Thursday 30 April 2020

            **.लॉकडाऊनच्या काळात **. 

          लॉकडाऊन सुरू झाल्यापासून मी घराबाहेर पडणे बंद केले होते. गरजेच्या सर्वच वस्तू घरात होत्या. भाजी शेजारच्या बाईच्या बागेतील ताजीच मिळत होती. दूध घरपोच यायचे. दोन तीन दिवसाआड शहरात राहणारा मुलगा सारंग शहापूरला यायचा. तो गरजेचे वाणसामान, औषधी व भाजीपाला घेऊन यायचा. आम्हाला घराबाहेर पडायची गरजच नव्हती. 

         आठवडी बाजाराच्या दिवशी आजूबाजूच्या गावातील लोक आपल्या शेतातील भाजीपाला घेऊन यायचे. सकाळी मिरची बाजार भरायचा. खूप गर्दी व्हायची ग्राहकांची. मग पोलीस आले की लाठीचार्ज करून गर्दी पांगवायचे. 

          पण आलेल्या भीषण संकटाची लोकांना पुरेशी जाणीव नव्हती. आताही नाही. तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधलेला नसतो. बाईकवर तिघे तिघे बसून फिरतात. पोलिस कुठे कुठे लक्ष देणार? छोट्या गावात एखाद्याच पोलिसाची ड्युटी लागलेली असते. तो एकटा जमावाला नियंत्रित करू शकत नाही.

     आठवडी बाजाराच्या दिवशी मात्र पोलिसांची कुमक यायची. व्यवसायी व ग्राहकांची गर्दी पांगवायला. हे दर आठवड्यालाच घडायचे.

      आम्हा दोघांच्या सोबतीला आमचा दहा-अकरा वर्षांचा नातू शाळा बंद असल्यामुळे शहापुरला आला होता. आम्हाला विरंगुळ्याचे एक साधन मिळाले होते. 
एकदोनदा सारंग आंबे घेऊन आला होता. यंदा घरच्या आंब्याच्या झाडाला आंबेच लागले नाहीत.  दरवर्षी भरपूर आंबे चोखून खायला मिळायचे. त्याने आणलेल्या आंब्यातील एखादा आंबा पळवायचा. त्याची आजी रागवायची. काल आठवडी बाजार होता. सकाळपासून त्याने आंब्याचा हट्ट धरला होता. बालहट्ट पुरवणे भाग होते म्हणून मी बाजारात जायचे ठरवले.

       पोलिसांच्या भीतीने मला घरून बराच विरोध झाला. पण मी ठामपणाने स्कूटी काढली. रुमालाने तोंड बांधले. बाजारात गेलो. स्कूटीवरूनच आढावा घेतला तर बरीच गर्दी दिसली. एका ठिकाणी मला गावरानी आंब्याचे दुकान दिसले. मी तिकडे जाण्यासाठी गाडी वळवली तोच पोलिस व्हॅन आली. पोलीस लाठ्या घेऊन उतरले आणि लोकांची पळापळ सुरू झाली. माझ्या बाजूने पळणाऱ्या लोकांकडे एक पोलीस धावला. आपणही घरीच जावे म्हणून मी गाडी वळवायला सुरुवात केली तोच माझ्या चेहऱ्यावरील रुमाल निसटला. गाडी थांबवून रुमाल बांधताना पोलिस काठी उगारून जवळ आला व थबकला. 

" अरे सर, तुम्ही? कशाला आले सर माहीत असूनही…"
त्याने मला विचारले. त्याच्या तोंडाला मास्क होता आणि वरून उन्हामुळे दुपट्टाही बांधला होता. त्याचा चेहरा ओळखूच येत नव्हता.

 मी खालच्या सुरात बोललो, " नातवाने आंब्याचा हट्ट धरला होता. नाईलाजाने यावे लागले. सॉरी ! मी जातो घरी."

मी गाडी वेगात घराच्या दिशेने वळवली. तो मागून‌ 'सर,...सर…' करीत राहिला.
    घरी येताच आजी व नातू पिशवी बघायला लागले. त्यांना घडलेला किस्सा सांगितला व घरात आलो.
  •    *.      *. ‌‌.  *

         सुमारे अर्ध्या तासाने बाहेरच्या फाटकातून आवाज आला. सौ. बघायला गेली. मी निवांत मोबाईल घेऊन बसलो. 

        सौ थोड्या वेळाने घरात आली. तिच्या हाती पिशवीत आंबे होते. मी प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहिले.

         ती म्हणाली," एक पोलीस आंबे घेऊन आला व सरांच्या नातवाकरिता आणले म्हणू लागला. मी तुम्हाला आवाज देणार होते तर नको म्हणाला. म्हणत होता की सर तसेच निघून गेले तर मला बरे वाटले नाही. हे आंबे घ्या."

     "  किती पैसे झाले? मी देते आणून.." 
  " नको आई! तुमच्या नातवाला सांगा की त्याच्या काकाने दिले म्हणून." 

     मी नाव विचारेपर्यंत तो बाईकवर बसून निघूनही गेला. 

     मी स्तब्ध झालो. तो नक्कीच माझा कोणीतरी विद्यार्थी असावा. पण कोरोना इफेक्टमुळे त्याची ओळख पटू शकली नाही.

   मी मात्र पोलिसातली माणुसकी …. आणि शिक्षकाप्रती आदर पाहून गहिवरलो. 

                    ____________© सुरेश इंगोले

No comments:

Post a Comment