Friday 9 October 2020

     # होस्टेल लाईफ. # (२)



    १९६२-६३ मध्ये माझे मोठे काका- काकू सहा महिन्याच्या अंतराने वारले. आमची तीन चुलत भावंडं आमच्या घरी आली. खाणारी तोंडं वाढली. वडिलांचा पगार पुरेना. 


     मी होस्टेलमध्ये राहत असताना वडिल दरमहा ऐंशी रुपये पाठवायचे. पंचेचाळीस रुपये मेसला लागत. वीस रुपये कॉलेजची फी होती. पंधरा रुपये खूप काटकसरीने वापरावे लागायचे. मी अवांतर कोणतेच खर्च करणे टाळायचो…


     हिरामन उईके आमच्या शेजारच्या रुममध्ये राहायचा. खेड्यातून आलेला हिरामन खूप साधा, सालस व स्वभावाने गरीब होता. तोही खूप काटकसरीने वागायचा. कधी त्याचे वडील भेटायला यायचे तेव्हा पपया, संत्री घेऊन यायचे. तो आम्हाला खायला बोलवायचा. आम्ही त्याला बागायतदाराचा मुलगा समजून त्याच्याशी अदबीने वागायचो. 


      एकदा असेच फळे खात असताना मी त्याला विचारले, " तुझ्या बागेत संत्रा पपयांची किती झाडे आहेत रे?"


   तो बराच वेळ गप्प बसला. मग शांतपणे म्हणाला," आमच्याकडे शेती नाही. माझे वडील पोतदाराच्या बागेत सालकरी आहेत. ते भेटायला येताना वानवळा आणतात."


   हिरामनच्या घरची परिस्थिती लक्षात येऊ लागली होती. आपल्या गरीबीचा फाटका पदर तो कोणालाच दिसू देत नव्हता. आणि स्वाभिमानाने जगत होता...जगणे शिकवत होता.


माझे नि हिरामनचे ट्युनिंग छान जुळले होते. 

आर्वीहून आमचे फराळाचे डबे आले की मी हिरामनला फराळ नेऊन द्यायचो. मला आवडतं म्हणून अंबाडीची भाकरी व मिरचीचा ठेचा तो माझ्यासाठी मुद्दाम राखून ठेवायचा. 


     परीक्षेचे दिवस जवळ आले. फी भरायची तारीख जाहीर झाली. हिरामन जरा अस्वस्थ दिसू लागला. दोन दिवसांनी त्याची तगमग पाहून मीच विचारलं, " काय रे! पैशाची अडचण आहे का? जरा अस्वस्थ दिसतोस म्हणून विचारलं…"

" हो! घरून पैसे आले नाहीत. शेवटची तारीख जवळ येत आहे.."

" अरे, काळजी करू नकोस. आम्ही गोळा करतो. सोय झाल्यावर परत करता येईल."

" नाही…" तो ठामपणे म्हणाला. त्याच्या चेहऱ्यावरचा करारीपणा पाहून मी पुढे बोलू शकलो नाही.


    आम्ही बराच वेळ चिंतित होऊन वेगवेगळ्या पर्यायावर चर्चा करीत राहिलो. बोलता बोलता हातातल्या घड्याळाशी खेळत तो म्हणाला," हे घड्याळ विकायला गेलो होतो काल... चाळीस रुपये सुद्धा द्यायला कोणी तयार झाला नाही."


    मी त्या घड्याळाकडे एकटक बघत राहिलो. एच एम टी चे घड्याळ होते. देखणे डायल होते. मी बराच वेळ विचार करीत होतो.‌ अचानक कुठल्यातरी पुस्तकात वाचलेला एक किस्सा आठवला. माझे डोळे चमकले. मी हिरामनला घड्याळ मागितले. त्याच्या खांद्यावर थोपटत म्हणालो, " तुझ्या अपेक्षेपेक्षा जास्त पैसे मिळतील."


     दुसऱ्या दिवशी रविवार होता. सकाळी नऊच्या सुमारास नाश्त्याच्या वेळी मेससमोर सगळे गोळा झाले होते. मी कारंजाजवळ उभा राहून ती घड्याळ हात उंचावून दाखवत जोरात बोललो, " फक्त एक रुपयात घड्याळ….कोणाला हवी आहे?"

सगळे चमकले. 

" क्या बक रहा बे….!" कोणीतरी रागाने विचारले.

" ज्याला घड्याळ घ्यायची आहे त्याने स्वत:च्या नावाची चिठ्ठी व एक रुपया या डब्यात टाकावा. साडेदहा वाजता त्यातून एक चिठ्ठी बाहेर काढली जाईल. ज्याचे नाव असेल त्याला ती घड्याळ मिळेल."

थोड्याच वेळात ही बातमी होस्टेलभर पसरली. नशिबाने मिळाली तर एक रुपयात घड्याळ अन्यथा एक रुपयाचे नुकसान म्हणजे नगण्यच!

हळूहळू डबा चिठ्ठी व नाणे-नोटांनी भरू लागला. गोष्ट वॉर्डनच्या कानावर गेली. ते स्वत: बघायला आले. 

" मिस्टर इंगोले, हे बेकायदेशीर आहे असे तुम्हाला वाटत नाही?" त्यांनी मला विचारले. मी याचा विचारच केला नव्हता. मी त्यांना हिरामनची अडचण, त्याचा स्वाभिमान याबद्दल सांगितले. त्यांचे समाधान झालेले दिसले.

साडेदहा वाजता त्यांच्याच हाताने ड्राॅ काढला जाईल असे मी जाहीर करून टाकले. 


    कोणातरी एकाला ती घड्याळ मिळाली. स्वत: वॉर्डननी रक्कम मोजून आलेले एकशे बारा रुपये हिरामनच्या स्वाधीन केले.


हिरामनने मारलेली मिठी तो सोडायला तयार नव्हता. आणि मलाही ती सोडवावीशी वाटत नव्हती…..


                © सुरेश इंगोले.

1 comment:

  1. The best steel rods for the titanium alloys - Titanium
    Steel rods for the titanium alloys - titanium knife Titanium-Aldrich. The ceramic or titanium flat iron quality titanium uses of titanium grades stainless steel rods is unparalleled microtouch titanium trim reviews and is measured against the common

    ReplyDelete