Thursday 30 April 2020

            **.लॉकडाऊनच्या काळात **. 

          लॉकडाऊन सुरू झाल्यापासून मी घराबाहेर पडणे बंद केले होते. गरजेच्या सर्वच वस्तू घरात होत्या. भाजी शेजारच्या बाईच्या बागेतील ताजीच मिळत होती. दूध घरपोच यायचे. दोन तीन दिवसाआड शहरात राहणारा मुलगा सारंग शहापूरला यायचा. तो गरजेचे वाणसामान, औषधी व भाजीपाला घेऊन यायचा. आम्हाला घराबाहेर पडायची गरजच नव्हती. 

         आठवडी बाजाराच्या दिवशी आजूबाजूच्या गावातील लोक आपल्या शेतातील भाजीपाला घेऊन यायचे. सकाळी मिरची बाजार भरायचा. खूप गर्दी व्हायची ग्राहकांची. मग पोलीस आले की लाठीचार्ज करून गर्दी पांगवायचे. 

          पण आलेल्या भीषण संकटाची लोकांना पुरेशी जाणीव नव्हती. आताही नाही. तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधलेला नसतो. बाईकवर तिघे तिघे बसून फिरतात. पोलिस कुठे कुठे लक्ष देणार? छोट्या गावात एखाद्याच पोलिसाची ड्युटी लागलेली असते. तो एकटा जमावाला नियंत्रित करू शकत नाही.

     आठवडी बाजाराच्या दिवशी मात्र पोलिसांची कुमक यायची. व्यवसायी व ग्राहकांची गर्दी पांगवायला. हे दर आठवड्यालाच घडायचे.

      आम्हा दोघांच्या सोबतीला आमचा दहा-अकरा वर्षांचा नातू शाळा बंद असल्यामुळे शहापुरला आला होता. आम्हाला विरंगुळ्याचे एक साधन मिळाले होते. 
एकदोनदा सारंग आंबे घेऊन आला होता. यंदा घरच्या आंब्याच्या झाडाला आंबेच लागले नाहीत.  दरवर्षी भरपूर आंबे चोखून खायला मिळायचे. त्याने आणलेल्या आंब्यातील एखादा आंबा पळवायचा. त्याची आजी रागवायची. काल आठवडी बाजार होता. सकाळपासून त्याने आंब्याचा हट्ट धरला होता. बालहट्ट पुरवणे भाग होते म्हणून मी बाजारात जायचे ठरवले.

       पोलिसांच्या भीतीने मला घरून बराच विरोध झाला. पण मी ठामपणाने स्कूटी काढली. रुमालाने तोंड बांधले. बाजारात गेलो. स्कूटीवरूनच आढावा घेतला तर बरीच गर्दी दिसली. एका ठिकाणी मला गावरानी आंब्याचे दुकान दिसले. मी तिकडे जाण्यासाठी गाडी वळवली तोच पोलिस व्हॅन आली. पोलीस लाठ्या घेऊन उतरले आणि लोकांची पळापळ सुरू झाली. माझ्या बाजूने पळणाऱ्या लोकांकडे एक पोलीस धावला. आपणही घरीच जावे म्हणून मी गाडी वळवायला सुरुवात केली तोच माझ्या चेहऱ्यावरील रुमाल निसटला. गाडी थांबवून रुमाल बांधताना पोलिस काठी उगारून जवळ आला व थबकला. 

" अरे सर, तुम्ही? कशाला आले सर माहीत असूनही…"
त्याने मला विचारले. त्याच्या तोंडाला मास्क होता आणि वरून उन्हामुळे दुपट्टाही बांधला होता. त्याचा चेहरा ओळखूच येत नव्हता.

 मी खालच्या सुरात बोललो, " नातवाने आंब्याचा हट्ट धरला होता. नाईलाजाने यावे लागले. सॉरी ! मी जातो घरी."

मी गाडी वेगात घराच्या दिशेने वळवली. तो मागून‌ 'सर,...सर…' करीत राहिला.
    घरी येताच आजी व नातू पिशवी बघायला लागले. त्यांना घडलेला किस्सा सांगितला व घरात आलो.
  •    *.      *. ‌‌.  *

         सुमारे अर्ध्या तासाने बाहेरच्या फाटकातून आवाज आला. सौ. बघायला गेली. मी निवांत मोबाईल घेऊन बसलो. 

        सौ थोड्या वेळाने घरात आली. तिच्या हाती पिशवीत आंबे होते. मी प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहिले.

         ती म्हणाली," एक पोलीस आंबे घेऊन आला व सरांच्या नातवाकरिता आणले म्हणू लागला. मी तुम्हाला आवाज देणार होते तर नको म्हणाला. म्हणत होता की सर तसेच निघून गेले तर मला बरे वाटले नाही. हे आंबे घ्या."

     "  किती पैसे झाले? मी देते आणून.." 
  " नको आई! तुमच्या नातवाला सांगा की त्याच्या काकाने दिले म्हणून." 

     मी नाव विचारेपर्यंत तो बाईकवर बसून निघूनही गेला. 

     मी स्तब्ध झालो. तो नक्कीच माझा कोणीतरी विद्यार्थी असावा. पण कोरोना इफेक्टमुळे त्याची ओळख पटू शकली नाही.

   मी मात्र पोलिसातली माणुसकी …. आणि शिक्षकाप्रती आदर पाहून गहिवरलो. 

                    ____________© सुरेश इंगोले

Sunday 26 April 2020

गंडांतर. *


…." संघर्ष ! ….घोर संघर्ष !!...तुमचा हात पाहून असं वाटतंय की तुमचं जीवन केवळ संघर्ष करण्याकरिताच आहे की काय? आतापर्यंतच्या आयुष्यात तुम्ही बरेच चढउतार पाहिलेत. खरं ना ?"
नंदिनीकडे विचारी नजरेने पाहत मिशांवरुन तर्जनी फिरवीत साधूसारख्या दिसणाऱ्या त्या ज्योतिषाने विचारले.
    नंदिनीने मान हलवली……

………. घरातली सगळी आवराआवर झाल्यावर पप्पू कोठे गेलाय् ते पाहायला नंदिनीने दार उघडले तेव्हा समोरच्या घरातील पाटीलांकडे तिला बायकांची गर्दी दिसली होती. कदाचित पप्पू तेथे असेल म्हणून नंदिनी सहज डोकावली होती.
        पाटीलांकडे त्यांच्या परिचयाचा कुणीतरी साधू आला होता.त्याला ज्योतिषविद्या चांगली अवगत आहे हे कळताच आजूबाजूच्या चौकस बाया तेथे जमल्या होत्या व त्याची अचूक ज्योतिषविद्या बघून थक्क झाल्या होत्या. शेजारणीच्या भिडेला बळी पडून नंदिनीला आपला हात पुढे करावा लागला होता.

..‌…….." तुमच्या यजमानांचं नाव काय?" त्याने विचारले.
नंदिनीने लाजून मान खाली वळवली.
" इश्श्य! लाजता काय अशा? दिलीपराव आहे हो त्यांचे नाव !" कुणीतरी माहिती दिली.
साधूची मुद्रा विचारी बनली.
…" तुमच्या लग्नाला तुम्हा दोघांच्याही घरून विरोध असला पाहिजे. तुमचा प्रेमविवाह का ?"
नंदिनीने खाली पाहत मान हलवली.

साधू सर्वज्ञ आहे व आपल्याला नुसतीच मान हलवावी लागते हे तेथे जमलेल्या बायांना एव्हाना ठावूक झाले होते.
…"किती वर्षे झालीत तुमच्या लग्नाला?"
…"पाच !"
…"हं! तुम्हाला एकच अपत्य असावं !" तिच्या होकाराची प्रतिक्षा न करता तो पुढे म्हणाला," तेवढंच आहे प्रारब्धात !*

….. नंदिनी स्तब्ध ! आपल्याला पुन्हा मूल होऊ शकत नाही हे तिलाही माहित होते. म्हणूनच पप्पू त्या दोघांचाही जीव की प्राण होता. त्याला दोघंही अतिशय जपत होते. त्याचं जरासं दुखलं खुपलं तर रात्री जागून काढत होते. त्याने एखाद्या वस्तूचा हट्ट केला तर तो त्वरित पूर्ण केला जायचा. मागितलं ते मिळतं म्हणून मग पप्पूही हट्टी बनत चालला होता. हव्या असलेल्या वस्तूसाठी रडून गोंधळ घालीत होता. तो रडलेला दिलीपला मुळीच खपत नसे. कधी कधी तो नंदिनीवर रागवी. त्याला हवं ते आणून देई…….

……. नंदिनी विचारात गर्क झाली होती. साधूही कसलीतरी आकडेमोड करीत होता. त्यांच्याभोवती गर्दी केलेल्या बाया आता चुळबुळू लागल्या होत्या. ' अशी कशी ही बावळट नंदिनी!
नुसती गप्प बसलीय..! नवऱ्याचं प्रमोशन, मुलांचं भवितव्य...काहीच कसं विचारीत नाही.'

…... अचानक साधूची गंभीर वाणी निनादू लागली.
" घोटाळा ! ब्रम्हघोटाळा !! बाई...तुमची दोघांचीही पत्रिका, कुंडली, ग्रहं जुळत नसताना निव्वळ प्रेमांधळेपणाने तुम्ही लग्न केलंत ! सारा गोंधळ माजून राहिलाय ! एकसारखा संघर्ष चाललाय ग्रहांमध्ये. ग्रहांची नाराजी...संकटं…! तुमच्यावर एक मोठ्ठं अरिष्ट…." तो एकदम थांबला. विचित्र मुद्रेनं तिच्याकडे पाहू लागला. त्याची नजर पाहून नंदिनी घाबरली. त्याला काहीतरी भयंकर सांगायचंय या विचारानं थरारली.
….." काय?...काय सांगायचंय तुम्हाला? ..चटकन सांगून टाका. मी...मला... काही वाटणार नाही. सवय झालीय दु:ख सहन करण्याची !" ती अडखळत खालच्या सुरात बोलली.
साधू क्षणभर गप्प राहिला. त्याने डोळे मिटले अन्य सांगून टाकले," तुमच्या घरातील पुरुषमंडळी वर या आदित्यवारापर्यंत मोठं गंडांतर येणार आहे…"
…." क्क ..क्काय ?" धसका बसून नंदिनीने आ वासला.
….." आदित्यवार सुखरूप पार पडला तर आयुष्यभर सुखात दिवस जातील. ग्रहांचा संघर्ष संपुष्टात येईल. राहूचं स्थान बदलते आहे अष्टमीनंतर…..*

×.  ×. ×.  ×. ×. ×

पप्पूला घेऊन नंदिनी घरी आली, त्याच्यासाठी दूध गरम करून लागली पण तिचे विचार काही केल्या थांबेनात. ते साधूच्या भविष्यवाणीभोवती घिरट्या घालू लागले होते. तिचा चेहरा काळवंडून गेला होता. हातपाय गळाल्यासारखे वाटू लागले होते. अवघा देह थरथरत होता. आतापर्यंत सोसलेल्या संकटांची भुते तिला भेडसावीत होती. तिच्याभोवती फेर धरून नाचू लागली होती. भरीस भर म्हणून हे नवे संकट पुन्हा दत्त म्हणून उभे !
      दूध पिऊन शांत झोपलेल्या चार वर्षांच्या पप्पूच्या निरागस मुखाकडे टक लावून पाहता पाहता नंदिनीचे डोळे भरून आले.

….. पप्पूच्या वेळी तिला किती त्रास सहन करावा लागला होता. वास्तविक पहिले बाळंतपण माहेरी व्हायचे...ते ओटीभरण... डोहाळे जेवण...मैत्रिणींची थट्टा ! यातले काही सुद्धा तिच्या वाट्याला आले नाही.
      आईवडिलांची संमती न घेता घरातून पळून जाऊन लग्न केलेले. त्यामुळे माहेर आणि सासर...एवढेच नव्हे तर प्रत्येक आप्तस्वकीय अंतरलेले ! त्यातून ती पहिलटकरीण ! कशास काही कळत नव्हते. प्रत्येक गोष्टीचा बाऊ वाटत होता. मनात भीती ठाण मांडून बसली होती. धीर द्यायला फक्त दिलीप ! शेवटी जे व्हायचे तेच 
झाले.

           ऑपरेशन करून मूल बाहेर काढावे लागले. " यापुढे तुम्हाला मूल होणे शक्य नाही.!"हा डॉक्टरने दिलेला
जबरदस्त धक्का ! ती किंचाळून बेशुद्ध पडली होती. दिलीपही अंतर्बाह्य हेलावला होता. त्या धक्क्यातून सावरायला बरेच दिवस लागले होते.     

…...पप्पूच्या चेहऱ्याकडे पाहता पाहता तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.

….' पुरुष मंडळींवर गंडांतर !...म्हणजे दिलीप किंवा पप्पू! दोघेही पुरुषच….एक पोटचा गोळा ...काळजाचा तुकडा ! दुसरा कुंकवाचा धनी... आयुष्याचा जोडीदार...सुखदु:खाचा भागीदार!

  देवा ! कां असा निष्ठूर होतोस? कोणतं गंडांतर आणणार आहेस  तू माझ्या आयुष्यावर? मला जीवनातून उठवायला कां निघालाहेस तू? असं कोणतं पाप घडलंय माझ्या हातून? दिलीपवर प्रेम केलं हा काय गुन्हा झाला? मातापित्याचं न ऐकता त्याच्याशी लग्न केले हे काय पाप झाले? सांग देवा, सांग!  माझ्या हातून काही वावगं घडलं असेल तर मला शिक्षा दे...पण माझा लाडका पप्पू...अन् माझं सौभाग्य अखंड राख..!"
तिचे ह्रदय दाटून आले. आवेग अनावर होऊन ती पलंगावर डोके टेकून हमसून हमसून रडू लागली.
    
       ×.   ×. ×.   ×. ×

  नेहमी शीळ घालत घरी येणारा दिलीप आज मुखावर चिंतेची छटा घेऊन आला होता. पण आपल्याच दु:खात चूर असलेल्या नंदिनीचे त्यांच्याकडे लक्ष नव्हते.
     रात्री झोपताना तिने त्याला दुपारची घटना सांगून स्वत:चे मन मोकळे करण्याचा प्रयत्न केला तसे त्याने तिला वेड्यातच काढले.
….." अगं! हे साधू, ज्योतिषी सगळे ढोंगी असतात." तो हसत म्हणाला," राहू, केतू, शनी...असल्या ग्रहांच्या भयानक कृत्यांची भीती दाखवून बायांना घाबरवून सोडायचं अन् मग गंडा, ताईत, ग्रहांची शांती इत्यादि उपाय सुचवून पैसा उकळायचा हा यांचा धंदाच असतो. तुम्ही भोळ्या बाया त्यांच्या ढोंगाला अचूक बळी पडता हे त्यांना चांगले ठाऊक असते."
   त्याच्या हसण्याने चिडून जाऊन ती म्हणाली, ":पण तो ढोंगी मुळीच नव्हता; त्याने दक्षिणेचा एक पैसाही मागितला नाही, अन् ग्रहांची शांती, गंडा, ताईत यांचे नावही काढले नाही." तिचा चेहरा रडवेला झाला. " त्याने...त्याने इतकेच सांगितले कि या रविवारपर्यंतचे दिवस सुखरूप पार पडले  कि काही धोका नाही."

   आताशा ती फार हळवी झाली आहे हे त्याला माहीत होते. तिच्या भावना तो हळुवारपणे जपत होता.
….." तुम्ही बायका फारच रडक्या असता बुवा! एवढ्या तेवढ्या कारणावरून गंगा यमुना वाहू लागतात तुमच्या डोळ्यातून! " तिला जवळ घेत बोटाने तिची हनुवटी वर उचलीत तो म्हणाला," ए..ए..वेडाबाई! तुझं म्हणणं काय आहे सांग पाहू!"
     त्याच्या कुशीत शिरते ती म्हणाली," तुम्ही... तुम्ही या रविवारपर्यंत कारखान्यात जाऊ नका….सुटी घेऊन टाका." 
रविवारपर्यंत मुलगा अन् पती आपल्या नजरेसमोर राहिले पाहिजे हा तिचा अट्टाहास होता.
…."माझ्या सुटीचा काय संबंध बुवा तुझ्या या प्रकारांनी?"
त्याने मिस्किलपणे विचारले.
…." तुम्ही नेहमी जोराने बाईक चालवता. अन् कारखान्यातही वेंधळेपणा ने काम करता…! कुठं काही अपघात…"
   तो जोरजोराने हसू लागला. हसता हसता म्हणाला," हे बघ नंदू! माणसाचं विधिलिखित जे असतं ना तेच घडतं. त्याचं जीवन जर संपलं नसेल तर तो फीनिक्स पक्ष्यासारखा राखेतून उठून उभा राहील. अन् जर संपलं असेल तर मुठीत पकडून ठेवलं तरी कापरासारखं उडून जाईल….."
पण तिच्या चेहऱ्याकडे पाहून त्याने पुढचे शब्द गिळून टाकले अन् दोन्ही हात जोडून तो नाटकीपणाने म्हणाला, " आज्ञा शिरसावंद्य, राणीसाहेब ! आता तुम्ही जा म्हटलं तरी हा बंदा कामावर जाणार नाही."
….." तुम्ही थट्टा करतात माझी! माझ्यासमोर अर्ज लिहा पाहू सुटीचा."
दिलीपचा चेहरा अचानक गंभीर बनला.एक मोठा सुस्कारा सोडून तो म्हणाला," काही गरज नाही अर्जाची. उद्यापासून कारखाना बेमुदत बंद आहे. सर्व कामगारांनी संप केलाय बोनससाठी….." तो बराच वेळ भांडवलदारांवर आग पाखडीत राहिला, पोटतिडकीने बोलत राहिला, पण नंदिनीचे त्यांच्याकडे लक्ष नव्हते.
तो आपल्या नजरेसमोर राहणार या समाधानाने तिचा चटकन डोळा लागला.

×.   ×. ×.   ×

मंगळवार.. बुधवार दोन दिवस नेहमीसारखे पार पडले. दिलीप दिवसभर घरीच असायचा. पप्पूशी खेळण्यात तो दंग होऊन जायचा.कामे आवरून नंदिनी ही  त्यांच्यात येऊन मिसळायची. साधूच्या भविष्यवाणीचे तिच्या मनावरचे एक अनाहूत दडपण दूर झाले होते. ती पूर्वीसारखी हसू खेळू लागली होती…..

.‌‌…. गुरूवारी सकाळी दिलीपला नंदिनीने हलवून जागे केले…." अहो, अहो ! उठा बघू! हा पप्पू बघा कसा तापाने फणफणलाय.."
  तिचा घाबरा स्वर ऐकून दिलीप ताडकन अंथरुणात उठून बसला. पप्पू खरेच तापाने फणफणला होता. कण्हत होता. ' आई...आई..' असे केविलवाणे बरळत होता. अंगावर कपडे चढवून दिलीप डॉक्टरकडे धावला.

   ……" काही काळजीचे कारण नाही. साधा ताप आहे हा! एक दोन दिवसात कमी पडेल. ही औषधे घेऊन या. दिवसातून तीनदा द्यायचीत. खायला काहीच देऊ नका मात्र. त्याने ताप वाढायची शक्यता असते. ग्लुकोजचे पाणी द्या वाटल्यास..‌" दिलीपला धीर देत डॉक्टरने औषधांची चिठ्ठी त्याच्या हाती दिली.
           दोघेही त्याच्या सुश्रुषेस लागली.दिवसभर त्याच्या उशा पायथ्याशी बसून राहू लागली. एकमेकांना धीर देऊ लागली.

     पण पप्पूचा ताप उतरण्याची चिन्हे दिसेनात. तापाच्या भरीस उन्हाच्या गरम झळा सुरू झाल्या होत्या. ग्रीष्म चांगलाच तापू लागला होता. जीवाची तलखी होत होती. पप्पू एकसारखा पाणी मागायचा. ग्लुकोजचे पाणी त्याला तोंडांत धरवत नव्हते. तोंडाशी आणलेला ग्लास तो भिरकावून देई.जवळच्या स्टूलवर मोसंबी, सफरचंद, द्राक्षे ठेवली होती. पण तो काहीच खाईंना. 
    काळजीने, जागरणाने दोघांचेही चेहरे काळवंडून गेले होते. नंदिनीच्या मनात एकसारखी अशुभाची पाल चुकचुकू लागली. तिला साधूच्या भविष्याची सारखी आठवण येऊ लागली. ती माजघरातल्या देवाच्या तसबिरीसमोर धरणे देऊन बसली.

    …….रविवारी सकाळी पुन्हा डॉक्टरांना बोलावणे धाडले. पप्पूचा ताप पांच वर चढला होता. तो तापात बरळत होता. नंदिनीच्या डोळ्यांना एकसारखी धार लागली होती. दिलीपचा चेहरा पार उतरला होता.

      पप्पूला तपासताना डॉक्टरांचा चेहराही गंभीर बनला. नंदिनीकडे वळून ते म्हणाले, " इंजेक्शनसाठी पाणी उकळा बरं जरा…"
ती माजघरात जाताच ते दिलीपच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले," वास्तविक एवढ्या लहान मुलाला इंजेक्शन देऊ नये म्हणून मी टाळत होतो. पण आता गत्यंतर नाही. त्याच्या घशाला सोस लागलाय. तो एकसारखे पाणी मागतोय. पण त्याला पाणी देऊ नका.फारच हट्ट केला तर चमचाभर ग्लुकोजचे पाणी तोंडांत सोडा. पण गार पाणी मुळीच देऊ नका. अन् दुसरं म्हणजे त्याला मुळीच रडू देऊ नका. त्यांचे स्नायु कमजोर बनलेत. रडण्यामुळे त्यांना इजा पोहोचण्याची शक्यता आहे…."
   नंदिनी पाणी घेऊन आली. सिरीज धूत ते म्हणाले," फक्त आजचा दिवस जरा कठीण आहे. तेवढं जपा. त्याला घाम सुटू लागला की ताप उतरायला सुरुवात होईल."

  ……….' आजचा दिवस कठीण आहे..' हे वाक्य कानावर पडताच नंदिनीचे हातपायच गळाले.तिने घाबरून दिलीपकडे पाहिले. त्याचाही चेहरा भयाने ग्रासला होता.

       इंजेक्शन देऊन डॉक्टर निघून गेले. निपचित पडलेल्या पप्पूच्या निस्तेज मुखाकडे पाहता पाहता नंदिनीला हुंदका फुटला. तिच्या खांद्यावर थोपटत अन् स्वत:च्या आवाजावर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करीत तो कसेबसे उद्गारला," ए नंदू! गप ! रडू नकोस. वेडी का आहेस तू? सगळं ठीक होईल.अगं, देवाला सर्वांची काळजी आहे. जा, घरात जा!"
    नंदिनीने पुन्हा देवाकडे धाव घेतली. अन् दिलीपच्या डोळ्यातून आतापर्यंत आवरून धरलेल्या अश्रूंचा बांध फुटला.

     ×.   ×. ×.   ×. ×

……….." अय् ऽ ‌ऽ ...कुल्फीवाला..ऽ ऽ! ठंडा और मीठेवाला ऽ ऽ! " कुठून तरी कर्कश स्वर उमटले. थोड्याच वेळात ते जवळ ऐकू येऊ लागले.
        अन् नुकतेच शुद्धीवर आलेल्या पप्पूने कुल्फीचा हट्ट धरला. दोन तीन दिवसांच्या जागरणाने दिलीपचा डोळा लागला होता. पप्पूच्या रडण्याने तो खडबडून जागा झाला.

      पप्पूचा कुल्फीचा हट्ट पाहून दिलीपच्या ह्रदयात धस्स झाले. डॉक्टरांनी गार पाणी द्यायला मनाई केली होती. त्याला रडू देऊ नका असेही बजावले होते. मधेच हा कुल्फीवाला कुठून कडमडला होता कुणास ठाऊक!
    पप्पूचा हट्ट वाढू लागला. रडणेही वाढले. दिलीप द्विधा मनःस्थितीत सापडला. तो पप्पूला नाना प्रकारे समजावू लागला.
" कुल्फी खाऊ नये बेटा! त्यांत किनई किडे असतात. घाणेरड्या दुधापासून बनविली असते ती!"
पप्पू काहीच ऐकायला तयार नव्हता.
"...नाई...मला कुल्पीच पायजे ऽ ऽ! " तो हातपाय झाडू लागला.
काय करावे हे दिलीपला कळेना. शेवटी तो मनाशी काहीतरी ठरवून  उठला. " मी कुल्फी आणायला जातोय. मात्र तू रडू नकोस हां! अगदी गप्प राहा बघू !" त्याला बजावून त्याने नंदिनीला त्याच्याजवळ बसायला सांगितले.अन तो दाराबाहेर पडला.

    समोरच्या कोपऱ्यावर एक वीस बावीस वर्षांचा मळकट कपडे घातलेला मवाल्यासारखा दिसणारा मुलगा कुल्फीचा डबा सायकलच्या कॅरियरवर ठेवून मोठमोठ्याने ओरडत होता..' अय ऽ ऽ कुल्फीवाला ऽ ऽ ! ठंडा और मीठेवाला ऽ ऽ!' त्याच्यासमोर  पाच सहा मुले कुल्फी खात उभी होती.

  ……." ए बाबा.! येथे ओरडत नको बसू.. जा पाहू येथून दुसरीकडे! माझ्या मुलाने रडून गोंधळ घातलाय त्या कुल्फीसाठी."  दिलीप त्याच्याजवळ जाऊन म्हणाला.

    ……."तुमाले नसंन घ्या चं तं नोका घेऊ साहेब! पन मले कायले जावाले सांगता!" त्या पोराने अगदी बेफिकिरीने उत्तर दिले.
….‌‌" अरे पण डॉक्टरांनी मनाई केली आहे त्याला कुल्फी खायला. तुझा आवाज ऐकून तो हट्ट करतोय ना !" दिलीप जीव तोडून सांगू लागला. पण त्या पोरावर काहीही परिणाम झाला नाही.
……" त्याले मी काय करू जी! मी तुमच्या घरात येऊन तं न्हाई ब़ोंबलत ना!"
….." हे बघ! दुसऱ्या कोणत्याही मोहल्ल्यात जाऊन घसा फाडून ओरड ! पण येथे मुळीच ओरडू नकोस. येथे माझ्या पोराच्या जीवावर बेतले आहे अन् तू….* दिलीप राग आवरून म्हणाला पण ते सर्व त्या पोराच्या कानावरून गेले जणू !

….." हे पाहा साहेब! धंद्याचा वखत हाये. खालीपिली भेजा नोका खाऊ! सारे मोहल्ले फिरून झाले अन् साली धा रुपयांची बी कमाई न्हाई झाली. आमचं तं हातावरंच पोट हाये ना! माह्या बी घरी माय बिमार हाये, तिची दवाई….खानं ..पेनं..!  कमाई न्हाई झाली तं काय खाऊ आमी ? कोणाचे हाडं घालू पोटात…..जावा...जावा...काम करा आपलं…" उर्मटपणे बोलून त्याने पुन्हा आवाज लावला…" अय.ऽ ऽ कुल्फीवाला..ऽ ऽ! ठंडा और मीठेवाला..ऽ. ऽ!"
   दिलीपचा राग अनावर झाला. तशात त्याला घरातून पप्पूचे रडणे ऐकू आले. त्याचा स्वत:वरचा ताबा सुटला.
' जातोस की नाही येथून..' असे म्हणत रागाने बेभान होऊन त्याने फाड् फाड् त्या पोराच्या मुस्काटात लगावल्या. 
   त्या पोराचा तोल गेला अन् सायकलला टेकून असलेला कुल्फीचा डबा खाली पडून सर्व कुल्फ्या मातीत मिसळल्या गेल्या. गरम धुळीने त्या पाहता पाहता वितळून जाऊ लागल्या
दिलीपने तोंडाने शिव्या घालीत पुन्हा दोन ठोसे त्याच्या छातीवर लगावले. तो पोरगा खाली पडला. सारी मुले भेदरून पळून गेली.

     उठता उठता त्या पोराचे लक्ष वितळणाऱ्या कुलफ्यांकडे गेले. अन् त्याचे मस्तक फिरले. त्याच्या डोळ्यासमोर फॅक्टरीच्या मालकाचा क्रूर चेहरा दिसला, भुकेनं व्याकुळलेली, खंगलेली, तापानं बेजार झालेली माय तरळली अन् तो पार बिथरला. मागचा पुढचा काही विचार न करता क्षणात त्याने खिशातून सुरा काढला अन् बेसावध असलेल्या दिलीपच्या छातीत खुपसला.

…….." आई  ऽ ‌ऽ गं ऽ ऽ !" दिलीपच्या तोंडून दबलेल्या आवाजात एक ह्रदयभेदक किंकाळी बाहेर पडली.अन छातीवर हात दाबून धरीत तो खाली कोसळला…..
          
                   *     * *
   ……." अहो ऽ ऽ ! पप्पूचा ताप उतरत चाललाय !  त्याला घाम सुटू लागलाय् …!" आनंदाने ओरडत नंदिनी बाहेर आली.  अन्…..
…….पुढचं दृष्य नजरेस पडताच भयाने तिचा आ वासला. अनाहूतपणे तिच्या हाताचा पंजा तिच्या मुखाशी गेला. दुसऱ्याच क्षणी एक आर्त..कर्णकटू.. किंकाळी फोडून ती धाडकन खाली कोसळली.

……..त्याच्या भळभळणाऱ्या रक्तात भिजलेले तिचे किंकाळीचे सूर दुपारच्या शांत...नीरव वातावरणात घुमत राहिले…

                         © सुरेश इंगोले

Saturday 25 April 2020

बाप.
   
    " सर,
              माझं हे पत्र वाचून तुम्ही बुचकळ्यात पडाल म्हणून आधीच सांगते. मी तुमची विद्यार्थिनी. चेतना रंगराव मस्के. बावीस तेवीस वर्षांपूर्वी तुम्ही मला कॉलेजात शिकवले आहे. तुम्ही सर्वच विद्यार्थ्यांना खूप आत्मियतेने शिकवायचे. तुमच्या तासाला कोणीही बुट्टी मारत नसे. तुमच्या प्रेमळ स्वभावामुळे तुम्ही आम्हा सर्वांना हवेहवेसे वाटायचे. मला तर नेहमी वाटायचे की तुम्हीच माझे वडील असायला हवे होते. आपण एकाच गावात राहत असल्यामुळे मी इंग्रजीच्या काही अडचणी विचारायला तुमच्या घरी यायचे तेव्हा तुमचं तुमच्या मुलांशी बोलणं वागणं पाहून मी भारावून जायचे.
सहजच तुलना करताना मला माझा बाप तुसडा, रागीट, सदा कावलेला दिसायचा. काही मागितले की अंगावर वसकन ओरडायचा. त्या घरात राहू नये असे वाटायचे.

          कॉलेजच्या सहलीसाठी पैसे मागितल्यावर माझा बाप मला खूप बोलला. मी वर्गात रडत बसले असता तुम्ही मला मायेने विचारले. मी भावनेच्या भरात तुम्हाला बापाबद्दल बोलले तेव्हा तुम्ही मला माझ्या बापाच्या आर्थिक परिस्थितीविषयी कल्पना दिली. बापाचं मन कसं असतं..इच्छा असूनही काही करता येत नाही तेव्हा तो कसा तडफडतो याची जाणीव करून दिली. आश्र्चर्य म्हणजे मला पैसे देऊन बापाने सहलीला परवानगी दिली. मी चकितच झाले.
     सर, माझ्या लग्नाच्या वेळी मला कळले की तुम्ही जसे मला समजावले तसेच माझ्या बापालासुद्धा  समजावून सांगितले होते. सहलीसाठी तुम्हीच मदत केली आणि त्याची परतफेड कशी करायची याची सुद्धा कल्पना दिली होती.
        सर,  आज माझ्या मुलीच्या बाबतीत हेच घडू लागले तेव्हा मला आवर्जून तुमची आठवण झाली.  मी तिला तुमच्याबद्दल सांगितले. तिला तुम्हाला भेटायची इच्छा आहे. माहेरी चौकशी केली असता तुम्ही बरेचदा बाहेरगावी असता असे कळले. या पत्रात दिलेल्या नंबरवर तुमची खुशाली कळवा. आम्ही तुम्हाला भेटायला नक्की येवूच.

                               आपली विद्यार्थिनी,
                                  चेतना