Sunday 10 May 2020

आई…
.
      विश्वातला अत्यंत पवित्र शब्द..!

    असे म्हणतात की देव सर्वच ठिकाणी जाऊ शकत नाही म्हणून त्याने आई बनवली. काही दुखलं खुपलं तर लगेच 'आई'चा धावा करतो आपण. संकटात वडील तर दु:खात आईचीच आठवण येते.

    आई दिव्याची ज्योत असते तर तो प्रकाश परिवाराला मिळावा यासाठी चटके सहन करणारा दिवा बाप असतो.

   मुलगा कुपुत्र असू शकतो परंतु आई कधीच कुमाता नसते. मुलाच्या अपराधावर पांघरूण घालणारी ती मायेची सावली असते.

          आईचं प्रेम व माया आयुष्यभर मिळालेला एक अत्यंत भाग्यवान मुलगा मी आहे. आम्हा सहा भावंडात मी मोठा असल्यामुळे आणि पाठची बहीण चार वर्षांनी झाल्यामुळे मला तिचं भरपूर प्रेम मिळालं. आई पाच वर्ग शिकलेली होती. इंग्रजी वर्णमालेशी तिची ओळख होती. ती घरीच मला शिकवायची. वडील प्राथमिक शिक्षक होते. पुस्तके घरीच असायची. चौथीपर्यंतचा पूर्ण अभ्यास तिने घरीच करून घेतला. ती माझी पहिली गुरू शिक्षणाच्या अर्थानेसुद्धा आहे.

    संस्कारांचा पहिला धडा आईच देते. सुसंस्कृत घरातून आल्यामुळे तिने आमच्यावर खूप चांगले संस्कार केले. तोच वारसा आमच्या पिढीनेही पुढे चालविला आहे.

        वयाच्या सातव्या वर्षी चौथ्या वर्गाची परीक्षा देण्याची किमया मी केवळ आईमुळे करू शकलो. माझ्यात वाचनाची आवड तिनेच निर्माण केली. वयाच्या पंधराव्या वर्षापर्यंत केवळ पुस्तकी किडा बनून आर्वीची अर्धी लायब्ररी पिंजून काढली. मी आणलेले पुस्तक मी शाळेत गेल्यावर ती वाचत बसायची. तिची वाचनाची आवड तिने आयुष्यभर जोपासली. 

     माझ्यासाठी दादाजींनी मुलगी पाहिली व तिच्याबद्दल आईला सांगितले. तिला आई, वडील, भाऊ, बहीण कोणीही नव्हते. वडील सैन्यात असताना तिच्या वयाच्या तिसऱ्या वर्षीच वारले. नातलगांनी तिच्या आईचे दुसरे लग्न लावून दिले. ती सहा वर्षांची असताना तिची आई देखिल वारली. तिला मावशीकडे आणले गेले. तिथे मावसभावाच्या बायकोच्या तालमीत ती लहानाची मोठी झाली. 

    आई दादाजींना म्हणाली, " आपण हीच मुलगी करून घेऊ आपल्या बाबासाठी. तिला आईवडिलांची माया देऊ. जी माया तिला आजवर मिळाली नाही…"

     आईने तिला कधीच सून मानले नाही. आणि आशाने सुद्धा तिला सासू मानले नाही. ती आईला चिडवायची, थट्टामस्करी करायची, आई रागावली की तिला मिठी मारायची. आईकडून बऱ्याच गोष्टी तिने शिकून घेतल्या. 

    माझ्या तीनही मुलांची लग्ने झाली. प्रत्येक लग्नात आई उत्साहाने पुढे असायची.

माझ्या तीनही सुनांना आई आणि आशा यांच्यातील नात्याची जाणीव झाली. आई त्यांचीही मैत्रीण बनली. होळी, पोळा, दिवाळी अशा सणांना सर्वजण एकत्र येत. धमाल करीत. ज्येष्ठ - कनिष्ठ असा भेदभाव न करता...त्यांचा योग्य तो आदर राखून…सगळे सहवास एन्जॉय करीत.

   वडील गेल्यावर आई माझ्याकडे आली. नंतर तिची भटकंती सुरू झाली. मावशीकडे महिनाभर, धाकट्या भावाकडे महिनाभर, बहिणीकडे महिनाभर अशी ती फिरत असायची. पण येथे जास्तीत जास्त राहायची. आम्हाला तिची एवढी सवय झाली होती की तिने कोठे जाऊच नये असे वाटे. 

माझ्या निवृत्ती नंतर आम्ही चिकार भटकंती केली. मी, आशा आणि आई तिघेच कारने नागपूर, अमरावती, मुर्तिजापूर, शेगांव असे नातलगभेटीचा प्रवास करायचो. प्रवासात सृष्टीसौंदर्याचा आस्वाद घेण्याची तिची वृत्ती अनेकदा दिसून आली.

   पंकज हैदराबाद येथे ई टीव्ही ला वृत्तनिवेदक म्हणून लागला त्यावेळी अनेकदा तेथे जाणे व्हायचे. रात्री ट्रॅव्हल्स मध्ये बसले की सकाळीसच हैदराबादला जाग यायचा. एकदा आई सोबत होती. सकाळी सहाच्या सुमारास आईने मला हलवून जागे केले. ती मला म्हणाली, " ते मोठमोठे खडक बघ. किती छान दिसताहेत."
पहाटेच्या नारिंगी प्रकाशात ते दृष्य मोठे लोभसवाणे दिसत होते. 

दगडातही सौंदर्य शोधणारी माझी आई…

२०१० साली धाकट्या परागने नागपूरला कार घेतली ती नागोठणेला नेऊन द्यायची होती. मी आणि सारंग जाणार होतोच तेव्हा आई म्हणाली,"कारमध्ये जागा आहे तर आम्ही दोघीही येतो की."

शहापूर ते मुंबई या प्रवासात खरा आनंद लुटला तो आईनेच. कोठे तलाव दिसला, पहाड व घाटी दिसली की गाडी थांबवायची. खाली उतरून ते दृष्य डोळ्यात साठवून घ्यायची. असा मनमुराद आनंद लुटणे आम्हाला नव्हते जमले.

  आईची प्रकृती धडधाकट होती. बीपी, शुगर अशा व्याधीपासून ती अलिप्त होती. २०१७ साल उजाडले. उन्हाळ्यानंतर तिने गावी रसुलाबादला जाण्याचा हेका धरला. 
" येथे काय अडचण आहे? तेथे जाऊन काय करणार?" मी विरोध केला.
" मला माझी तिन्ही मुले माझ्याजवळ हवी. त्या दोघांना येथे बोलावून घे." आई म्हणाली.
" त्यांना त्यांची कामे आहेत तेथे. ते कसे येतील ?"
" मग तू चल तिकडे. तू तर रिकामाच (निवृत्त) आहेस." तिने मला निरुत्तर केले.

  गणपतीच्या काळात आम्ही महालक्ष्मी करिता गावी गेलो. आईला तेथे ठेवून आम्ही दोघे पुण्याला पंकजकडे गेलो. महिन्याभराने परत आल्यावर आम्ही दुसऱ्याच दिवशी सकाळी कारने रसुलाबादला निघालो. दसऱ्याचा दिवस होता. वर्धेला कुबेरकरांच्या भेटीगाठी घेत गावी संध्याकाळी पोहोचलो. मला पाहताच तिला एवढा आनंद झाला की रात्री दसऱ्याचे सोने द्यायला आलेल्या प्रत्येकाला ती सांगायची..' माझा बाबा आला..'... तिची जीभ जडावली होती. शब्द स्पष्ट निघत नव्हते.

मागे एकदा तिने मरणाच्या गोष्टी काढल्या तेव्हा मी तिला रागावलो होतो. " लता मंगेशकर तुझ्या वयाची आहे. बघ कशी ठणठणीत दिसते. तू कां उगाच मरणाच्या गोष्टी करतेस?"
त्यावर ती म्हणाली होती," शरीर थकल्यावर दुसऱ्यावर अवलंबून राहण्यात लाचारी असते. अशी वेळ येण्यापेक्षा गेलेले बरे!"

       यावेळी तिची अवस्था थकलेलीच वाटत होती. दोन तीन दिवसांनी आईला शहापूरला घेऊन जाऊ असा विषय काढला. सकाळी पुतण्याने आईची प्रकृती बरी नसल्याचे सांगितले. डॉक्टरांनी तिला तपासल्यावर मला बाहेर नेऊन सांगितले की तिला कोठेही नेऊ नका. आणि तुम्हीही जाऊ नका. 
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आम्ही थांबलो
 मग मी सर्व जवळच्या नातेवाईकांना तिच्या भेटीला बोलावण्याचा सपाटा लावला. दहा बारा दिवसांनी सर्व मुलामुलींच्या भेटी झाल्यावर तिने बारा ऑक्टोबर रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास शेवटचा श्वास घेतला. 

तीनही मुले जवळ हवीत हा हट्ट असो की शरीर थकल्यावरची लाचारी पत्करायची नाही हा निर्धार असो...ती स्वत:चे जिणे स्वत:च्या  तत्त्वावर जगली…. भरभरून जगली.

    आजही आमच्या या घरात जागोजागी आईच्या वावरखुणांचा भास होतो.

 बशीत चहा ओतून पिणारी आई…
पणतू किंवा पणतीला कुशीत घेऊन झोपलेली आई.,.
पाळण्यावर कापसाच्या वाती वळत बसलेली आई…
मला आवडते म्हणून गॅस शेगडी खाली उतरायला लावून पुरणपोळ्या करणारी आई….
नातू..नातसुनांसोबत पत्ते खेळताना नेहमी जिंकणारी आई…
हातात काठी घेऊन अंगणात शतपावली करणारी आई…
पदोपदी... जागोजागी आईचा भास सतत होतच असतो.

आई आहे ! माझ्या अवतीभोवती सावलीसारखी माझ्यावर तिची मायेची पाखर घालून आहे !!

  • अशीच लाभो तुझी सावली मला निरंतर
  • तुझ्याविना मज नकोत दूजी सौख्ये माते

________________© सुरेश इंगोले