Saturday 30 June 2018

★  कोडे   ★
 
        हल्लीच्या बुफेमध्ये पंगतीच्या जेवणाची मजा नाही. घाईघाईत सगळे पदार्थ वाढून घ्यायचे. उभ्या उभ्या खायचे व उरलेले उष्टे टाकून निघायचे. ना खाल्ल्याचे समाधान ना पोट भरल्याचे सुख..

         पंगतीत जेवण्याची मजाच काही और होती. बारसे, मुंज, वाढदिवस, लग्न… कार्यक्रम कोणताही असो, जेवणाची पंगत असायची. मंडपात स्वादिष्ट पदार्थांचा घमघमाट सुटलेला असायचा. लोक पानावर बसले की पदार्थ नेटकेपणाने वाढले जायचे. उदबत्त्यांचा सुवास दरवळायचा. मग कोणीतरी श्लोक म्हणून जेवणाला आरंभ करण्याची सूचना करायचा.  भोजन सुरू असताना श्लोक म्हणण्याची चढाओढ लागायची.

        आमच्या खेड्यात बाला क्षीरसागर नावाचा आचारी होता. चविष्ट स्वयंपाक करण्यात त्याचा हात कोणीच धरत नसे. पंगत सुरू करणारा पहिला श्लोक तोच म्हणायचा.
   ‘ जेवा हो जेवा वरणभात पोळी..
     वांग्याची भाजी तोंडाले लावा..
     कढीचा भुरका मजेत घ्यावा..
     सैंपाक करणा-याले आशीर्वाद द्यावा..
         पुंडलीक वरदा हारी विठ्ठल……..
पंगत जेवण सुरु करायची. की लगेच..गोविंदराव म्हणा श्लोक..
आवाज यायचा. दामोदरपंत होऊ द्या श्लोक… आणि मग श्लोक म्हणण्याची अहमहमिका सुरू होई..

        एकदा एका पंगतीत एका व्यक्तीने एक श्लोक म्हटला. आणि त्याचा अर्थ सांगण्याचे आव्हान दिले. काही दिवसांनी पुन्हा भोजनयोग येताच त्यांनी तोच श्लोक म्हटला. यावेळी मी त्यांना अर्थ सांगून माझी पाठ थोपटून घेतली.

     तर मंडळी….सादर आहे तोच श्लोक !

   “ कोणी एक वनी विचित्र पुतळा जेवावया बैसला ।
    पात्री भोजन जेविता अति त्वरे पात्रेचि त्या भक्षिला ।
    त्याची ती वनिता वनात फिरता सूर्यास प्रार्थी सदा ।
    बोले विठ्ठल हा पदार्थ उमगा...षण्मासीचा वायदा || “

      श्लोक रचयिता विठ्ठल पंतांनी षण्मासीचा म्हणजे सहा महिन्याचा वायदा केला तेव्हाची गोष्ट निराळी होती. काबाडकष्ट करणा-यांना वेळ काढणे जिकिरीचे असायचे. आपली गोष्ट तशी नाही. आपण तर अधूनमधून फेसबुकवर पडीकच असतो. आणि त्या पिढीपेक्षा आपण सवाईने हुशारही आहोत.

       तर बघू या...कोण याचा नेमका अर्थ सांगतो ते…

         ..                              ★  सुरेश इंगोले  ★

(अर्थ ः- श्लोकात रूपक दडलेले आहे.
              भुंगा फुलामध्ये मध घ्यायला बसतो. तेव्हा अंधार पडताच फुलाच्या पाकळ्या मिटून तो तेथे अडकतो. त्याची पत्नी सूर्याची प्रार्थना करते की तू उगवशील तेव्हा पाकळ्या उमलून भुंग्याची सुटका होईल.
शेवटच्या ओळीत श्लोक रचयिता विठ्ठल कवी हे कोडे उलगडायला सहा महिन्यांची मुदत देतात.)

1 comment: