Tuesday 15 January 2019

★ हलणारं झाड  ★
                               ========

       तो असा काळ होता ज्यावेळी बऱ्यापैकी सुबत्ता होती. प्रत्येक हाताला काम मिळत होते. खूप सुधारणा झाल्या नव्हत्या. खेड्यापाड्यात वीज येऊन काही वर्षे लोटली होती. दळणवळणाची साधने मोजकीच होती. फाट्यावर एस.टी साठी दोन दोन तास वाट पाहावी लागे.

        खेड्यांची अवस्था फारशी चांगली नव्हती. आडगावी दोन चार कोस पायी चालत जावे लागे. सधन लोक घरच्या बैलगाडीने प्रवास करीत. रेंगी, छकडा, दमणी अशा ऐपतीनुसार गाड्या बाळगीत. खिल्लारी बैलांची जोडी असे. घरात नोकरचाकर असत. दूधदुभत्याची चंगळ असे. वीज आल्यापासून शेतात विहिरीवर मोटरपंप आले होते.

          आमचे गाव रसुलाबाद हे मुख्य रस्त्यापासून पश्चिमेकडून दोन किलोमीटर तर दक्षिणेकडून रेल्वेस्टेशनपासून आठ किलोमीटर अंतरावर होते. वर्धा जिल्ह्यातील एक छोटेसे गाव. भोवताल सदैव वाहणारे नाले. गाव तसे खोलात होते. अगदी जवळ गेले तरीही गाव दिसत नसे. नाला लागला की समजावे..गाव आले.

           मुंबई सोडून मी गावी आलो आणि विमा एजंट बनलो. गावोगावी फिरायचे. पॉलिसी मिळवायच्या. आणि प्रिमीयमची रकम भरायला वर्धा ऑफिसला जायचे. परत येताना बरेचदा रात्र व्हायची. गाड्या निघून गेल्या असल्या तर आठ किलोमीटर पायी चालत यायचे. घरी आल्यावर आई किंवा दादाजींच्या शिव्या खायच्या. त्याला कारणही तसेच होते. गावाच्या शिवेवर भुतं आहेत ही गावातल्या प्रत्येकाला खात्री होती. मी आजवर गावात राहत नसल्यामुळे मला याबद्दल माहिती नव्हती किंवा मी ती करूनही घेतली नव्हती. वैज्ञानिक दृष्टीकोन व शिक्षण यामुळे माझा यावर काडीचाही विश्वास नव्हता.

          एकदा वर्धेला प्रिमियम भरून परतायला उशीर झाला. संध्याकाळी भुसावळ पॅसेंजरने पुलगावला निघालो. योगायोगाने त्याच डब्यात माझा आतेभाऊ रमेश भेटला. गप्पांच्या ओघात त्याला विचारले की गावी कसे जाणार…
तो म्हणाला,” पुलगावला जाईन. तिथून आर्वीच्या गाडीने सोरट्याला उतरेन. तिथून रसुलाबादला पायी जाईन.”
   
  “ अरे पण आर्वीची गाडी पहाटे पाच वाजता सुटेल ना…”

  “ मग काय ? झोप होते छान गाडीत.”

  “ मग पुलगावहून पायी गेले तर काय होईल? अडीच कोस तर आहे.”
   
    “ एवढी तंगडेतोड कोन करंन…”

पायी जायला हा दाद देणार नाही याची मला खात्री पटली. मला अशी झोपमोड करायची नव्हती. अचानक माझ्या मनात एक विचार चमकून गेला. पुलगावच्या आधी कवठा नावाचे स्टेशन होते. तेथूनही रसुलाबाद आठ किलोमीटर होते. त्या रस्त्याने मी दोनतीनदा गावी गेलो होतो.

       गाडीची गती मंदावली तसा मी
म्हणालो, “.रमेश, कोणते स्टेशन आले रे?”

   “कवठा असंन.” असे म्हणत तो दारातून वाकून पाहू लागला. हळूहळू गाडी थांबली. एक प्रवासी उतरू लागला तसे मी त्याला खाली खेचले. त्यांना उतरू दे म्हणत त्याचा हात घट्ट धरून ठेवला. अशा आडगावी गाडी फक्त काही सेकंदच थांबते. रमेश गाडीत चढायला धावला पण मी त्याला घट्ट पकडून ठेवले होते. गाडी जाईपर्यंत मी त्याचा हात सोडला.नाही.

     गाडी निघून गेल्यावर त्याने मला खूप शिव्या घातल्या. मी नुसता हसत राहिलो. स्टेशनवरच झोपेन पण येणार नाही असा अडून बसल्यावर मी त्याला कारण विचारले. तेव्हा तो म्हणाला, “ गावच्या नाल्यापाशी एका झाडावर भूत हाये.”

     मी जोरजोराने हसू लागलो.

  “ असं भूतबीत काही नसते. मनाचे खेळ असतात सारे. “
असे म्हणून त्याला ओढत मी गावाच्या रस्त्याने चालू लागलो..
चालताना कोणाकोणाला त्या भुताने झपाटले याच्या गोष्टी तो सांगू लागला. मी त्या गोष्टीवरून त्याचे लक्ष दुसरीकडे वेधले जावे म्हणून मुंबईच्या फिल्मी ग्लॅमरच्या गोष्टी त्याला सांगायला सुरुवात केली.

   टिपूर चांदणं पडलं होतं. नीरव शांततेत आमच्या दोघांच्या पावलांचाच आवाज येत होता. गप्पांच्या नादात हळूहळू गाव जवळ आले. रस्त्याने वळण घेतले आणि रमेशचा आवाज बंद पडला.
चालताचालता त्याने माझा हात घट्ट धरला आणि थरथर कापू लागला.

     “ काय झालं रे?”
     “.गाव आलं.”
     “.मग?”
     “ म्या मनलं ना इथं भूत हाये म्हून…”
     “ कुठे आहे? तुला दिसले का? “
     “ नावराशीवर दिस्ते थे..”
     “ तुझ्या नावराशीवर दिसते का?”
     “ म्हाईत न्हाई.”
     “ माझ्या नावराशीवर नाही दिसत. तू काळजी करू नको. माझा हात घट्ट धरून ठेव. “
     “ तुले काय म्हाईत ?”
      “ अबे, माझा देवगण आहे. भुतं घाबरतात मला. चल !” असे म्हणून मी त्याला ओढत नेऊ लागलो. चालताना तो भिरभिर इकडेतिकडे पाहत होता. थोड्याच वेळात आम्ही नाल्याच्या काठाजवळ आलो.

      रमेश एकाएकी थबकला. भयभीत होऊन थरथर कापायला लागला.
     “ काय झालं रे?” मी त्याला गदागदा हरवले.

        त्याने एका झाडाकडे बोट दाखवले.
       झाड जोरजोरात हलत होते.

     “ अरे, वाऱ्याने हलतंय ते झाड.” मी बोलून गेलो.

     “ वारा कुठं हाये? बाकीचे झाडं कुठं हालून राह्यले?” तो थरथरतच म्हणाला. मी आजूबाजूला पाहिले. त्याच्या बोलण्यात तथ्य होते. वारा पडलेला होता. इतर झाडांची पानेही हलत नव्हती.

     माझ्या अंगावर सरसरून काटा आला.

   म्हणजे झाडावर नक्कीच काहीतरी असावे तर…
पण नेमके काय असेल ? भुतं खरोखर असतात का? कसे असते ते?

     माझ्याही अंगाला थरकाप सुटला. मती गुंग झाली. काही न सुचून मी एक दगड उचलला. रमेशने माझा हात धरला.
 
     “ गोटा नोको मारू..”
     “ कां बरं ?”
     “ असं म्हंतेत का थो गोटा पानी टाकून घासतेत आन् जसजसा थो झिजंन तसतसा मानूस झुरु झुरु मरतेत…”

        मी हसायला लागलो. “ असं कधी असते का रे..कसल्या भाकड गोष्टी वर विश्वास ठेवता तुम्ही लोक.” असे म्हणून मी तो दगड झाडाच्या दिशेने जोरात भिरकावला.
     झाड हलायचे थांबले.

   रमेश कान बंद करून खाली बसला. मी चमकलो. झाड हलायचं कां थांबलं….काही कळेना. मी दुसरा थोडा मोठा दगड उचलून ताकदीने झाडावर भिरकावला.

     आणि…..झाड पुन्हा जोरजोराने हलायला लागले. फांद्या वरखाली होऊ लागल्या. रमेश ताडकन उठला व त्याने घाबरून मला मिठी मारली. मी पुन्हा एक दगड मारला. आणि आता….

     झाडावरून हूप हूप असे विविध आवाज ऐकू येऊ लागले. सगळ्या फांद्यांवर उच्छाद सुरू झाला. या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारणारी माकडं पाहून मी सुटकेचा श्वास टाकला.

    रमेशची मिठी सोडवून मी त्याला अलग केले.
“ बघ, कुठे आहेत भुतं? माकडं आहेत झाडावर. त्यांच्या उड्या मारण्याने झाड हलत होते. भेकड लेकाचा….!” असे म्हणून मी  त्याला ओढत निघालो.
झाडाखालून जाताना रमेशने माझ्या हाताला झटका मारून हात सोडवला. व तो धूम पळत सुटला. मीही गावात शिरलो. घरी माझे नेहमीप्रमाणे स्वागत झाले. यावेळी दादाजींना मी सगळा किस्सा सांगून टाकला. त्यांचा कितपत विश्वास बसला कळले नाही.

       सकाळी आत्या मला शिव्या घालतच घरात शिरली. दादाजींनी तिला थोपवले तशी ती तावातावाने बोलू लागली.
“ थ्या रमशाले तुहं पोट्टं कवठ्याच्या रस्त्यानं रात्री घिवून आलं. नाल्याच्या चिचीच्या झाडावर भूत दिसलं म्हने. पोट्टं तापानं फनफनलं हाये. पार धोतर भरवून आलतं घरी.”
मी हात धरून तिला खाली बसवले. तिची समजूत काढली. देवघरातून उदबत्तीची राख आणून तिला देत सांगितले की “हा मंतरलेला अंगारा आहे. त्याच्या कपाळावर लावून अंगावरून उतरून टाक. लवकर आराम पडेल त्याला.”

       ती गेल्यावर दादाजींनी विचारले.” तुझा या गोष्टीवर विश्वास नाही ना.?”
  “ पण तिचा आहे ना..त्या विश्वासानेच त्याला आराम पडेल. मी तिला साधी उदबत्तीची राख दिली. कुठला अंगारा आणि कसलं काय…!”
           रमेश संध्याकाळ पर्यंत ठीक झाला. घरी आल्यावर मी त्याला म्हणालो, “ रमेश, आज रात्री वावरातून हुरडा आणायचा आहे. चालशील ना.. झाडाखालून जावं लागेल म्हणून विचारतोय.”
  तो चप्पल घेऊन माझ्यामागे धावला.


                                    ★★© सुरेश इंगोले ★★