Thursday 5 October 2017

ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी..
भेटीत तुष्टता मोठी.....

          बाळ कोल्हटकर यांचे गीत, वसंत देसाई यांचे संगीत.....आणि...कुमार गंधर्व, वाणी जयराम यांच्या अत्यंत सुमधुर स्वरांनी अजरामर केलेले हे गाणे आज कानावर पडले आणि मन तृप्त झाले.
         
             या ऋणानुबंधाचे मला मोठे नवल वाटते. हजारो लोकांशी आपल्या ओळखी असतात. नेहमी भेटणारांची नावे आपल्या स्मरणात असतात. क्वचित भेटणारांशी आपण हसून दोन शब्द बोलतो. काही लोकांशी आपली नित्य भेट होत असते. तर काही जणांशी आपण फार क्वचित.... अधूनमधून  भेटत असतो. पण ऋणानुबंध ज्यांच्याशी जुळतात त्यांची गोष्टच वेगळी असते. ते या कोणत्याच वर्गवारीत बसत नाहीत. कारण त्यांचं स्थान केवळ स्मरणात, मेंदूत नसतं...तर ते थेट काळजात असतं.

                  असे अनेकजण माझ्या काळजात ठाण मांडून बसले आहेत. वर्ष दोन वर्षे भेट झाली नाही तरी हृदयाची स्पंदने त्यांना जाणवत असावीत याचा मला विश्वास आहे. कारण नागपूरचा माझा जिवलग मित्र दत्तू केदार याच्याशी दोन वर्षांपासून भेट नसूनही फोन केल्यावर ज्या आत्मीयतेने तो विचारपूस करतो, जुन्या आठवणी काढतो की मन हेलावून जातं. वार्धक्यामुळे तो बाहेर जाऊ शकत नाही आणि फिरस्तीमुळे मी त्याची भेट घेऊ शकत नाही याचे कधीकधी वैषम्य वाटते.

                 ज्याचे स्थान हृदयात...काळजात असते अशांनाच आपण जिवलग म्हणतो. त्यांची संख्या कमी असते. पण त्यांच्यामुळे आपले जीवन सुखकर होते. पुन्हा पुन्हा भेटीची ओढ लागते.
         भेटीलागी जीवा। लागलीसे आस।
          पाहे रात्रंदिस। वाट तुझी ॥
अशी अवस्था निर्माण होते. जिवलगा, कधी रे येशिल तू..असे आपले मन आक्रंदत असते.

                  हृदयाच्या कप्प्यात अढळ स्थान असणारे माझे परममित्र...विदर्भाची शान...गझलगंधर्व..संगीतकार...गझलगायक...श्री सुधाकर कदम यांचे पाय माझ्या घरी शहापुरला कधी लागतील याची मला शाश्वती नव्हती. ते पुण्यात स्थायिक झाल्यामुळे विदर्भात प्रसंगानेच येणे होत असे. पुण्याच्या त्यांच्या घरी नेहमीप्रमाणे यावेळी आमची १८ सप्टेंबरला भेट झाली तेव्हा मी शहापुरला कधी येता असे विचारले. ते यवतमाळ - वर्धेला येणार हे कळले होते. २६ तारखेला त्यांनी शहापुरची चौकशी केली व २८ तारखेला येतो म्हणाले तेव्हा माझा आनंद गगनात मावेना.
   अखेर तो दिवस उजाडला. त्यांचे शहापुरात आगमन झाले. आम्ही उभयता त्यांच्या स्वागतास सज्ज होतो. सारे घर आनंदाने भरून गेले. सुधाकराव, सुलभावहिनी, निषाद, पल्लवी आणि गोड नातू अबीर यांना घराने आपल्या कवेत घेतले.

              आमचे घर, विहीर व आंब्याचे झाड यांनी आम्हाला जोडलेली माणसे टिकवण्यात मोलाची साथ दिलेली आहे. दोन दिवस एकमेकांच्या सहवासात, थट्टामस्करीत, खेळीमेळीत कशी गेली ते कळलेच नाही. त्यांच्या नागपूरच्या मित्राचा अस्वस्थ असल्याचा निरोप आला म्हणून जाणे अपरिहार्य असूनही त्यांचा पाय निघेना.
              जाताना हातात हात घट्ट धरून एवढेच म्हणाले," डिसेंबरमध्ये चांगले आठ दिवसाच्या मुक्कामाने येतो भौ...." मन भरून आले.
          यालाच ऋणानुबंध म्हणतात ना........

No comments:

Post a Comment