Sunday 23 October 2016

                   **  तिची  पर्स  **

                                          लेखक :  सुरेश इंगोले


           ' मनोहर रेगे ' दाराबाहेरून आवाज व टकटक ऐकू आली. रेगे काकांनी दार किलकिले करुन पाहिले. बाहेर कुरियरवाला उभा होता. दार पूर्ण न उघडताच त्यांनी कुरियर घेतले. सही करुन कागद परत दिला. दार बंद करुन त्यांनी लखोटा फोडला. त्यात काही फोटो व अनुरागचे पत्र होते. फोटो पाहून त्यांनी वीणाकाकूंना हाक मारली. पदराला हात पुसत त्या किचनमधून बाहेर आल्या.

        " अनूचे कुरियर का ? काय म्हणतो तो ? आली का एखादी मुलगी पसंत त्याला ?' टेबलवर फोटोंची चळत पाहून त्यांनी उत्सुकतेने प्रश्न विचारायला सुरुवात केली.

           रेगेकाका गंभीर मुद्रेने पत्र वाचत होते. त्यांच्या चर्येकडे लक्ष जाताच त्या थबकल्या.

           " त्याला एकही मुलगी पसंत नाही. त्याला ह्यातल्या कुणाशीच लग्न करावयाचे नाही." असे म्हणून त्यांनी पत्र काकूंकडे सोपवले. काकू पत्र वाचू लागल्या.


               अनुराग त्यांचा एकुलता एक मुलगा. त्याच्याइच्छेप्रमाणे त्यांनी त्याला शिकविले. मुलगा डॉक्टर व्हावा असे यांना वाटत होते. त्याला इंजिनिअर व्हायचे होते. त्याने पुण्यातच जॉब करावा असे यांचे मत होते. त्याने बंगलोरला जास्त स्कोप आहे म्हणून तेथील जॉब स्वीकारला होता. प्रत्येकाला स्वतंत्र मत असतं व त्या मताचा आदर करावा असे संस्कार घरातच होते. मुलगा चांगला कमावतोय व स्थिर होतोय असे दिसताच शिरस्त्याप्रमाणे त्याच्या विवाहाची यांना घाई सुटली.

                  योगायोगाने त्याची पुण्यातच बदली झाली व तो आपल्याजवळ राहणार याचा दोघांनाही आनंद झाला होता. रेगेकाका बँकेतून निवृत्त झाले तेव्हा त्यांनी अनुरागजवळ लग्नाचा विषय काढला. त्याने हसून टाळले होते. दोन वर्षे निघून गेली पण त्याने लग्नाचे मनावर  घेतले नाही.

        तेवढ्यात त्याला कंपनीच्या कामाकरिता कॅनडाला जावे लागले. तो तेथे तीन वर्षे राहणार होता. यावेळी त्याने लग्नाला संमती दर्शविली तेव्हा दोघांनाही आनंद झाला. वधूसंशोधन सुरु झाले व निवडक मुलींचे फोटो त्याला यांनी पाठवले होते.


               काकूंनी पत्र वाचून संपवले. दोघेही बराच वेळ नि:शब्द बसून राहिले. मोबाईलच्या काळात पत्र हेच मुळी अप्रूप होते. ऑनलाईन मॅट्रिमोनीच्या काळात मुलींचे फोटो पाठवणे हेही जुनाटच होते. पण अनुरागने मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी योग्य साधन निवडले होते.

                 ..... त्याचे एका मुलीवर निस्सिम प्रेम होते. दोघांनीही लग्नाच्या आणाभाका घेतल्या होत्या. दोघांनीही घरी सगळे सांगून परवानगी घेण्याचेही ठरविले होते. तेवढ्यात कॅनडाला जायची संधी आली. दोघांनीही परदेशात राहण्याची स्वप्ने रंगविली होती. जायच्या आदल्या दिवशी तिची भेट झाली तेव्हा एका छोट्याशा गोष्टीवरुन दोघांचा वाद झाला. त्याचे म्हणणे होते की सुरवातीला आपण दोघे वर्षभर राहू. दुस-या वर्षी आईबाबांना घेऊन येऊ. तिने ठामपणे सांगितले की आईबाबांना सोबतच घेऊन जाऊ.

          पत्राच्या शेवटी त्याने लिहिले होते की कॅनडाला आल्यावर त्याने तिला कितीदा फोन केला. मेसेजेस केले पण तिने कधी उत्तर दिले नाही. नंतर तिचा फोनच बंद केला होता.

भारतात आल्यावर तिला समक्ष भेटून जाब विचारल्याशिवाय तो कोणताही निर्णय घेणार नव्हता......


             बराच वेळाने रेगे काकाकाकू भानावर आले.

दोघेही एकमेकाकडे पाहून हसले.

     " एका शब्दाने सांगितले नाही अनूने." काकू म्हणाल्या.

" तुझ्यावर गेलाय् तो. तू तरी कुठे चटकन व्यक्त होतेस ?" काका म्हणाले.

" एवढे नाही बरं का ! अहो, एवढं पत्रात मन मोकळं लिहूनही त्याने त्या मुलीचे नाव,पत्ता,माहिती काही दिली का ?"

" बरं...आज उद्या त्याचा फोन किंवा व्हिडिओ कॉल येईलच तेव्हा विचारू." काका म्हणाले.  

      काकूंनी काकांचा हात हाती घेतला व म्हणाल्या," अहो, पण पोर लाघवी दिसत्ये. आत्तापासून आपली काळजी तिला. आपल्याला सोबत घेऊन जाण्यासाठी भांडली अनूशी."

      दोघेही समाधानाने हसले.

" चला, आता बाहेर जाऊ. थोडी भटकंती. एखादे नाटक नाहीतर सिनेमा पाहू. तुझ्या आवडीच्या हॉटेलमध्ये जेवण करू. चालेल ? " काका खुर्चीतून उठत म्हणाले

" चालेल काय धावेल..." काकूंनी हसत दुजोरा दिला.


           ... दोघेही मनसोक्त भटकले. भेळ, पाणीपुरी खाल्ली. नाटकाची तिकिटे न मिळाल्यामुळे दोघांनीही सिनेमा पाहिला. हॉटेलात जेवण करून निघाले तेव्हा रात्रीचे दहा वाजून गेले होते. बराच वेळ पाऊस पडत होता.
   बरीच वाट पाहिल्यावर एकदाची रिक्षा मिळाली. बाहेर काळाकुट्ट अंधार होता. रस्त्यावरचे दिवे अंधुकसे मिणमिणत होते. पावसाची हलकी रिपरिप सुरूच होती.


            एका वळणावर रिक्षा वळली. तिच्या उजेडात समोरच्या बसस्टॉपवर काकूंचे लक्ष गेले. सात आठ माणसे उभी होती. त्या रांगेच्या शेवटी एक तरुण मुलगी कुडकुडत  होती. काकूंनी रिक्षा थांबवली.

          " अहो, ती मुलगी एकटीच दिसते बिचारी. रात्र खूप झाली आहे. तिला घेऊ या का रिक्षात ? तिच्या घरी सोडून देऊ." काकूंनी विचारले. काकांनी मान डोलावली.

           काकूंनी तिला हाक मारली. " अगं ए बाळ, ये इकडे."

तिने रिक्षात कोण आहे याचा अंदाज घेतला. मग ती रिक्षाजवळ आली. " ये, बैस.. कुठे जायचंय् तुला ? आम्ही सोडतो." तिने मान डोलावली. ती अंग चोरून बसली. रिक्षा सुरु झाली.

       " नाव काय गं तुझं ?"

      " छकुली..." ती  मुक्तपणे हसली. " घरी मला सगळे छकुलीच म्हणतात. "

       " घरी कोण कोण आहेत तुझ्या ?"

     " आई व अण्णा आहेत ना. वाट बघत असतील माझी."

     " हो ना ! बरीच रात्र झाली आहे. बस आलीच नाही का बराच वेळची ?"

     " नाही ना..  रिक्षा थांबवा येथे. मला उतरायचे आहे."

रिक्षा थांबली. ती खाली उतरली. " कुठे आहे तुझे घर ? "

काकूंनी विचारले तसे तिने एका घराकडे अंगुलीनिर्देश करुन घर दाखवले.

       बैठे घर होते. फाटकाजवळ प्राजक्त फुलला होता. घरावरही ' प्राजक्त ' असे सुबक नाव कोरले होते आणि दिव्याच्या उजेडात चमकत होते. ती त्यांना धन्यवाद देऊन फाटकाकडे वळली. रिक्षा पुढे निघाली. दोन तीन वळणे घेऊन रिक्षा त्यांच्या इमारतींच्या आवारात शिरली. दोघेही उतरले तोच काकूंचे लक्ष गेले. " अहो, पोर तिची पर्स विसरली येथे."

    " अरे, घाईघाईत विसरली वाटते. ठेव तुझ्याजवळ. उद्या नेऊन देऊ. तू नीट पाहिलेस ना तिचे घर ?-"

   काकूंनी मान डोलावली. रिक्षाचे भाडे चुकवून दोघेही कुलूप उघडून घरात आले.

          अनुरागच्या लग्नाचे व भावी वधूचे स्वप्न पाहत त्यांनी रात्र घालवली.

सकाळ रोजच्यासारखी पार पडल्यावर काकांना तिच्या पर्सची आठवण झाली.

    " अगं, त्या छकुलीची पर्स नेऊन द्यायची आहे ना ? " त्यांनी काकूंना विचारले.

   " अय्या, हो ना ! विसरलेच की...जेवणे आटोपली की जाऊ या."

          रेगे काका काकूंना घरून निघायला चार वाजलेच. तिची पर्स घेऊन त्यांनी खाली येऊन रिक्षा बोलावली.

काकूंनी घर नेमके ओळखले. प्राजक्त विसरणे शक्यच नव्हते.

फाटक उघडून त्यांनी आत प्रवेश केला. दारावरची घंटा वाजवली.

            जड पावलांनी कोणीतरी येत असल्याचे जाणवले. दार उघडले. दारात एक साठीचे गृहस्थ उभे होते. चर्येवरुन ते खूप थकलेले दिसत होते.

            " कोण हवंय् ? "

         " छकुली..." काकू बोलल्या. '' येथेच राहतेय ना ती ?"

     त्या गृहस्थाने विचित्र नजरेने त्यांच्याकडे पाहिले.

दारातून बाजूला होत त्यांनी या दोघांना आत घेतले.

एव्हाना त्यांची पत्नी बाहेर आली होती.

   " ही दोघं छकुलीकडे आलीयेत..." त्यांनी पत्नीला सांगितले. त्यांनी सोफ्याकडे इशारा करीत बसायला सांगितले.

   " काय काम होतं ?'

 " छकुलीची पर्स द्यायची होती " काकूंनी पर्स पुढे करीत सांगितले .

दोघेही चमकले. छकुलीच्या आईने पर्स हिसकल्यासारखी ओढून घेतली.

   " कुठे भेटली तुम्हाला ?' त्यांनी पर्सची झिप उघडत विचारले.

" कोण ?   छकुली ? " काकूंनी विचारले.

" अहो पर्स..."

" छकुली विसरली काल रिक्षात ..."

" क्काय.?" तिचे आईवडील जोरात ओरडले.

" होय .."

" काल ? कसं शक्य आहे ?"

" म्हणजे ?..काल ती आमच्या रिक्षात बसली. येथे उतरली तेव्हा पर्स विसरुन गेली. मी घर लक्षात ठेवले होते म्हणून आज परत द्यायला आलो आम्ही." काकूंनी एका दमात सारे सांगून टाकले.

      तिच्या पर्समधून तिचे आयकार्ड दिसताच तिची आई धाय मोकलून रडू लागली. तिचे वडीलांनीही रुमाल काढून डोळ्यांना लावला. रेगे काका काकू विस्मयाने त्यांच्याकडे पाहू लागले.

   " काय हो ? हा काय प्रकार आहे ? काल छकुली रात्री घरी आली होती ना.. आई अण्णा वाट बघत असतील म्हणाली. " रेगे काकांनी विचारले.

      आता अण्णाही रडू लागले. रडता रडता त्यांनी भिंतीकडे पाहिले आणि ते पुन्हा उमाळा येऊन रडायला लागले. नकळत काका काकूंची नजर भिंतीकडे गेली. आणि......


            ... दोघेही दचकले. एकटक भिंतीकडे पाहू लागले. आणि पाहता पाहता थरथर कापू लागले.


              भिंतीवर छकुलीचा फोटो टांगला होता. हसतमुख....निरागस....आणि त्या फोटोला हार घातला होता.
.... बराच वेळ दोघेही सुन्न बसून होते. भानावर येऊन काकूंनी थरथरत काकांचा हात धरला.

     " म्हणजे.... काल ती सोबत....होती.....नव्हती...."

काकांनी अण्णांच्या खांद्यावर थरथरता हात ठेवला. त्यांच्या शरीरातला कंप अण्णांना जाणवला.

  " मला नीट उलगडून सांगा. " काकांनी काकुळतीने विचारले.

    काही क्षण नि:शब्दतेत गेले. मग अण्णा बोलू लागले.

          " दोन महिन्यापुर्वी ती खूप आनंदात होती. कारण विचारलं तर काही सांगेना... मग सांगेन म्हणाली. एकुलती एक असल्यामुळे आम्ही तिला लाडात वाढवले. तिच्या इच्छा पूर्ण केल्या. खूप सालस, विचारी व समंजस होती. आम्ही तिच्या कलानेच घ्यायचो. पोरगी प्रेमात पडली की काय असे वाटायचे. पण स्वत:हून सांगेल म्हणून शांत राहिलो."

      अण्णांनी एक खोल नि:श्वास सोडला. फोटोकडे पाहून डोळे टिपले.

   " दोन महिन्यापुर्वी ती लवकर घरी आली नाही म्हणून तिला फोन केला तर आज उशीर होईल, वाट पाहू नका ...म्हणाली. पण रात्रीचे दहा वाजायला आले तेव्हा आमचा धीर सुटला. तिला बरेचदा फोन केला पण फोन स्वीच ऑफ येत होता. मी लगेच शेजारच्या चिंटूला घेऊन तिला शोधायला निघालो.

एके ठिकाणी खूप गर्दी दिसली. ..."

         अण्णा हमसून हमसून रडायला लागले. काका त्यांच्या पाठीवर थोपटू लागले. थोडे शांत झाल्यावर ते पुढे बोलू लागले.

     " तिथे एक अपघात झाला होता. प्रेत छिन्नविच्छिन्न झाले होते. काहीही ओळख लागत नव्हती. आम्ही तेथून पोलीस स्टेशनला गेलो. तक्रार नोंदवली. काही वेळाने पोलीस आम्हाला तेथेच घेऊन गेले. आम्हाला काही वस्तू दाखवल्या गेल्या. त्यातली छकुलीची घड्याळ, कर्णफुले, तिच्या नावाचे पदक असलेली चेन व चपला ओळखू आल्या. ती दिसलीच नाही. पोस्टमॉर्टेम नंतर ज्या शवाला अग्नी दिला ते तिचेच होते की नाही कोणास ठाऊक......!"

      बराच वेळ शांततेत गेला.

     " छकुलीची पर्स मिळालीच नव्हती. त्यात तिचे फोटो, मोबाईल आणि इतर ओळखपत्रे होती. कुणी लांबवली असेल असे पोलीस म्हणत होते. आजूबाजूला शोध घेतला पण पर्स मिळाली नव्हती. .....आणि...आज तुम्हाला ही पर्स घेऊन तिनेच पाठवले...."


.....  छकुलीची आई किती तरी  वेळ ती पर्स उराशी धरून रडत होती. रेगे काका काकू अजूनही धक्क्यातून सावरले नव्हते.

           तिच्या आईने पर्समधून एकेक सामान काढायला सुरुवात केली. तिचे फोटो, क्रेडिट - डेबिट कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, एका मुलाचा फोटो.....तिच्या आईने फोटो निरखून पहायला सुरुवात केली.

        " अहो, छकुलीने पसंत केलेला मुलगा असेल का हा ? तिने काही सांगितले नव्हते. "

  अण्णांनी त्यांच्या हातून फोटो घेतला. ते फोटो पाहत असताना रेगेकाकांचे त्याकडे लक्ष गेले. ते एकदम दचकले. त्यांनी तो फोटो जवळजवळ हिसकावूनच घेतला. आणि तो पाहताच ते ओरडले, " अरे, हा तर आमच्या अनुरागचा फोटो." काकू अनुरागच्या फोटोकडे पाहून थक्क झाल्या.

     

          चौघेही एकमेकांकडे पाहत राहिले.....


 न सांगता ब-याच गोष्टींचा उलगडा होत गेला. पर्सच्या निमित्ताने तिने दोन कुटुंबांना जवळ आणले होते. ज्या दिवशी अनुराग कॅनडाला जायला निघाला त्याच दिवशी तिचा अपघात झाला होता. कदाचित ती त्याला सोडायला एयरपोर्टवर जायला निघाली असेल. कदाचित आदल्या दिवशी झालेल्या वादामुळे तिची मन:स्थिती चांगली नसेल..कदाचित....

       पण हे सगळे प्रश्न आता अनुत्तरित होते. मोबाईल बॅटरी संपल्यामुळे डिसचार्ज झाला होता. म्हणून कोणाचेच कॉल लागत नव्हते.


         अण्णांशी बोलण्यासाठी रेगेकाका शब्दांची जुळवाजुळव करू लागले....


                                      ** सुरेश इंगोले **

                                       शहापुर = भंडारा