Tuesday 27 November 2018

#अरबांच्या देशात..

    सौदी अरेबिया
सौदीला जाण्यासाठी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर लवकरच पोहोचलो. साडेनऊच्या फ्लाईटसाठी सहा साडेसहापर्यंत आत प्रवेश करावा म्हणून आम्ही बाहेरच फिरू लागलो आणि तेथील गर्दी पाहून दचकलोच. सगळे हजयात्री आबालवृद्ध तेथे फिरताना दिसले. ते आपल्यासोबत सौदीपर्यंत असणार हा विचार मनात येऊन इमिग्रेशन काउंटरला मोठमोठ्या रांगा असतील याची जाणीव झाली. आम्हाला सोडायला आलेल्या सारंगला अर्धा तास तरी बाहेर थांब असे बजावून आम्ही आत प्रवेश केला.

       बोर्डिंग पासच्या काउंटरला मोठ्या रांगा होत्याच. आम्ही रांगेत लागताच एका रक्षकाने आम्हाला बाजूला बोलावले. रिकाम्या काउंटरवर त्याने आमचा नंबर लावला. बोर्डिंग पास लगेच मिळाला. ज्येष्ठ नागरिक असल्याचा हा लाभ अप्रत्याशित होता. हाच अनुभव इमिग्रेशन काउंटरला देखिल आला. पंधरा मिनिटातच सारंगला फोन केला. तो चकितच झाला. त्याला फोनवरच निरोप दिला.

       दोन तास फोनवर परिचितांशी निरोपाचे बोलण्यात घालवले. साडेनऊला विमानाने उड्डाण केले. पराग, प्रियांका व आमची नात ऋग्वेदा दम्मम एअरपोर्टवर घ्यायला येणार होते. विमान वेळेआधीच पोचले तेव्हा परागला फोन करून कळवले. तो नुकताच विमानतळावर पोहोचला होता. म्हणाला, “ बाबा, लोक उतरण्याची घाई करून इमिग्रेशन काउंटरला गर्दी करतील.”
“ मी अशी घाई करणार नाही. कारण एकतर आम्ही अगदी मागे बसलोय. उतरायला वेळ लागणारच आणि झपाट्याने चालूही शकणार नाही. जे होईल ते बघू या. आम्ही बाहेर येईपर्यंत वाट पहा.”

       आमच्या सोबत एक ट्रॉलीब्याग होती. सर्वात शेवटी आम्ही दोघे कॉरिडॉर पार करू लागलो. चालताना सोयीचे व्हावे म्हणून मधे मधे रनिंग एस्कलेटर्स होते. थकणाऱ्या पावलांना तेवढाच आराम. त्यावर उभे राहिल्यावर सौ. ब्यागजवळ उभीच राहिली. मी मात्र त्यावरूनही चालत जावून पुढे तिची वाट पाहू लागलो..

       एस्कलेटर संपताच मागून बुरखा घातलेली एक स्त्री झपाट्याने पुढे झाली व आमची ब्याग उचलून चालू लागली. सौ एकदम ओरडली, “ ये हमारी ब्याग है।” मी क्षणभर अवाकच झालो. लगेच तिला आडवा होत बायकोला म्हणालो, “अरे, वो तुम्हें मदद कर रही होगी। मैडम, ये हमारी बैग है।” तिच्या हातून मी बैग काढून घेतली. ती झटकन पुढच्या बुरखाधारी बायांमध्ये मिसळून गेली. आता तिला काय ओळखणार, कप्पाळ !

       इमिग्रेशन काउंटरला अपेक्षेप्रमाणे गर्दी होतीच. आम्ही एका रांगेत लागलो. सफेद चोगा घातलेले अरबी वेशधारी कर्मचारी रांगेतील लोकांना सूचना देत फिरत होते. एकाचे आमच्याकडे लक्ष गेले. तो अरबी भाषेत काहीतरी बोलला. मला काही कळले नाही. तो परत उद्गारला, “ फस्टाईम ?” काही क्षणातच कळले की तो आमची पहिलीच वेळ आहे का हे विचारत होता. मी मान डोलावली. त्याने आम्हाला बोलावून एका रिकाम्या काउंटरला पाठवले.  दोन तीन मिनिटात आम्ही मोकळे झालो. ब्यागेज काउंटरवरून सूटकेसेस घेऊन बाहेर येत असताना ‘ आई..बाबा..’अशा हाका मारत ऋग्वेदा धावत येऊन बिलगली. आश्चर्य व्यक्त करून पराग म्हणाला, “एवढ्या लवकर कशी सुटका झाली?”
          त्याला फष्टाईम चा किस्सा सांगताना माझे बुरखाधारी प्रियंकाकडे लक्ष गेले. मी आजूबाजूला पाहिले. आणि सगळे माझ्या लक्षात आले..
              माझी बायको वगळता सर्वच स्त्रिया बुरख्यात होत्या.
तिच्यामुळेच त्या अरबाने आमचे फष्टाईम ओळखून आमची सुटका केली होती…. कदाचित तिला पाहूनच त्या स्त्रीने ब्याग पळवण्याचे धाडस करून पाहिले असेल…

        आता आजपासून बायकोला बुरख्यात पाहायची सवय करावी लागेल….

                       # © सुरेश इंगोले