Wednesday 28 June 2017

आज आठवडी बाजार होता.
सौ बाजारातून आली. पिशवी खाली ठेवत, घाम पुसत म्हणाली," काय महाग होत्या भाज्या आज ? थोडी उशीरा गेले असते तर स्वस्त तरी मिळाल्या असत्या."

   पुस्तकातून डोके वर न काढता मी सहज बोलून गेलो," त्यापेक्षा बाजार संपता संपता गेली असतीस तर टमाटर, वांगी, कांदे, पालेभाज्या  या सर्व फुकट मिळाल्या असत्या."
                   ********

आत्ता आठ वाजून गेले तरी किचनमध्ये शुकशुकाट आहे. आज जेवायला मिळणार की नाही कळत नाही.
मी काही चुकीचे बोलून गेलो का मघाशी....?
मला तर काही आठवत नाही......

असो... शुभ रात्री !!
                                             == सुरेश इंगोले ==

Friday 9 June 2017

*सुमुहूर्त सावधान*

           प्रत्येकाच्या आयुष्यात  येणारा विवाह संस्कार हा अत्यंत महत्वाचा असा सोहळा असतो. तो कशा प्रकारे साजरा करावा हे प्रत्येकाने ठरवायचे असते. अर्थात वरपिता किंवा वधूपिता यांनाही पूर्णपणे हे स्वातंत्र्य नसते.  अनेक तडजोडी करुन हा सोहळा संपन्न केला जातो. देणीघेणी, हुंडा, मानपान, आहेर या गोष्टी महत्वाच्या असतात. लग्नाची तिथी ठरते. मग मुहूर्त काढला जातो.
             त्या मुहूर्तावर लग्न लागणे अपेक्षित असते. बहुधा मुंबई पुण्यासारख्या शहरात मुहूर्तावर लग्ने लागलेली मी पाहिली आहेत. सफल विवाहासाठी हा सुमुहूर्त पाळणे आवश्यक आहे असे मानले जाते.

             पण ग्रामीण भागात किंवा नागरी भागात या मुहूर्ताची ऐसीतैसी केली जाते. मुहूर्त हा पाळण्यासाठी नसतोच अशी यांची ठाम धारणा असते. त्यामुळे सकाळी नऊ वाजताचे लग्न दुपारी दीड-दोन वाजता लागते. मग जेवणारांची झुंबड उडते. सगळा गोंधळ माजतो.

           याला कारणीभूत असतात वरातीत नाचणारे नवरदेवाचे मित्र आणि वराकडील पाहुणे मंडळी. डीजेच्या तालावर ठुमके घेत, वेडेवाकडे अंगविक्षेप करीत, कमरेला  विचित्र झटके देत प्रत्येक जण नाचायची हौस पूर्ण करून घेतो. वेळेचे भान कुणालाही नसते. ते करून देण्याचाही उपयोग नसतो. नवरदेवाच्या खिशातून मित्रांच्या अपेयपानाची व्यवस्था होत असते. अंगूरी चढत जाते. नाच रंगत जातो. बँडवाल्यांचीही चांदी असते. कुणीतरी नाचणा-यावरून नोटा ओवाळून त्यांना देत जातो. या सगळ्या प्रकारात मुहूर्ताची वाट लागते. वधूकडील मंडळी बिचारी वाट पाहून थकून गेलेली असते.

               या सर्व प्रकारामागे एक गोंडस समजूत असते की लग्न आयुष्यात एकदाच होते. ही मजा नंतर कधी करणार ? वीस वर्षांपुर्वी आमच्या गावातील शिक्षकाच्या मुलीचे लग्न होते. मुहूर्त सकाळी नऊचा होता. लग्न लावून जेवण करुन शाळेत येता येईल म्हणून कोणीही सुटी घेतली नव्हती. ऑफिसला जाणारी इतर मंडळी याच विचाराने मंडपात जमली. मुहूर्त टळून एक तास झाल्यावर चुळबुळत एकेकजण सटकू लागला. आम्ही सगळे परत आलो. नंतर कळले की लग्न दुपारी दीड वाजता लागले तेव्हा मंडपात फक्त नातलग मंडळी तेवढी शिल्लक होती. किमान तीनशे ते चारशे लोकांचा स्वयंपाक शिल्लक राहिला होता.

             आम्हा मित्रमंडळीत या मुहूर्ताबद्दल नेहमी काथ्याकूट होत असे. मुहूर्त किंवा लग्नाची वेळ पाळायलाच हवी हे माझे मत मी ठामपणे मांडत असतो. आमच्या मित्राच्या मुलाच्या लग्नात बोलणी करताना मला हजर राहण्याचा योग आला. मुलीकडच्यांनी लग्न वेळेवर लागावे म्हणून गळ घातली तेव्हा मित्राच्या वतीने मी त्यांना हमी दिली. मित्राला माझे विचार माहीत होते. तो काही बोलला नाही. मी नव-या मुलाला सांगितले की नाचणा-या मित्रांचे काय ते तू बघ. लग्न वेळेवर लागेलच.

          मुहूर्त सकाळी साडे अकराचा होता. जानवशावरून वरात सकाळी दहालाच निघाली. मारुतीच्या मंदिरातून मंगल कार्यालयाकडे येताना नाचणारांचा जोश वाढू लागला. मी मंडपाकडे निघून गेलो. अकरा वाजून दहा मिनिटे झाली तसा वधूपित्याचा जीव वरखाली होऊ लागला. त्याने माझ्याकडे येऊन घड्याळ दाखवले. त्याच्या चेह-यावरील काकुळती मला हेलावून गेली. मी मित्राला बोलावून गाडीत बसवले व वळसा घालून वरातीच्या मागून गाडी नाचणारांच्या बाजूला आणली. त्याच्या एका मित्राला बोलावले. त्याला माझी योजना सांगितली. त्याला पूर्वकल्पना होतीच. त्याने वराला घोड्यावरून खाली नाचायला उतरवले. मित्र आणखी जोशात नाचू लागले. मी मित्राला खुणावले. तो खाली उतरला. नाचणारात जाऊन त्याने वराला हात धरून आणले व गाडीत बसवले. बाजूला तोही बसला. मी काचा चढवून गाडी पुढे काढली. चारच मिनिटात आम्ही मंडपात पोहचलो. सुमुहूर्त बरोबर साधला गेला. मंगलाष्टके झाली. वरमाला घातल्या गेल्या. फटाके फोडण्यात आले पण नाचणा-यांचे उन्मादात नाचणे सुरूच होते. ते मंडपाशी पोचल्यावर बराच वेळाने वस्तुस्थिती त्यांना कळाली.
     
             नंतर बराच हंगामा झाला. असो !
वराचे वरातीतून अपहरण अशी नंतर लोकल वर्तमानपत्रात बातमी झळकली होती. आजही परिस्थिती बदलली नाही. मुहूर्ताची ऐशीतैशी होतच असते.

                                      ***  सुरेश इंगोले. ***