Wednesday 17 February 2016

                      *  घाटातला    देवदूत.  *
                      ===============

                 वकील साहेब अकोल्याहून नागपूरला जायला निघाले तेव्हाच चार वाजायला आले होते. आज उशीर होणार नक्कीच ! शिवाय त्यांचा सहकारी आज येऊ शकला नव्हता. उद्या हायकोर्टात महत्वाची केस होती. ते एकटेच कार ड्राईव्ह करीत सुसाट निघाले होते. मधे कुठे थांबायची त्यांची इच्छा नव्हती. तळेगांवचा घाट लागला आणि  गाडी झटके मारू लागली. ऐन घाटाच्या अवघड वळणावर गाडीने आचके दिले.  गाडी बाजूला घेऊन ते खाली उतरले.  गाडीचे बॉनेट उघडून त्यांनी पाहिले. कार खूप गरम झाली होती. तसंही त्यांना गाडीचं काहीच तंत्रज्ञान माहीत नव्हतं. अंधार पडला होता. तुरळक वाहतुक सुरु होती. त्यांनी एकदोन वाहनांना हात देऊन पाहिला. पण त्या अवघड वळणावर कोणी थांबायला तयार नव्हते. काय करावे त्यांना काही सुचेना.
                  तेवढ्यात बाजूच्या दरीतून घाट चढून कुणीतरी रस्त्यावर आले. जवळ आल्यावर तो एक पंचविशीतला तरुण असल्याचे वकीलसाहेबांना दिसले. गोरापान, साधारण उंचीचा, मागे वळवलेले काळेभोर केस, सरळ नाक आणि हसतमुख चेहरा. त्याला पाहून त्यांना एकदम हायसे वाटले.
" काय साहेब, गाडी बिघडली वाटते ?" त्याने हसून विचारले.
" होय रे बाबा ! काय झाले काही कळत नाही. मला त्यातले काही कळतही नाही. " वकील साहेब हताशपणे उद्गारले.
" मी पाहू का ? " त्याने अदबीने विचारले.
" अरे वा ! उपकार होतील रे बाळा..." ते आनंदाने म्हणाले.
" उपकार कायचे त्याच्यात साहेब ? आपलं कामच आहे हे..तुम्ही दूर उभे राहा साहेब. "असे म्हणून त्याने त्याच्या खिशातून अवजारं काढली व तो कामाला लागला. वकील साहेबांनी खिशातून सिगारेटचे पाकीट काढले तोच तो म्हणाला, " साहेब, प्लीज सिगारेट नका पेटवू. मला वास सहन होत नाही." त्यांनी पाकीट खिशात ठेवून दिले. ते सहज त्याच्याशी गप्पा मारू लागले. त्याचे नाव संजय होते. थोड्याच वेळात त्याने कार स्टार्ट करायला सांगितली. वकीलसाहेबांनी कार सुरू केली. ती सुरू होताच त्यांना आनंद झाला. ते खाली उतरले व त्यांनी पाकीट काढून काही पैसै दत्याला देऊ केले. तो नम्रतेने नकार देऊन दरीकडे जाऊ लागला.  "अरे संजय, तू राहतोस कुठे ? चल, मी तुला सोडतो ना " त्यांनी विचारताच तो सहज म्हणाला, " माझी येथे खालीच झोपडी आहे." दरी उतरून तो नाहीसा झाला.
              वकील साहेबांनी पुढे प्रवास सुरु केला. घाट उतरताच सारवाडी गाव लागले. त्यांनी गाडी थांबवली. एका हॉटेलमधे येऊन त्यांनी चहाची ऑर्डर दिली. हॉटेलमालक बोलघेवडे होते. त्यांनी चौकशी करयला सुरवात केली. वकील साहेबांनी गाडी घाटात बिघडल्याचे सांगताच ते म्हणाले, " मग कशी दुरुस्त झाली ?" " एक तरुण मुलगा आला व त्याने चटकन दुरुस्त केली." त्यांनी असे म्हणताच हॉटेल मालकांनी त्याचे वर्णन करुन म्हटले, " संजय नाव होते का त्याचे ?"
" होय हो ! फार गुणी मुलगा. सालस स्वभावाचा. एक पैसा सुद्धा घेतला नाही. "
" खरेच गुणी मुलगा होता बिचारा... कोणाचेही काम करायचा. नेहमी हसत राहायचा."
"म्हणजे..." वकीलसाहेबांनी दचकून विचारले.
" बाजूच्या कारंजा गावातला होता तो. क्लीनर म्हणून ट्रकवर लागला. सगळी कामं शिकून घेतली त्यानं."
" होता म्हणजे.....?" वकील साहेबांचा आवाज घशातच विरला.
" दोन वर्षांपुर्वी घाटात त्याच ठिकाणी त्यांचा ट्रक उलटला व दरीत कोसळला. कोणीच वाचले नाही."
वकीलसाहेबांना दरदरून घाम फुटला. म्हणजे...... म्हणजे ....तो.... संजयचे भूत ....!
हॉटेल मालकांनी वकीलसाहेबांना पाणी पाजले. धीर दिला. " बघा साहेब, आजही तो तेथे एखादी गाडी बिघडली तर दुरुस्त करुन देतो. कधी कोणाला त्रास दिला नाही. तुम्ही घाबरू नका. त्याने तुम्हाला मदतच केली आहे. "
वकील साहेबांनी हॉटेल मालकांना एका ड्रायव्हरची सोय करायला सांगितली. ते आता गाडी चालविण्याच्या मन:स्थितीत नव्हतेच.
        रात्रभर ते दचकून उठत होते. सकाळी जरा फ्रेश वाटताच त्यांनी मित्राला कळवून प्रेस कॉन्फरन्स बोलावली व सर्व वृत्तांत कथन केला.
        दुस-या दिवशी सर्व वृत्तपत्रात ही बातमी छापून आली.

( १९६२-६३ मधे घडलेली सत्यघटना.)


                                                                  ----  सुरेश इंगोले ------

Monday 15 February 2016

** घरकुल **

 आज मी खरेच अवाक् झालोय्. !
सर्वसामान्यांप्रमाणे जीवन घालवणारे आपण ....शिकतो, नोकरी किंवा उद्योग करतो. लग्न करतो, कुटुंबाच्या रहाटगाडग्यात गुंतवून धेतो. काळजी, संकटे, ओढाताण या फे-यातून काही आनंदाचे क्षण शोधण्याचा प्रयत्न करतो. शरीर धडधाकट असतं. मन, बुद्धी शाबूत असते. त्या दृष्टीने आपण श्रीमंत असतो.
         पण .... शरीराच्या एखाद्या अवयवाला अपंगत्व आले तर काही अंशी कुटुंबावर अवलंबून असतो. असे अपंग शिक्षण, प्रशिक्षण व सहाय्याद्वारे स्वावलंबी होऊ शकतात.
             परंतु ' मतिमंदां ' च्या बाबतीत ' समजणं ' ही प्रक्रियाच नसते. त्यामुळे ते पालकावर सर्वस्वी अवलंबून असतात. तीव्र मतिमंदत्व असेल तर त्यांना जगविण्याची जबाबदारी पालकांवर येते. अशावेळी आई वडील नसले तर.... त्यांचा सांभाळ इतर नातलग कसोशीने करु शकत नाही.
                डोंबिवलीत 'खोणी ' या गावी अशा मतिमंद व्यक्तींचा सांभाळ तहहयात करण्यासाठी पालकांनी एकत्र येऊन ' अमेय पालक संघटना ' ही संस्था स्थापन केली आहे. शासनाकडून कोणतेही अनुदान न घेता सुजाण व सहृदय हितचिंतकांच्या पाठबळावर सुरु आहे.
              आज ' कुबेर ' स्नेही चंदूकाका सीएम जोशी यांच्यामुळे मला या ' घरकुलाला' भेट देण्याचा योग आला. आणि मी खरेच धन्य झालो. मतिमंदांच्या विश्वात डोकावण्याची, त्याना जाणून घेण्याची संधी प्राप्त झाली.
                 उजाड माळरानावर अथक परिश्रमाने आज नंदनवन फुलले आहे. प्रशस्त इमारत, अतिशय नीटनेटका परिसर, फळझाडे, फुलझाडे, बाग मन मोहून घेते.
          अविरत सेवा देणारे श्री अशोक वल्लभदास यांनी पूर्ण इमारत व परिसर फिरून दाखवला. तिथल्या मुलामुलींना पाहून, भेटून  मी स्तिमित झालो. अतिशय स्वच्छ, नीटनेटके आणि शिस्तबद्ध वागणे पाहून मला सामान्यांशी तुलना करण्याचा मोह आवरला नाही. त्यांचे स्वच्छ टॉयलेट पाहून मला सार्वजनिकच नव्हे तर इतर कोणत्याही संस्थेतल्या टॉयलेटची आठवण आली.
       मुदपाकखाना, भोजनगृह पंचतारांकित टापटिपीचे ! काही विद्यार्थ्यांना स्वत:च्या हाताने जेवताही येत नाही. तिथलीच एक मतिमंद मुलगी त्याला आपल्या हाताने भरवीत होती. ते पाहून माझे डोळे पाणावले. काका, काका करीत मुले बिलगत होती तेव्हा जाणवले की यांना फक्त मायेचा ओलावा हवा आहे. काही मुले तिशी, चाळिशी ओलांडलेली सुद्धा आहेत. प्रथम दाखल होणारा प्रकाश शेनोलीकर म्हणतो की ही इमारत मी बांधली तेव्हा त्याचे कौतुक वाटते कारण भूमीपूजनाची पहिली कुदळ त्याने मारली असते. येथल्याच एका मुलीने चित्रपटात काम केले म्हटल्यावर तुम्हाला ती व तो चित्रपट आठवला असेलच....
                खरंच मित्रांनो.... आपल्या भेटीने या मुलांना एक वेगळाच आनंद व समाधान मिळते. आपण आपल्या मुलांना यांना भेटायची, यांचे आयुष्य जाणायची एक संधी द्या. मला खात्री आहे की तुम्ही तुमच्या मुलांवर दुपटीने प्रेम करु लागाल.
       
सुरेश इंगोले**

Saturday 13 February 2016

व्हेलेन्टाईन डे.

अगदी ठरवून
ठराविक दिवशी
ठरलेलं
किंवा न ठरलेलं
प्रेम
करायला
...... हृदयात आवेग असतो ?
की नुसताच
                  भोग असतो ?

उथळ प्रेमाचे प्रदर्शन करायला
मात्र
' व्हेलेन्टाईन डे ' चा योग असतो.


* सुरेश इंगोले *

Wednesday 10 February 2016

होस्टेल लाईफ

*  होस्टेल लाईफ  *
                               -------------------

     होस्टेल लाईफची मजाच काही और असते. ज्याने ते अनुभवले तो पुढील आयुष्यात परिपक्व होतो. माझे कॉलेजचे पहिलेच वर्ष. होस्टेलचेही पहिलेच वर्ष. आर्वीसारख्या लहानशा गावातून आम्ही सात जण नागपूरला शिकायला आलो. शालेय जीवनात अभ्यासाबरोबर दांडगाई सुद्धा भरपूर केली होती. त्यामुळे बुजरेपणा नव्हताच.

           पहिल्याच दिवशी रुमपार्टनरने मला रँगिंगची कल्पना दिली होती. पण आम्ही शिताफीने सीनियर मुलांशी अदबीने, प्रेमाने वागून त्यांची मने जिंकली होती. रोज एक दोघांचा नंबर लागायचा. वाट्टेल ते प्रकार केले जायचे. आमची मात्र सुटका होत असे. पण फायनलच्या एका बिहारी मुलाच्या हे लक्षात आले.

           एक दिवस त्याने मला हाक मारून मधल्या चौकात उभे केले. सगळे गोळा झाले होते.
" चल, कान पकडके मुर्गा बन जा."  त्याने फर्मान सोडले.
" मुझे नही आता मुर्गा बनना."
" क्यों ? स्कूल में कभी मुर्गा नही बना क्या ?"
" नही , कभी नौबतही नही आयी. मुर्गा कैसे बनते है, तुम बनके दिखाओ."
अनवधानाने त्याने उकिडवे बसून पायातून हात घालून कोंबडा बनून दाखवले. सगळे खदखदा हसू लागले. आपली फिरकी घेतली गेली हे त्याच्या लक्षात आले. तो चिडून मला मारायला धावला तसे त्याला सीनियर्सनी धरले. " छोड दे उसे. सीधासादा बच्चा है "
" फिर उसे कभी छेडना मत." दुस-याने त्याला बजावले.
पण...... त्याने मनात डूख धरून ठेवला. कॉलेजच्या आवारात त्याने एकदोनदा मला पकडण्याचा प्रयत्न केला पण माझी सात आठ जणांची गँग पाहून थबकला. याचा सोक्षमोक्ष लावावा म्हणून एकदा आम्ही त्याला वॉर्निंग दिली. पण त्याला स्वत:च्या फजितीचा वचपा घ्यायचाच असेल, त्याने मला त्रास द्यायचे थांबवले नाही.

           मार्च महिन्यात आमची अभ्यासाची जागरणे सुरू झाली. तो रोज रात्री आमच्या खोलीत येऊन दूध पिऊन टाकायचा. मग आम्हाला काळा चहा प्यावा लागे. एक दिवस माझ्या मित्राने मला भांग आणून दिली. दुधाच्या ग्लासात भांग टाकून काजू बदाम वगैरे टाकून ग्लास झाकून ठेवला. नित्याप्रमाणे त्याने दूध पिऊन टाकले. आणि मधल्या चौकातल्या एका खाटेवर झोपला.
          रात्री दोनच्या सुमारास आम्ही उठलो. त्याच्या अंगावरचे सर्व कपडे काढले. एक चादर पांघरून त्याला खाटेला दोराने घट्ट बांधले. ती खाट चौघांनी उचलून वर टेरेसवर नेऊन टाकली. आणि रुममध्ये येऊन झोपलो.

           सकाळी खूप गलका ऐकू येऊ लागला. आम्ही उठून बाहेर आलो. तो सर्वांना कपडे मागत होता. त्याला सोडवू देत नव्हता. एकदोघांनी त्याची चादर हटवून पाहिली आणि हास्याचा जो धबधबा कोसळू लागला की सारे होस्टेल त्यात सामिल झाले.

           पुन्हा त्याने कधीच कोणाला त्रास दिला नाही.

                                                                          _____        सुरेश इंगोले

#कुबेर_हम_भी_है_जोश_मे
With संतोष जगन्नाथ लहामगे,
अनिल हंबीर,
Amey T Sonawane

Tuesday 9 February 2016

** बुवाबाजी **

**  बुवाबाजी  **
                                   --------------

       अंधश्रद्धा व बुवाबाजी यांचा जवळचा संबंध असतो. देवभोळ्या लोकांच्या अज्ञानाचा फायदा कसा घेतला जातो हे मला अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करीत असताना वेळोवेळी जाणवले. बरेचसे प्रयोग मी शिकून घेतले होते. जाहीररित्या ते प्रयोग करून आम्ही समाजप्रबोधन करीत असू.
       
        ८०च्या दशकात ही अंधश्रद्धा बरीच पसरली होती. मी भंडारा जिल्ह्यात निर्मूलनाचे कार्य करीत असताना तिकडे वर्धा जिल्ह्यात आमच्या खेड्यात कुणी एक शंकरबाबा अवतरले होते. आणि कहर म्हणजे माझे वडील त्यांच्या नादी लागले होते. प्राथमिक शिक्षक असलेले माझे वडील बुवाच्या नादी लागतील अशी शंकाही मला आली नव्हती. पण भावाने मला याची कल्पना दिली व मी चकित झालो. त्या बाबाने गावातील काही मुलींना नादी लावल्याचे कळल्यावर तर माझी सटकलीच. याचा बंदोबस्त करायचाच असे ठरवून मी तयारीला लागलो.

      दोन तीन दिवस सुट्या घेऊन मी गावी गेलो. रात्री आईकडून कळले की उद्या म्हणजे रविवारी आपल्या घरीच बाबांचा दरबार आहे. मी मनातल्या मनात योजना तयार करीत राहिलो. दरबारात काय काय घडत असतं याची माहिती घेतली.
     दुस-या दिवशी मी सकाळी सगळं आवरुन शेतावर गेलो. आमचा सालकरी गडी भेटला. तो बराच लुबाडला गेल्याची  मला माहिती होती. त्याच्याशी बोलल्यावर त्याला घरी यायला सांगितले. मी घरी परतलो . बघतो तो आमचे अंगण भक्तगणांनी फुलून गेले होेते. मी कसाबसा मार्ग काढीत पडवीत आलो. चौरंगावर शंकरबाबा बसले होते. त्यांची पूजा सुरु होती. मला पाहताच दादाजी ( वडील) म्हणाले, " महाराज, हा माझा मोठा मुलगा सुरेश. पाया पड रे महाराजांच्या." मी उभाच होतो. त्यांचा अंदाज घेत होतो.
       " अरे पाया पड ना !" दादाजी पुन्हा म्हणाले. मी आईच्या व नंतर दादाजींच्या पाया पडलो. बाबांच्या पायावर मी डोके ठेवत नाही हे पाहून वडील चिडले. ते काही बोलणार तोच मी बोलायला सुरुवात केली.
    " दादाजी, मी तुम्हा दोघांशिवाय कधी कोणाच्या पाया पडत नाही हे तुम्हाला माहीत आहे. मी या बाबांना मानीत नाही."
     एकजण म्हणाला, " बाबांचे चमत्कार तुम्हाला माहीत नाही. बाबा, यांना प्रसाद द्या !"
बाबांनी हवेतून हात फिरवून माझ्या हातावर पेढा टाकला.  मी तो त्याच माणसाला दिला आणि हवेतून हात फिरवून त्याच्या हातावर एक सफरचंद टाकले. तो आणि इतर सगळेच अवाक झाले.
 "असले चमत्कार मीही करतो. " बोलता बोलता एका तंबाकू मळणा-या इसमाच्या हातावर भिंतीचा चुना नखाने खरडून टाकला व खायला सांगितला. ' चुना साखरेसारखा गोड लागतो ' असे त्याने सांगितल्यावर मी आणखी चार पाच लोकांच्या हातावर भिंतीचा चुना टाकला.

     वातावरण चांगलेच तापल्याचे जाणवल्यावर मी माझे ठेवणीतले अस्त्र काढले. मंत्राने अग्नी पेटवून दाखवा मग मी तुम्हाला मानतो असे बाबांना आव्हान दिले. हल्ली असे मंत्र उपलब्ध नाहीत वगैरे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि मी माझे शेवटचे आव्हान दिले. तुम्हाला मंत्राने अग्नी पेटवता येत नसेल तर मी पेटवून दाखवतो मात्र असे झाले तर तुम्हाला हा गाव सोडून जावे लागेल.

     काही क्षण नीरव शांतता पसरली. मग हळूहळू जमाव उत्तेजित होऊ लागला. अग्नी पेटवा नाहीतर गाव सोडा असे नारे लागू लागले.  नाईलाजाने बाबा तयार झाले. मी तयारीला लागलो. एकाला अगरबत्तीचा गुल एका कागदावर काढायला सांगितला. दहा बारा अगरबत्त्या त्याला दिल्या. विटांचे कुंड तयार करुन त्यात तो अगरबत्तीचा गुल असणारा कागद ठेवला. त्यावर काटक्या रचून समिधा नीट रचल्या. गोव-यांचे तुकडे वगैरे ठेवून झाल्यावर माझ्या भावाला तुपाची वाटी आणायला सांगितली.
 मी आसन मांडून बसल्यावर गायत्री मंत्राचा जप सुरू केला. व पळीने वाटीतले तूप सोडायला सुरुवात केली.
         बराच वेळ होऊनही धूर निघेना तसा माझा धीर सुटत चालला. प्रयोग फसतो की काय असे वाटले. पण चिकाटीने तूप सोडणे व मंत्र म्हणणे सुरूच होते. आणि........
धूर निघायला सुरुवात झाली . लोकांनी टाळ्या वाजवणे सुरु केले. आणि शेवटी अग्नी प्रदीप्त झाला. कुंड धडाडले. मी कुंडाला नमस्कार केला. उठून उभा राहिलो तो बाबाजी निघून जात होते. लोक जोरजोरात माझ्या नावाने ओरडत होते.

       अशा रितीने गावातील बुवाबाजी संपली. वडील बरेच दिवस अबोल राहिले. भाऊ मला वारंवार विचारत होता, " बाबा, सांग ना ! आग कशी पेटली ?"
शेवटी त्याला गुपित सांगितले. तुम्ही कुणाला सांगणार नाही ना !!
ज्या कागदावर अगरबत्तीचा गुल काढला होता त्या कागदावर मी पोटँशियम परमँगनेट मिसळले होते. दोहोंचा रंग काळा असल्यामुळे कळत नव्हते. तुपाच्या वाटीत तूप नसून ग्लिसरीन होते. ते तुपासारखेच दिसते. ग्लिसरीनचा स्पर्श जेव्हा पोटँशला होतो तेव्हा अग्नी पेटतो.

                                                                         सुरेश इंगोले

#कुबेर_हम_भी_है_जोश_मे
With... संतोष जगन्नाथ लहामगे,  अनिल हंबीर,  Amey T Sonawane

#कुबेर_हम_भी_है_जोश_में मावशी आली धावून ..... ---

#कुबेर_हम_भी_है_जोश_में

 मावशी आली धावून .....
------------------------
                                 स्वत:ची फजिती सांगायला धाडस लागते म्हणे. तेव्हा म्हटले सुरवात फजितीपासूनच करावी.
                                  चाळीस वर्षापुर्वीची गोष्ट. १९७५ मध्ये आमचे लग्न झाले. नवी नवरी घरात आली. आठ दिवसांनी चुलत भावाचे लग्न होते. त्यामुळे आठ दिवस ती घरात असूनही तिच्याशी बोलण्याची संधी मिळत नव्हती कारण संपूर्ण घर पाहुण्यांनी भरलेले आणि संधी मिळाली तरी बोलण्याचे धाडस नव्हते. तो काळ असा होता की वडीलधा-यासमोर बोलताही येत नसे.
     
                                 माझी मुंबईची मित्राची बायको संधी मिळवून द्यायचा आटोकाट प्रयत्न करीत असे. पण आम्ही मुलींच्या बाबतीत लाजाळूचं झाड. माझी थट्टा टोकाला जायची पण मी घाबरून शेतात पळून जाई. माझा चुलत भाऊ तिची खूप चेष्टा करायचा आणि ती ही त्याला  प्रत्युत्तर द्यायची. असे आठ दिवस निघून गेले. आम्ही दुरूनच आमच्या सौ ला केवळ बघत बसायचो.
                           
                                 चुलत भावाच्या लग्नाला परत अमरावतीला गेलो. ( माझे लग्नही अमरावतीलाच झाले होते.) लग्नाच्या सगळ्या विधीत 'ही' एवढी उठून दिसत होती की अस्मादिकांचं लक्ष इतरत्र नव्हतंच. नव्या नवरीला घेऊन परत गावी आलो. दुस-या दिवशी पूजा घातली गेली. दोन जोडपी पूजेला बसलेली. माझा भाऊ अधून मधून त्याच्या बायकोशी बोलायचा तेव्हा मी त्याच्यावर डोळे वटारायचो. तो हसायचा.

                                  दुस-या दिवशी अमरावतीला पूजेसाठी जायचे होते. आम्ही चौघे म्हणजे दोन्ही जोडपी ट्रेनने निघालो. माझा भाऊ प्रवासात दोघींशीही मनसोक्त गप्पा मारत होता. पण प्रवासात सुद्धा मी तिच्याशी बोललो तर कुणी पाहील तर नाही ना ही धाकधूक. वेडेपणाचा कळसच ! मधे एका स्टेशनवर चहा घेताना मी भावाला म्हटले, " भास्कर, चहा हवा का विचार तिला." तो म्हणाला, " अरे ! तू विचार ना !" तर मी डोळे वटारले.

                                  अमरावतीला पूजा आटोपली. दुस-या दिवशी सकाळी अंबादेवीच्या मंदिरात ओटी भरायला  जायचे होते. रिक्षात बसून निघालो. काहीतरी बोलायचे म्हणून मी हिंमत करुन विचारले," ओटी भरून लगेच निघायचे ना? " " थोडी खरेदी करायची आहे. " ती हळूच म्हणाली.

                                  ओटीभरण व पूजा आटोपल्यावर आम्ही बाजूच्या  मार्केटमधे गेलो. ती उत्साहाने दुकाने फिरू लागली. मला एक परिचित भेटले त्यांच्याशी गप्पा मारण्यात मी दंग झालो.   त्या काळी विमा एजंट असल्यामुळे मी प्रत्येकाला गि-हाईक समजून वागायचो. त्यामुळे बराच वेळ आमच्या गप्पा रंगल्या. तेवढ्यात ती आली व मला म्हणाली, " पन्नास रुपये हवे होते. " मी खिशातील पन्नास रुपये तिला दिले आणि माझ्या डोळ्यासमोर वीज चमकली.

                                  माझ्या खिशात  फक्त दहा रुपये उरले होते. घरून निघताना मी खिशात किती पैसे आहे ते पाहिलेच नव्हते. घरून पैसे घेतलेच नव्हते. मला दरदरुन घाम फुटला. आता काय करायचे.!

                                 रिक्षा करून आम्ही तिच्या माहेरी आलो. माझ्यासमोर एवढे संकट होते की रिक्षात तिच्या होणा-या स्पर्शाने सुद्धा माझ्या चित्तवृत्ती फुलल्या नाहीत. गावी कसे जायचे ? तिकिटाला पैसे कुठून येणार ? कुणाला मागायचे ? शरमेने काळाठिक्कर पडायची वेळ आली होती. रिक्षाचे पैसे चुकवून  घरात आलो.

                                 खिसा आता पूर्ण रिकामा झाला होता. मी घाम पुसत सोफ्यावर बसत होतो तोच आतून एक महिला बाहेर आली. माझ्याकडे बघून हसू लागली. " काय रे, ओळखलंस ना !"  तिच्याकडे निरखून बघत मी म्हणालो, " तू  मालती मावशी ना ! " तिने हसत हसत आपल्या मिस्टरांची ओळख  करून दिली. " अरे हे आशाचे भाऊ लागतात ...दूरचे "  मी चकित झालो. म्हणालो, " म्हणजे तू  माझी मावशी आणि हिची वहिनी का ?" सगळे हसू लागले.

                                मी क्षणभर स्वत:ची व्यथा विसरलो.  त्यांच्याशी गप्पांमध्ये रमलो. परत चिंता पोखरू  लागली तेव्हा एक मार्ग सुचला की भावाला भेटून काहीतरी मार्ग निघेल. तेवढ्यात एक नातलग येऊन सांगू लागले की माझा भाऊ त्याच्या सासरी खेड्यावर गेलाय. माझे उरले सुरले अवसान गळाले.

                                आमच्या बोळवणीची पूर्ण तयारी झाली होती. सगळं सामान बांधून तयार झालं. रिक्षा आणायला कुणीतरी गेलं. मी रडकुंडीस आलो होतो. शेवटी विचार केला की प्रोफेसर साहेबांस ( सौ चे मोठे बंधू) स्पष्ट कल्पना द्यावी. होऊ झाली फजिती !

                                निघताना मी इतर ज्येष्ठांसोबत मावशीच्या पाया पडलो. " जोडीने पाया पड रे " मावशी म्हणाली. आम्ही पाया पडताच मावशीने माझ्या हाती शंभराची नोट दिली. त्या काळात .....शंभराची नोट.....

        मंडळी....! माझी अवस्था काय सांगू !  आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन....साला मै तो साब बन गया ! आमचा परतीचा प्रवास सुरु झाला. माझ्या डोळ्यासमोरून सारा घटनाक्रम सरकू लागला. आणि सगळी भीड सोडून मी बेधडक बायकोशी बोलायला सुरवात केली. भीड चेपल्यावर मी तिला माझी अवस्था विशद केली ......
                 
                     आणि ती सहज म्हणाली," माझ्याकडे होते की पैसे...मला विचारायचे की !"
       माझाच पोपट झाला.........

                                                                       सुरेश इंगोले

अनिलहंबीर
Amey T Sonawane

With...
 संतोष जगन्नाथ लहामगे