Monday 11 April 2016

चिमखडे बोल.....

   पाहुणे जायला निघाले. निरोप द्यायला सगळे बाहेर आले. पण घाई कोणालाच नव्हती. सुनंदा एका बाजूला सौ.सोबत माहेरच्या गोष्टीत रमली. माझा मुलगा व सून त्यांच्या मुलाशी व सुनेशी गप्पा मारत होते. मुले झाडाभोवती शिवाशिवी खेळत होती. मी व पाहुणे बोलत बोलत टेरेसवर आलो.

     संध्याकाळचे सोनेरी ऊन पसरले होते. भोवतालचे दृष्य पाहून सुभाषरावांच्या चेह-यावर प्रसन्नता उमटली.  " वा सर ! निसर्गाच्या सान्निध्यात राहायला मिळण्यासारखे भाग्य आम्हा शहरी लोकांना कुठून मिळणार ?"
मी हसलो. त्यांच्या खांद्यावर हात ठेवत म्हणालो, ' येथे घर बांधायला सर्वांचाच विरोध होता. मुलांना शहरात राहायला हवे होते. बायकोला एवढे मोठे घर नको होते. मोठ्या घराचे काम तिच्याने होत नव्हते. मी येथे वीस वर्षे भाड्याच्या घरात काढली. दोन खोल्यांच्या लहान लहान घरात अडचणी सोसत मुलांना वाढवले. तेव्हाच मनाशी खूणगाठ बांधली होती की जेव्हा स्वत:चे घर बांधीन तेव्हा मोठे प्रशस्त बांधीन."
    " तुमची इच्छा पूर्ण झाली म्हणायची. "
   " सर्वांचा विरोध पत्करून मी हे घर बांधले. वास्तुपूजनाला येणा-या सर्वच लोकांनी जेव्हा घर व परिसराची प्रशंसा सुरु केली तेव्हा घरातला विरोध मावळला."
   
    आम्हाला पाहून सगळेच टेरेसवर आले.  मुले अवती भवती बागडू लागली. आमच्या संभाषणात भाग घेत सौ म्हणाली, " खरेच आधी माझा विरोध होता. पण यांना कर्मभूमी सोडायची नव्हती. येथे सगळे जिव्हाळ्याचे लोक आहेत. अडीनडीला धावून येतात."
" ताई, सर्वात महत्वाचे म्हणजे मुले काही तुमच्यासोबत राहणार नव्हती. नोकरीधंद्यानिमित्ताने दूर कोठेतरी जाणारच होती ना !" सुभाषराव म्हणाले.
" हो ना ! निवृत्त आयुष्य निवांत काढण्यासाठी याहून दुसरा मार्ग नाही असे मला वाटते. आता सणांच्या निमित्ताने तीन ही मुले आपापल्या कुटुंबासह येतात. घर आनंदाने नाचू लागतं. पुढच्या वेळी जेव्हा मुले येतील तोपर्यंत सगळ्या स्मृती घर जपून ठेवतं. तुम्हाला सांगतो सुभाषराव....घराला मन असतं. घर माया लावतं. ओढ लावतं. त्याच ओढीने मुंबई असो की सौदी असो, मुलं घरी येण्याचे प्लॅनिंग करतात. पुन्हा पुन्हा येतात. खूप बरं वाटतं."

      मी जरा जास्तच भावुक झालो होतो. वातावरणाला हलके करण्यासाठी सुभाषरावांनी विषय बदलला.

" बाकी काही म्हणा सर, येथून आजूबाजूचे दृष्य अगदी नयनरम्य दिसते. एका बाजूला नॅशनल हायवे नं. ६ वरुन सतत सुरु असणारी वाहनांची वर्दळ, उत्तर आणि दक्षिणेकडे असणा-या टेकड्या...समोर पसरलेली भातशेती... वा ! केवळ अप्रतिम ..."

     सर्वजण टेकड्यांकडे बघू लागले. मधेच सुभाषरावांचा मुलगा म्हणाला, " अरे इतर टेकड्यावर झाडे व किती छान हिरवळ आहे. ही एकच टेकडी कां बरं बोडकी आहे ? "
माझा सहा वर्षांचा नातू शौर्य चटकन म्हणाला,-" काका, ती रिकामटेकडी आहे."

    सर्वजण खळखळून हसू लागले.

                               ....... सुरेश इंगोले.

1 comment: