Friday 6 January 2017

***  नागपूरचा सी.ए.रोड नेहमीच गजबजलेला असतो. त्यातही संध्याकाळची वेळ म्हणजे लगीनघाई...ऑफिस सुटलेले लोक, क्लास सुटलेली मुले-मुली, ट्रॅफिक सिग्नलवर पुढे घुसण्याची घाई....उगाच या रस्त्याने आलो ही खंत निर्माण करणारी स्थिती...
            प्रत्येक सिग्नलला थांबावे लागल्याने चिडचिड झाली होती. अग्रसेन चौकातून मी गाडी पाचपावलीकडे वळवली. आता रस्त्याला सिग्नल नसल्यामुळे..किंवा बंद असल्यामुळे गर्दी वाढली. कशीबशी वाट काढत पुढे जात असताना सायकलवर तो दिसला.
              सायकलच्या कॅरिअरवर बसलेला सात-आठ वर्षांचा मुलगा. पस्तिशीतला हडकुळा, परिस्थितीने गांजलेला माणूस नेट लावून पॅडल मारीत होता व तो मुलगा कावराबावरा होऊन, घाबरून मागे माझ्या गाडीकडे पाहत होता. गाडी आत्ता धडकेल व आपण गाडीखाली येऊ ही मूर्तिमंत भीती त्याच्या चेह-यावर स्पष्ट दिसत होती.......

             ..... मला एकाएकी माझे बालपण आठवले. हाच प्रसंग थोड्याफार फरकाने तेव्हा घडला होता. मी सात-आठ वर्षांचाच असेल. वर्धेला मोठ्या मामांसोबत सायकलने निघालो होतो. बोरगाव - देवळीकडे जाणा-या पुलावर नेहमीच गर्दी असते.  पुलावर सायकल आल्यावर मामा नेट लावून पॅडल मारू लागला. सायकल कशीबशी वर सरकू लागली. तेवढ्यात मागून एक कार आली. मी दचकलो. ती आता सायकलला धडकणार म्हणून मी जाम घाबरलो. 'मामा..गाडी...मामा...गाडी..' असे ओरडू लागलो.
मामाचा श्वास फुलला होता. तो उतरू शकत नव्हता. तेवढे अंतर पार करणे गरजेचे होते. कारचा हॉर्न वाजू  लागला. ...आणि आता खिडकीतून डोके बाहेर काढून त्याने शिव्या द्यायला सुरवात केली.
  " दिखता नही क्या पीछेसे कार आ रही है... अपन फटीचर सायकल हटा..नही तो ठोक दूँगा ** "
मला कार धडकण्याची भीती तर होतीच पण कारवाल्याचा माजोरीपणा, सायकलवाल्याला क्षुद्र लेखण्याची वृत्ती ही त्याही वयात मनात खोलवर रुजली होती.....

     ......   माझ्या कारसमोरच्या सायकलवरील त्या मुलाच्या चर्येवरील ती भीती  भूतकाळ आठवून गेली. मी त्या मुलाकडे हसून पाहिले. नजरेने त्याला आश्वस्त केले. त्याच्या सायकलमागे माझी कार हळूहळू जाऊ लागली. आता गर्दी संपली होती. सायकलने वेग घेतला होता. मी बाजूने कार पुढे घेऊ शकत होतो. पण अजूनही मी मुद्दाम कार सायकलमागेच ठेवली होती.
                 तो मुलगा आता हसत होता. आपल्या सायकलने कारला जिंकल्याचा आनंद त्याच्या चर्येवर फुलला होता. पुढच्या वळणावर ती सायकल वळली. त्या मुलाने मागे वळून पाहिले. मी हात हलवला तसा त्यानेही गोड हसून हात हलवला.

                               ***   सुरेश इंगोले  ***

No comments:

Post a Comment