Monday 25 June 2018

    #प्रौढत्वी_निज_शैशवास_जपणे…

             परिवर्तन हा जगाचा नियम आहे. वय वाढतं तसा शारीरिक बदल होऊ लागतो. बाल्यावस्था, किशोरावस्था, कुमारावस्था असा प्रवास करीत आपण यौवनात पदार्पण करतो. मुसमुसते तारुण्य सर्वांनाच हवेहवेसे वाटते. पौगंडावस्थेपासून तो प्रगल्भावस्थेपर्यंत हा प्रवास म्हणजे जीवनातला संस्मरणीय कालखंड असतो. आपण जगलेले तारुण्य आपलेच असते. त्याची दुस-याच्या तारुण्याशी तुलनाच होऊ शकत नाही.

          पण माणूस चिरंतन तरुण राहू शकतो काय? प्रत्येकाचे उत्तर नाही असेच असेल. कसे शक्य आहे? वय वाढतं तशा जबाबदा-या वाढतात. लग्न, अपत्यप्राप्ती, नोकरी-व्यवसाय, मुलांची शिक्षणं, त्यांचे लग्न, आईवडिलांचे आजारपण, आपल्या तब्येतीच्या कुरबुरी…..एक ना अनेक जबाबदा-या पेलता पेलता माणूस ओझ्याने, काळजीने वाकतो...खंगतो. नाना प्रकारच्या चिंतांनी पोखरला जातो. अकाली वृद्धत्व येतं. केस पांढरे होतात, टक्कल पडू लागतं. त्वचा काळवंडते, सैल पडू लागते. सुरकुत्यांनी चेहरा झाकोळला जातो.

           होतं ना असं…? ..असंच होतं !

कारण आपण मनाने खंगलो असतो. हे सगळे बदल मनाने स्वीकारले असतात. शारीरिक बदलांमध्ये मानसिक अवस्थेचा फार मोठा सहभाग असतो. छोट्यामोठ्या संकटांनी मन खचून जाते. परत उभारी घेणे सर्वांनाच शक्य नसते. मनाच्या विषण्णतेचा शरीरावर परिणाम होतो. याचा प्रत्यय तेव्हा येऊ शकतो जेव्हा एखादी व्यक्ती मोठ्या गंभीर आजारातून उपचाराला प्रतिसाद देत लवकर ठणठणीत होते तर एखादी व्यक्ती छोट्याशा आाजारातूनही लवकर बरी होत नाही.

             नकारात्मकता जर प्रयत्नपूर्वक काढून टाकली आणि सकारात्मकता धारण केली तर हे सहज शक्य होते. अर्थात यासाठी नेटाने अथक प्रयत्न करावे लागतात.

            लहान मुलांत रमणे, साठी उलटल्यावरही तरुणांशी संवाद साधणे, त्यांच्या संगतीत त्यांच्या विचारांशी तादात्म्य पावून त्यांच्या सहवासात वेळ घालवणे या कृतींनी त्यांची तरुण सळसळती ऊर्जा आपल्याला मिळत असते. मनाने आपण तरुण होत जातो. शरीर जरी थकले असले तरी मन तरुण असते. मंद हालचालीमध्ये हळूहळू तरतरी येऊ लागते. भरपूर पाणी पिणे, माफक व्यायाम व शारीरिक हालचाली करणे, योगा करणे या गोष्टी सकारात्मकता वाढवतात. अभी तो दिल जवान है...असे वाटणे म्हणजे लढाई जिंकलीच समजा….

       ****
              परवा दुपारी अर्जंट खरेदीसाठी आम्ही शहरातील दुकानात गेलो. सौ आतमधे साड्या पाहत होती व मी काउंटरजवळ मालकाशी गप्पा मारत होतो. मागून आवाज आला,’ दादा, थोडं सरकता का?’ मी लक्ष दिलं नाही. परत आवाज आला,’ अहो भाऊ, थोडं बाजूला व्हा ना..’मी मागे वळून पाहिले. विशीतली एक मुलगी मलाच संंबोधत होती.  मला नेहमी काका ऐकायची सवय होती. भाऊ किंवा दादा म्हणजे जरा अतीच नव्हे का ! मी लगेच दुकानातल्या आरशात पाहिले. डोक्यावर पीकॅप असल्यामुळे टक्कल झाकलेले होते.. दुकानमालकाने हळूच चिमटा काढला…”अभी भी जवान लगते हो सर !”

★★★ सुरेश इंगोले

No comments:

Post a Comment