Monday 16 March 2020

            *   रणरागिणी.  *

              होळीपासून मंजी आलीच नव्हती. चार दिवस वाट पाहून शेवटी परवा सौ.ने सगळी भांडी घासून घेतली. खूप दिवसांनी चाललेली भांडी घासायची तिची धडपड पाहून मी म्हणालो देखिल," परवापासून सांगतोय, की भांडी कमी आहेत तर लगेच घासून धुवून घे. पण ती आता तरी येईल म्हणून तू वाट पाहत बसलीस."

"मला वाटलं होतं येईल म्हणून. होळीपासूनच तिचा नवरा दारू पिऊन तिला त्रास देत असेल म्हणून आली नसेल."

" ती त्याचा प्रतिकारही करू शकत नाही. पाप्याचं पितर आहे नुसती." 
मी असे म्हणताच सौ लगेच म्हणाली, " म्हणजे तिने काय करावे ? नवऱ्यावर हात उगारावा का?"

" जो माणूस काही कमाई करीत नाही, बायकोच्या जीवावर नुसता बसून खातो, तिच्याच पैशाने दारू ढोसतो तो असून नसून काय फायदा? बायकोला मारणे, मुलांना मारणे आणि पैशाचा तगादा लावणे याशिवाय दुसरं करतो तरी काय तो ?"

   यावर सौ काही बोलली नाही. सगळ्या परिस्थितीची कल्पना होती आम्हाला.

आठ-दहा महिन्यांपूर्वी कुणाच्या तरी सांगण्यावरून ती काम मागायला आली होती. चौकशी केली असता कळले की ती याच गावची असून माझ्याच शाळेत शिकली आहे. मॅट्रिकपर्यंतच शिकल्यामुळे मी जरी तिला शिकवले नसले तरी ती मला ओळखत होती. तिचा नवराही गावातीलच होता व दोघांनी प्रेमविवाह केला होता. त्यांना एक दहा वर्षांची मुलगी व सहा सात वर्षांचा मुलगा होता. नवरा कोणत्या तरी कार्यालयात ड्रायव्हर म्हणून काम करीत होता.

तो दारू प्यायला लागला, दारूच्या आहारी गेला आणि घरात क्लेशाची ठिणगी पडली. त्याचा पगार दारूत जाऊ लागला आणि तिच्यावर घर चालवण्याची जबाबदारी आली. चार घरची धुणीभांडी करून ती घर चालवीत होती. पण मग त्याने दारूसाठी तिला पैसे मागायला सुरुवात केली. तिने नाही म्हटले तर मारायचा. ज्यांच्याकडे ती काम करायची त्यांच्याकडे पैसे मागायला हा जायचा. मग तिची ओढाताण व्हायची. धान्य, किराणा, भाजी इत्यादींसाठी पैसेच नसायचे. 

तिची संपूर्ण कहाणी ऐकल्यावर मी तिला काम देताना एक विचार मांडला. रकमेऐवजी वाणसामान घेऊन द्यायचे. म्हणजे तिच्या घरी मुले उपाशी तरी झोपणार नाही. तिने होकार दिला. 

ती माझ्याकडे काम करते हे त्याला माहीत होते पण मला ओळखत असल्याने तो पैसे मागायला स्वत: कधीच आला नाही.

मंजुळा फारच कृश होती. कुपोषित वाटायची. पण काम प्रामाणिकपणे करायची. एकदा मी सौ ला सांगत होतो,
" अगं, त्या गंगाने नवऱ्याला घरातून हाकलले आज."

" म्हणजे? असा कसा गेला तो ?" तिने विचारले," त्याने 
प्रतिकार नाही केला?"

" खूप पिऊन होता. धड उभा राहू शकत नव्हता. गंगाने धक्का दिल्यावर पडला तर उठणे मुश्किल झाले होते त्याला."

   कामे आटोपल्यावर मंजीला गंगाच्या घराकडे जातांना मी पाहिले. 

मागच्या महिन्यात मंजीच्या नवऱ्याची नोकरी गेली. दारू पिऊन कामावर गेल्यामुळे त्याला नोकरी गमवावी लागली. आता तो दिवसभर घरीच नशेत असायचा.

होळीच्या दिवशी खूप पिऊन मंजीच्या नवऱ्याने तमाशा सुरू केला. पैसे देत नाही म्हणून तिला अडकित्ता फेकून मारला. तिने स्वत:ला वाचवले तर तो तिच्या मुलाच्या डोक्याला लागला. खोक पडून रक्त वाहू लागले. दोघेही घाबरले होते. मुलाला दवाखान्यात नेऊन पट्टी बांधून आणले. 

   आता तरी मंजी कामावर येईल असे वाटले होते. पण ती आलीच नाही. 

   सकाळी मंजीची शेजारीण दवाखान्यात जात असताना सौ ला भेटली. तिच्याकडून कळाले की, मंजीने नवऱ्याला घराबाहेर हाकलले. या विधानावर विश्वास बसणे शक्य नव्हते. पण म्हणतात ना की बाई एकवेळ अबला असू शकेल पण एक आई आपल्या मुलांसाठी रणरागिणी बनू शकते. दुसऱ्या दिवशी पुन्हा तिच्या नवऱ्याने तिला मारायला सुरुवात केली तेव्हा तिच्या मुलाने बापाच्या कमरेला धरून ढकलले. बापाचा राग अनावर झाला आणि त्याने मुलाला मारण्यासाठी हात उगारला. त्यासरशी आवेशाने मंजीने नवऱ्याला जोराने ढकलले. तो उठायच्या आतच तिने काठी उगारली. आणि त्याला मारायला सुरुवात केली. धडपडत तो बाहेर पळाला. तिनेही नवऱ्याला तंबी दिली की घरात पाय ठेवायचा नाही. जेवायला ही मिळणार नाही. पुन्हा घराकडे फिरकायचे सुद्धा नाही. तिलाही माहित होते की बाहेर याचे थेरं कोणी खपवून घेणार नाही. आणि काही दिवसांनी सुतासारखा सरळ येईल.

   हे सगळे मला कळताच मी सौ ला म्हणालो की ती कामावर येईल तेव्हा तिला भरघोस बक्षिस देशील.

पोटच्या लेकरासाठी रणरागिणी बनलेल्या या मातेला मनोमन सलाम !

                 © सुरेश इंगोले.