Thursday 1 April 2021

एका लग्नाची गोष्ट

 

      लग्नाचा किस्सा आठवला की आजही हसू येते. ४५/४६ वर्षांपुर्वीची गोष्ट. त्या काळात २१/२२ वर्षांचा असतानाच लग्न व्हायचे. मी बावीसचा असताना वडील लग्नासाठी घाई करू लागले. मी मुंबईची सीआयडीची नोकरी सोडून खेड्यावर परत आलो होतो. जोवर चांगली नोकरी लागत नाही तोवर लग्न करायचे नाही या विचाराने मी नकार देऊ लागलो. वडिलांना स्पष्ट सांगितले की बहिणीचे लग्न झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही. १९७० मध्ये बहिणीचे लग्न झाले. तिच्या पाठी आणखी दोन बहिणी होत्या. चुलता-चुलती वारल्यामुळे चुलत भावंडं आमच्यातच होती.    दरम्यानच्या काळात मी छोट्या मोठ्या बऱ्याच नोकऱ्या केल्या. विमा एजन्सी घेऊन गावोगाव भटकू लागलो. गो-ह्याने पाडल्यामुळे पाय फ्रॅक्चर होऊन वडील घरीच होते. त्या काळात दोन्ही बहिणींची लग्ने मीच पुढाकार घेऊन जुळवली. १९७४ मध्ये दोघींचेही विवाह झाले. आणि वडिलांनी आमच्यासाठी मुली पाहणे सुरू केले. मी आणि माझ्यापेक्षा दोन वर्षांनी लहान असलेल्या चुलतभावासाठी त्यांचे वधूसंशोधन सुरू झाले.

  मार्च महिन्यात एके दिवशी त्यांनी जाहीर केले. ' अमरावतीला दोन मुली पसंत करून ठेवल्या आहेत. दोघेही जावयांना सोबत घेऊन मुली पाहून या.' वडिलांसमोर काही बोलायची आमची प्राज्ञा नसायची. त्यांनीच एक दिवस निश्चित केला. अमरावतीला निरोप पाठवला गेला. आम्ही दोघेही अमरावतीला बहिणीकडे गेलो.

    दुसऱ्या दिवशी सकाळी तयार होऊन आम्ही मेहुण्यासोबत पहिली मुलगी बघायला गेलो. मुलीचे भाऊ कॉलेज मध्ये प्रोफेसर होते. त्यांनी आमची विचारपूस केली. मुलगी आली. मी आधीच भिडस्त. वर मान करून पाहण्याचे धाडस झाले नाही. पाहण्याचे सोपस्कार पार पडल्यावर आम्ही तेथून दुसरी मुलगी बघायला निघालो.

     रिक्षात बसल्यावर मेहुण्यांनी मला विचारले, " काय बाबा? कशी वाटली मुलगी?" मी काही बोलायच्या आतच भास्कर म्हणाला," मला वहिनी म्हणून पसंत आहे."
         माझ्या आवडीनिवडीचा प्रश्नच उरला नाही. मोठेपणाचा आव आणून गप्प बसलो.
अर्थात दुसरी मुलगी पाहून झाल्यावर मेहुण्यांनी भास्करलाच विचारले. त्यानेही पसंती दर्शविली.
अशा रीतीने लग्न जुळले. मला नोकरी नव्हतीच. विमा एजंट म्हणून काम करत होतो. त्या काळात २७/२८ वय म्हणजे घोडनवराच होतो. आणि नवरी १७/१८ ची. दहा वर्षांचे अंतर आहे आमच्यात...

    १२ एप्रिलला साक्षगंध आणि ३० मे १९७५ रोजी लग्न झाले. सात दिवसांनी भास्कर चे लग्न होते. आठ दिवस आशा घरात होती. पण कधी नजरानजर होत नव्हती. माझा भिडस्तपणा आणि पाहुण्यांनी गच्च भरलेले घर. मित्राची बायको मुंबईहून मुलीला घेऊन लग्नाला आलेली..दहा दिवस आमच्या खेड्यातच होती. तिने आम्हा दोघांमध्ये बोलण्याचे अनेक प्रसंग घडवून आणले. पण कोणी पाहिले तर काय म्हणतील या भीतीपोटी मी तेथून सटकायचो..

       लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात. पृथ्वीवर फक्त सोहळे साजरे होतात
असं म्हटलं जातं. ते अक्षरशः खरे वाटते. आज लग्न होऊन ४६ वर्षे होत आहेत. या संसारात तिचा सिंहांचा वाटा आहे. मुलांचे संगोपन, आई-वडिलांचे आजारपण, लग्नसमारंभातील आहेर,भेटी....मला या कोणत्याच गोष्टीत लक्ष घालायची कधी गरज पडली नाही. कठीण प्रसंगात ती पाठीशी उभी राहिली.

     आशाला आई-वडील, बहीण-भाऊ कोणीच नव्हते. ती तीन वर्षांची असल्यापासून तिच्या मावसभावाने तिचा सांभाळ केला. आईने म्हटले होते की मला हीच मुलगी सून म्हणून हवी आहे. तिला मी आईचे प्रेम देईन. आईने शब्द खरा केला. या दोघीत मायलेकीचे नाते निर्माण झाले होते. हाच वारसा आशाने पुढे चालवला. आमच्या तीनही सुना आमच्या मुलीच आहेत. आम्हाला मुलगी नसल्याची खंत सुनांनी भरून काढली.
      कुबेरच्या मुलींसाठी आमचे घर जणू माहेरच आहे.
मुले त्यांच्या कुटुंबात रममाण झाली आहेत. घरी आम्ही दोघेच असतो. पण आमचे एकमेकांशिवाय पानही हलत नाही.
याच आमच्या साताजन्माच्या गाठी आहेत याबद्दल दुमत नाही....

                         * सुरेश इंगोले *

No comments:

Post a Comment