Wednesday 12 December 2018

★ #अरबांच्या_देशा ★★

@ अल्- जुबेल..(सौदी अरेबिया)

दम्मम एयरपोर्टवरून आम्ही अल्-जुबेलला निघालो. अंतर किमान शंभर किलोमीटर असेल. मोठमोठे सहा पदरी प्रशस्त रस्ते. रस्त्याच्या दुतर्फा झगझगीत दिवे. आणि ते ही पूर्ण रस्ताभर...अगदी अल्-जुबेलपर्यंत. ते गुळगुळीत रस्ते मला पचनी पडत नव्हते. खड्ड्यांच्या रस्त्यांची आम्हाला सवय. बरे, रहदारीचे नियम अत्यंत कडक. जागोजागी कॅमेरे लागलेले. गाड्यांचे स्पीड ठरलेले. कुठे नव्वद, शंभर तर कुठे एकशेवीस. मर्यादेबाहेर वेग वाढला की लगेच दंडाचा मेसेज मोबाईलवर हजर.
    शंभरच्या स्पीडने कार जात होती. रस्त्यावर तुरळक रहदारी होती. पराग म्हणाला,” बाबा, चालवता का कार ?”
“ नको रे बाबा, आम्हाला राईट हँड ड्राईव्हची सवय. ते स्टिअरिंग उलट वाटतं. उजव्या हाताला गिअरची सवय नाही. आणि एवढ्या स्पीडने गाडी चालवण्याची आता हिंमतही नाही.”
तो हसून म्हणाला,” येथे लहान कार्स दिसतही नाहीत. बाईक्स क्वचितच दिसतील. आणि हळू गाडी चालवणे म्हणजे मागच्या गाडीची धडक खाणे.”

     अल्-जुबेलमध्ये पराग जेथे राहतो तेथे बहुधा सर्वच भारतीय राहतात. त्यामुळे आपल्याच भागात असल्याचा फील येतो. तीन इमारतींना कंपाउंडने सुरक्षित केले आहे. तेथे सर्वजण आपले सणसमारंभ एकत्रितपणे साजरे करतात. सुट्यांमध्ये गेट-टुगेदर घेतात. आपल्या देशापासून आपण दूर आहोत या भावनेने त्यांच्यात एक जिव्हाळ्याचे बंध निर्माण झाले आहेत.

   दुसऱ्याच दिवशी आम्हाला भेटायला शेजारी येऊ लागले. बोलण्यातून परस्परांविषयीची आत्मीयता जाणवत होती. आम्हाला लवकरच त्यांनी आपल्यात सामावून घेतले. तेथे शुक्रवार व शनिवार साप्ताहिक सुटी असते. शुक्रवारी सर्वजण बाहेर गेट-टुगेदर साठी जातात. यावेळी दरीन बीचवर जायचे ठरले.


     सौदी अरेबिया हा देश वाळवंटात वसलेला आहे.तेथे पाण्याचे अत्यंत दुर्भिक्ष आहे. समुद्राचे पाणी प्रक्रिया करुन वापरले जाते. तेथे हिरवळ नाहीच. रस्त्याच्या दुतर्फा तुरळक झाडे दिसतात ती जाणीवपूर्वक लावलेली आहेत. अशा देशात बागेचा विचारही मनात येत नाही. पण दरीन बीचवर गेल्यावर मी आश्चर्याने थक्क झालो.

       समुद्राच्या किनाऱ्यावर एक भली मोठी बाग होती. हिरवळ,  मोठमोठी झाडे, मुलांचे खेळ, जागोजागी पार्किंग, स्वच्छतागृहे आणि सगळे नियोजनपूर्वक केलेले. स्वच्छता एवढी की गर्दी असूनही कुठेही एक कपटा देखिल नाही. मोठमोठे डस्टबिन्स जागोजागी ठेवलेले होते.

        बीचवर सर्वानी गप्पागोष्टी हास्यविनोद करीत छान दिवस घालवला. स्त्रियांना बुरखा आवश्यक असल्यामुळे बिचाऱ्यांना चेहऱ्यावर रंगरंगोटी शिवाय इतर कपड्यांची फॅशन करता येत नाही. सौ.ने खूप आवडीने साड्या व ड्रेस घेतले होते पण तिचा खूप विरस झाला. असो...जैसा देश वैसा भेस..!

       इथले मॉल्स खूप सुंदर, अवाढव्य व अत्याधुनिक आहेत. वेळ घालविण्याचे एक नित्याचे चैनीचे स्थान. त्यामुळे येथले मॉल्स फिरायला मजा येते. डॅशिंग कारमध्ये नातीच्या आग्रहावरून तेरा वर्षांनी बसलो. खूप मज्जा आली.

        सध्या सौदीला बरे दिवस येताहेत. नवीन राजा मोहम्मद बिन सुलतान थोडा आधुनिक विचारांचा असल्यामुळे स्त्रियांना काही अधिकार मिळताहेत. निवडणूक लढविण्याचा अधिकार, ड्रायव्हिंग करण्याचा अधिकार. मॉलमध्ये स्त्रिया काम करताना दिसताहेत. राजेशाहीचे एक बरे असते. लोक कायद्यांचे धाकाने पालन करतात. ज्या देशात कायदा पाळला जातो तेथील राज्यव्यवस्था उत्तम असते.
          

Tuesday 27 November 2018

#अरबांच्या देशात..

    सौदी अरेबिया
सौदीला जाण्यासाठी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर लवकरच पोहोचलो. साडेनऊच्या फ्लाईटसाठी सहा साडेसहापर्यंत आत प्रवेश करावा म्हणून आम्ही बाहेरच फिरू लागलो आणि तेथील गर्दी पाहून दचकलोच. सगळे हजयात्री आबालवृद्ध तेथे फिरताना दिसले. ते आपल्यासोबत सौदीपर्यंत असणार हा विचार मनात येऊन इमिग्रेशन काउंटरला मोठमोठ्या रांगा असतील याची जाणीव झाली. आम्हाला सोडायला आलेल्या सारंगला अर्धा तास तरी बाहेर थांब असे बजावून आम्ही आत प्रवेश केला.

       बोर्डिंग पासच्या काउंटरला मोठ्या रांगा होत्याच. आम्ही रांगेत लागताच एका रक्षकाने आम्हाला बाजूला बोलावले. रिकाम्या काउंटरवर त्याने आमचा नंबर लावला. बोर्डिंग पास लगेच मिळाला. ज्येष्ठ नागरिक असल्याचा हा लाभ अप्रत्याशित होता. हाच अनुभव इमिग्रेशन काउंटरला देखिल आला. पंधरा मिनिटातच सारंगला फोन केला. तो चकितच झाला. त्याला फोनवरच निरोप दिला.

       दोन तास फोनवर परिचितांशी निरोपाचे बोलण्यात घालवले. साडेनऊला विमानाने उड्डाण केले. पराग, प्रियांका व आमची नात ऋग्वेदा दम्मम एअरपोर्टवर घ्यायला येणार होते. विमान वेळेआधीच पोचले तेव्हा परागला फोन करून कळवले. तो नुकताच विमानतळावर पोहोचला होता. म्हणाला, “ बाबा, लोक उतरण्याची घाई करून इमिग्रेशन काउंटरला गर्दी करतील.”
“ मी अशी घाई करणार नाही. कारण एकतर आम्ही अगदी मागे बसलोय. उतरायला वेळ लागणारच आणि झपाट्याने चालूही शकणार नाही. जे होईल ते बघू या. आम्ही बाहेर येईपर्यंत वाट पहा.”

       आमच्या सोबत एक ट्रॉलीब्याग होती. सर्वात शेवटी आम्ही दोघे कॉरिडॉर पार करू लागलो. चालताना सोयीचे व्हावे म्हणून मधे मधे रनिंग एस्कलेटर्स होते. थकणाऱ्या पावलांना तेवढाच आराम. त्यावर उभे राहिल्यावर सौ. ब्यागजवळ उभीच राहिली. मी मात्र त्यावरूनही चालत जावून पुढे तिची वाट पाहू लागलो..

       एस्कलेटर संपताच मागून बुरखा घातलेली एक स्त्री झपाट्याने पुढे झाली व आमची ब्याग उचलून चालू लागली. सौ एकदम ओरडली, “ ये हमारी ब्याग है।” मी क्षणभर अवाकच झालो. लगेच तिला आडवा होत बायकोला म्हणालो, “अरे, वो तुम्हें मदद कर रही होगी। मैडम, ये हमारी बैग है।” तिच्या हातून मी बैग काढून घेतली. ती झटकन पुढच्या बुरखाधारी बायांमध्ये मिसळून गेली. आता तिला काय ओळखणार, कप्पाळ !

       इमिग्रेशन काउंटरला अपेक्षेप्रमाणे गर्दी होतीच. आम्ही एका रांगेत लागलो. सफेद चोगा घातलेले अरबी वेशधारी कर्मचारी रांगेतील लोकांना सूचना देत फिरत होते. एकाचे आमच्याकडे लक्ष गेले. तो अरबी भाषेत काहीतरी बोलला. मला काही कळले नाही. तो परत उद्गारला, “ फस्टाईम ?” काही क्षणातच कळले की तो आमची पहिलीच वेळ आहे का हे विचारत होता. मी मान डोलावली. त्याने आम्हाला बोलावून एका रिकाम्या काउंटरला पाठवले.  दोन तीन मिनिटात आम्ही मोकळे झालो. ब्यागेज काउंटरवरून सूटकेसेस घेऊन बाहेर येत असताना ‘ आई..बाबा..’अशा हाका मारत ऋग्वेदा धावत येऊन बिलगली. आश्चर्य व्यक्त करून पराग म्हणाला, “एवढ्या लवकर कशी सुटका झाली?”
          त्याला फष्टाईम चा किस्सा सांगताना माझे बुरखाधारी प्रियंकाकडे लक्ष गेले. मी आजूबाजूला पाहिले. आणि सगळे माझ्या लक्षात आले..
              माझी बायको वगळता सर्वच स्त्रिया बुरख्यात होत्या.
तिच्यामुळेच त्या अरबाने आमचे फष्टाईम ओळखून आमची सुटका केली होती…. कदाचित तिला पाहूनच त्या स्त्रीने ब्याग पळवण्याचे धाडस करून पाहिले असेल…

        आता आजपासून बायकोला बुरख्यात पाहायची सवय करावी लागेल….

                       # © सुरेश इंगोले

Thursday 20 September 2018

नातू अंगणात खेळत होता.
मी पोर्चमध्ये झोपाळ्यावर बसून पेपर वाचत होतो.
बाहेरच्या गेटजवळ गाडी थांबली तसा नातू ओरडला,
"बाबा, डॉक्टर काका आले."
" ये रे चहा घ्यायला.!" मी हात हालवून त्याला बोलावले.
"नाही काका, घाई आहे" म्हणत त्याने एक पत्रिका शौर्यजवळ दिली व गाडी पलटवून निघून गेला.
   शौर्य पत्रिका घेऊन आला. तेवढ्यात सौ बाहेर आली.
" कोण आले होते? कसली पत्रिका आहे?" तिने विचारले.
" अगं, डॉक्टरच्या मुलाचा वाढदिवस आहे. तोच आला होता पत्रिका घेऊन.." पत्रिका वाचत मी तिला माहिती दिली.
" अरे....बाहेरच्या बाहेरून गेला. घरात आलाही नाही." सौ म्हणाली.
तसा शौर्य म्हणाला, " अगं...बाबा रोज apple खातात नं."
"मग काय झालं?" ती म्हणाली.
" म्हणून डॉक्टर काका घरात येत नाहीत. An apple a day, keeps doctor away."

           मी व सौ एकमेकांच्या तोंडाकडे पाहत राहिलो.

हे आजकालचे पोट्टे ना....कुठला कुठं संबंध लावतील..काही नेम नाही.

                                     ©सुरेश इंगोले.

Saturday 1 September 2018

श्रावण

आषाढाचा विरतो पडघम
लयीत करतो पाऊस नर्तन
हिरवळलेल्या सृष्टीवरती
हळुच आगमन करतो श्रावण..।
   भारतीय पंचांगातील बाराही महिन्यांना एक वलय आहे. चैत्रातल्या वसंतोत्सवापासून तो फाल्गुनातल्या पानगळीपर्यंत प्रत्येक महिना आपली एक अमीट छाप सोडून जातो. त्यातही श्रावणाची लीला अगाध आहे. चातुर्मासाची सुरुवात करुन देणारा हा महिना सर्वच दृष्टीने अविस्मरणीय असतो.

      मुख्य सणांचा प्रारंभच या महिन्यापासून होतो. सुरुवात श्रावणी सोमवारपासून होते. नागपंचमी, रक्षाबंधन, गोकुळअष्टमी या सणांनी उत्सवप्रियतेला चालना मिळते. खरी मजा येते ती गोकुळ अष्टमीच्या दहीहंडीला.

     आमच्या लहानपणी आजच्यासारखा गोविंदांचा माहौल नव्हता. पण शम्मीकपूरचा ‘ ब्लफमास्टर ‘ चित्रपट प्रदर्शित झाला आणि ‘ गोविंदा आला रे आला ‘ या गाण्याने धूम मचवली.. गावोगावी सार्वजनिक दहीहंडीच्या शर्यती लावणे सुरू झाले. गावोगावी आखाडे होतेच. आखाड्यातल्या तरुणांनी सराव सुरू केला.

        मी आर्वीला असताना तेलंगराय मोहल्ल्यातल्या एका आखाड्यात जायचो. इच्छा नसतानाही तीर्थरूपांच्या धाकाने काही काळ मी आखाड्याच्या वस्तादाच्या कानपिचक्या खाल्ल्या आहेत. 1963 मध्ये ब्लफमास्टर आला...गाजला तेव्हा मी नागपूरला कॉलेजमध्ये शिकत होतो. रक्षाबंधनाच्या निमित्ताने आर्वीला आलो तेव्हा मित्रांनी मला आखाड्यात नेले. तेथे दहीहंडी फोडण्यासाठी रिंगणात सराव सुरू होता. मी चकित झालो. तीन चार थर रचून होताच सगळे धडाधड पडत. हंडी फोडणारा मुलगा चढू लागला की सारे थर कोसळत.

      वस्तादचे माझ्याकडे लक्ष जाताच ते म्हणाले,” अरे, हा बारका आहे. याला चढवा वर.” मी जाम टरकलो.  विरोध करून पाहिला. पण वस्तादपुढे काही चालणार नव्हते. माझाही सराव सुरू झाला. तीन थर रचून होताच मी वर चढताना आपला जीव वाचवत यशस्वी प्रयत्न केला. सर्वांनी टाळ्या वाजवल्या.

       गोकुळ अष्टमीला आमच्या मोहल्ल्यातल्या दहीहंडीसाठी आमच्या आखाड्याचे गोविंदा जमले. एकावन्न रुपयांचे बक्षीस होते. दोन तीन प्रयत्न अयशस्वी झाल्यावर एकदाचे तीन थर लागले. मला इशारा करण्यात आला. मी कमरेला शेला बांधून
धडधाकट तरुणांच्या खांद्यावर पाय रोवत वर वर चढू लागलो. गाणी कर्कश आवाजात तर बँड जोरजोरात वाजत होता. मला खाली पाडण्यासाठी बरेच प्रयत्न चालू होते. मी माझे लक्ष हंडीवर केंद्रित केले व शेवटच्या थरावर उभा राहण्याच्या  प्रयत्नात डगमगू लागलो. लोकांचा गोंगाट वाढला. आता आपण पडल्याशिवाय राहत नाही याची खात्री होताच मी उसळून हंडी टांगलेला दोर पकडला. दोराला हिसका बसताच माझे पाय लटपटले. आणि धडाधड थर कोसळले. मी दोराला लटकून लोंबकळत राहिलो.

          क्या सीन होगा बॉस..? आजच्यासारखे मोबाईल असते तर किती व्हिडीओ शूट झाले असते.

          त्या काळी मी खरेच बारका होतो. नाहीतर दोर तुटून खाली आपटून हातपाय मोडून घेतले असते. त्याही अवस्थेत माझे लक्ष हंडीवरील एकावन्न रुपयांकडे लागले होते. मी एका हाताने लटकून दुसऱ्या हाताने हंडी उपडी केली. त्यावरच्या दोन नोटा, पन्नास व एक रुपयांच्या मुठीत घट्ट धरुन ठेवल्या. तोवर मला उतरवण्यासाठी परत थर रचण्यास सुरुवात झाली होती. मी यशस्वीपणे खाली उतरू शकणार होतो. पण…..

           अचानक माझे लक्ष घोळक्याकडे गेले. आणि आमचे तीर्थरूप तेथे दिसले. घाबरून माझा हात सुटला आणि मी थर रचणाऱ्या मुलांच्या अंगावर येऊन पडलो. सारे आडवेतिडवे कोसळले..

           कोणीतरी मला उचलले. कपडे झटकत मी पाहिले. तीर्थरूप माझी पाठ थोपटत होते. मला हायसे वाटले. एकावन्न रुपयांची वाटणी करताना मोठा पाच रुपयांचा वाटा मला मिळाला. त्यापेक्षाही वडील रागावले नाहीत याचा आनंद फार मोठा होता.

            पुढे 1966 मध्ये मी मुंबई येथे नोकरीला लागलो असताना गोविंदांची.पथके हंडी फोडताना पाहून ही घटना आठवायची.

           तेव्हापासून श्रावण माझ्याकरीता अविस्मरणीय झाला.

                   ★★ सुरेश इंगोले ★★

Wednesday 29 August 2018

#श्रावणस्पर्धा5
#चित्रचारोळी1

भरले मोदकाचे ताट
माझ्या गणरायासाठी
किती आसुसून पाहे
ओठंगून माझ्या पाठी....।

              ★  सुरेश#श्रावणस्पर्धा5
#चित्रचारोळी2

अतिप्रीय मोदक असे गणेशास फार
उडवू कसे हळुच ते, करी तो विचार
मातेस बेत कळला, हसली मनी ती
हे लाड पूर्ण व्हावे….असते सुनीती ||
               ★  सुरेश इंगोले। ★ इंगोले  ★

Monday 27 August 2018

चित्रचारोळी1

नाही अन्न नाही वस्त्र
घर  पडलं  गहाण...
लेक माझा गिरवतो
मेरा भारत महान....।
           ★ सुरेश इंगोले  ★

चित्रचारोळी2

गरिबी पाचवीला पुजलेली
सारी स्वप्ने मनात कुजलेली
उष्ट्या अन्नावर पोसतो हा देह
सोडू नको पोरा शिक्षणाचा मोह…||
          ★ सुरेश इंगोले  ★

Friday 24 August 2018

#श्रावणस्पर्धा#
#चित्रचारोळी२#

प्रतिमूर्ति तू होउन माझी
बसला देवाच्या दारी....
मुखवट्यांच्या जगात या
पाषाणाला मोलच भारी..||

          ★ सुरेश इंगोले  ★
*तुझी आठवण पेरित जाते*
*मनात माझ्या गंध फुलांचा....*.

*तत्क्षणि सखये तुझाच उरतो*
*विचार नुरतो मग सकलांचा....||*
#श्रावणस्पर्धा#
#चित्रचारोळी1#
जिवाशिवाची भैट होउनी तुला पूजितो नाथा
नतमस्तक मी तव चरणांशी टेकवितो हा माथा।
कष्टाचे या चीज होउ दे बळ दे इतुके आता
सुगी दिसू दे धन्यास माझ्या तूच तयाचा त्राता ||
                 ★  सुरेश इंगोले। ★

Monday 13 August 2018

  ★★  अंबू लंके  ★★


    तिचे नाव तसे अंबिका पण सगळे तिला अंबूच म्हणत. आईवडिलांची एकुलती एक कन्या म्हणून खूप लाडात वाढलेली. तिची प्रत्येक इच्छा पूर्ण होई. पण आईवडिलांचे संस्कार असे की कोणत्याही अवास्तव गोष्टींचा तिने कधी हट्ट केला नाही. अवखळ, बालिश, खोडकर असूनही तेवढीच सालस, समंजस आणि हुशार होती अंबू. सर्वांना हवीहवीशी वाटे ती. दुसऱ्यांना मदत करण्यात ती नेहमी आघाडीवर असे.

     खेळताना कोणाला मार लागला, खरचटले तर लगेच अंबूचे उपचार सुरू होत. तिला ब-याच घरगुती औषधांची माहिती होती. तिचे वडील आबासाहेब लंके हे त्या काळातील अमरावतीचे नावाजलेले वैद्य होते. ते रुग्णांची नाडीपरीक्षा करताना अंबू जवळच असायची. प्रश्न विचारून त्यांना भंडावून सोडायची. औषधांची माहिती करून घ्यायची. बँडेज बांधणे, पट्टी बदलणे ही कामे ती उत्स्फूर्तपणे करीत असे. जसजशी ती मोठी होऊ लागली तसतशी तिची या विषयात रुची वाढू लागली.
      तो काळ गुलामगिरीचा होता. स्त्रियांना शिक्षण घेणे वर्ज्य होते. धर्मांधतेचा पगडा जनमानसावर घट्ट रोवलेला होता. करणी, भानामती, जादूटोणा, दृष्ट लागणे, बाहेरबाधा यावर लोकांचा दृढ विश्वास होता. आजारातून बरे होण्यासाठी मांत्रिक-तांत्रिकांना पाचारण केले जाई. लोकांच्या या मानसिकतेमुळे अपमृत्युचे प्रमाण खूप वाढले होते.

      लोकांना या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी आबासाहेब सतत प्रयत्नशील असायचे. त्यांची तळमळ आणि तडफड अंबू पाहत असे. ती सुद्धा त्यांच्या प्रयत्नात पुरेपूर हातभार लावत असे.

     रुग्णांची सेवा हे अंबूचे मुख्य ध्येय बनले होते. आता तिला परिसरातील सगळे ओळखू लागले होते. एकदा एक बाई अडली तेव्हा अंबूने सुईणीच्या मदतीने तिची सुटका केली होती.
आबासाहेबांना खूप आनंद झाला होता. हळूहळू लोक आबासाहेबांच्या घरी औषधोपचार घेण्यासाठी येऊ लागले. कधीकधी रोग्यांना बघण्यासाठी त्यांच्या घरी जावे लागायचे. तेव्हा त्यांच्यासोबत अंबू नेहमीच असायची. आबासाहेबांच्या उपचारासोबत अंबूची सेवा लोकांच्या मनात घर करू लागली.

       शाळेत न जाताही अंबूचे प्राथमिक शिक्षण आबासाहेबांनी घरीच शिक्षक ठेवून पूर्ण केले होते. इंग्रजी विषयाची तोंडओळख झाल्यावर तिला वाचनाची गोडी लागली. तिला फ्लॉरेन्स नाइटिंगेलचे चरित्र वाचून आपण तिच्यासारखे सेवाभावी कार्य करावे असे सतत वाटू लागले. एकोणिसाव्या शतकाचा तो काळ. युरोपमध्ये फ्लॉरेन्स नाइटिंगेलचे कार्य जोमात सुरू होते.

      एके दिवशी अंबू आबासाहेबांना म्हणाली, “ आबा, मला फ्लॉरेन्स नाइटिंगेलला भेटायचे आहे.” आबासाहेब चकितच झाले.
“त्यासाठी तुला इटलीला जावे लागेल.” आबासाहेब म्हणाले.
“ मला तिची भेट घ्यायचीच आहे.” अंबू निग्रहाने म्हणाली.
आबासाहेब ऐपतदार होतेच. दोन महिने व्यवसाय बंद ठेवायला त्यांची हरकत नव्हती. एकुलत्या एक कन्येचा हट्ट पुरवणे त्यांना महत्त्वाचे वाटले.

        एके दिवशी दोघेही जहाजाने प्रवासाला निघाले. युरोप दर्शन करताना इटलीतील मुक्कामात अखेर फ्लॉरेन्स नाइटिंगेलशी अंबूची भेट झाली. दुभाषाच्या मध्यस्थीने त्या दोघींचा संवाद आबासाहेब कौतुकाने ऐकत होते. फ्लॉरेन्सच्या कार्याने ते भारावले होते. अंबूविषयी त्यांना प्रेमाचे भरते आले.

    अमरावतीला परत आल्यावर अंबूचे सेवाकार्य जोमाने सुरू झाले. पंचक्रोशीत तिचे नाव दुमदुमू लागले.  आबासाहेबांची फोर्ड गाडी ड्रायव्हरसहित अंबूच्याच दिमतीला राहू लागली. इंग्रज सरकारला तिच्या सेवाकार्याची दखल घ्यावी लागली.

     एके दिवशी अंबूच्या नावाचा एक लखोटा आला. अंबूच्या कार्याचा गौरव करण्यासाठी सभा आयोजित करण्यात आली होती. तत्कालीन ब्रिटिश राणी अलेक्झांड्रिना विक्टोरिया जिने नुकताच एम्प्रेस ऑफ इंडिया म्हणून भारताचा कार्यभार सांभाळला होता तिच्या स्वाक्षरीचे मानपत्र कलेक्टर साहेब तिला प्रदान करणार होते.

      सभेला भरगच्च जनसमुदाय जमला होता. आबासाहेब व आऊसाहेबांच्या सोबत अंबूने सभागृहात प्रवेश करताच सर्वांनी टाळ्या वाजवून तिचे स्वागत केले..

       तिच्या कार्याच्या गौरवपर भाषणात कलेक्टर साहेबांनी एक घोषणा केली की सरकारतर्फे एक गाडी अंबूला बक्षीस देण्यात येत आहे. त्या गाडीवर तिचे नाव लिहिलेले असेल. टाळ्यांच्या कडकडाटात अंबूला मानपत्र व गाडीची चावी प्रदान करण्यात आली.

     गाडीवरचे आवरण काढताच सगळे कौतुकाने गाडीकडे पाहू लागले. गाडीवर रेडक्रॉसचे चिन्ह होते. त्याखाली मोठ्या अक्षरात ‘ अंबू लंके ‘ इंग्रजीत लिहिले होते.
 “ आबा, येथे तरी अंबिका लिहायला हवे होते ना..” अंबू आबासाहेबांच्या कानात कुजबुजली.
“ अग, सगळे तुला अंबू म्हणूनच ओळखतात ना. ते असू दे. पण गोऱ्या साहेबाने आडनावाचे स्पेलिंग चुकवले. “ आबासाहेबांनी असे म्हणताच अंबूने पाहिले. लंकेचे स्पेलिंग LANKE  ऐवजी LANCE असे लिहिले होते. आणि पेंटरच्या अकलेने अंबू व लंके यातले अंतरही मिटवून टाकले होते. ठळक अक्षरात तेथे लिहिले होते……

           AMBULANCE

ब्रिटिशांच्या उच्चारामुळे बिचारी अंबू लंके तेव्हापासून अँबुलन्स म्हणून ओळखली जाऊ लागली.

                                 ★ © सुरेश इंगोले। ★

Wednesday 8 August 2018


          ★★      एस्टीचा लाल डब्बा    ★★

खूप दिवसांनी एस्टीच्या लाल डब्यात बसण्याचा योग आला. ती.आईच्या वर्षश्राद्ध निमित्ताने गावी जायला निघालो.

आम्ही दोघेही शहापुरहून नागपूरला कारने आलो. मुलाला काम होते म्हणून तो आम्हाला बस स्टँडवर सोडून कार घेऊन गेला.

दळणवळण क्षेत्रात सोयी सुविधा देण्याच्या बाबतीत बरीच पावले उचलण्यात आली आली आहेत, त्यातलेच एक पाऊल म्हणजे शिवशाही !

    शिवशाहीने आम्ही वर्धेला आलो. हा प्रवास छानच झाला. गावी जाणारी बस नुकतीच गेल्याचे कळले. आता दीड तास पुढच्या गाडीसाठी थांबणे जीवावर आले होते. पुलगावला जाणारी बस लागलेली दिसली. म्हटले, थोडा फेरा पडेल पण वेळ तर वाचेल.

   तेव्हा लाल डब्यात बसून प्रवास करण्याचा योग फार दिवसांनी आलेला होता. आम्ही गाडीत बसलो.. तिकीट काढले. गाडी सुटली. गाडीत मोजून पंधरा प्रवासी होते. गाडी सुरू झाली आणि काही वेळातच तो खूप जुना अनुभव स्मृतीचे दार ठोठावू लागला.

   
रस्त्याची अवस्था अशी होती की खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे... कळायला मार्ग नव्हता. संपूर्ण गाडी खडखड वाजत होती. मिनिटा मिनिटाला गाडी उसळत होती. थोड्याच वेळात शरीराची सगळी हाडे खिळखिळी झाली.  क्षणाक्षणाला तोंडातून ' अरे बाप रे...अरे देवा...असे उद्गार बाहेर पडत होते. खडखडाटाच्या आवाजाने कानठळ्या बसल्या होत्या. तो पाऊण तास फारच जीवघेणा होता.

   एकदाची गाडी पुलगावला थांबली..पिशवीतले काही सामान खाली तर पडले नाही ना म्हणून सौ ने शंका काढली आणि मी सीटच्या खाली शोधू लागलो. एव्हाना सगळे उतरले होते. कंडक्टर सहज बोलला, "काका, काय शोधताय ?"

    एका तासातला अनुभव उत्स्फूर्तपणे मुखातून बाहेर पडला.
  " हाडं शोधतोय काही पडली तर नाही ना इकडे तिकडे... सगळी हाडं खिळखिळी झाली हो. बरं काही सापडली तर तुमच्या ऑफिसमध्ये जमा करा. घेऊन जाईन नंतर.."

     बिचा-याच्या चेह-यावरचे भाव पाहण्यासारखे होते..

  असा हा खूप दिवसांनी घेतलेला अनुभव. आणि प्रवासाचे उतरत्या क्रमाचे टप्पे. कार...शिवशाही... लाल डब्बा...आणि शेवटी खच्चून भरलेल्या ऑटोमधला घुसमटणारा प्रवास....

   निष्कर्ष एकच निघाला की बिचा-या ग्रामीण जनतेला लाल डब्याशिवाय अन्य पर्याय नाही. 

                                                ★★©  सुरेश इंगोले  ★★

Saturday 4 August 2018

एक मतला....एक शेर !

त्याच्या कुशीत आहे... आता खुशीत आहे..।
ही जिन्दगी सुखाच्या    वाटे  मुशीत  आहे...।

दिसतो कठोर मजला    माझा सखा परंतू...।
काळीज मात्र त्याचे     हे भुसभुशीत आहे...||
   
                            ★  © सुरेश इंगोले  ★
* रे मना *. 

*तुझ्यात मी अन् माझ्यामध्ये समाविष्ट तू...।*
*दिसते साधे तरी भासते अती क्लिष्ट तू...।*

*क्षणात हसते क्षणात रुसते वेडे जैसे*….
*मनधरणी ही केली परि कां असे रुष्ट तू...।*

*इच्छा नसता तुला हवे ते जरी आणले*..
*परी भासते अजुनी आहे असंतुष्ट तू….।*

*कसे सांग मी समजावू या मनास वेड्या*…
*हो खंबिर अन्  टाळ भविष्याचे अरिष्ट तू….।*

.                          ★★  © सुरेश इंगोले  ★★

Saturday 30 June 2018

★  कोडे   ★
 
        हल्लीच्या बुफेमध्ये पंगतीच्या जेवणाची मजा नाही. घाईघाईत सगळे पदार्थ वाढून घ्यायचे. उभ्या उभ्या खायचे व उरलेले उष्टे टाकून निघायचे. ना खाल्ल्याचे समाधान ना पोट भरल्याचे सुख..

         पंगतीत जेवण्याची मजाच काही और होती. बारसे, मुंज, वाढदिवस, लग्न… कार्यक्रम कोणताही असो, जेवणाची पंगत असायची. मंडपात स्वादिष्ट पदार्थांचा घमघमाट सुटलेला असायचा. लोक पानावर बसले की पदार्थ नेटकेपणाने वाढले जायचे. उदबत्त्यांचा सुवास दरवळायचा. मग कोणीतरी श्लोक म्हणून जेवणाला आरंभ करण्याची सूचना करायचा.  भोजन सुरू असताना श्लोक म्हणण्याची चढाओढ लागायची.

        आमच्या खेड्यात बाला क्षीरसागर नावाचा आचारी होता. चविष्ट स्वयंपाक करण्यात त्याचा हात कोणीच धरत नसे. पंगत सुरू करणारा पहिला श्लोक तोच म्हणायचा.
   ‘ जेवा हो जेवा वरणभात पोळी..
     वांग्याची भाजी तोंडाले लावा..
     कढीचा भुरका मजेत घ्यावा..
     सैंपाक करणा-याले आशीर्वाद द्यावा..
         पुंडलीक वरदा हारी विठ्ठल……..
पंगत जेवण सुरु करायची. की लगेच..गोविंदराव म्हणा श्लोक..
आवाज यायचा. दामोदरपंत होऊ द्या श्लोक… आणि मग श्लोक म्हणण्याची अहमहमिका सुरू होई..

        एकदा एका पंगतीत एका व्यक्तीने एक श्लोक म्हटला. आणि त्याचा अर्थ सांगण्याचे आव्हान दिले. काही दिवसांनी पुन्हा भोजनयोग येताच त्यांनी तोच श्लोक म्हटला. यावेळी मी त्यांना अर्थ सांगून माझी पाठ थोपटून घेतली.

     तर मंडळी….सादर आहे तोच श्लोक !

   “ कोणी एक वनी विचित्र पुतळा जेवावया बैसला ।
    पात्री भोजन जेविता अति त्वरे पात्रेचि त्या भक्षिला ।
    त्याची ती वनिता वनात फिरता सूर्यास प्रार्थी सदा ।
    बोले विठ्ठल हा पदार्थ उमगा...षण्मासीचा वायदा || “

      श्लोक रचयिता विठ्ठल पंतांनी षण्मासीचा म्हणजे सहा महिन्याचा वायदा केला तेव्हाची गोष्ट निराळी होती. काबाडकष्ट करणा-यांना वेळ काढणे जिकिरीचे असायचे. आपली गोष्ट तशी नाही. आपण तर अधूनमधून फेसबुकवर पडीकच असतो. आणि त्या पिढीपेक्षा आपण सवाईने हुशारही आहोत.

       तर बघू या...कोण याचा नेमका अर्थ सांगतो ते…

         ..                              ★  सुरेश इंगोले  ★

(अर्थ ः- श्लोकात रूपक दडलेले आहे.
              भुंगा फुलामध्ये मध घ्यायला बसतो. तेव्हा अंधार पडताच फुलाच्या पाकळ्या मिटून तो तेथे अडकतो. त्याची पत्नी सूर्याची प्रार्थना करते की तू उगवशील तेव्हा पाकळ्या उमलून भुंग्याची सुटका होईल.
शेवटच्या ओळीत श्लोक रचयिता विठ्ठल कवी हे कोडे उलगडायला सहा महिन्यांची मुदत देतात.)

Monday 25 June 2018

    #प्रौढत्वी_निज_शैशवास_जपणे…

             परिवर्तन हा जगाचा नियम आहे. वय वाढतं तसा शारीरिक बदल होऊ लागतो. बाल्यावस्था, किशोरावस्था, कुमारावस्था असा प्रवास करीत आपण यौवनात पदार्पण करतो. मुसमुसते तारुण्य सर्वांनाच हवेहवेसे वाटते. पौगंडावस्थेपासून तो प्रगल्भावस्थेपर्यंत हा प्रवास म्हणजे जीवनातला संस्मरणीय कालखंड असतो. आपण जगलेले तारुण्य आपलेच असते. त्याची दुस-याच्या तारुण्याशी तुलनाच होऊ शकत नाही.

          पण माणूस चिरंतन तरुण राहू शकतो काय? प्रत्येकाचे उत्तर नाही असेच असेल. कसे शक्य आहे? वय वाढतं तशा जबाबदा-या वाढतात. लग्न, अपत्यप्राप्ती, नोकरी-व्यवसाय, मुलांची शिक्षणं, त्यांचे लग्न, आईवडिलांचे आजारपण, आपल्या तब्येतीच्या कुरबुरी…..एक ना अनेक जबाबदा-या पेलता पेलता माणूस ओझ्याने, काळजीने वाकतो...खंगतो. नाना प्रकारच्या चिंतांनी पोखरला जातो. अकाली वृद्धत्व येतं. केस पांढरे होतात, टक्कल पडू लागतं. त्वचा काळवंडते, सैल पडू लागते. सुरकुत्यांनी चेहरा झाकोळला जातो.

           होतं ना असं…? ..असंच होतं !

कारण आपण मनाने खंगलो असतो. हे सगळे बदल मनाने स्वीकारले असतात. शारीरिक बदलांमध्ये मानसिक अवस्थेचा फार मोठा सहभाग असतो. छोट्यामोठ्या संकटांनी मन खचून जाते. परत उभारी घेणे सर्वांनाच शक्य नसते. मनाच्या विषण्णतेचा शरीरावर परिणाम होतो. याचा प्रत्यय तेव्हा येऊ शकतो जेव्हा एखादी व्यक्ती मोठ्या गंभीर आजारातून उपचाराला प्रतिसाद देत लवकर ठणठणीत होते तर एखादी व्यक्ती छोट्याशा आाजारातूनही लवकर बरी होत नाही.

             नकारात्मकता जर प्रयत्नपूर्वक काढून टाकली आणि सकारात्मकता धारण केली तर हे सहज शक्य होते. अर्थात यासाठी नेटाने अथक प्रयत्न करावे लागतात.

            लहान मुलांत रमणे, साठी उलटल्यावरही तरुणांशी संवाद साधणे, त्यांच्या संगतीत त्यांच्या विचारांशी तादात्म्य पावून त्यांच्या सहवासात वेळ घालवणे या कृतींनी त्यांची तरुण सळसळती ऊर्जा आपल्याला मिळत असते. मनाने आपण तरुण होत जातो. शरीर जरी थकले असले तरी मन तरुण असते. मंद हालचालीमध्ये हळूहळू तरतरी येऊ लागते. भरपूर पाणी पिणे, माफक व्यायाम व शारीरिक हालचाली करणे, योगा करणे या गोष्टी सकारात्मकता वाढवतात. अभी तो दिल जवान है...असे वाटणे म्हणजे लढाई जिंकलीच समजा….

       ****
              परवा दुपारी अर्जंट खरेदीसाठी आम्ही शहरातील दुकानात गेलो. सौ आतमधे साड्या पाहत होती व मी काउंटरजवळ मालकाशी गप्पा मारत होतो. मागून आवाज आला,’ दादा, थोडं सरकता का?’ मी लक्ष दिलं नाही. परत आवाज आला,’ अहो भाऊ, थोडं बाजूला व्हा ना..’मी मागे वळून पाहिले. विशीतली एक मुलगी मलाच संंबोधत होती.  मला नेहमी काका ऐकायची सवय होती. भाऊ किंवा दादा म्हणजे जरा अतीच नव्हे का ! मी लगेच दुकानातल्या आरशात पाहिले. डोक्यावर पीकॅप असल्यामुळे टक्कल झाकलेले होते.. दुकानमालकाने हळूच चिमटा काढला…”अभी भी जवान लगते हो सर !”

★★★ सुरेश इंगोले

Thursday 21 June 2018

        ★ भूकंप ★


      मुंबईला नोकरी करीत असताना मी दादरला राहत असे. रोज 9.35 च्या लोकलने व्हीटीला जात असे. माझा रुम पार्टनर होता सुधाकर मुदलियार. माझ्या दुप्पट वयाचा. मी विशीचा तर तो चाळिशीचा. फार प्रेमळ होता. माझ्यावर त्याचा फार जीव. वय वाढले पण राहायची सोय नसल्यामुळे बिचारा लग्न करू शकत नव्हता. गर्लफ्रेंडसोबत त्याला दादरच्या चौपाटीवर मी बरेचदा पाहिले होते. पण मी मुद्दाम त्यांच्या समोर जात नव्हतो. एकदा मी दिसल्यावर त्याने हाक मारून बोलावले व तिची ओळख करून दिली होती. त्याला साजेशीच होती ती. काळी सावळी पण रेखीव. ख्रिश्चन होती बहुधा. फ्रेनी होते तिचे नाव. दोघेही घराच्या विवंचनेत असायचे.

         तो बहुधा रोजच आंटीच्या गुत्त्यावर जायचा. मला याची जाणीव नव्हती.. एकदा रात्रीचे दहा वाजून गेले तरी तो आला नाही. मी काळजीने चौकशी केली तेव्हा शेजारचा चंदू मला गुत्त्यावर घेऊन गेला. मला पाहून सुधाकर भडकला. मला कशाला आणले म्हणून चंदूला रागावला. तुझ्याच काळजीने तो बेजार झाला असे चंदूने सांगताच त्याने मला तेथेच मिठी मारली. आपली काळजी करणारे कुणीतरी आहे या भावनेने तो बराच बदलला.

        एकदा माटुंगा - दादर दरम्यान दोन लोकलची टक्कर झाली. हाहाकार माजला. मी त्याच लोकलने व्हीटीला.जायचो. रेल्वे रुळांवरून चालत जात आम्ही काही सहप्रवासी अपघातस्थळी पोचलो. तेथील द्रुष्य भयानक होते. प्रेतांचा खच पडला होता. पोलीस, बाजूच्या झोपडपट्टीतले लोक प्रेताच्या खिशातला ऐवज, घड्याळ, दागिने काढून प्रेताला ढिगावर फेकून देत. पाहूनच अंगावर काटा आला. मी ऑफिसला गेलोच नाही. कर्णोपकर्णी बातमी पसरताच सुधाकर काळजीत पडला. मी त्याच लोकलने जायचो हे त्याला माहीत होते. त्याने माझ्या ऑफिसला फोन लावला. मी ऑफिसला आलोच नाही व काही निरोपही नाही हे कळताच तो कामावरुन तडक दादरला रुमवर आला. दार वाजले तसा मी उठलो व दार उघडले. मी समोर दिसताच त्याने एक माझ्या कानाखाली लावली व शिव्या देऊ लागला. मी गालावर हात ठेवून ऐकत राहिलो. अपघात पाहून मला जबरदस्त धक्का बसला होता. घरापासून, आईवडील भावंडापासून शेकडो मैल दूर आपली चौकशी करणारे कोण आहे या विचाराने मन विषण्ण झाले होते. सुधाकरच्या मायेपोटी मारलेल्या फटक्याने मी भारावलो व त्याला मिठी मारून रडू लागलो.

        ऑफिसमधील माझे जिवलग मित्र अर्थात विदर्भातले… डोंबिवलीला रेल्वे क्वार्टरमध्ये एक खोली किरायाने घेऊन राहू लागले. दत्तूने वहिनींना व मुलीला आणले. अल्पावधीतच अंजूने मला खूप लळा लावला. वहिनींच्या हातचे घरगुती जेवण मला खुणावू लागले. मग माझा मुक्काम दादरला कमी व डोंबिवलीला जास्त होऊ लागला. गजूने त्याच्या बायकोला माहेरी पाठवल्यामुळे मी त्याच्या रुमवर राहू शकत होतो. त्यामुळे मी आता डोंबिवलीत जास्त रमू लागलो.

        दादरच्या रुमवर एक लोखंडी पलंग होता. तो रुममालकाचा होता व रुममालक माझा गाववाला असल्यामुळे त्याने तो मला वापरायला दिला होता. सुधाकर त्याची पथारी खाली टाकत असे. पण ज्या दिवशी मी डोंबिवलीला मुक्कामाने जायचो त्या दिवशी सुधाकर पलंगावर झोपायचा. डोंबिवलीला जाताना त्याला सांगून जायचे हा अलिखित नियम बनला होता.
          
      डिसेंबर 1967 ची घटना. ऑफिस सुटताच मी, गजू व दत्तू व्हीटीला निघालो. धावतपळत एका डब्यात निवांत जागा पकडली. गाडीने भायखळा सोडले व एकाएकी दत्तूने मला सांगितले की आज वहिनीनी श्रीखंड केले आहे. गोड पदार्थ हा माझा वीक पॉईंट..दोघेही आग्रह करू लागले.
“ अरे, पण मी सुधाकरला कळवले नाही ना..” मी अयशस्वी प्रयत्न केला. पण शेवटी श्रीखंडाचा विजय झालाच..रात्री मस्त जेवण झाले. अंजूला थोपटून झोपवून दिल्यावर मी गजूच्या रुमवर झोपायला आलो.

       रात्री दोनच्या सुमारास गाढ झोपेत असताना एकाएकी फळीवरली भांडी धडाधड आमच्या अंगावर पडली. मी दचकून.. घाबरून उठून बसलो. वीज गेली होती. बाहेर गलका ऐकू येत होता. मी गजूला गदगदा हालविले. पण तो ढिम्म हलायला तयार नव्हता. तसेही त्याला लाथ घातल्याशिवाय तो उठतच नसे..शेवटी लाथ मारून उठवले व दोघेही बाहेर आलो. रेल्वे कॉलनीतले सगळेजण घाबरुन मोकळ्या जागी गोळा झाले होते. भूकंपाचा जोरदार धक्का बसल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्याच क्षणी पुन्हा एक जबर धक्का बसला व आम्ही जागीच हेलपाटलो. पहाट होईपर्यंत आम्ही बाहेरच होतो.  

       दुस-या दिवशी सगळीकडे भूकंपाच्याच बातम्या. कोयनानगरला तीव्र स्वरूपाचा भूकंप झाला होता. त्याचे क्षेत्र मुंबईपर्यंत पसरले होते. ऑफिसमध्ये असताना दुपारी साडेबाराच्या सुमारास पुन्हा एक सौम्य धक्का जाणवला होता.

       पाचच्या सुमारास मी दादरला रुमवर आलो. जिना चढत असतानाच जाणवले की प्रत्येक जण माझ्याकडे विस्मयचकित नजरेने बघतो आहे. शेजारी राहणारे भाटकर मला म्हणाले देखिल…”सुरेशभाई, शंभर वर्षांचे आयुष्य आहे तुम्हाला.” काय झाले मला काही कळेना..माझ्या रुममध्ये बघ्यांची गर्दी जमली होती. माझ्या छातीत धस्स झाले. काही विपरीत तर घडले नाही ना...मला पाहताच गर्दीने मला जागा करून दिली. सुधाकरचे माझ्याकडे लक्ष जाताच मला विळखा घालून तो आवळू लागला. जणू मी त्याला सोडून जाणार होतो. प्रत्येक जण पलंगावर पाहत होता. माझे तिकडे लक्ष गेले आणि मी मटकन खालीच बसलो.

        पलंगावर उशीच्या मधोमध छताचा मोठ्ठा तुकडा...दहा पंधरा किलो वजनाचा.. पडला होता. पलंगाचा तेवढा भाग पोचा पडून  दबला होता. जो कोणी तेथे झोपला असता त्याच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला असता.

          अचानक डोंबिवलीला गेल्यामुळे मी बचावलो होतो. ...आणि सुधाकरला मी न कळवल्यामुळे तो पलंगावर झोपला नाही म्हणून तोही बचावला होता…

       अखेर देव तारी त्याला.।।।।।।।।


                               ★ .सुरेश इंगोले ★

Saturday 19 May 2018

#लमच्या

पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली हे जिल्हे झाडी पट्टी म्हणून ओळखले जातात. या भागात अतिशय दाट जंगल आहे. याच भागात चंद्रपुरजवळचे ताडोबा -अंधारी, उमरेड - करांडला, भंडाराजवळचे कोका - नागझिरा हे  व्याघ्रप्रकल्प प्रसिद्ध आहेत. दाट वनराईला झाडी म्हणतात. आणि हा भाग झाडीपट्टी म्हणून प्रसिद्ध आहे. येथल्या बोलीला झाडीबोली असे म्हणतात.

         या जिल्ह्यांना लागूनच असलेल्या मध्यप्रदेश, छत्तीसगड, आंध्रप्रदेश येथल्या भाषेचा प्रभाव स्थानिक मराठीवर पडलेला दिसून येतो. इथल्या भाषेत बरेचसे शब्द हिंदीतून आलेले आहेत. उच्चारसुद्धा हिंदीशी साधर्म्य साधून असतात. च ला च्य, ज ला ज्य, झ ला झ्य सामान्यपणे सगळीकडे उच्चारले जातात. बाहेरून येणा-या मराठी भाषिकाला ऐकताक्षणी हा फरक प्रकर्षाने जाणवतो.

           नवख्या मराठी भाषिकास वारंवार ऐकू येणारा एक सर्वसामान्य शब्द आहे...लमच्या !
       लमच्या, लमची हे शब्द एवढे रूढ झालेले आहेत की प्रत्येकाच्या बोलण्यात... प्रत्येक वाक्यात येत असतात.

---लमच्यानं अजून पैसे देल्ले न्हाई..

---- लमची ..गाडीबी बेज्या लेट हाये...

--- तुले सांगलो ना बे लमच्या ...उद्या ये म्हून...

--- हत् लमचं....आजई काई काम व्हत न्हाई...

--- आमदाराच्या मांगं मांगं कुत्र्यावानी फिरतेत लमचे...

                हा एवढा सार्वकालिक शब्द आला कुठून....?
मी भंडारा जिल्ह्यात नोकरीस लागलो आणि झाडीबोलीच्या अनेक शब्दांनी हैराण झालो. मुंबई, पुणे, खानदेश, कोकण सगळीकडे स्वैर संचारामुळे मला मराठीची सगळी रूपे अवगत झाली होती. पण हे फार विचित्र वाटत होते. हिंदीचा प्रभाव पदोपदी जाणवत होता. प्रचलित शब्दांची मूळ रुपे जाणून घेण्याची जिज्ञासा स्वस्थ बसू देत नव्हती. चिकाटीने मी त्यामागे लागलो.

          लमचा/लमची या शब्दाचे मूळ राजेशाहीत दडले आहे. राजाच्या राणीवशात अनेक राण्या असत. त्या व्यतिरिक्त दासी, बटीक यांच्याशी सुद्धा राजाचे संबंध असत. त्यांना राजापासून होणारे अपत्य दासीपुत्र, बटीकपुत्र मानले जात. इतिहासात याचे अनेक दाखले आहेत. त्यांच्या मुलांना ' बटकीचा' म्हणून संभावना केली जाई.

           मोगलकाळात दासींना लवंडी / लौंडी म्हटले जाई. दास, गुलाम यांना लौंडा/लवंडा म्हटले जाई. त्यामुळे दासींच्या मुलांमुलींना लवंडीचा / लवंडीची असे संबोधन मिळू लागले. कालांतराने हेच शब्द अपभ्रंश होऊन लमचा / लमची असे वापरले जाऊ लागले.
       
          *****      *****       *****

---हत् लमचं....येक घंटा टाईम लागला हे लिवाले....


                                         ***  सुरेश इंगोले. ***
#ब्येस_!!

भाषा हे संवादाचे माध्यम आहे. त्यांत नित्य नवी भर पडत असते. निरनिराळ्या भाषेतील शब्द कधी तत्सम कधी तद्भव स्वरुपात दाखल होत असतात. आपले अस्तित्व टिकवून ठेवतात.अशा निरनिराळ्या भाषेतील शब्दांनी आपली भाषा समृद्ध होत जाते.

     भारतावर राज्य करणा-या वेगवेगळ्या राज्यकर्त्यांनी आपापल्या भाषेतील शब्द प्राकृत मराठीत आणले. फारसी, उर्दू, इंग्रजी, फ्रेंच, पोर्तुगीज या भाषेतील कित्येक शब्द मराठीत दाखल झाले. रुजले, रुळले. प्रचलित झाले...रूढ झाले.

       आपल्या भाषेची गंमत ही की आपण मूळ शब्दांचा नीट उच्चार न करू शकल्यामुळे त्या शब्दांचे अपभ्रंश होऊन अर्थही बदलत गेले. आणि त्या बदललेल्या अर्थानेच ते शब्द आपण वापरतो.

            तर...... आजचा पहिला शब्द आहे ..ब्येस !
इंग्रजीतला BEST हा अतिशय.चांगला या अर्थाचा शब्द मराठीत सुरवातीला त्याच अर्थाने दाखल झाला. गो-या लोकांबरोबर स्थानिक उच्चशिक्षित, नंतर शिक्षित अशा लोकांनी हा शब्द वापरायला सुरवात केली.
... __ काय रे, किती मार्क मिळाले तिमाहीत ?
---- पंच्याऐंशी टक्के मिळाले अण्णा.
____ वा..वा...वा...बेस्ट ! अशीच प्रगती होऊ दे..

******         ******        ******       *******

_____ धोंडिबा, काय मग औंदा पीकपाणी कसं काय ?
______ तात्या, पाऊस चांगला येतोय. भरपूर पिकणार बरं शेती...
______ वा...वा... हे लई ब्येस व्हनार बरं... पोरीचं लगीन उरकतं की औंदा..

        हळूहळू ' ब्येस ' हा शब्द सामान्य जनमानसात एवढा रूढ झाला की तो बोथट होऊ लागला. त्याचा मूळ अर्थ नाहीसा होऊ लागला. आता ही उदाहरणे पहा....व ब्येस या शब्दाचे अर्थ पहा.....

___ काय गोविंदराव, काल शकूला पहायला मुलगा आला होता म्हणे... कसा आहे मुलगा ?
____ तेवढा काही साजरा न्हाई..पन ब्येस हाये...म्याटरीक झाला म्हंतेत...

_____ कशी झाली जवाई भाजी ? तुमाले आवडते म्हून केली खास..
_____ तशी ब्येस झाली...पन आमाशिक अयनी वाट्टे. तिखट मीठ कमी टाकलं वाट्टे तुमी....

____ कसा झाला आमच्या बालीचा डान्स ?
____ब्येस झाला....पन थे दुसरी पोरगी साजरी नाचत व्हती बॉ....!

*****
         आता मला सांगा...ब्येस चा हा अर्थ इंग्रजांना कळला असता तर .....
चुल्लूभर पानी में डूब के....खुदकुशी....केली असती ना !

++#पुढच्यावेळी_दुसरा_शब्द
                                                   ** सुरेश इंगोले **

Friday 27 April 2018

#पुढच्यास ठेच_मागचा शहाणा

कुठल्या तरी कार्यक्रमाला जायचे होते. तयारी करून मित्राकडे गेलो. मला पाहताच त्याने खुंटीवरील कपडे काढले व घालू लागला. कपडे घालून होताच तो चपला घालणार तोच...

      .....त्याने अंगात काहीतरी संचारल्यासारखे थयथय नाचणे सुरू केले. आम्ही चकितच झालो. हे काय भलतेच ! तो अंगावरील कपडे ओरबाडू लागला. घाईघाईत शर्ट काढून फेकले. नाचत नाचतच पँट काढली आणि जोरजोरात झटकू लागला. ....आणि...पँटीतून एक पाल बाहेर पडली. ई...करीत सगळेच चित्कारले.

         त्याने पँट व शर्ट तीन तीनदा जोरजोरात झटकले.
" अरे, निघाली ना पाल ? आता काय तिची पिल्ले असतील का ?"  आम्ही त्याला हसत हसत टोकले.  पुन्हा कपडे चढवून तो आमच्यााबरोबर निघाला.

      ***
              या घटनेला कित्येक वर्षे लोटली.
आजही मी कपडे चढवताना आधी चांगले झटकून घेतो. सवयच लागली आहे जणू...न जाणो. ...एखादी पाल, किडा, झुरळ काहीतरी आत असले तर.....

                                  ***  सुरेश इंगोले. ***

Saturday 10 March 2018

** आक्रित **

       आकाशात मळभ दाटून आले होते. पावसाचे दिवस नव्हते. मार्च महिन्यात थंडी कमी होत जाऊन उन्हाची तीव्रता वाढायला सुरुवात होते. विदर्भाचा उन्हाळा तसाही रखरखीतच. पण चैत्राची चाहूल मन उल्हसित करते. झाडांना नवीन पालवी फुटू लागते.

           पण कां कोण जाणे...या दोन तीन दिवसात वातावरण बदलले होते. कसे उदास वाटत होते.

             टाकीतले पाणी संपल्याची वर्दी आली. मी विहिरीवरचा मोटरपंप सुरू केला. आठ दहा मिनिटात टाकी भरते. पण पाचच मिनिटात विहिरीतून आवाज येऊ लागला. मी तडक जाऊन पाहिले. विहीर कोरडी पडू लागली होती. पंप उघडा पडला होता. पटकन पंप बंद केला. पोर्चमध्ये बसून विचार करू लागलो.

               या वर्षी मार्चमध्येच विहीर कोरडी होऊ लागली होती. पाण्याची पातळी खूप खोल गेल्याचे जाणवत होते. पूर्व विदर्भात ब-याच गावांमध्ये पाणी विकत घेतले जात असल्याच्या बातम्या कानावर येत होत्या. दक्षिण आफ्रिकेत पाण्याअभावी कित्येक गावे ओस पडू लागल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. ग्लोबल वार्मिंगचा विळखा आवळू लागल्याचीे जाणीव कासावीस करीत होती.

                रात्री जेवण झाल्यावर झोपण्यापुर्वी बातम्या पाहत होतो. ठिकठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष्य दाखवणा-या बातम्या पाहून मन विटून गेले. टीव्ही बंद करून झोपी गेलो.

                कसल्याशा कोलाहलाने जाग आली. काय झाले असावे हा विचार करीतच दार उघडले. पाहतो तर जागोजागी लोक घोळक्याने चर्चा करीत असलेले. चिंताक्रांत चेहरे पाहून मला कळेना काय झाले असे एकाएकी…..

                 पायात चपला घालून मी बाहेर आलो. मला पाहून एकजण पुढे आला.
-- काय झाले?...मी विचारले.
-- अहो सर, गावातल्या सर्व विहिरी रात्रीतून आटल्या.
-- काय? असे कसे शक्य आहे?
-- हो..सकाळपासून पाण्यासाठी धावाधाव सुरु आहे. कुठेच पाण्याचा थेंबही  मिळाला नाही. तुमची विहीर बघा विश्वास नसेल तर…

             मी लगबगीने विहिरीजवळ येऊन वाकून पाहिले. रात्रीतून चार पाच फूट पाणी आले असेल याची खात्री होती. पण हे काय? विहीर कोरडी ठक्क
होती. म्हणजे बातमी खरी होती तर….

            मला गरगरल्यासारखे झाले. हे देवा ! हे काय आक्रित घडते आहे...पाण्याअभावी तडफडून मारणार आहेस का सर्वांना….पाणी हेच जीवन मानतो आपण. हे जीवनच संपणार आता. पत्नी माझ्याजवळ येऊन बसली होती. तिला सर्व घटना कळल्या होत्या. कोणी कोणाला धीर द्यायचा हेच कळत नव्हते.

               टाकीत असलेले पाणी अत्यंत जपून वापरू या एवढाच निष्कर्ष तूर्तास निघाला होता. कसेबसे प्रातर्विधी व आन्हिके उरकून मी मोठ्या मुलास फोन लावला. येथले वर्तमान त्याला कसे कळवावे हा विचार करीत असतानाच तो घाब-या आवाजात बोलला,
“ अहो बाबा, आता तुम्हालाच फोन करणार होतो. एक भयंकर आक्रित घडलं आहे. रात्रीतून एकाएकी संपूर्ण शहरातील पाणी आटले आहे. पाण्यासाठी धावाधाव सुरु आहे. मी सकाळी वीस लिटरची कॅन आणली होती. बातमी कळल्यावर पुन्हा एखादी आणून ठेवावी म्हणून गेलो तर तो अडीचशे रुपये म्हणाला. “
“ मी त्यासाठीच फोन केला होता. येथेही तशीच परिस्थिती आहे. गावोगावी पाण्यासाठी धुमाकूळ सुरू आहे. आता भय्याला फोन करतो. तेथेही हंगामाच सुरू आसेल.”

         बराच वेळ आम्ही निष्फळ चर्चा करीत बसलो. थोड्या वेळाने मी मधल्या मुलाला फोन केला. बराच वेळ झाला तरी कोणी फोन उचलेना.
गाडी काढून त्याच्याकडे जायचा विचार करणार तोच लोकांनी रस्ते वाहतुक बंद पाडल्याच्या  बातम्या येऊ लागल्या. टीव्ही लावायची भीती वाटू लागली.

         सगळीकडे हाहाकार माजला होता. पाणी जनजीवनातून गायब झाले होते. पाण्यासाठी लोक काहीही करायला तयार झाले होते.

           अचानक फोन वाजला. भय्याचाच फोन होता. मी चटकन फोन कानाला लावला.
“ बाबा,” एवढेच बोलून तो गप्प झाला. रडवेला स्वर आणि भावना आवरण्याचा असफल प्रयत्न स्पष्ट जाणवत होता. मी त्याला इथल्या घटना सांगितल्या. तो बोलू लागला आणि तेथील विदारक परिस्थिती काळजाला घरे पाडू लागली. त्याच्या घरातील पाणी संपले होते व त्याची मुले पाण्यासाठी आकांत करीत होती. बाहेर पाणी मिळवण्याचा त्याने प्रयत्न केला. मोठ्या कसोशीने त्याला दीडशे रुपये देऊन एक बिसलेरीची बाटली मिळाली होती. घरी येताच दोन्ही मुलांनी तीवर झडप घातली व झटापटीत बाटली खाली पडून सांडली होती. मग धपाटे, ओरडणे या धांदलीत मोठ्या मुलाने उरलेली बाटली तोंडाला लावली होती. आता धाकट्याचा पाण्यासाठी आक्रोश सुरु होता. फोनमधून त्याचा तो आकांत ऐकवेना. पाणी घेऊन येतो असे सांगून मी फोन बंद केला. पत्नीने लगेच दोन-तीन बाटल्या मोठ्या पर्समध्ये टाकल्या. घराला कुलूप लावून मी स्कूटी बाहेर काढली.

          बाहेर रस्त्यावर सगळीकडे गर्दी, गोंधळ व झटापटी सुरु होत्या. गाडी चालवणे दुरापास्त झाले होते. कशीबशी वाट काढत होतो तेवढ्यात एका घोळक्याने गाडी अडविली. पाणी...पाणी...असे ते ओरडत होते. अनवधानाने पत्नीने पर्स पोटाशी घट्ट धरली. आणि घात झाला. एकाने झटक्यात पर्स ओढली. बाकीचे त्यावर तुटून पडले. तीनही पाण्याच्या बाटल्या त्यांच्या हाती लागल्या. आणि ओढाताणीत तीनही बाटल्या खाली पडून पाणी वाहू लागले. ते वाहणारे पाणी कोणी ओंजळीने प्यायचा प्रयत्न करू लागले. कोणी रस्त्यावरचे पाणी चाटू लागले.

       इकडे पत्नीने शेरू म्हणून टाहो फोडला आणि पाण्यासाठी हातपाय घासत ओक्साबोक्सी रडणारा शेरू डोळ्यासमोर येताच माझी शुद्ध हरपली……

        …...मी खडबडून उठून बसलो. शरीर थरथर कापत होते. मी माझ्याच बेडवर होतो. म्हणजे हे सारे स्वप्न होते तर….माय गॉड..!..मला सावरायला बराच वेळ लागला. पाण्याची धार पडत असल्याचा आवाज कानी आला व मी झटकन बाहेर आलो.

              सौ बेसिनजवळ ब्रश करीत होती व नळ सुरू होता. मी पुढे होऊन नळ बंद केला.
-- काय हो...काय झाले?
--- भांड्यात पाणी घेऊन दात घास . नळ सुरु ठेवू नकोस.
         ती फ्रेश होऊन येताच मी तिला माझे स्वप्न सविस्तर सांगितले. पाण्यासाठी तडफडणा-या शेरूचा भाग ऐकून ती शहारली.
“ यापुढे पाणी जपून वापरू या.,” ती खोल गेलेल्या आवाजात म्हणाली.

           एकाएकी बाहेर गलबला ऐकू येऊ लागला.
कसला गोंधळ आहे हे पाहण्यासाठी मी दार उघडले. लोक घोळक्या घोळक्याने चर्चा करीत होते. मला दाट शंका येऊ लागली. तेवढ्यात शेजारी लगबगीने विहिरीजवळ येऊन वाकून पाहू लागले. त्यांचा भकास चेहरा पाहून मी विचारले,” काय हो?”
“ दादा, टीव्हीवरच्या बातम्या पाहून मी घाबरून गेलो होतो. येऊन पाहिले तर विहीर साफ कोरडी. अहो, सा-या देशातले पाणी गडप झाले आहे. टीव्ही लावा…”
  पुढचे मला काहीच ऐकू आले नाही.

       …….         
                                      सुरेश इंगोले.
( It may happen one day. Be alert…! )

Saturday 3 March 2018

दिल...
तुम्हारे रूखेपन से
आहत होकर
आँखों से
बहने लगता है...
मायूस होकर
हमसे
कहने लगता है...
" तुमसे अपना प्यार
  कहा नही जाता....
   हम से ये दर्द
   सहा नही जाता.....।"

                           सुरेश इंगोले

Tuesday 27 February 2018

आम्ही प्रवासी घडीचे

प्रवास कधीच आणि कोणालाही चुकला नाही. सतत आपण कुठूनतरी कुठेतरी जात असतो. पृथ्वी, चंद्र, तारे हे खरे अविश्रांत प्रवासी. अथक चालणारे. गन्तव्यस्थान नसणारे. आपले गन्तव्य मात्र ठरलेले. घर ते कार्यालय ...शाळा, बाग, चित्रपटगृह, रंगमंदिर, मंडई....रोजचा प्रवास...

            लग्न, मुंज, बारसे, वाढदिवस, मरण, तेरावे...कितीतरी प्रसंगी प्रवास करावाच लागतो. निरनिराळ्या वाहनाने. दुचाकी, चारचाकी, बस, आगगाडी आणि विमानसुद्धा.. हल्ली प्रवासाला  कारण आणि साधन शोधावे लागत नाही. बाहेरचं जग खुणावत असतं. पहाड, दरी, हिरवाईने नटलेली सृष्टी, जगातली आश्चर्ये, जंगल, पशुपक्षी, सरोवर....निसर्ग साद घालत असतो..आपण हुंकार भरण्याची वाट पाहत !

            प्रवासाची तयारी करुन निघालो की सुखाचा प्रवास होण्यासाठी शुभेच्छांची बरसात होऊ लागते. हॅपी जर्नी, आपला प्रवास सुखाचा होवो, बॉन व्हॉयेज, आपकी यात्रा सुखमय हो इ.इ.
            प्रवासात असताना अधून मधून चौकशी करणारे फोन येतात. ख्यालीखुशाली विचारली जाते. क्षणाक्षणाची बित्तंबातमी देणारा भ्रमणध्वनी हा वर्तमानयुगाचा चमत्कार होय.

        ... पन्नास वर्षांपुर्वी किती वेगळी परिस्थिती होती ? प्रवासाची साधने तुटपुंजी होती. रेल्वे, बसगाड्या यांची संख्या फार कमी होती. जवळच्या ठिकाणी जायलासुद्धा खूप वेळ लागायचा. बाहेरगावी गेलेला माणूस परत घरी येईपर्यंत त्याची ख्यालीखुशाली कळत नसे. प्रवासाचे प्रसंग फार कमी येत. जवळचा प्रवास बैलगाड्यांनी केला जाई. पाचदहा मैलांचा प्रवास सायकलने होई. सारी नातलग मंडळी पंचक्रोशीच्या आतच राहायची. 

               दूरचा प्रवास करायचे प्रसंग क्वचितच येई. पण ते प्रसंग कायम लक्षात राहत. पेटी, होल्डॉल, वॉटरबॅग वगैरे सामान तयार असायचे. स्टेशनवर सोडायला बैलगाडी (दमणी) तयार असायची. आई हातावर दही घालायची. थोरांच्या पाया पडून होताच आजी पाठीवरून, गालावरून सुरकुतलेला हात फिरवत म्हणायची," बाबू, जपूून जाय. खिडकीच्या बाहेर हात नोको काढू. दारात नोको उभा राहू. बाहेरचं खाऊ नोको. डबा देल्ला हाये संगं. गावाले गेेल्यावर पत्रं टाकजो. जाय मा...सुखाचा राह्य.."
       
               सुखरूप पोहचल्याचे पत्र आठ दिवसांनी मिळायचे. तोवर इकडे सर्व व्यवहार सुरळीत चालायचे. कोणतेच अभद्र विचार कोणाच्याही मनात येत नसत. जगण्याला स्थैर्य होतं, सुरक्षितता होती. प्रवास खरोखर सुखाचा होत असे. त्यासाठी शुभेच्छा द्यायची गरज कोणालाच वाटत नसे.

            *   *    *    *     *    *     *     *      *    *

                आज आम्ही पुण्याहून नागपूरला जायला निघालो तेव्हा कुटुंबीय, शेजारी हॅपी जर्नीच्या शुभेच्छा देऊ लागले. ट्रॅव्हल्समध्ये बसल्यावर मुलाचा फोन आला. पोचताक्षणी फोन करा म्हणून सूचना मिळाल्या. त्यावरून हा सगळा प्रवासप्रपंच आठवला.

                                              ==+ सुरेश इंगोले  +===

राजभाषा मराठी

१९६६ मध्ये मराठीला राजभाषेचा दर्जा प्राप्त झाला आणि लगेचच सरकारी परिपत्रक आमच्या कार्यालयात येऊन धडकले. यापुढे कार्यालयाचे कामकाज मराठीतूनच व्हावे. आमचे संचालक श्री दारूवाला हे पारशी असल्यामुळे त्यांनी ते कदाचित न वाचताच आमच्या अवलोकनार्थ अग्रेषित केले. मी त्यावर मुद्दाम मराठीत स्वाक्षरी केली.
         मुंबईतील आमच्या कार्यालयाचे सगळे कामकाज इंग्रजीतच चालायचे. संचालकांशी संभाषण सुद्धा इंग्रजीतच करावे लागे. मराठीत कामकाज करणे म्हणजे कार्यालयीन पारिभाषिक शब्दांना पर्यायी शब्द शोधणे हे महाकठिण कर्म होते.
        मी आमच्या कार्यालयातला वयाने सर्वात लहान...केवळ एकोणीस वर्षांचा ! परिपक्वता आणि पोरकटपणा यांचे बेमालूम मिश्रण असलेला कर्मचारी.
        मी लगेचच सुटीचा अर्ज लिहिला. पारिभाषिक शब्दकोषाचा आधार घेऊन शुद्ध मराठीत अर्ज लिहून शिपायाकरवी पाठवून दिला. पारशीबावाची भंबेरी उडणार होती. हंगामा होणार होता. मी बोलावणे येण्याची वाट पाहू लागलो.
थोड्याच वेळाने शिपाई बोलवायला आला. मी आत गेलो.
(आता मला इंग्रजीचा आधार घ्यावाच लागेल.)
--What is this Mr. Ingole ?
-- Sir. Its my leave application.
-- Why didn't you write in English ?
--Sir, today we receive a circular mentioning the use of Marathi in daily routine work. So its my application in Marathi.
-- You know very well that I don't know Marathi.
-- Sir, please call Mr.Bhide to translate it. He is well educated among us.
      भिडे साहेबांना पाचारण करण्यात आले. दारुवाला साहेबांनी अर्ज त्यांच्याकडे टाकला.
      ते बराच वेळ अर्ज वाचत राहिले. माझ्याकडे करडी नजर टाकून म्हणाले," ही कोणती भाषा आहे ? "
      " मराठी.."
संचालक ?....Director
अंगुली मुद्रा केंद्र..?..Finger Print Bureau.
गुन्हा अन्वेषण विभाग ?..CID...Criminal Investigation Department.
माझा जबाब अशा पद्धतीने सुरु होता जणू मी फार मोठा गुन्हा केला होता.
पारिभाषिक शब्दांचे अर्थ विचारून झाल्यवर उरलेल्या अर्जाचा अर्थ सांगून जळजळीत नजरेने माझ्याकड पाहत भिडे साहेब निघून गेले.
             दारूवाला साहेब माझ्याकडे रोखून पाहत होते. अर्जावर स्वाक्षरी करीत ते म्हणाले, " Mr. Ingole, henceforth no Marathi..Only English."
---But Sir, the circular...."
--Forget it. I will send another circular tomorrow."

.........अशा त-हेने राजभाषेच्या परिपत्रकाचा त्याच दिवशी खून करण्यात आला. त्यानंतर बहुधा ते परिपत्रक बासनातच गुंडाळून राहिले असावे. कारण सीआयडी सहित सर्वच सरकारी कार्यालयांचे कामकाज आजतागायत इंग्रजीतूनच चालवले जात आहे. न्यायव्यवस्था हे याचे ज्वलंत उदाहरण आहे.
   
                                            **** सुरेश इंगोले ***

Monday 8 January 2018

मला मीच माझे हृदय अर्पिले बघ
तमा काय मजला तुझ्या स्पंदनांची ।
कितीही जरी तू मला टाळले ना
तरी प्रीत जुळली असे दो मनांची...॥