Wednesday 12 December 2018

★ #अरबांच्या_देशा ★★

@ अल्- जुबेल..(सौदी अरेबिया)

दम्मम एयरपोर्टवरून आम्ही अल्-जुबेलला निघालो. अंतर किमान शंभर किलोमीटर असेल. मोठमोठे सहा पदरी प्रशस्त रस्ते. रस्त्याच्या दुतर्फा झगझगीत दिवे. आणि ते ही पूर्ण रस्ताभर...अगदी अल्-जुबेलपर्यंत. ते गुळगुळीत रस्ते मला पचनी पडत नव्हते. खड्ड्यांच्या रस्त्यांची आम्हाला सवय. बरे, रहदारीचे नियम अत्यंत कडक. जागोजागी कॅमेरे लागलेले. गाड्यांचे स्पीड ठरलेले. कुठे नव्वद, शंभर तर कुठे एकशेवीस. मर्यादेबाहेर वेग वाढला की लगेच दंडाचा मेसेज मोबाईलवर हजर.
    शंभरच्या स्पीडने कार जात होती. रस्त्यावर तुरळक रहदारी होती. पराग म्हणाला,” बाबा, चालवता का कार ?”
“ नको रे बाबा, आम्हाला राईट हँड ड्राईव्हची सवय. ते स्टिअरिंग उलट वाटतं. उजव्या हाताला गिअरची सवय नाही. आणि एवढ्या स्पीडने गाडी चालवण्याची आता हिंमतही नाही.”
तो हसून म्हणाला,” येथे लहान कार्स दिसतही नाहीत. बाईक्स क्वचितच दिसतील. आणि हळू गाडी चालवणे म्हणजे मागच्या गाडीची धडक खाणे.”

     अल्-जुबेलमध्ये पराग जेथे राहतो तेथे बहुधा सर्वच भारतीय राहतात. त्यामुळे आपल्याच भागात असल्याचा फील येतो. तीन इमारतींना कंपाउंडने सुरक्षित केले आहे. तेथे सर्वजण आपले सणसमारंभ एकत्रितपणे साजरे करतात. सुट्यांमध्ये गेट-टुगेदर घेतात. आपल्या देशापासून आपण दूर आहोत या भावनेने त्यांच्यात एक जिव्हाळ्याचे बंध निर्माण झाले आहेत.

   दुसऱ्याच दिवशी आम्हाला भेटायला शेजारी येऊ लागले. बोलण्यातून परस्परांविषयीची आत्मीयता जाणवत होती. आम्हाला लवकरच त्यांनी आपल्यात सामावून घेतले. तेथे शुक्रवार व शनिवार साप्ताहिक सुटी असते. शुक्रवारी सर्वजण बाहेर गेट-टुगेदर साठी जातात. यावेळी दरीन बीचवर जायचे ठरले.


     सौदी अरेबिया हा देश वाळवंटात वसलेला आहे.तेथे पाण्याचे अत्यंत दुर्भिक्ष आहे. समुद्राचे पाणी प्रक्रिया करुन वापरले जाते. तेथे हिरवळ नाहीच. रस्त्याच्या दुतर्फा तुरळक झाडे दिसतात ती जाणीवपूर्वक लावलेली आहेत. अशा देशात बागेचा विचारही मनात येत नाही. पण दरीन बीचवर गेल्यावर मी आश्चर्याने थक्क झालो.

       समुद्राच्या किनाऱ्यावर एक भली मोठी बाग होती. हिरवळ,  मोठमोठी झाडे, मुलांचे खेळ, जागोजागी पार्किंग, स्वच्छतागृहे आणि सगळे नियोजनपूर्वक केलेले. स्वच्छता एवढी की गर्दी असूनही कुठेही एक कपटा देखिल नाही. मोठमोठे डस्टबिन्स जागोजागी ठेवलेले होते.

        बीचवर सर्वानी गप्पागोष्टी हास्यविनोद करीत छान दिवस घालवला. स्त्रियांना बुरखा आवश्यक असल्यामुळे बिचाऱ्यांना चेहऱ्यावर रंगरंगोटी शिवाय इतर कपड्यांची फॅशन करता येत नाही. सौ.ने खूप आवडीने साड्या व ड्रेस घेतले होते पण तिचा खूप विरस झाला. असो...जैसा देश वैसा भेस..!

       इथले मॉल्स खूप सुंदर, अवाढव्य व अत्याधुनिक आहेत. वेळ घालविण्याचे एक नित्याचे चैनीचे स्थान. त्यामुळे येथले मॉल्स फिरायला मजा येते. डॅशिंग कारमध्ये नातीच्या आग्रहावरून तेरा वर्षांनी बसलो. खूप मज्जा आली.

        सध्या सौदीला बरे दिवस येताहेत. नवीन राजा मोहम्मद बिन सुलतान थोडा आधुनिक विचारांचा असल्यामुळे स्त्रियांना काही अधिकार मिळताहेत. निवडणूक लढविण्याचा अधिकार, ड्रायव्हिंग करण्याचा अधिकार. मॉलमध्ये स्त्रिया काम करताना दिसताहेत. राजेशाहीचे एक बरे असते. लोक कायद्यांचे धाकाने पालन करतात. ज्या देशात कायदा पाळला जातो तेथील राज्यव्यवस्था उत्तम असते.