Friday 25 December 2020

एका दगडाची गोष्ट

            * एका दगडाची गोष्ट *


परवा अचानक एक कार घरासमोर उभी राहिली. त्यातून एक कुटुंब बाहेर पडले. नवरा, बायको आणि दोन मुले..साधारण चौदा ते सोळा वयाचे.  फाटक उघडून ते आत येऊ लागले. पण ते कोण आहेत हे माझ्या काही लक्षात येत नव्हते. त्या माणसाचा चेहरा कधीतरी पाहिल्यासारखे वाटत होते.


" नमस्कार सर. ओळखलंत मला.?" त्याने हसून विचारले.

 मी नकारार्थी मान हलवली. 

" या, आत या. बसा.." 

मी त्यांना घरात घेऊन आलो. 

मी खुर्चीत बसताच त्याने मला वाकून नमस्कार केला. पाठोपाठ बायको व मुलांनी सुद्धा पायावर डोके ठेवून नमस्कार केला. मला अवघडल्यासारखे झाले. 

"अरे, काय हे! " असे काहीसे पुटपुटताच तो म्हणाला, " सर, तुम्ही आमचे भाग्यविधाता आहात. हा तुमचा मान आहे."

" मी खरंच तुम्हाला ओळखलं नाही." मी दिलगिरी व्यक्त केली.

" सर, मी विनोद...विनोद लांजेवार !  तुम्ही रिटायर व्हायच्या दोन वर्षे आधी शिक्षक म्हणून लागलो होतो. आपला सहवास तसा कमीच लाभला."

" अरे हो, आठवले. मला वाटतं, मी रिटायर झाल्यावर तुम्ही सुद्धा नोकरी सोडून गेल्याचे कळले होते."

" हो सर! गावाशेजारच्या शाळेत एक जागा निघाली होती. आपल्या शाळेतून अतिरिक्त झाल्यावर तेथे सामावून घेतले गेले.एकदा तुम्ही माझी मायेने चौकशी केली होती. कां कोण जाणे, पण मी तुमच्याजवळ मनमोकळेपणाने व्यक्त झालो होतो."


मला काही आठवत नव्हते. माझ्या चेहऱ्यावर तसे भाव दिसताच तो पटकन म्हणाला, " आठवतं सर ? तुम्ही मला एक दगड दिला होता. त्याला देवघरात ठेवायला सांगितले होते. रोज त्याची पूजा करायला सांगितली होती. "


एकाएकी माझ्या डोक्यात प्रकाश पडला. माझ्या चेहऱ्यावर हसू उमटले. 

* * * *


   नदीकाठी किंवा समुद्रावर फिरायला गेल्यावर तिथले वाळूतले रंगीबेरंगी दगड व शंख-शिंपले गोळा करायचा मला छंद होता.  घरातल्या शोकेसमध्ये, नकली फुलांच्या पितळी कुंड्यांमध्ये ते दगड, शंख, शिंपले मी रचून ठेवले होते. हिरवे, करडे, काळे, पांढरे असे ते दगड छान दिसायचे. 

     एकदा विनोद शाळेतून माझ्या घरी आला. तो चिंतेत वाटत होता. मी आत्मीयतेने विचारले तसे तो स्वतः:विषयी, बायको व आई-वडिलांविषयी सांगू लागला. घरची परिस्थिती अगदीच वाईट नव्हती. शेतीचे उत्पन्न बऱ्यापैकी येत होते. त्यालाही शिक्षणसेवक म्हणून नियमित, कमी कां होईना, पगार मिळत होता. पण इतरांशी तुलना करताना त्याच्या मनावर निराशेचे सावट दिसत होते. त्याची बायको सतत आजारी असायची. डॉक्टरांनी तिला कोणताच आजार नाही हे निक्षून सांगितले होते. त्याला सकारात्मक ऊर्जेची गरज होती.

"आपल्याजवळ जे नाही त्याचा विचार करून चिंता करीत बसण्यापेक्षा जे आहे  ते ज्याच्याजवळ नाही त्याच्याशी तुलना करून पहा. समाधान मिळेल. " हे सांगत मी त्याला अनेक उदाहरणे दिली. त्याला ते पटल्यासारखे वाटले. त्याच्यासारख्या पापभीरू व देवभोळ्या माणसावर एक प्रयोग करावा असे वाटून मी कुंडीतला एक हिरवा दगड घेतला. त्याला धुवून साफ करून विनोदला देत सांगितले," हा दगड देवघरात ठेव. मनोभावे त्याची पूजा कर. मनात कधीही निराशेचे विचार येणार नाहीत. सगळं चांगलं होईल. मात्र याबद्दल कोणालाही काहीही सांगायचं नाही. नाहीतर   त्याचा प्रभाव नष्ट होईल."

  मी त्याला हे काय आणि कां सांगितले हे मलाच क्षणभर कळले नाही. गंमत म्हणून एक प्रयोग केला होता आणि तो अंगलट येऊ नये म्हणून खबरदारी घेतली होती एवढे मात्र खरे..!

* * * *


" सर, खरंच तुमचे उपकार मानावे तेवढे कमीच आहेत. तुम्ही दिलेल्या दगडाची आम्ही रोज पूजा करतो. काही दिवसातच आम्हाला त्याची प्रचिती येऊ लागली. विद्याला बरं वाटू लागलं. ती हुरूपाने कामं करू लागली. मी पूर्ण वेळ शिक्षक बनलो. पगार भरपूर वाढला. शेतीला मी पैसा पुरवू लागलो. बोअरवेलमुळे शेतीला बरकत आली. काय आणि किती सांगू सर...!

या दहा बारा वर्षात ज्या काही विपत्ती आल्या होत्या त्यावर आम्ही सहज मात करू शकलो. मागच्या वर्षी आम्ही चौघे मॉरिशसची सहल करून आलो. आज नागपूरला जात असताना आपली प्रकर्षाने आठवण झाली. "

   त्या चौघांशी गप्पा मारत असताना जाणवले की यांना सत्य सांगण्यात काही हशील नाही. कधी कधी अज्ञानातही सुख असते. त्यांच्या बाबतीत जे काही घडत गेले ते त्यांच्या मनाच्या सकारात्मकतेमुळे. आयुष्यात एकदा सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारला की जगणं सोपं होतं. 


चिंता, संकटं, अडचणी, व्याधी हे सगळे प्रत्येकाच्याच नशीबात आहेत. पण माझं कसं होईल या विचाराने हातपाय गाळून बसण्यापेक्षा यातूनही काही चांगलंच होईल हा दृष्टिकोन ठेवला तर जगण्याला, लढण्याला बळ मिळतं..


निरोप घेताना विनोद हळूच म्हणाला," सर, एक विनंती आहे. विद्याचा भाऊ..माझा शालक..अशाच गंभीर परिस्थितीत आहे. त्याच्यासाठी एक दगड मिळेल का? आम्ही त्यालाच काय, कोणालाच याबाबत काही सांगितले नाही. विद्यानेच सुचवले म्हणून..."


त्यांच्या खांद्यावर हात ठेवून मी म्हणालो," असा कोणताही दगड आता माझ्याकडे नाही. असे समजा की तो एकमेव होता जो तुमच्या स्वाधीन केला होता. तुमचे सगळे चांगले होत आहे तेव्हा आता तोच दगड त्याला द्या. बघा, तुम्हीच विचार करा.."


* * * 

सारांश हाच....की निराशेत असणाऱ्या प्रत्येकाने असा कोणताही एक दगड मनोभावे देवघरात ठेवून त्याची पूजा केली तर निश्चितच फरक पडेल.

करून पहायला काय हरकत आहे....?


       © सुरेश इंगोले.


No comments:

Post a Comment