Tuesday 27 December 2016

**  आंब्याचे  झाड  **

            एखादी गोष्ट सहजगत्या घडून जाते. त्यात काही योजकत्व नसते. घर बांधल्यावर पुढे फार मोठी जागा उपलब्ध असल्यामुळे एक आंब्याचे झाड मधोमध लावले होते. ते जसजसे मोठे होत गेले तसतशा त्याच्या खालच्या फांद्या छाटून त्याला एक आकार येत गेला.
              या पंधरा वर्षात त्याचं रुपांतर एका डेरेदार वृक्षात झालं. खालच्या फांद्या अशा विस्तारल्या की लहान मुले देखिल त्यांच्यावर खेळू बागडू शकतात.
              झाडाचा विस्तार एवढा झाला की इतर झाडांनी हळूहळू काढता पाय घेतला. आता राजासारखा तो एकटाच दिमाखात बहरत असतो, फुलत असतो. सर्व फळांचा राजा असलेला हा आंबा फेब्रुवारी ते जूनपर्यंत सर्वांना आकर्षित करीत असतो. मल्लिका जातीचे आकाराने मोठे असलेले फळ सर्वगुणसंपन्न आहे. त्याच्या कैरीचे लोणचे, आमचूर पावडर व गुळांबा खायला मिळतो तर पिकल्यावर दोन- तीन आंब्यांच्या गोड रसात कुटुंबाची चंगळ होते.

             घरी येणारे मित्र मंडळी घरात बसून गप्पा मारण्यापेक्षा अंगणात आम्रवृक्षाखाली बसून फोटो काढत हास्यविनोदात रमून जातात.
              मागच्या आठवड्यात फेसबुक मैत्रीतून जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झालेली मंडळी पिकनिक व ग्रेट भेट म्हणून घरी आली. शशांक व मीनल गिरडकर, प्रवीण व नीलांबरी कलाल, कांचन मडके, वसुधा वैद्य, वीणा डोंगरवार व वंदना देशभ्रतार आवर्जून भेटायला आले. घरात थोडावेळ बसून सगळे अंगणात आले. जणू आंब्याचे झाड त्यांना खुणावत होते. गप्पा, चेष्टा-मस्करी, हास्यविनोद यांनी आवार फुलून गेले. सर्वांनी खूप फोटो काढले त्यात आंब्याचे झाड ' सेलिब्रिटी ' सारखे मिरवीत होते.

            काल आमचे परममित्र श्री. शानूजी पंडित सहकुटुंब घरी आले. फेसबुकच्या आभासी जगातून ते आमच्या कुटुंबाचा घटक कधी झाले ते कळलेच नाही. कौटुंबिक हास्यविनोदात खूप रमलो आम्ही. झाडाने जणू साद घातल्याप्रमाणे सगळे त्याच्याभोवती पिंगा घालू लागले. त्यांचा नातू परत जायला तयार नव्हता एवढा जिव्हाळा हे घर...हे झाड लावतं व परत परत यायची ओढ निर्माण करतं....

           आम्हाला माणसं जमवण्याची व टिकवण्याची प्रेरणा या घराने...या आम्रवृक्षाने दिली हे त्याचे आमच्यावर उपकारच !
ज्याच्या ऋणात आम्हाला सदैव राहायला आवडेल ते हे आमचे
               आंब्याचे झाड !!  

                                               ***  सुरेश इंगोले. ***

Sunday 25 December 2016

         
         ** आर डी  **
     आज पक्याची काही खैर नव्हती. एकतर त्याची चामडी सोलून निघेल किंवा हात पाय तरी मोडला जाईल अशी पारावरच्या टोळभैरवांची खात्री होती. कारण त्याने रवीशी पंगा घ्यायचे ठरविले होते.

      रवी त्या एरीयाचा गुंड होता. उंच, धिप्पाड, काळासावळा...हातभट्टीच्या दारूची ने-आण करणे, मटका-सट्टा खेळणे, छोट्या मोठ्या सुपा-या घेणे अशी कामे करुन त्याने आपली दहशत निर्माण केली होती. सगळेजण त्याला टरकून असत.

    पक्या कॉलेजात शिकत होता. देखणा, मिष्किल स्वभावाचा, खोडकर...पण सर्वांचा आवडता. शब्दांशी खेळणे त्याला आवडायचे. मित्रांना तो बीजे, टीपी, जेके, एमडी अशा नावांनी बोलवायचा. प्रचलित शब्दांना नवनवी रुपे देण्याचा त्याला छंद होता.

     पक्या नसल्यामुळे पारावर स्तब्धता होती पण तो दिसताच चैतन्याची लहर पसरली जणू. बीजे उर्फ भाावड्या ओरडला...पीके आला रे...
    पक्याने लगेच नोटबुक मांड्यासमोर धरले. ' पीके म्हणजे आमीरखान नव्हे... तू लेका...प्रकाश काळे..' सगळे हसले.
" कां उशीर केलास ?"
" अरे त्या शेळके काकांना घर दाखवले. म्हटलं, प्रत्येक बेडरूमला एबीसीेएल आहे. तर ते म्हणाले, एबीसीएल तर बंद पडली...अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड. मी म्हटलं...अहो काका.. एबीसीएल म्हणजे अटॅच्ड बाथरुम कम लॅट्रीन...." सगळे हसू लागले.
"ही एक रुम वेगळी कां असे विचारल्यावर सांगितले की तेथे नाईक एकटाच राहायचा पण इतर रुममध्येसुद्धा आपले सामान ठेवायचा. पक्का बीडीओ होता. म्हणून त्याच्या खोलीला वेगळे केले. तर म्हणाले, बीडीओ असूनही....
मी लगेच म्हणालो, ओ काका ! बीडीओ म्हणजे ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर नव्हे, भटाला दिली ओसरी..."
' आयला पक्या, तू कोणालाही फिरवतोस यार...'

      पक्याचा छंद सर्वांना माहीत होता. बीपी वाढलाय असं कुणी सांगितलं की बीपी खाऊ नका म्हणायचा. तो कन्फ्यूज होई मग हा सांगे...बीपी म्हणजे ब्रेड पकोडे....

         आज तो पारावर आल्याबरोबर सर्वांनी त्याच्याकडे रवीबद्दल तक्रार केली. तो कसा सगळ्यांना छळतो वगैरे...
" पक्का रानडुक्कर आहे साला..." पक्या बोलला. सगळ्यांनी त्याची री ओढली.
' आयडिया ! आपण त्याचं नावंच रानडुक्कर ठेवू. त्याच नावाने त्याला हाक मारू. ओके ?'
' स्वत:ची हाडं खिळखिळी करुन घ्यायची आहेत का ?'
' गपा रे...त्याला आरडी म्हणायचे...रानडुक्कर..त्याला कळणार नाही व आपल्याला म्हटल्याचे समाधान लाभेल.'
' नको रे बाबा...त्याला संशय येईल.'
'ठीक आहे. मी सुरुवात करतो.' असे म्हणून पक्या निघाला. रवी कोणाशी तरी तावातावाने बोलत होता.

.....  ....
         " काय आरडी..कसं काय ?" त्याच्या पाठीवर थाप मारत पक्या बोलला.
रवी गर्रकन वळला. "काय म्हणालास ?' त्याने डोळे वटारले.
" आर डी." पक्या शांतपणे म्हणाला." आजपासून आम्ही सर्वांनी तुला आरडी म्हणायचे ठरवले आहे. काय दोस्तांनो ?"
    सगळे चिडीचूप...
" काय टेरर आहे यार तुझं. कोणी बोलायलाही घाबरतं. एकाच एरीयात राहतो म्हटल्यावर मिळून मिसळून राहायला हवं ना.."
रवीला कसला तरी संशय आला. हे बेणं सरळ नाही हे त्याला ठाऊक होतं. त्याने पक्याचे बखोट धरले व दातओठ खाऊन बोलला..." आरडीचा अर्थ सांग आधी.."
  आता सगळेच टरकले होते. ती वेळ येऊन ठेपली होती.
पक्याने त्याचा हात झटकला. आणि शांतपणे म्हणाला, " हे बघ...तू आपल्या एरीयाचा भाई आहेस. दादा आहेस. रवी दादा. आजपासून आम्ही तुला रवी दादा म्हणजेच आरडी म्हणायचे ठरवले आहे.  काय दोस्तांनो....,"
हो.......सगळे एका सुरात
' चला तर मग म्हणा... आपला भाई कोण..?'
"आर डी...!" सगळे एकासुरात ओरडले..मनातल्या मनात ' रानडुक्कर' म्हणत.....

                      ***  सुरेश इंगोले.  ***

Wednesday 21 December 2016

सहज सुचलेलं.....मनातलं.....

                 सोशिकपणाबद्दल आम्ही भारतीय विश्वप्रसिद्ध आहोत......कोई शक ?

           प्राचीन काळापासून अनेक राजे आलेत...अन्याय करुन गेलेत. आम्ही निमूट सहन केले.

           शक आले, हूण आले, मंगोल,मोगल, पोर्तुगीज आले.
फ्रेंच आले, इंग्रज आले...
           
            आम्ही उदार मनाने त्यांना आपले राज्य दिले. आपल्यावर अत्याचार करण्याची परवानगी दिली. त्यामुळे सोशिकपणा वाढतो हे जगाला दाखवून दिले.

           मग आम्हाला वाटले...परक्यांचा अत्याचार पाहिला, साहिला....आता आपल्यांचाच अत्याचार सहन करून पाहू.

           परक्यांना हुसकावून आम्ही आपले राज्य स्थापन केले.
आणि त्यांच्या अत्याचारासाठी सज्ज झालो.

           कायदा-नियम धाब्यावर बसवून, निरनिराळ्या क्लृप्त्या लढवून मनमानी करण्याची अनेक तंत्रे शोधली जाऊ लागली.
अनेक आमिषे दाखवून आवळा देऊन कोहळा काढण्याची किमया केली जाऊ लागली.

          ..... आणि आम्ही निमूटपणे सहन करीत आलो.
         
          आजही तेच सुरू आहे.

           आम्ही पै-पैशासाठी दिवसभर रांगेत उभे राहतो. पैसा मागच्या दाराने करोडोंच्या संख्येत मूठभरांच्या खिशात जातो.

           आम्ही हीन - दीन होऊन मंदिरात माथे टेकवून नवसाला जवळ असले-नसले पैसे पेटीत टाकतो. मंदिराच्या कोषागारात अब्जावधी रुपये, सोने-नाणे, हिरे-जवाहिर अगदी बेहिशेबी पडलेले असतात.

            आम्हाला अजूनही असं वाटत असतं की यातून चांगले काही तरी निष्पन्न होईल.

           अच्छे दिन येतील...

         .... नाहीतरी सोशिकपणाबद्दल आम्ही विश्वप्रसिद्ध आहोतच....

                                 *** सुरेश इंगोले ***