Saturday 1 September 2018

श्रावण

आषाढाचा विरतो पडघम
लयीत करतो पाऊस नर्तन
हिरवळलेल्या सृष्टीवरती
हळुच आगमन करतो श्रावण..।
   भारतीय पंचांगातील बाराही महिन्यांना एक वलय आहे. चैत्रातल्या वसंतोत्सवापासून तो फाल्गुनातल्या पानगळीपर्यंत प्रत्येक महिना आपली एक अमीट छाप सोडून जातो. त्यातही श्रावणाची लीला अगाध आहे. चातुर्मासाची सुरुवात करुन देणारा हा महिना सर्वच दृष्टीने अविस्मरणीय असतो.

      मुख्य सणांचा प्रारंभच या महिन्यापासून होतो. सुरुवात श्रावणी सोमवारपासून होते. नागपंचमी, रक्षाबंधन, गोकुळअष्टमी या सणांनी उत्सवप्रियतेला चालना मिळते. खरी मजा येते ती गोकुळ अष्टमीच्या दहीहंडीला.

     आमच्या लहानपणी आजच्यासारखा गोविंदांचा माहौल नव्हता. पण शम्मीकपूरचा ‘ ब्लफमास्टर ‘ चित्रपट प्रदर्शित झाला आणि ‘ गोविंदा आला रे आला ‘ या गाण्याने धूम मचवली.. गावोगावी सार्वजनिक दहीहंडीच्या शर्यती लावणे सुरू झाले. गावोगावी आखाडे होतेच. आखाड्यातल्या तरुणांनी सराव सुरू केला.

        मी आर्वीला असताना तेलंगराय मोहल्ल्यातल्या एका आखाड्यात जायचो. इच्छा नसतानाही तीर्थरूपांच्या धाकाने काही काळ मी आखाड्याच्या वस्तादाच्या कानपिचक्या खाल्ल्या आहेत. 1963 मध्ये ब्लफमास्टर आला...गाजला तेव्हा मी नागपूरला कॉलेजमध्ये शिकत होतो. रक्षाबंधनाच्या निमित्ताने आर्वीला आलो तेव्हा मित्रांनी मला आखाड्यात नेले. तेथे दहीहंडी फोडण्यासाठी रिंगणात सराव सुरू होता. मी चकित झालो. तीन चार थर रचून होताच सगळे धडाधड पडत. हंडी फोडणारा मुलगा चढू लागला की सारे थर कोसळत.

      वस्तादचे माझ्याकडे लक्ष जाताच ते म्हणाले,” अरे, हा बारका आहे. याला चढवा वर.” मी जाम टरकलो.  विरोध करून पाहिला. पण वस्तादपुढे काही चालणार नव्हते. माझाही सराव सुरू झाला. तीन थर रचून होताच मी वर चढताना आपला जीव वाचवत यशस्वी प्रयत्न केला. सर्वांनी टाळ्या वाजवल्या.

       गोकुळ अष्टमीला आमच्या मोहल्ल्यातल्या दहीहंडीसाठी आमच्या आखाड्याचे गोविंदा जमले. एकावन्न रुपयांचे बक्षीस होते. दोन तीन प्रयत्न अयशस्वी झाल्यावर एकदाचे तीन थर लागले. मला इशारा करण्यात आला. मी कमरेला शेला बांधून
धडधाकट तरुणांच्या खांद्यावर पाय रोवत वर वर चढू लागलो. गाणी कर्कश आवाजात तर बँड जोरजोरात वाजत होता. मला खाली पाडण्यासाठी बरेच प्रयत्न चालू होते. मी माझे लक्ष हंडीवर केंद्रित केले व शेवटच्या थरावर उभा राहण्याच्या  प्रयत्नात डगमगू लागलो. लोकांचा गोंगाट वाढला. आता आपण पडल्याशिवाय राहत नाही याची खात्री होताच मी उसळून हंडी टांगलेला दोर पकडला. दोराला हिसका बसताच माझे पाय लटपटले. आणि धडाधड थर कोसळले. मी दोराला लटकून लोंबकळत राहिलो.

          क्या सीन होगा बॉस..? आजच्यासारखे मोबाईल असते तर किती व्हिडीओ शूट झाले असते.

          त्या काळी मी खरेच बारका होतो. नाहीतर दोर तुटून खाली आपटून हातपाय मोडून घेतले असते. त्याही अवस्थेत माझे लक्ष हंडीवरील एकावन्न रुपयांकडे लागले होते. मी एका हाताने लटकून दुसऱ्या हाताने हंडी उपडी केली. त्यावरच्या दोन नोटा, पन्नास व एक रुपयांच्या मुठीत घट्ट धरुन ठेवल्या. तोवर मला उतरवण्यासाठी परत थर रचण्यास सुरुवात झाली होती. मी यशस्वीपणे खाली उतरू शकणार होतो. पण…..

           अचानक माझे लक्ष घोळक्याकडे गेले. आणि आमचे तीर्थरूप तेथे दिसले. घाबरून माझा हात सुटला आणि मी थर रचणाऱ्या मुलांच्या अंगावर येऊन पडलो. सारे आडवेतिडवे कोसळले..

           कोणीतरी मला उचलले. कपडे झटकत मी पाहिले. तीर्थरूप माझी पाठ थोपटत होते. मला हायसे वाटले. एकावन्न रुपयांची वाटणी करताना मोठा पाच रुपयांचा वाटा मला मिळाला. त्यापेक्षाही वडील रागावले नाहीत याचा आनंद फार मोठा होता.

            पुढे 1966 मध्ये मी मुंबई येथे नोकरीला लागलो असताना गोविंदांची.पथके हंडी फोडताना पाहून ही घटना आठवायची.

           तेव्हापासून श्रावण माझ्याकरीता अविस्मरणीय झाला.

                   ★★ सुरेश इंगोले ★★

No comments:

Post a Comment