यात सामिल झाले.

           पुन्हा त्याने कधीच कोणाला त्रास दिला नाही.

                                                                          _____        सुरेश इंगोले

#कुबेर_हम_भी_है_जोश_मे
With संतोष जगन्नाथ लहामगे,
अनिल हंबीर,
Amey T Sonawane

Tuesday 9 February 2016

** बुवाबाजी **

**  बुवाबाजी  **
                                   --------------

       अंधश्रद्धा व बुवाबाजी यांचा जवळचा संबंध असतो. देवभोळ्या लोकांच्या अज्ञानाचा फायदा कसा घेतला जातो हे मला अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करीत असताना वेळोवेळी जाणवले. बरेचसे प्रयोग मी शिकून घेतले होते. जाहीररित्या ते प्रयोग करून आम्ही समाजप्रबोधन करीत असू.
       
        ८०च्या दशकात ही अंधश्रद्धा बरीच पसरली होती. मी भंडारा जिल्ह्यात निर्मूलनाचे कार्य करीत असताना तिकडे वर्धा जिल्ह्यात आमच्या खेड्यात कुणी एक शंकरबाबा अवतरले होते. आणि कहर म्हणजे माझे वडील त्यांच्या नादी लागले होते. प्राथमिक शिक्षक असलेले माझे वडील बुवाच्या नादी लागतील अशी शंकाही मला आली नव्हती. पण भावाने मला याची कल्पना दिली व मी चकित झालो. त्या बाबाने गावातील काही मुलींना नादी लावल्याचे कळल्यावर तर माझी सटकलीच. याचा बंदोबस्त करायचाच असे ठरवून मी तयारीला लागलो.

      दोन तीन दिवस सुट्या घेऊन मी गावी गेलो. रात्री आईकडून कळले की उद्या म्हणजे रविवारी आपल्या घरीच बाबांचा दरबार आहे. मी मनातल्या मनात योजना तयार करीत राहिलो. दरबारात काय काय घडत असतं याची माहिती घेतली.
     दुस-या दिवशी मी सकाळी सगळं आवरुन शेतावर गेलो. आमचा सालकरी गडी भेटला. तो बराच लुबाडला गेल्याची  मला माहिती होती. त्याच्याशी बोलल्यावर त्याला घरी यायला सांगितले. मी घरी परतलो . बघतो तो आमचे अंगण भक्तगणांनी फुलून गेले होेते. मी कसाबसा मार्ग काढीत पडवीत आलो. चौरंगावर शंकरबाबा बसले होते. त्यांची पूजा सुरु होती. मला पाहताच दादाजी ( वडील) म्हणाले, " महाराज, हा माझा मोठा मुलगा सुरेश. पाया पड रे महाराजांच्या." मी उभाच होतो. त्यांचा अंदाज घेत होतो.
       " अरे पाया पड ना !" दादाजी पुन्हा म्हणाले. मी आईच्या व नंतर दादाजींच्या पाया पडलो. बाबांच्या पायावर मी डोके ठेवत नाही हे पाहून वडील चिडले. ते काही बोलणार तोच मी बोलायला सुरुवात केली.
    " दादाजी, मी तुम्हा दोघांशिवाय कधी कोणाच्या पाया पडत नाही हे तुम्हाला माहीत आहे. मी या बाबांना मानीत नाही."
     एकजण म्हणाला, " बाबांचे चमत्कार तुम्हाला माहीत नाही. बाबा, यांना प्रसाद द्या !"
बाबांनी हवेतून हात फिरवून माझ्या हातावर पेढा टाकला.  मी तो त्याच माणसाला दिला आणि हवेतून हात फिरवून त्याच्या हातावर एक सफरचंद टाकले. तो आणि इतर सगळेच अवाक झाले.
 "असले चमत्कार मीही करतो. " बोलता बोलता एका तंबाकू मळणा-या इसमाच्या हातावर भिंतीचा चुना नखाने खरडून टाकला व खायला सांगितला. ' चुना साखरेसारखा गोड लागतो ' असे त्याने सांगितल्यावर मी आणखी चार पाच लोकांच्या हातावर भिंतीचा चुना टाकला.

     वातावरण चांगलेच तापल्याचे जाणवल्यावर मी माझे ठेवणीतले अस्त्र काढले. मंत्राने अग्नी पेटवून दाखवा मग मी तुम्हाला मानतो असे बाबांना आव्हान दिले. हल्ली असे मंत्र उपलब्ध नाहीत वगैरे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि मी माझे शेवटचे आव्हान दिले. तुम्हाला मंत्राने अग्नी पेटवता येत नसेल तर मी पेटवून दाखवतो मात्र असे झाले तर तुम्हाला हा गाव सोडून जावे लागेल.

     काही क्षण नीरव शांतता पसरली. मग हळूहळू जमाव उत्तेजित होऊ लागला. अग्नी पेटवा नाहीतर गाव सोडा असे नारे लागू लागले.  नाईलाजाने बाबा तयार झाले. मी तयारीला लागलो. एकाला अगरबत्तीचा गुल एका कागदावर काढायला सांगितला. दहा बारा अगरबत्त्या त्याला दिल्या. विटांचे कुंड तयार करुन त्यात तो अगरबत्तीचा गुल असणारा कागद ठेवला. त्यावर काटक्या रचून समिधा नीट रचल्या. गोव-यांचे तुकडे वगैरे ठेवून झाल्यावर माझ्या भावाला तुपाची वाटी आणायला सांगितली.
 मी आसन मांडून बसल्यावर गायत्री मंत्राचा जप सुरू केला. व पळीने वाटीतले तूप सोडायला सुरुवात केली.
         बराच वेळ होऊनही धूर निघेना तसा माझा धीर सुटत चालला. प्रयोग फसतो की काय असे वाटले. पण चिकाटीने तूप सोडणे व मंत्र म्हणणे सुरूच होते. आणि........
धूर निघायला सुरुवात झाली . लोकांनी टाळ्या वाजवणे सुरु केले. आणि शेवटी अग्नी प्रदीप्त झाला. कुंड धडाडले. मी कुंडाला नमस्कार केला. उठून उभा राहिलो तो बाबाजी निघून जात होते. लोक जोरजोरात माझ्या नावाने ओरडत होते.

       अशा रितीने गावातील बुवाबाजी संपली. वडील बरेच दिवस अबोल राहिले. भाऊ मला वारंवार विचारत होता, " बाबा, सांग ना ! आग कशी पेटली ?"
शेवटी त्याला गुपित सांगितले. तुम्ही कुणाला सांगणार नाही ना !!
ज्या कागदावर अगरबत्तीचा गुल काढला होता त्या कागदावर मी पोटँशियम परमँगनेट मिसळले होते. दोहोंचा रंग काळा असल्यामुळे कळत नव्हते. तुपाच्या वाटीत तूप नसून ग्लिसरीन होते. ते तुपासारखेच दिसते. ग्लिसरीनचा स्पर्श जेव्हा पोटँशला होतो तेव्हा अग्नी पेटतो.

                                                                         सुरेश इंगोले

#कुबेर_हम_भी_है_जोश_मे
With... संतोष जगन्नाथ लहामगे,  अनिल हंबीर,  Amey T Sonawane

#कुबेर_हम_भी_है_जोश_में मावशी आली धावून ..... ---

#कुबेर_हम_भी_है_जोश_में

 मावशी आली धावून .....
------------------------
                                 स्वत:ची फजिती सांगायला धाडस लागते म्हणे. तेव्हा म्हटले सुरवात फजितीपासूनच करावी.
                                  चाळीस वर्षापुर्वीची गोष्ट. १९७५ मध्ये आमचे लग्न झाले. नवी नवरी घरात आली. आठ दिवसांनी चुलत भावाचे लग्न होते. त्यामुळे आठ दिवस ती घरात असूनही तिच्याशी बोलण्याची संधी मिळत नव्हती कारण संपूर्ण घर पाहुण्यांनी भरलेले आणि संधी मिळाली तरी बोलण्याचे धाडस नव्हते. तो काळ असा होता की वडीलधा-यासमोर बोलताही येत नसे.
     
                                 माझी मुंबईची मित्राची बायको संधी मिळवून द्यायचा आटोकाट प्रयत्न करीत असे. पण आम्ही मुलींच्या बाबतीत लाजाळूचं झाड. माझी थट्टा टोकाला जायची पण मी घाबरून शेतात पळून जाई. माझा चुलत भाऊ तिची खूप चेष्टा करायचा आणि ती ही त्याला  प्रत्युत्तर द्यायची. असे आठ दिवस निघून गेले. आम्ही दुरूनच आमच्या सौ ला केवळ बघत बसायचो.
                           
                                 चुलत भावाच्या लग्नाला परत अमरावतीला गेलो. ( माझे लग्नही अमरावतीलाच झाले होते.) लग्नाच्या सगळ्या विधीत 'ही' एवढी उठून दिसत होती की अस्मादिकांचं लक्ष इतरत्र नव्हतंच. नव्या नवरीला घेऊन परत गावी आलो. दुस-या दिवशी पूजा घातली गेली. दोन जोडपी पूजेला बसलेली. माझा भाऊ अधून मधून त्याच्या बायकोशी बोलायचा तेव्हा मी त्याच्यावर डोळे वटारायचो. तो हसायचा.

                                  दुस-या दिवशी अमरावतीला पूजेसाठी जायचे होते. आम्ही चौघे म्हणजे दोन्ही जोडपी ट्रेनने निघालो. माझा भाऊ प्रवासात दोघींशीही मनसोक्त गप्पा मारत होता. पण प्रवासात सुद्धा मी तिच्याशी बोललो तर कुणी पाहील तर नाही ना ही धाकधूक. वेडेपणाचा कळसच ! मधे एका स्टेशनवर चहा घेताना मी भावाला म्हटले, " भास्कर, चहा हवा का विचार तिला." तो म्हणाला, " अरे ! तू विचार ना !" तर मी डोळे वटारले.

                                  अमरावतीला पूजा आटोपली. दुस-या दिवशी सकाळी अंबादेवीच्या मंदिरात ओटी भरायला  जायचे होते. रिक्षात बसून निघालो. काहीतरी बोलायचे म्हणून मी हिंमत करुन विचारले," ओटी भरून लगेच निघायचे ना? " " थोडी खरेदी करायची आहे. " ती हळूच म्हणाली.

                                  ओटीभरण व पूजा आटोपल्यावर आम्ही बाजूच्या  मार्केटमधे गेलो. ती उत्साहाने दुकाने फिरू लागली. मला एक परिचित भेटले त्यांच्याशी गप्पा मारण्यात मी दंग झालो.   त्या काळी विमा एजंट असल्यामुळे मी प्रत्येकाला गि-हाईक समजून वागायचो. त्यामुळे बराच वेळ आमच्या गप्पा रंगल्या. तेवढ्यात ती आली व मला म्हणाली, " पन्नास रुपये हवे होते. " मी खिशातील पन्नास रुपये तिला दिले आणि माझ्या डोळ्यासमोर वीज चमकली.

                                  माझ्या खिशात  फक्त दहा रुपये उरले होते. घरून निघताना मी खिशात किती पैसे आहे ते पाहिलेच नव्हते. घरून पैसे घेतलेच नव्हते. मला दरदरुन घाम फुटला. आता काय करायचे.!

                                 रिक्षा करून आम्ही तिच्या माहेरी आलो. माझ्यासमोर एवढे संकट होते की रिक्षात तिच्या होणा-या स्पर्शाने सुद्धा माझ्या चित्तवृत्ती फुलल्या नाहीत. गावी कसे जायचे ? तिकिटाला पैसे कुठून येणार ? कुणाला मागायचे ? शरमेने काळाठिक्कर पडायची वेळ आली होती. रिक्षाचे पैसे चुकवून  घरात आलो.

                                 खिसा आता पूर्ण रिकामा झाला होता. मी घाम पुसत सोफ्यावर बसत होतो तोच आतून एक महिला बाहेर आली. माझ्याकडे बघून हसू लागली. " काय रे, ओळखलंस ना !"  तिच्याकडे निरखून बघत मी म्हणालो, " तू  मालती मावशी ना ! " तिने हसत हसत आपल्या मिस्टरांची ओळख  करून दिली. " अरे हे आशाचे भाऊ लागतात ...दूरचे "  मी चकित झालो. म्हणालो, " म्हणजे तू  माझी मावशी आणि हिची वहिनी का ?" सगळे हसू लागले.

                                मी क्षणभर स्वत:ची व्यथा विसरलो.  त्यांच्याशी गप्पांमध्ये रमलो. परत चिंता पोखरू  लागली तेव्हा एक मार्ग सुचला की भावाला भेटून काहीतरी मार्ग निघेल. तेवढ्यात एक नातलग येऊन सांगू लागले की माझा भाऊ त्याच्या सासरी खेड्यावर गेलाय. माझे उरले सुरले अवसान गळाले.

                                आमच्या बोळवणीची पूर्ण तयारी झाली होती. सगळं सामान बांधून तयार झालं. रिक्षा आणायला कुणीतरी गेलं. मी रडकुंडीस आलो होतो. शेवटी विचार केला की प्रोफेसर साहेबांस ( सौ चे मोठे बंधू) स्पष्ट कल्पना द्यावी. होऊ झाली फजिती !

                                निघताना मी इतर ज्येष्ठांसोबत मावशीच्या पाया पडलो. " जोडीने पाया पड रे " मावशी म्हणाली. आम्ही पाया पडताच मावशीने माझ्या हाती शंभराची नोट दिली. त्या काळात .....शंभराची नोट.....

        मंडळी....! माझी अवस्था काय सांगू !  आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन....साला मै तो साब बन गया ! आमचा परतीचा प्रवास सुरु झाला. माझ्या डोळ्यासमोरून सारा घटनाक्रम सरकू लागला. आणि सगळी भीड सोडून मी बेधडक बायकोशी बोलायला सुरवात केली. भीड चेपल्यावर मी तिला माझी अवस्था विशद केली ......
                 
                     आणि ती सहज म्हणाली," माझ्याकडे होते की पैसे...मला विचारायचे की !"
       माझाच पोपट झाला.........

                                                                       सुरेश इंगोले

अनिलहंबीर
Amey T Sonawane

With...
 संतोष जगन्नाथ लहामगे