Tuesday 27 February 2018

आम्ही प्रवासी घडीचे

प्रवास कधीच आणि कोणालाही चुकला नाही. सतत आपण कुठूनतरी कुठेतरी जात असतो. पृथ्वी, चंद्र, तारे हे खरे अविश्रांत प्रवासी. अथक चालणारे. गन्तव्यस्थान नसणारे. आपले गन्तव्य मात्र ठरलेले. घर ते कार्यालय ...शाळा, बाग, चित्रपटगृह, रंगमंदिर, मंडई....रोजचा प्रवास...

            लग्न, मुंज, बारसे, वाढदिवस, मरण, तेरावे...कितीतरी प्रसंगी प्रवास करावाच लागतो. निरनिराळ्या वाहनाने. दुचाकी, चारचाकी, बस, आगगाडी आणि विमानसुद्धा.. हल्ली प्रवासाला  कारण आणि साधन शोधावे लागत नाही. बाहेरचं जग खुणावत असतं. पहाड, दरी, हिरवाईने नटलेली सृष्टी, जगातली आश्चर्ये, जंगल, पशुपक्षी, सरोवर....निसर्ग साद घालत असतो..आपण हुंकार भरण्याची वाट पाहत !

            प्रवासाची तयारी करुन निघालो की सुखाचा प्रवास होण्यासाठी शुभेच्छांची बरसात होऊ लागते. हॅपी जर्नी, आपला प्रवास सुखाचा होवो, बॉन व्हॉयेज, आपकी यात्रा सुखमय हो इ.इ.
            प्रवासात असताना अधून मधून चौकशी करणारे फोन येतात. ख्यालीखुशाली विचारली जाते. क्षणाक्षणाची बित्तंबातमी देणारा भ्रमणध्वनी हा वर्तमानयुगाचा चमत्कार होय.

        ... पन्नास वर्षांपुर्वी किती वेगळी परिस्थिती होती ? प्रवासाची साधने तुटपुंजी होती. रेल्वे, बसगाड्या यांची संख्या फार कमी होती. जवळच्या ठिकाणी जायलासुद्धा खूप वेळ लागायचा. बाहेरगावी गेलेला माणूस परत घरी येईपर्यंत त्याची ख्यालीखुशाली कळत नसे. प्रवासाचे प्रसंग फार कमी येत. जवळचा प्रवास बैलगाड्यांनी केला जाई. पाचदहा मैलांचा प्रवास सायकलने होई. सारी नातलग मंडळी पंचक्रोशीच्या आतच राहायची. 

               दूरचा प्रवास करायचे प्रसंग क्वचितच येई. पण ते प्रसंग कायम लक्षात राहत. पेटी, होल्डॉल, वॉटरबॅग वगैरे सामान तयार असायचे. स्टेशनवर सोडायला बैलगाडी (दमणी) तयार असायची. आई हातावर दही घालायची. थोरांच्या पाया पडून होताच आजी पाठीवरून, गालावरून सुरकुतलेला हात फिरवत म्हणायची," बाबू, जपूून जाय. खिडकीच्या बाहेर हात नोको काढू. दारात नोको उभा राहू. बाहेरचं खाऊ नोको. डबा देल्ला हाये संगं. गावाले गेेल्यावर पत्रं टाकजो. जाय मा...सुखाचा राह्य.."
       
               सुखरूप पोहचल्याचे पत्र आठ दिवसांनी मिळायचे. तोवर इकडे सर्व व्यवहार सुरळीत चालायचे. कोणतेच अभद्र विचार कोणाच्याही मनात येत नसत. जगण्याला स्थैर्य होतं, सुरक्षितता होती. प्रवास खरोखर सुखाचा होत असे. त्यासाठी शुभेच्छा द्यायची गरज कोणालाच वाटत नसे.

            *   *    *    *     *    *     *     *      *    *

                आज आम्ही पुण्याहून नागपूरला जायला निघालो तेव्हा कुटुंबीय, शेजारी हॅपी जर्नीच्या शुभेच्छा देऊ लागले. ट्रॅव्हल्समध्ये बसल्यावर मुलाचा फोन आला. पोचताक्षणी फोन करा म्हणून सूचना मिळाल्या. त्यावरून हा सगळा प्रवासप्रपंच आठवला.

                                              ==+ सुरेश इंगोले  +===

राजभाषा मराठी

१९६६ मध्ये मराठीला राजभाषेचा दर्जा प्राप्त झाला आणि लगेचच सरकारी परिपत्रक आमच्या कार्यालयात येऊन धडकले. यापुढे कार्यालयाचे कामकाज मराठीतूनच व्हावे. आमचे संचालक श्री दारूवाला हे पारशी असल्यामुळे त्यांनी ते कदाचित न वाचताच आमच्या अवलोकनार्थ अग्रेषित केले. मी त्यावर मुद्दाम मराठीत स्वाक्षरी केली.
         मुंबईतील आमच्या कार्यालयाचे सगळे कामकाज इंग्रजीतच चालायचे. संचालकांशी संभाषण सुद्धा इंग्रजीतच करावे लागे. मराठीत कामकाज करणे म्हणजे कार्यालयीन पारिभाषिक शब्दांना पर्यायी शब्द शोधणे हे महाकठिण कर्म होते.
        मी आमच्या कार्यालयातला वयाने सर्वात लहान...केवळ एकोणीस वर्षांचा ! परिपक्वता आणि पोरकटपणा यांचे बेमालूम मिश्रण असलेला कर्मचारी.
        मी लगेचच सुटीचा अर्ज लिहिला. पारिभाषिक शब्दकोषाचा आधार घेऊन शुद्ध मराठीत अर्ज लिहून शिपायाकरवी पाठवून दिला. पारशीबावाची भंबेरी उडणार होती. हंगामा होणार होता. मी बोलावणे येण्याची वाट पाहू लागलो.
थोड्याच वेळाने शिपाई बोलवायला आला. मी आत गेलो.
(आता मला इंग्रजीचा आधार घ्यावाच लागेल.)
--What is this Mr. Ingole ?
-- Sir. Its my leave application.
-- Why didn't you write in English ?
--Sir, today we receive a circular mentioning the use of Marathi in daily routine work. So its my application in Marathi.
-- You know very well that I don't know Marathi.
-- Sir, please call Mr.Bhide to translate it. He is well educated among us.
      भिडे साहेबांना पाचारण करण्यात आले. दारुवाला साहेबांनी अर्ज त्यांच्याकडे टाकला.
      ते बराच वेळ अर्ज वाचत राहिले. माझ्याकडे करडी नजर टाकून म्हणाले," ही कोणती भाषा आहे ? "
      " मराठी.."
संचालक ?....Director
अंगुली मुद्रा केंद्र..?..Finger Print Bureau.
गुन्हा अन्वेषण विभाग ?..CID...Criminal Investigation Department.
माझा जबाब अशा पद्धतीने सुरु होता जणू मी फार मोठा गुन्हा केला होता.
पारिभाषिक शब्दांचे अर्थ विचारून झाल्यवर उरलेल्या अर्जाचा अर्थ सांगून जळजळीत नजरेने माझ्याकड पाहत भिडे साहेब निघून गेले.
             दारूवाला साहेब माझ्याकडे रोखून पाहत होते. अर्जावर स्वाक्षरी करीत ते म्हणाले, " Mr. Ingole, henceforth no Marathi..Only English."
---But Sir, the circular...."
--Forget it. I will send another circular tomorrow."

.........अशा त-हेने राजभाषेच्या परिपत्रकाचा त्याच दिवशी खून करण्यात आला. त्यानंतर बहुधा ते परिपत्रक बासनातच गुंडाळून राहिले असावे. कारण सीआयडी सहित सर्वच सरकारी कार्यालयांचे कामकाज आजतागायत इंग्रजीतूनच चालवले जात आहे. न्यायव्यवस्था हे याचे ज्वलंत उदाहरण आहे.
   
                                            **** सुरेश इंगोले ***