Monday 9 October 2017

..#कुबेर _लग्नसोहळा..

          लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असे म्हणतात. खरे असावे ते. माझा तरी यावर विश्वास आहे. भावंडात मी वडील मुलगा म्हणून जबाबदा-या खूप. १९व्या वर्षी मी मुंबईला नोकरीस लागलो. पण तीन वर्षातच वडिलांनी नोकरी सोडून बोलावले. नोकरी करतो म्हणून मुली सांगून येत होत्या पण बहिणींची लग्ने झाल्याशिवाय लग्न करायचे नाही असे मी ठामपणे सांगितले होते. शेवटी १९७५ साली वडिलांनी फर्मान सोडले. मी तुमच्याकरिता वधूसंशोधन करायला जात आहे. मी आणि माझा चुलत भाऊ दोघांचेही लग्न एकाच वेळी करायचे दादाजींनी ठरवले होते.( वडिलांना आम्ही दादाजी म्हणत असू.)
             एक दिवस त्यांनी फर्मान सोडले, " अमरावतीला दोन मुली मी निवडून ठेवल्या आहेत. दोन दिवसांनी जावयासोबत जाऊन त्या मुली पसंत करून या." वडिलांसमोर काही बोलायची सोय नव्हती.
                 आम्ही अमरावतीला गेलो. पहिल्या घरी मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाला. बुजरेपणा आणि संस्कार यामुळे मी धीटपणे मुलीकडे पाहू शकलो नाही. मेहुण्यांनी तिला जुजबी प्रश्न विचारले. कार्यक्रम आटोपला. तेथून लगेच दुसरी मुलगी पाहायला निघालो. वाटेत मेहुण्यांनी आम्हाला विचारले, " कशी वाटली मुलगी ?" मी काही बोलू शकलो नाही पण माझा भाऊ लगेच उत्तरला," मला वहिनी म्हणून पसंत आहे."
मला चॉईसच उरला नाही. मुकाट्याने दुसरी मुलगी मला भावससून म्हणून पसंत करावी लागली. अशा त-हेने हिच्याशी माझी जन्माची गाठ पडली.
                   ३० मे १९७५ साली वयाच्या २८व्या वर्षी आम्ही बंधनात अडकलो. ४२ वर्षानंतरही .....आम्ही आजही काया-वाचा-मनाने एवढे एकरूप आहोत की जोडीदार म्हणून दुस-या कोणाचा विचारही मनाला शिवला नाही.
                                  सुरेश इंगोले

Thursday 5 October 2017

ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी..
भेटीत तुष्टता मोठी.....

          बाळ कोल्हटकर यांचे गीत, वसंत देसाई यांचे संगीत.....आणि...कुमार गंधर्व, वाणी जयराम यांच्या अत्यंत सुमधुर स्वरांनी अजरामर केलेले हे गाणे आज कानावर पडले आणि मन तृप्त झाले.
         
             या ऋणानुबंधाचे मला मोठे नवल वाटते. हजारो लोकांशी आपल्या ओळखी असतात. नेहमी भेटणारांची नावे आपल्या स्मरणात असतात. क्वचित भेटणारांशी आपण हसून दोन शब्द बोलतो. काही लोकांशी आपली नित्य भेट होत असते. तर काही जणांशी आपण फार क्वचित.... अधूनमधून  भेटत असतो. पण ऋणानुबंध ज्यांच्याशी जुळतात त्यांची गोष्टच वेगळी असते. ते या कोणत्याच वर्गवारीत बसत नाहीत. कारण त्यांचं स्थान केवळ स्मरणात, मेंदूत नसतं...तर ते थेट काळजात असतं.

                  असे अनेकजण माझ्या काळजात ठाण मांडून बसले आहेत. वर्ष दोन वर्षे भेट झाली नाही तरी हृदयाची स्पंदने त्यांना जाणवत असावीत याचा मला विश्वास आहे. कारण नागपूरचा माझा जिवलग मित्र दत्तू केदार याच्याशी दोन वर्षांपासून भेट नसूनही फोन केल्यावर ज्या आत्मीयतेने तो विचारपूस करतो, जुन्या आठवणी काढतो की मन हेलावून जातं. वार्धक्यामुळे तो बाहेर जाऊ शकत नाही आणि फिरस्तीमुळे मी त्याची भेट घेऊ शकत नाही याचे कधीकधी वैषम्य वाटते.

                 ज्याचे स्थान हृदयात...काळजात असते अशांनाच आपण जिवलग म्हणतो. त्यांची संख्या कमी असते. पण त्यांच्यामुळे आपले जीवन सुखकर होते. पुन्हा पुन्हा भेटीची ओढ लागते.
         भेटीलागी जीवा। लागलीसे आस।
          पाहे रात्रंदिस। वाट तुझी ॥
अशी अवस्था निर्माण होते. जिवलगा, कधी रे येशिल तू..असे आपले मन आक्रंदत असते.

                  हृदयाच्या कप्प्यात अढळ स्थान असणारे माझे परममित्र...विदर्भाची शान...गझलगंधर्व..संगीतकार...गझलगायक...श्री सुधाकर कदम यांचे पाय माझ्या घरी शहापुरला कधी लागतील याची मला शाश्वती नव्हती. ते पुण्यात स्थायिक झाल्यामुळे विदर्भात प्रसंगानेच येणे होत असे. पुण्याच्या त्यांच्या घरी नेहमीप्रमाणे यावेळी आमची १८ सप्टेंबरला भेट झाली तेव्हा मी शहापुरला कधी येता असे विचारले. ते यवतमाळ - वर्धेला येणार हे कळले होते. २६ तारखेला त्यांनी शहापुरची चौकशी केली व २८ तारखेला येतो म्हणाले तेव्हा माझा आनंद गगनात मावेना.
   अखेर तो दिवस उजाडला. त्यांचे शहापुरात आगमन झाले. आम्ही उभयता त्यांच्या स्वागतास सज्ज होतो. सारे घर आनंदाने भरून गेले. सुधाकराव, सुलभावहिनी, निषाद, पल्लवी आणि गोड नातू अबीर यांना घराने आपल्या कवेत घेतले.

              आमचे घर, विहीर व आंब्याचे झाड यांनी आम्हाला जोडलेली माणसे टिकवण्यात मोलाची साथ दिलेली आहे. दोन दिवस एकमेकांच्या सहवासात, थट्टामस्करीत, खेळीमेळीत कशी गेली ते कळलेच नाही. त्यांच्या नागपूरच्या मित्राचा अस्वस्थ असल्याचा निरोप आला म्हणून जाणे अपरिहार्य असूनही त्यांचा पाय निघेना.
              जाताना हातात हात घट्ट धरून एवढेच म्हणाले," डिसेंबरमध्ये चांगले आठ दिवसाच्या मुक्कामाने येतो भौ...." मन भरून आले.
          यालाच ऋणानुबंध म्हणतात ना........

Wednesday 6 September 2017

मला छळण्याला
किती हे बहाणे
चोरून पहाणे
इथे तिथे.......।

पुसटता स्पर्श
लावी हुरहूर
जाऊ नये दूर
असे वाटे.....।

आवेगाने मिठी
घालाविशी वाटे
परी भय दाटे
मनामध्ये.......।

मनात काहूर
जिवा तगमग
सखा जिवलग
दूर जाता......॥

Sunday 2 July 2017

मतल्यात शोधले ना वृत्तात शोधले मी...
गझलेस या मनाच्या कप्प्यात शोधले मी...

Wednesday 28 June 2017

आज आठवडी बाजार होता.
सौ बाजारातून आली. पिशवी खाली ठेवत, घाम पुसत म्हणाली," काय महाग होत्या भाज्या आज ? थोडी उशीरा गेले असते तर स्वस्त तरी मिळाल्या असत्या."

   पुस्तकातून डोके वर न काढता मी सहज बोलून गेलो," त्यापेक्षा बाजार संपता संपता गेली असतीस तर टमाटर, वांगी, कांदे, पालेभाज्या  या सर्व फुकट मिळाल्या असत्या."
                   ********

आत्ता आठ वाजून गेले तरी किचनमध्ये शुकशुकाट आहे. आज जेवायला मिळणार की नाही कळत नाही.
मी काही चुकीचे बोलून गेलो का मघाशी....?
मला तर काही आठवत नाही......

असो... शुभ रात्री !!
                                             == सुरेश इंगोले ==

Friday 9 June 2017

*सुमुहूर्त सावधान*

           प्रत्येकाच्या आयुष्यात  येणारा विवाह संस्कार हा अत्यंत महत्वाचा असा सोहळा असतो. तो कशा प्रकारे साजरा करावा हे प्रत्येकाने ठरवायचे असते. अर्थात वरपिता किंवा वधूपिता यांनाही पूर्णपणे हे स्वातंत्र्य नसते.  अनेक तडजोडी करुन हा सोहळा संपन्न केला जातो. देणीघेणी, हुंडा, मानपान, आहेर या गोष्टी महत्वाच्या असतात. लग्नाची तिथी ठरते. मग मुहूर्त काढला जातो.
             त्या मुहूर्तावर लग्न लागणे अपेक्षित असते. बहुधा मुंबई पुण्यासारख्या शहरात मुहूर्तावर लग्ने लागलेली मी पाहिली आहेत. सफल विवाहासाठी हा सुमुहूर्त पाळणे आवश्यक आहे असे मानले जाते.

             पण ग्रामीण भागात किंवा नागरी भागात या मुहूर्ताची ऐसीतैसी केली जाते. मुहूर्त हा पाळण्यासाठी नसतोच अशी यांची ठाम धारणा असते. त्यामुळे सकाळी नऊ वाजताचे लग्न दुपारी दीड-दोन वाजता लागते. मग जेवणारांची झुंबड उडते. सगळा गोंधळ माजतो.

           याला कारणीभूत असतात वरातीत नाचणारे नवरदेवाचे मित्र आणि वराकडील पाहुणे मंडळी. डीजेच्या तालावर ठुमके घेत, वेडेवाकडे अंगविक्षेप करीत, कमरेला  विचित्र झटके देत प्रत्येक जण नाचायची हौस पूर्ण करून घेतो. वेळेचे भान कुणालाही नसते. ते करून देण्याचाही उपयोग नसतो. नवरदेवाच्या खिशातून मित्रांच्या अपेयपानाची व्यवस्था होत असते. अंगूरी चढत जाते. नाच रंगत जातो. बँडवाल्यांचीही चांदी असते. कुणीतरी नाचणा-यावरून नोटा ओवाळून त्यांना देत जातो. या सगळ्या प्रकारात मुहूर्ताची वाट लागते. वधूकडील मंडळी बिचारी वाट पाहून थकून गेलेली असते.

               या सर्व प्रकारामागे एक गोंडस समजूत असते की लग्न आयुष्यात एकदाच होते. ही मजा नंतर कधी करणार ? वीस वर्षांपुर्वी आमच्या गावातील शिक्षकाच्या मुलीचे लग्न होते. मुहूर्त सकाळी नऊचा होता. लग्न लावून जेवण करुन शाळेत येता येईल म्हणून कोणीही सुटी घेतली नव्हती. ऑफिसला जाणारी इतर मंडळी याच विचाराने मंडपात जमली. मुहूर्त टळून एक तास झाल्यावर चुळबुळत एकेकजण सटकू लागला. आम्ही सगळे परत आलो. नंतर कळले की लग्न दुपारी दीड वाजता लागले तेव्हा मंडपात फक्त नातलग मंडळी तेवढी शिल्लक होती. किमान तीनशे ते चारशे लोकांचा स्वयंपाक शिल्लक राहिला होता.

             आम्हा मित्रमंडळीत या मुहूर्ताबद्दल नेहमी काथ्याकूट होत असे. मुहूर्त किंवा लग्नाची वेळ पाळायलाच हवी हे माझे मत मी ठामपणे मांडत असतो. आमच्या मित्राच्या मुलाच्या लग्नात बोलणी करताना मला हजर राहण्याचा योग आला. मुलीकडच्यांनी लग्न वेळेवर लागावे म्हणून गळ घातली तेव्हा मित्राच्या वतीने मी त्यांना हमी दिली. मित्राला माझे विचार माहीत होते. तो काही बोलला नाही. मी नव-या मुलाला सांगितले की नाचणा-या मित्रांचे काय ते तू बघ. लग्न वेळेवर लागेलच.

          मुहूर्त सकाळी साडे अकराचा होता. जानवशावरून वरात सकाळी दहालाच निघाली. मारुतीच्या मंदिरातून मंगल कार्यालयाकडे येताना नाचणारांचा जोश वाढू लागला. मी मंडपाकडे निघून गेलो. अकरा वाजून दहा मिनिटे झाली तसा वधूपित्याचा जीव वरखाली होऊ लागला. त्याने माझ्याकडे येऊन घड्याळ दाखवले. त्याच्या चेह-यावरील काकुळती मला हेलावून गेली. मी मित्राला बोलावून गाडीत बसवले व वळसा घालून वरातीच्या मागून गाडी नाचणारांच्या बाजूला आणली. त्याच्या एका मित्राला बोलावले. त्याला माझी योजना सांगितली. त्याला पूर्वकल्पना होतीच. त्याने वराला घोड्यावरून खाली नाचायला उतरवले. मित्र आणखी जोशात नाचू लागले. मी मित्राला खुणावले. तो खाली उतरला. नाचणारात जाऊन त्याने वराला हात धरून आणले व गाडीत बसवले. बाजूला तोही बसला. मी काचा चढवून गाडी पुढे काढली. चारच मिनिटात आम्ही मंडपात पोहचलो. सुमुहूर्त बरोबर साधला गेला. मंगलाष्टके झाली. वरमाला घातल्या गेल्या. फटाके फोडण्यात आले पण नाचणा-यांचे उन्मादात नाचणे सुरूच होते. ते मंडपाशी पोचल्यावर बराच वेळाने वस्तुस्थिती त्यांना कळाली.
     
             नंतर बराच हंगामा झाला. असो !
वराचे वरातीतून अपहरण अशी नंतर लोकल वर्तमानपत्रात बातमी झळकली होती. आजही परिस्थिती बदलली नाही. मुहूर्ताची ऐशीतैशी होतच असते.

                                      ***  सुरेश इंगोले. ***

Wednesday 22 March 2017

#मित्रास पत्र....

    बीजी,

                 फेसबुकवरील आमच्या समूहाने पत्र लिहिण्याचे आवाहन केले तेव्हाच तू डोळ्यासमोर उभा राहिलास. मी आयुष्यात कधी तुला पत्र लिहिले नसते. तू मला डोळ्यासमोरही नको आहेस. तू मनातून उतरलास तसाच मी तुला माझ्या आयुष्यातूनही वजा केले आहे. मी तुला प्रिय लिहू शकत नाही की तुझे नाव घ्यायचीसुद्धा माझी इच्छा नाही. हे तुला पत्राच्या मायन्यावरुन कळेलच.
       
                 एक छोटीसी घटना पस्तीस वर्षांचे घट्ट नाते तुटण्यास कारणीभूत होते. तीन वर्षापुर्वीची होळी तो प्रसंग घेऊन आली होती. मित्राने आवर्जून बोलावल्यामुळे मी व्याह्यांना घेऊन त्याच्या बंगल्यावर गेलो. तेथे माझे इतर जिवलग मित्र प्राचार्य, डॉक्टर, संस्थेचे कार्यवाह, आयकर अधिकारी इत्यादी जमलेले होते. आम्ही एकमेकांना रंग लावला. हास्यविनोदात आम्ही रंगलो असताना तू अचानक तेथे आलास. तुझे येणे अनपेक्षित होते. तू चिक्कार दारू प्यायला होतास. अद्वातद्वा बोलत होतास. घाणेरड्या शिव्या तुझ्या तोंडून निघत होत्या. बैठकीत पाहुणे असल्याची तुला डॉक्टरांनी समज दिली पण उपयोग नव्हता. मी सर्वांची रजा घेऊन व्याह्यांसोबत निघालो. मुंबईच्या पाहुण्यासमोर झाली तेवढी शोभा पुरे असे सर्वांना वाटले होते. रंगाचा बेरंग झाला होता.
पण नंतर तुला सगळे बोलू लागले तेव्हा तू मला व व्याह्यांनाही शिव्या घातल्या. ही गोष्ट सर्वांना खटकली.

          डॉक्टरांनी मला फोन करुन सगळे सांगितले. त्यांना या गोष्टीचा खूप राग आला होता. तुला आम्ही मुलाप्रमाणे वागविले होते. तू आम्हाला आई व बाबा म्हणायचास हे सर्वांना माहीत होते. तुझ्या तोंडून आमच्याप्रती घाण शिव्या त्यांना सहन झाल्या नाही. तुला कुणीतरी मारायला धावले होते.
   
         मी बरेच दिवस हा प्रसंग मनावर घेतला नाही. पण नंतर दुस-याच दिवशी तू सर्वांची घरी जाऊन माफी मागितली पण माझ्या घरी पायसुद्धा ठेवला नाही तेव्हा मी तुला जाब विचारायचे ठरवले. तुझ्या घरी येऊन मी तुला छेडले तेव्हा माझी अपेक्षा होती की तू म्हणशील, बाबा, माझी चूक झाली, मी नशेत होतो. पण उलट तू सपशेल नाकारलेस. मी तसे बोललोच नाही, ते लोक काहीतरी सांगतात असा कांगावा केला.  त्याचक्षणी तू माझ्या मनातून पूर्णपणे उतरलास. खरं बोलायला धाडस लागतं. येथे तुझा ईगो आडवा आला.
     तुझी मुलगी एकदा घरी येऊन खूप रडली तेव्हा तिला जवळ घेऊन दिलासा दिला की तुला आम्ही अंतर देणार नाही. पण तुझ्या घराचा उंबरा यापुढे ओलांडला जाणार नाही हे मात्र खरे.
         तू फेसबुकवर नसल्यामुळे हे पत्र तुला वाचता येणार नाही. तरीपण तुझा मुलगा किंवा मुलगी हे वाचतीलच. त्यांच्याकडून तुला हा पत्रप्रपंच कळो. तीन वर्षांची मनातली खदखद या निमित्ताने बाहेर पडली. मनाला हलके वाटले.

                                       तुझा कोणीही नसलेला,
                                                   बाबा.

Sunday 26 February 2017

थोरांचा सहवास =:= तात्याराव सावरकर //आचार्य अत्रे

             मुंबईत नोकरीला लागलो १९६६च्या फेब्रुवारीत. हळूहळू रुळलो. मित्र तयार होऊ लागले. असाच एक मित्र नंदा प्रधान...सांताक्रूझ विमानतळावर नोकरीला होता.

            बहुधा  जून-जुलै महिना असावा. नंदाने सांगितले की तात्याराव सावरकर खूप आजारी आहेत. मी विचारले," स्वातंत्र्यवीर सावरकर ?" त्याने होकारार्थी मान हलवली. मी त्याचा हात घट्ट धरून म्हटले," नंदू, मला त्यांना पहायचंय...भेटायचंय !"
         
             शनिवारी दुपारी मी ऑफिसमधून आलो. नंदाला सुटी होती. मी दिसताच तो म्हणाला," चल, येतोस सावरकरांना पहायला ?"
              मी उलट्या पावली निघालो. घराजवळच शिवाजी पार्क होते. वळसा घालून आम्ही एका लेनमध्ये शिरलो. दुपारी सगळीकडे निवांत शांतता होती. एका घराच्या पाय-या चढून आम्ही वर आलो. दार लोटलेले होते. खिडकीतून पाहिले. पलंगावर स्वा. सावरकर शांत झोपलेले होते. बाजूच्या आरामखुर्चीवर एक धिप्पाड व्यक्ती डोळे मिटून पहुडली होती.

             नंदा माझ्या कानात कुजबुजला," ते कोण आहेत माहिताय्.?" मी नाही म्हटले. "आचार्य अत्रे !"
 मी चकित झालो. मी अत्रेंचे बरेच साहित्य वाचले होते. मराठा त्यांच्या खुसखुशीत लिखाणामुळे माझे आवडते दैनिक होते. आज या दोन्ही थोर दिग्गजांना भेटल्याशिवाय जायचेच नाही असा मी चंग बांधला. पण नंदा पुढाकार घेईना. आपण चुकीच्या वेळी आलो असे तो म्हणू लागला. मी धीर एकवटला. आणि दारावर हळूच टकटक केले.
           
            छातीत धडधड वाढली होती. थोड्या वेळाने दार उघडले. दारात आचार्य अत्रे उभे होते. सहा फुटाहून उंच व धिप्पाड अशा त्यांच्या देहाकडे पाहून आपले खुजेपण जाणवत होते. " काय रे, कोण तू ? यावेळी कां आलास ?"  त्यांच्या साध्या बोलण्यातही जरब जाणवत होती. मी क्षणभर गांगरलो. मग धीर एकवटून म्हणालो," मी नागपूरहून आलोय. तात्यारावांचे दर्शन घ्यायचंय.." त्यांनी माझ्याकडे रोखून पाहिले. मग दारातून बाजूला होत ते म्हणाले," त्यांची झोपमोड करू नकोस. जा !" मी आणि नंदा आत आलो. पलंगावर एक थोर व्यक्तिमत्व शांत झोपलं होतं. त्यांची कृश काया व शांत चेहरा पाहून हेच का ते अंदमानातून समुद्र पोहून येणारे अशी शंका मनात आली. त्यांच्याविषयीच्या कथा आठवून मी रोमांचित झालो. त्यांची मूर्ती डोळ्यात साठवून घेऊ लागलो. हळूच त्यांच्या पायावर माथा टेकविला. त्यांनी किंचित चुळबुळ केली. मी चटकन बाजूला झालो. नंदाने घाबरून दुरूनच नमस्कार केला.

             आम्ही दाराशी आलो. मी चटकन वाकून अत्रेंना नमस्कार केला. मला हात धरून उठवीत ते म्हणाले," काय म्हणतात आमचे कंडमवार ? आणि अनिलांना ओळखतोस का?"
         मी म्हणालो, "अनिल म्हणजे आ.रा.देशपांडे ना? त्यांच्या कविता खूप आवडतात. त्यांच्या घराकडे धंतोलीला मी बरेचदा गेलो पण भेटायचे धाडस झाले नाही. "
          "आज केलेस ना धाडस ? तसेच करायचे. कन्नमवार खूप चांगले आहेत. मुख्यमंत्रीपद गाजवलंय त्यांनी.."
         
            मी चकित झालो. मुख्यमंत्री असताना त्यांच्यावर अत्र्यांनी कायम टीका केली होती. माझ्या पाठीवर थोपटून त्यांनी आम्हाला रजा दिली.

          त्यानंतर आचार्य अत्र्यांची दोनदा भेट झाली. प्लाझामध्ये व्ही शांताराम यांच्या ' इये मराठीचिये नगरी' या चित्रपटाच्या प्रीमियरप्रसंगी गेटवरच भेटले. मी नमस्कार करुन नाव सांगताच तू  'नागपूरचा ना' अशी विचारणा केली. मला कृतकृत्य वाटले.

                                         * * * सुरेश इंगोले * * *

Sunday 19 February 2017

काल गजानन महाराज प्रगटदिनानिमित्त सौ ला मंदिरात जायचे होते. संध्याकाळी चिरंजीव कॅब करुन पर्वतीच्या पायथ्याशी असलेल्या मंदिरात घेऊन गेले. चिकार गर्दी होती. मुख्य मंदिराच्या गर्भगृहात पोचायला पन्नास मिनिटे लागली.
                 
                  गर्भगृहाच्या बाहेर फोटो काढू नये अशी सूचना लिहिली होती. आत प्रवेश करताच उजव्या बाजूला दोन जण मोबाईलने व्हिडिओ शूटिंग करताना दिसले. स्वयंसेवक पुढे पुढे सरकण्याच्या वारंवार सूचना करीत होता. त्याचे तिकडे लक्ष नव्हते की मुद्दाम दुर्लक्ष करीत होता तोच जाणे...

                   मी त्याला ऐकू जाईल एवढ्या आवाजात सौ ला म्हणालो, " अगं ही पाण्याची बाटली पकड जरा. मला मूर्तीचे फोटो घ्यायचे आहेत." मी खिशातून मोबाईल काढण्यासाठी हात घातला तोच तो म्हणाला," अहो काका ! फोटो काढायला मनाई आहे. "
" कुणाला ? मला एकट्याला ?"
" अहो सर्वांनाच... '
" मग ते काय आहे?" मी अंगठा खांद्यावरून मागे नेत विचारले.
              त्याचे तिकडे लक्ष गेले तेव्हा तो जोरात ओरडून 'बंद करा हो मोबाईल ' असे त्यांना म्हणाला. पण त्यांचे शूटिंग सुरूच होते. मी त्या स्वयंसेवकाकडे रोखून पाहिले. त्याने नजर चुकविली.

              आम्ही जवळ पोचलो. सौ पूजा करणार तोच बाजूच्या दारातून पांढरा शुभ्र कुर्ता पायजमा व जाकिट घातलेली व डोक्यावर फरची टोपी घतलेली व्यक्ती हातात पूजेचे ताट घेऊन सरळ मूर्तीसमोर आली. त्याच्यामागे दोघे चेले होते.
         " अहो, काय हे !" मी पुजा-याला विचारले. " एक तासापासून आम्ही रांगेत उभे आहोत. हे मधेच कसे घुसतात ?''
    " ओ काका, त्यांना प्रचाराला जायचंय " एक चेला म्हणाला.
 पुजा-याने त्याचे ताट घेऊन पूजा केली. फरच्या टोपीने डोके टेकवले.
  " एक तास रांगेत उभे राहून यांनी पूजा केली असती तर या गर्दीला त्यांचा आदर वाटला असता. फुकाफुकी मतांची संख्या वाढली असती."मी बोललो.जाताजाता एका चेल्याने माझ्याकडे रोखून पहिले.
      रांगेतल्या एका ज्येष्ठ नागरिकाने आपली खंत दाखवली. "आताच हा उर्मटपणा आहे तर निवडून आल्यावर बघायलाच नको."

          बाहेर पडेपर्यंत मन विषादाने भरून गेले होते.
फाटकाजवळ फुगे विकणारे होते. नातीसाठी एक फुगा घेतला. त्या म्हातारीला पन्नासची नोट दिली. मला सुटे देण्यासाठी ती बटवा उपसू लागली. दहाच्या तीन व पन्नासची एक नोट अशा चार नोटा तिने मला दिल्या. मी तिच्याकडे पाहून हसलो.
" हिसाब नही आता ? या नोट नही समझते ? पचास की नोट क्यों वापस दे रही हो ?" तिला पन्नासची नोट परत करुन मी दहाची नोट घेतली...

              आता मन हलके हलके वाटत होते. परततांना मी कॅबमध्ये निवांत रेलून बसलो व डोळे मिटून घेतले...

                                              ***  सुरेश इंगोले  ***

Sunday 22 January 2017

## जलिकट्टू ##

       सहज या भागात आलोच तर प्रमोदची भेट घ्यावी म्हणून त्याच्या घरात डोकावलो. " मिश्राजी है क्या ?" म्हणत घरात प्रवेश केला.
        नवरा बायकोचे भांडण सुरु होते. तो तिला बोलत होता. ती उलट उत्तरे देत होती. आल्या पावली परतायचे म्हणून मी वळलो तोच माझ्या कानावर पडले," आप हमेशा मुझे जलिकट्टू सुनाते हो।"
        माझ्यावर नजर जाताच दोघांचाही सूर जरा निवळला.
" जलिकट्टू नही पगली...वह तो सांडों का खेल है। तुम्हे जलीकटी सुनाता हूँ...ऐसा कहना था।"
        " देखा भाईसाहब, खुद ही कुबूल कर रहे है कि ये मुझे हमेशा जलीकटी सुनाते है।"

       प्रमोद मिश्राचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. त्याच्या खांद्यावर हात ठेवत मी म्हणालो, " बीवी को नीचा दिखाना मुश्किल ही नही, नामुमकिन है।"

                                           ## सुरेश इंगोले ##

Wednesday 11 January 2017

जीवन खूप सुंदर आहे.
 
          जीवनाकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टीकोन भिन्न असू शकतो. एखाद्या प्रसंगाकडे आपण कोणत्या दृष्टीने बघतो त्यावर ते अवलंबून असते.

          काल नागपूरला मित्राला काही काम होते. मी सोबत होतो. नागपूरला सगळीकडे सिमेंटचे रस्ते बनविण्याचे काम चालू आहे. त्याला जेथे जायचे तेथे गाडी जात नव्हती म्हणून त्याने चौकातच बाजूला गाडी लावली. त्याने दहा मिनिटांत येतो म्हटल्यामुळे मी गाडीतच बसून होतो.

           सहजच आजूबाजूला पाहू लागलो. दुकानांमध्ये हल्ली शुकशुकाटच असतो. नोटबंदीचा परिणाम असावा. मात्र पतंजलीच्या दुकानात ब-यापैकी गर्दी होती. एका जोडप्याने आपल्या तीन-चार वर्षांच्या मुलीला बिस्कीटचा पुडा दिला होता. ती बिस्कीट खात खात बाहेर आली. फुटपाथच्या कडेला कोणा मजुराची दोन लहान मुले खेळत होती. ती मुले सुद्धा तीन आणि पाच-सहा वर्षांची असावीत. लहान तीन वर्षाचा मुलगा शेजारच्या हॉटेलकडे बोट दाखवून मोठ्या मुलाला काहीतरी सांगत होता. मोठ्या मुलाने त्याला धपाटा घातला. तो भोकाड पसरून रडायला लागला.

                  बिस्किट खाणा-या मुलीचे त्याच्याकडे लक्ष गेले. ती बराच वेळ त्या दोघांकडे पाहत होती. तिने दुकानाकडे नजर टाकून आपल्या आईवडिलांकडे पाहिले. मग ती खाली उतरून त्या मुलांकडे आली. तिने त्या रडणा-या मुलाला एक बिस्किट दिले. त्याने झटक्यात ते हिसकून तोंडात टाकले. ती मुलगी गोड हसली. दोन्ही मुलेसुद्धा हसू लागली. तिने आता मोठ्या मुलाला सुद्धा एक बिस्कीट दिले. धाकट्याला आणखी एक दिले. तिघेही हसत हसत बिस्किटे खाऊ लागली.

                हे निर्व्याज, निरागस हास्य पाहून माझ्याही चर्येवर हास्य फुलले. मी कौतुकाने त्यांच्याकडे पाहत होतो तेवढ्यात त्या मुलीची आई तरातरा आली आणि तिने तिच्या पाठीत एक धपाटा घातला. तिचा हात धरून तिला दुकानाकडेे नेले. ती काय बोलत होती हे मला ऐकू आले नाही.

                 एवढ्यात त्या दोन मुलांची आईही तेथे आली. मोठ्या मुलाने तिला काहीतरी सांगितले. त्याबरोबर तिनेही धाकट्याच्या पाठीत धपाटा घातला. मोठ्याने त्या मुलीकडे संकेत केला. तिच्याकडे पाहत त्या बाईने धाकट्याला पोटाशी घेतले.

                 गाडीचे काच बंद असल्यामुळे मला कोणाचेच बोलणे कळले नाही. पण......
मनात विचारांनी गर्दी केली.  आपण आपल्या मुलांवर संस्कार करतो. त्यांनी ते पाळावे याकडे कसोशीने लक्ष देतो. मग अशा प्रसंगाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा असावा...

                 त्या दोन्ही आयांनी कोणता निकष लावला असेल या प्रसंगाकडे बघण्याचा ?

                                        ***  सुरेश इंगोले  ***

Friday 6 January 2017

***  नागपूरचा सी.ए.रोड नेहमीच गजबजलेला असतो. त्यातही संध्याकाळची वेळ म्हणजे लगीनघाई...ऑफिस सुटलेले लोक, क्लास सुटलेली मुले-मुली, ट्रॅफिक सिग्नलवर पुढे घुसण्याची घाई....उगाच या रस्त्याने आलो ही खंत निर्माण करणारी स्थिती...
            प्रत्येक सिग्नलला थांबावे लागल्याने चिडचिड झाली होती. अग्रसेन चौकातून मी गाडी पाचपावलीकडे वळवली. आता रस्त्याला सिग्नल नसल्यामुळे..किंवा बंद असल्यामुळे गर्दी वाढली. कशीबशी वाट काढत पुढे जात असताना सायकलवर तो दिसला.
              सायकलच्या कॅरिअरवर बसलेला सात-आठ वर्षांचा मुलगा. पस्तिशीतला हडकुळा, परिस्थितीने गांजलेला माणूस नेट लावून पॅडल मारीत होता व तो मुलगा कावराबावरा होऊन, घाबरून मागे माझ्या गाडीकडे पाहत होता. गाडी आत्ता धडकेल व आपण गाडीखाली येऊ ही मूर्तिमंत भीती त्याच्या चेह-यावर स्पष्ट दिसत होती.......

             ..... मला एकाएकी माझे बालपण आठवले. हाच प्रसंग थोड्याफार फरकाने तेव्हा घडला होता. मी सात-आठ वर्षांचाच असेल. वर्धेला मोठ्या मामांसोबत सायकलने निघालो होतो. बोरगाव - देवळीकडे जाणा-या पुलावर नेहमीच गर्दी असते.  पुलावर सायकल आल्यावर मामा नेट लावून पॅडल मारू लागला. सायकल कशीबशी वर सरकू लागली. तेवढ्यात मागून एक कार आली. मी दचकलो. ती आता सायकलला धडकणार म्हणून मी जाम घाबरलो. 'मामा..गाडी...मामा...गाडी..' असे ओरडू लागलो.
मामाचा श्वास फुलला होता. तो उतरू शकत नव्हता. तेवढे अंतर पार करणे गरजेचे होते. कारचा हॉर्न वाजू  लागला. ...आणि आता खिडकीतून डोके बाहेर काढून त्याने शिव्या द्यायला सुरवात केली.
  " दिखता नही क्या पीछेसे कार आ रही है... अपन फटीचर सायकल हटा..नही तो ठोक दूँगा ** "
मला कार धडकण्याची भीती तर होतीच पण कारवाल्याचा माजोरीपणा, सायकलवाल्याला क्षुद्र लेखण्याची वृत्ती ही त्याही वयात मनात खोलवर रुजली होती.....

     ......   माझ्या कारसमोरच्या सायकलवरील त्या मुलाच्या चर्येवरील ती भीती  भूतकाळ आठवून गेली. मी त्या मुलाकडे हसून पाहिले. नजरेने त्याला आश्वस्त केले. त्याच्या सायकलमागे माझी कार हळूहळू जाऊ लागली. आता गर्दी संपली होती. सायकलने वेग घेतला होता. मी बाजूने कार पुढे घेऊ शकत होतो. पण अजूनही मी मुद्दाम कार सायकलमागेच ठेवली होती.
                 तो मुलगा आता हसत होता. आपल्या सायकलने कारला जिंकल्याचा आनंद त्याच्या चर्येवर फुलला होता. पुढच्या वळणावर ती सायकल वळली. त्या मुलाने मागे वळून पाहिले. मी हात हलवला तसा त्यानेही गोड हसून हात हलवला.

                               ***   सुरेश इंगोले  ***