Wednesday 22 March 2017

#मित्रास पत्र....

    बीजी,

                 फेसबुकवरील आमच्या समूहाने पत्र लिहिण्याचे आवाहन केले तेव्हाच तू डोळ्यासमोर उभा राहिलास. मी आयुष्यात कधी तुला पत्र लिहिले नसते. तू मला डोळ्यासमोरही नको आहेस. तू मनातून उतरलास तसाच मी तुला माझ्या आयुष्यातूनही वजा केले आहे. मी तुला प्रिय लिहू शकत नाही की तुझे नाव घ्यायचीसुद्धा माझी इच्छा नाही. हे तुला पत्राच्या मायन्यावरुन कळेलच.
       
                 एक छोटीसी घटना पस्तीस वर्षांचे घट्ट नाते तुटण्यास कारणीभूत होते. तीन वर्षापुर्वीची होळी तो प्रसंग घेऊन आली होती. मित्राने आवर्जून बोलावल्यामुळे मी व्याह्यांना घेऊन त्याच्या बंगल्यावर गेलो. तेथे माझे इतर जिवलग मित्र प्राचार्य, डॉक्टर, संस्थेचे कार्यवाह, आयकर अधिकारी इत्यादी जमलेले होते. आम्ही एकमेकांना रंग लावला. हास्यविनोदात आम्ही रंगलो असताना तू अचानक तेथे आलास. तुझे येणे अनपेक्षित होते. तू चिक्कार दारू प्यायला होतास. अद्वातद्वा बोलत होतास. घाणेरड्या शिव्या तुझ्या तोंडून निघत होत्या. बैठकीत पाहुणे असल्याची तुला डॉक्टरांनी समज दिली पण उपयोग नव्हता. मी सर्वांची रजा घेऊन व्याह्यांसोबत निघालो. मुंबईच्या पाहुण्यासमोर झाली तेवढी शोभा पुरे असे सर्वांना वाटले होते. रंगाचा बेरंग झाला होता.
पण नंतर तुला सगळे बोलू लागले तेव्हा तू मला व व्याह्यांनाही शिव्या घातल्या. ही गोष्ट सर्वांना खटकली.

          डॉक्टरांनी मला फोन करुन सगळे सांगितले. त्यांना या गोष्टीचा खूप राग आला होता. तुला आम्ही मुलाप्रमाणे वागविले होते. तू आम्हाला आई व बाबा म्हणायचास हे सर्वांना माहीत होते. तुझ्या तोंडून आमच्याप्रती घाण शिव्या त्यांना सहन झाल्या नाही. तुला कुणीतरी मारायला धावले होते.
   
         मी बरेच दिवस हा प्रसंग मनावर घेतला नाही. पण नंतर दुस-याच दिवशी तू सर्वांची घरी जाऊन माफी मागितली पण माझ्या घरी पायसुद्धा ठेवला नाही तेव्हा मी तुला जाब विचारायचे ठरवले. तुझ्या घरी येऊन मी तुला छेडले तेव्हा माझी अपेक्षा होती की तू म्हणशील, बाबा, माझी चूक झाली, मी नशेत होतो. पण उलट तू सपशेल नाकारलेस. मी तसे बोललोच नाही, ते लोक काहीतरी सांगतात असा कांगावा केला.  त्याचक्षणी तू माझ्या मनातून पूर्णपणे उतरलास. खरं बोलायला धाडस लागतं. येथे तुझा ईगो आडवा आला.
     तुझी मुलगी एकदा घरी येऊन खूप रडली तेव्हा तिला जवळ घेऊन दिलासा दिला की तुला आम्ही अंतर देणार नाही. पण तुझ्या घराचा उंबरा यापुढे ओलांडला जाणार नाही हे मात्र खरे.
         तू फेसबुकवर नसल्यामुळे हे पत्र तुला वाचता येणार नाही. तरीपण तुझा मुलगा किंवा मुलगी हे वाचतीलच. त्यांच्याकडून तुला हा पत्रप्रपंच कळो. तीन वर्षांची मनातली खदखद या निमित्ताने बाहेर पडली. मनाला हलके वाटले.

                                       तुझा कोणीही नसलेला,
                                                   बाबा.