Thursday 3 September 2020

एकलव्य



                   एकलव्य

   

          अंगणात ठेवलेली नवीन सायकल पाहून मी सौ.ला विचारले," कुणाची आहे गं सायकल?"


ती म्हणाली," तो नाही का…. दोन महिन्यांपूर्वी तुम्हाला विचारून सायकल ठेवून दवाखान्यात गेला होता."


      मला आठवले. एक साधारण पन्नाशीचा सडपातळ, विरळ अर्धवट पिकलेले केस, बारीक मिशी, पॅंट आणि टी शर्ट घातलेला हसतमुख इसम सरळ फाटक उघडून आत आला होता. चेहरा ओळखीचा वाटला होता. तो हसून परवानगी मागत म्हणाला," नवीन सायकल आहे गुरुजी. मुलानं घेऊन दिली. पण माझ्याने तिचा लॉक तुटला. दवाखान्यात जाऊन येईपर्यंत ठेवू का? तिथं चोरी जायची भिती वाटते."

 मी हसून परवानगी दिली. 

नंतर त्याने केव्हा सायकल नेली ते कळले नाही.


आज पुन्हा एकदा तो सायकल ठेवून दवाखान्यात गेला होता. मी पोर्चमध्ये झोपाळ्यावर बसून पेपर वाचू लागलो. 


   फाटक वाजले तशी मान वर करून मी पाहिले. फाटक उघडून तो आत आला होता. मी त्याला बोलावले. त्याने आढेवेढे घेतले पण मी खुर्चीकडे इशारा करताच तो पायऱ्या चढून आला व खुर्चीवर बसला.


     त्याने तोंडावरचा मास्क काढताच मला हा चेहरा ओळखीचा वाटला होता पण नाव गाव काही आठवत नव्हते.


  " मला ओळखलं नाही का गुरुजी?" त्याने विचारले.


"आठवत नाही बुवा.." मी कबूल केले.


" मी ज्ञानेश्वर शेंडे. ठाणा पेट्रोल पंप ला राहतो. मूळ गाव निहारवाणी. साधारण पंचवीस वर्षे झाली असतील, मी माझ्या बहिणीला तुमच्याकडे शिकवणीला घेऊन यायचो. आणि शिकवणी होईपर्यंत बाहेर बसून राहायचो."


अजूनही मला काही केल्या आठवत नव्हते. तोच पुढे म्हणाला," गुरुजी, एकदा मला मोठा साप निघाला होता. मी मारला होता त्याला."


आता मात्र मला आठवले. साप दिसताच त्याला अडवीत काठीसाठी त्याने आरडाओरडा केला होता. शेजारी व घरमालक जमले पण साप पाहून पळाले होते. काठी मिळताच त्याने एकट्याने त्याला मारले होते.


" तुमच्या बहिणीचे नाव काय?" मी विचारले.

 

" तिचे नाव सारिका... सारिका शेंडे..तुमची आवडती विद्यार्थिनी.."


त्याने नाव सांगताच तिचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर आला. पंधरा सोळा वर्षांची, हुशार, चुणचुणीत मुलगी.किंचित सावळा वर्ण, पाणीदार डोळे, चेहऱ्यावर तेज. ती जात्याच हुशार होती. वर्गात कोणत्याही विषयावरील प्रश्र्नांची उत्तरे ती पटापट द्यायची. मी तिची चौकशी केली तेव्हा कळले की घरची परिस्थिती बेताची असल्याने तिचे एकटीचे शिक्षण सुरू होते. आई-वडील दोघेही अशिक्षित होते. एक मोठा भाऊ होता त्याला आठवीतून काढून मजुरीला लावले होते. बारावीनंतर हिचेही लग्न करून द्यायचे ठरले होते. मला तिच्याबद्दल अनुकंपा वाटत होती. मी तिच्या वडिलांना भेटीला घरी बोलावले तेव्हा हाच भाऊ त्यांना घेऊन संध्याकाळी घरी आला होता. 


त्यांची समजूत काढणे फार कठीण होते. पण माझे विचार कळल्यावर त्याने आश्वासन दिले, " गुरुजी, सारिकाला खूप शिकू द्या. मी डब्बल मजुरी करीन पण तिला शिकवीन..बाबांची समजूत काढतो मी."

 

" तिला रोज संध्याकाळी घरी शिकवणीला आणत जा. मी एकही पैसा घेणार नाही. " तेव्हापासून तो रोज तिला सायकलवरून घरी आणायचा. आणि शिकवणी होईपर्यंत बाहेर बसून राहायचा.


   " सारिका कुठे आहे हल्ली? काय करते ती ?" मी विचारले.


  त्याचा चेहरा अभिमानाने भरून आला. " ती तहसीलदार आहे गुरुजी परभणी जिल्ह्यातील एका शहरात. तिचे मिस्टर डॉक्टर आहेत. दोन मुलं आहेत त्यांना. तिची मुलगी खूपच हुशार आहे आणि मुलगाही चुणचुणीत आहे. एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर ती तुम्हाला भेटायला आली होती गुरुजी. मीच घेऊन आलो होतो. पण तुम्ही मुंबईला गेले होते आणि महिनाभर येणार नाही असे कळले. तुम्ही दाखवलेल्या मार्गानेच गेली ती. आणि जिद्दीने एमपीएससी झाली. "


माझा ऊर अभिमानाने भरून आला. माझ्या डोळ्यात तरळलेले पाणी पाहून तोही सद्गदित झाला. 


    तेवढ्यात सौ. चहा घेऊन आली. आम्ही दोघेही चहा पिऊ लागलो.


" तुम्ही काय करता सध्या.." चहा संपताच मी प्रश्न केला. 

" सांगतो गुरुजी..पण मला अहो जाहो करू नका. खूप लहान आहे मी तुमच्यापेक्षा." तो अजिजीने म्हणाला. 

मी हसलो.


" मी स्वत:ला तुमचा विद्यार्थीच मानतो गुरुजी."


" ते कसं काय ? तुम्ही आठवीनंतर शाळा सोडली. मी कॉलेजला शिकवीत असल्यामुळे तुम्हाला शिकवल्याचा प्रश्नच येत नाही." मी विचारले.


" मला शिकण्याची खूप इच्छा होती गुरुजी. पण संधी मिळाली नाही. सारिकाच्या शिकवणीच्या निमित्ताने मी बाहेर बसून तुमचा शब्द न् शब्द ऐकायचो. तुम्ही तिला सामान्य ज्ञान, इतिहास, राज्यशास्त्र आणि इंग्रजी ग्रामरचे धडे द्यायचे. घरी गेल्यावर तिच्याशी चर्चा करायचो. तुमच्या सांगण्यावरून मी मराठी व इंग्रजी असे दोन्ही वर्तमानपत्र लावले. जागतिक आणि प्रादेशिक घडामोडीवर आम्ही चर्चा करीत असायचो. तिचा एमपीएससी चा पाया घातला गेला. आणि माझ्याही ज्ञानात भर पडू लागली."


" ती बारावीत असताना माझे लग्न झाले. समंजस बायको मिळाली. तुम्ही एकदा म्हटलेले वाक्य माझ्या कायम लक्षात राहीले. सचोटीने पैसा कमावण्यासाठी शिक्षणाची गरज नाही तर धाडस आणि कष्टाची गरज असते. मी हे पक्के लक्षात घेऊन बायकोशी सल्लामसलत केली. मजुरीच्या पैशाने सारिकाचे शिक्षण होऊ शकलेच नसते. ठाण्याच्या बसस्टॉप जवळ आत्याचे घर होते. तिच्या परवानगीने तेथे चहाची टपरी सुरू केली. मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील वृत्तपत्रे ठेवू लागलो. मग बायकोच्या मदतीने हळूहळू भजी, समोसे, आलूबोंडे व तर्रीपोहे ठेवणे सुरू केले. पाहता पाहता टपरीचे रुपांतर हॉटेल मध्ये कधी झाले कळलेच नाही."


" सारिका ने पदवीनंतर एमपीएससी चा मार्ग निवडला. तिला मी सगळी पुस्तकं आणून दिली. तिने शिक्षणाचे चीज केले."


" आत्याने ती जागाच मला देऊन टाकली. तिलाही मी काही कमी पडू दिले नाही. आता तेथे दोन मजली इमारत बांधली आहे. खालच्या बाजूला हॉटेल आहे. बाजूच्या भागात आम्ही राहतो. वर दोन मुलांसाठी दोन ब्लॉक काढले. मोठ्याचे लग्न करून दिले. तो हॉटेलचा सर्व व्यवहार पाहतो. धाकट्याने ट्रॅव्हल्सचा व्यवसाय सुरू केला आहे. त्याला दोन तीन गाड्या घेऊन दिलेल्या आहेत. माझी सायकल मात्र सुटत नाही. जुनी सायकल मोडीत टाकून धाकट्याने मला ही नवीन सायकल घेऊन दिली."


" सगळं देवदयेने सुरळीत सुरू आहे, गुरुजी. या माझ्या वाटचालीत आजवर मी सचोटी सोडली नाही. आणि ही तुमची शिकवण मानून माझ्या मुलांनाही मी तेच संस्कार दिले."


  " खरं सांगू गुरुजी...प्रत्यक्षात नसले तरी मी तुम्हाला माझा गुरू मानतो. एकलव्याप्रमाणे मी तुमची शिकवण अमलात आणली आणि त्याचे फळ मला मिळाले….."


      बोलता बोलता तो उठला व माझ्या पायाशी वाकू लागला तसे मी त्याला उठवले. घट्ट मिठी मारली आणि त्याच्या पाठीवर थोपटत म्हणालो,

" शेंडे, तुम्ही स्वत:ला एकलव्य मानत असलात तरी मी द्रोणाचार्य नव्हे. हे सगळे यश तुमचेच आहे. कोणालाही त्याचे श्रेय देऊ नका. मला खरंच तुमचा अभिमान वाटतो. "


      तो माझे दोन्ही हात हातात घेऊन अजिजीने म्हणाला," गुरुजी...आपले पाय माझ्या घराला लागावे अशी आमची सर्वांची खूप इच्छा आहे. नाही म्हणू नका गुरुजी. कधी येता ?"


 मी हसून म्हणालो, " नक्कीच येईन. नुकतेच गुडघ्यांचे ऑपरेशन झाले. छान चालता फिरता आले की अगदी चालत चालत येईन. मग तर झाले.."


      सायकल घेऊन जाताना पुन्हा त्याने साद घातली, " नक्की या गुरुजी…!" आणि सायकलवर बसून जाऊ लागला. तो दिसेनासा होईपर्यंत मी तिकडे पाहतच राहिलो. खांद्याला स्पर्श होताच मी वळून पाहिले. सौ. माझ्याकडे कौतुकाने पाहत होती.

       तिला विचारले," मग ? कधी जायचे समोसे, तर्रीपोहे खायला ?"


                      © सुरेश इंगोले

sureshingole.blogspot.com

                        


No comments:

Post a Comment