Wednesday 11 January 2017

जीवन खूप सुंदर आहे.
 
          जीवनाकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टीकोन भिन्न असू शकतो. एखाद्या प्रसंगाकडे आपण कोणत्या दृष्टीने बघतो त्यावर ते अवलंबून असते.

          काल नागपूरला मित्राला काही काम होते. मी सोबत होतो. नागपूरला सगळीकडे सिमेंटचे रस्ते बनविण्याचे काम चालू आहे. त्याला जेथे जायचे तेथे गाडी जात नव्हती म्हणून त्याने चौकातच बाजूला गाडी लावली. त्याने दहा मिनिटांत येतो म्हटल्यामुळे मी गाडीतच बसून होतो.

           सहजच आजूबाजूला पाहू लागलो. दुकानांमध्ये हल्ली शुकशुकाटच असतो. नोटबंदीचा परिणाम असावा. मात्र पतंजलीच्या दुकानात ब-यापैकी गर्दी होती. एका जोडप्याने आपल्या तीन-चार वर्षांच्या मुलीला बिस्कीटचा पुडा दिला होता. ती बिस्कीट खात खात बाहेर आली. फुटपाथच्या कडेला कोणा मजुराची दोन लहान मुले खेळत होती. ती मुले सुद्धा तीन आणि पाच-सहा वर्षांची असावीत. लहान तीन वर्षाचा मुलगा शेजारच्या हॉटेलकडे बोट दाखवून मोठ्या मुलाला काहीतरी सांगत होता. मोठ्या मुलाने त्याला धपाटा घातला. तो भोकाड पसरून रडायला लागला.

                  बिस्किट खाणा-या मुलीचे त्याच्याकडे लक्ष गेले. ती बराच वेळ त्या दोघांकडे पाहत होती. तिने दुकानाकडे नजर टाकून आपल्या आईवडिलांकडे पाहिले. मग ती खाली उतरून त्या मुलांकडे आली. तिने त्या रडणा-या मुलाला एक बिस्किट दिले. त्याने झटक्यात ते हिसकून तोंडात टाकले. ती मुलगी गोड हसली. दोन्ही मुलेसुद्धा हसू लागली. तिने आता मोठ्या मुलाला सुद्धा एक बिस्कीट दिले. धाकट्याला आणखी एक दिले. तिघेही हसत हसत बिस्किटे खाऊ लागली.

                हे निर्व्याज, निरागस हास्य पाहून माझ्याही चर्येवर हास्य फुलले. मी कौतुकाने त्यांच्याकडे पाहत होतो तेवढ्यात त्या मुलीची आई तरातरा आली आणि तिने तिच्या पाठीत एक धपाटा घातला. तिचा हात धरून तिला दुकानाकडेे नेले. ती काय बोलत होती हे मला ऐकू आले नाही.

                 एवढ्यात त्या दोन मुलांची आईही तेथे आली. मोठ्या मुलाने तिला काहीतरी सांगितले. त्याबरोबर तिनेही धाकट्याच्या पाठीत धपाटा घातला. मोठ्याने त्या मुलीकडे संकेत केला. तिच्याकडे पाहत त्या बाईने धाकट्याला पोटाशी घेतले.

                 गाडीचे काच बंद असल्यामुळे मला कोणाचेच बोलणे कळले नाही. पण......
मनात विचारांनी गर्दी केली.  आपण आपल्या मुलांवर संस्कार करतो. त्यांनी ते पाळावे याकडे कसोशीने लक्ष देतो. मग अशा प्रसंगाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा असावा...

                 त्या दोन्ही आयांनी कोणता निकष लावला असेल या प्रसंगाकडे बघण्याचा ?

                                        ***  सुरेश इंगोले  ***

No comments:

Post a Comment