Monday 9 October 2017

..#कुबेर _लग्नसोहळा..

          लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असे म्हणतात. खरे असावे ते. माझा तरी यावर विश्वास आहे. भावंडात मी वडील मुलगा म्हणून जबाबदा-या खूप. १९व्या वर्षी मी मुंबईला नोकरीस लागलो. पण तीन वर्षातच वडिलांनी नोकरी सोडून बोलावले. नोकरी करतो म्हणून मुली सांगून येत होत्या पण बहिणींची लग्ने झाल्याशिवाय लग्न करायचे नाही असे मी ठामपणे सांगितले होते. शेवटी १९७५ साली वडिलांनी फर्मान सोडले. मी तुमच्याकरिता वधूसंशोधन करायला जात आहे. मी आणि माझा चुलत भाऊ दोघांचेही लग्न एकाच वेळी करायचे दादाजींनी ठरवले होते.( वडिलांना आम्ही दादाजी म्हणत असू.)
             एक दिवस त्यांनी फर्मान सोडले, " अमरावतीला दोन मुली मी निवडून ठेवल्या आहेत. दोन दिवसांनी जावयासोबत जाऊन त्या मुली पसंत करून या." वडिलांसमोर काही बोलायची सोय नव्हती.
                 आम्ही अमरावतीला गेलो. पहिल्या घरी मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाला. बुजरेपणा आणि संस्कार यामुळे मी धीटपणे मुलीकडे पाहू शकलो नाही. मेहुण्यांनी तिला जुजबी प्रश्न विचारले. कार्यक्रम आटोपला. तेथून लगेच दुसरी मुलगी पाहायला निघालो. वाटेत मेहुण्यांनी आम्हाला विचारले, " कशी वाटली मुलगी ?" मी काही बोलू शकलो नाही पण माझा भाऊ लगेच उत्तरला," मला वहिनी म्हणून पसंत आहे."
मला चॉईसच उरला नाही. मुकाट्याने दुसरी मुलगी मला भावससून म्हणून पसंत करावी लागली. अशा त-हेने हिच्याशी माझी जन्माची गाठ पडली.
                   ३० मे १९७५ साली वयाच्या २८व्या वर्षी आम्ही बंधनात अडकलो. ४२ वर्षानंतरही .....आम्ही आजही काया-वाचा-मनाने एवढे एकरूप आहोत की जोडीदार म्हणून दुस-या कोणाचा विचारही मनाला शिवला नाही.
                                  सुरेश इंगोले

Thursday 5 October 2017

ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी..
भेटीत तुष्टता मोठी.....

          बाळ कोल्हटकर यांचे गीत, वसंत देसाई यांचे संगीत.....आणि...कुमार गंधर्व, वाणी जयराम यांच्या अत्यंत सुमधुर स्वरांनी अजरामर केलेले हे गाणे आज कानावर पडले आणि मन तृप्त झाले.
         
             या ऋणानुबंधाचे मला मोठे नवल वाटते. हजारो लोकांशी आपल्या ओळखी असतात. नेहमी भेटणारांची नावे आपल्या स्मरणात असतात. क्वचित भेटणारांशी आपण हसून दोन शब्द बोलतो. काही लोकांशी आपली नित्य भेट होत असते. तर काही जणांशी आपण फार क्वचित.... अधूनमधून  भेटत असतो. पण ऋणानुबंध ज्यांच्याशी जुळतात त्यांची गोष्टच वेगळी असते. ते या कोणत्याच वर्गवारीत बसत नाहीत. कारण त्यांचं स्थान केवळ स्मरणात, मेंदूत नसतं...तर ते थेट काळजात असतं.

                  असे अनेकजण माझ्या काळजात ठाण मांडून बसले आहेत. वर्ष दोन वर्षे भेट झाली नाही तरी हृदयाची स्पंदने त्यांना जाणवत असावीत याचा मला विश्वास आहे. कारण नागपूरचा माझा जिवलग मित्र दत्तू केदार याच्याशी दोन वर्षांपासून भेट नसूनही फोन केल्यावर ज्या आत्मीयतेने तो विचारपूस करतो, जुन्या आठवणी काढतो की मन हेलावून जातं. वार्धक्यामुळे तो बाहेर जाऊ शकत नाही आणि फिरस्तीमुळे मी त्याची भेट घेऊ शकत नाही याचे कधीकधी वैषम्य वाटते.

                 ज्याचे स्थान हृदयात...काळजात असते अशांनाच आपण जिवलग म्हणतो. त्यांची संख्या कमी असते. पण त्यांच्यामुळे आपले जीवन सुखकर होते. पुन्हा पुन्हा भेटीची ओढ लागते.
         भेटीलागी जीवा। लागलीसे आस।
          पाहे रात्रंदिस। वाट तुझी ॥
अशी अवस्था निर्माण होते. जिवलगा, कधी रे येशिल तू..असे आपले मन आक्रंदत असते.

                  हृदयाच्या कप्प्यात अढळ स्थान असणारे माझे परममित्र...विदर्भाची शान...गझलगंधर्व..संगीतकार...गझलगायक...श्री सुधाकर कदम यांचे पाय माझ्या घरी शहापुरला कधी लागतील याची मला शाश्वती नव्हती. ते पुण्यात स्थायिक झाल्यामुळे विदर्भात प्रसंगानेच येणे होत असे. पुण्याच्या त्यांच्या घरी नेहमीप्रमाणे यावेळी आमची १८ सप्टेंबरला भेट झाली तेव्हा मी शहापुरला कधी येता असे विचारले. ते यवतमाळ - वर्धेला येणार हे कळले होते. २६ तारखेला त्यांनी शहापुरची चौकशी केली व २८ तारखेला येतो म्हणाले तेव्हा माझा आनंद गगनात मावेना.
   अखेर तो दिवस उजाडला. त्यांचे शहापुरात आगमन झाले. आम्ही उभयता त्यांच्या स्वागतास सज्ज होतो. सारे घर आनंदाने भरून गेले. सुधाकराव, सुलभावहिनी, निषाद, पल्लवी आणि गोड नातू अबीर यांना घराने आपल्या कवेत घेतले.

              आमचे घर, विहीर व आंब्याचे झाड यांनी आम्हाला जोडलेली माणसे टिकवण्यात मोलाची साथ दिलेली आहे. दोन दिवस एकमेकांच्या सहवासात, थट्टामस्करीत, खेळीमेळीत कशी गेली ते कळलेच नाही. त्यांच्या नागपूरच्या मित्राचा अस्वस्थ असल्याचा निरोप आला म्हणून जाणे अपरिहार्य असूनही त्यांचा पाय निघेना.
              जाताना हातात हात घट्ट धरून एवढेच म्हणाले," डिसेंबरमध्ये चांगले आठ दिवसाच्या मुक्कामाने येतो भौ...." मन भरून आले.
          यालाच ऋणानुबंध म्हणतात ना........