Sunday 27 September 2015

श्रावण

शब्द बाण •••••
            
              श्रावणसरी सकाळपासून कोसळतच होत्या. तशा त्या बेभरवशाच्याच ! कधीही येणार... कधी ही जाणार...छत्री घेऊन बाहेर पडावे तो चक्क उन्हं पडणार...छत्री विसरुन बाहेर पाऊल टाकले तर क्षणात बरसून चिंब भिजवणार !
                  त्या थेंबांचे नर्तन पाहत नंदिनी खिडकीशी ओठंगून उभी होती.एखादी उनाड सर तिच्या चेह-यावर सपकारा मारी तेव्हा ती शहारून जाई. पाडगांवकरांचे शब्द तिला आठवे....    श्रावणात घन निळा बरसला रिमझिम रेशिमधारा ।
उलगडला पानातुन अवचित हिरवा मोर पिसारा ।।
        तिची दृष्टी दूरवर जाई. सृष्टीची हिरवाई तिला भारून टाकीत असे.
           याच पावसाची प्रतिक्षा धरती करीत असते. संपूर्ण आषाढभर.  ढगांची फौज घेऊन पर्जन्यराजा क्षितिजावर कशाची बरे वाट पाहत असतो ? कां उगाच धरतीला मनधरणी करायला लावतो ? आणि मग धो धो बरसून तिचा रुसवा ही काढतो. ती ही राग विसरून जाते. पावसाच्या पहिल्या स्पर्शाने सृष्टीत नवचैतन्याचे वारे वाहू लागतात. आषाढसरी सृष्टीला न्हाऊ माखू घालतात, तृप्त करतात आणि तिच्या बाळसलेल्या रुपाचे कोडकौतुक करायला श्रावण येतो.........
           .... नंदिनीला श्रावणमास खूप आवडतो. अगदी बालपणापासून ! अचानक बरसणा-या श्रावण सरींनी चिंब भिजून तिने कितीदा तरी आईचा ओरडा खाल्ला होता.खळखळ वाहणा-या नालीत कागदी होड्या सोडून किती दूरवर जातात याचा खेळ ती मैत्रिणीसोबत खेळताना भान विसरून जाई. घरी आल्यावर धपाटे ठरलेलेच.
              चुपचाप घरी येऊन सर्वांची नजर चुकवून कपडे बदलायचे तर ताई नेमकी चोंबडेपणा करायची. आणि तिला धपाटे बसताना बघून हसायची. मग दोघींची भांडणे व्हायची. ती रागाने म्हणायची, " बघ हं तायडे, मला त्रास देशील तर... तर.... मी बदला घेईन."
सगळे हसायचे.  आई म्हणायची, " अगं, ती लग्न होऊन सासरी गेली की तूच रडशील तिच्या आठवणींनी ! म्हणे, बदला घेईन ! काय करशील गं ?"
   " मी.... मी.... तिचा नवरा च पळवीन." काही न सुचून ती बोलली तशी सगळे हसले होते.
××××××      एके दिवशी ती शाळेतून आली तेव्हा तिला घरात बरीच मंडळी दिसली. ती सरळ आंत शिरली व पाहुण्यांकडे निरखून पाहत असताना तिला आईने हात धरून घरात ओढले.
  " ही आमची धाकटी मुलगी, नंदिनी. बारावीला शिकते." अण्णा पाहुण्यांना सांगत होते.
" आई, कोण गं ही मंडळी ? " तिने विचारले.
" ताईला बघायला आलेत. कपडे बदल आणि बाहेर येऊ नकोस." आईने ताकीद देऊन ठेवली.
नंदिनीने फ्रेश होऊन तिचा आवडता ड्रेस  घातला व हॉलच्या दाराशी येऊन वाकून पाहिले. दोन पुरुष, दोन बाया व एक देखणा तरुण समोरच बसले होते. तिचे अण्णा, काका व मामा त्यांच्याशी गप्पा मारत होते. ती एकटक त्या तरुणाकडे पाहत राहिली. किती देखणा व रुबाबदार होता तो ! धिप्पाड, कसलेली शरीरयष्टी.... गोरा रंग... बारीक छाटलेले केस, कोरीव मिशी...
" अय्या ! सलमानखानच ! " तिने ताईच्या कानात सांगितले. ताईने लाजून तिला धपाटा घातला.
दाखवण्याचा कार्यक्रम पार पडेपर्यंत नंदिनीला आईने बाहेर येऊ दिले नाही. पाहुणे जायला निघाले, सारे त्यांना सोडायला अंगणात जमा झाले होते. नंदिनी दारातून थोडी पुढे झाली. तो तरुण एकटक तिच्याकडेच बघत होता. नजरानजर होताच अगदी ओळखीचे दिलखुलास हास्य त्याच्या चेह-यावर उमटले. ती ही हसली व एकदम घरात गेली. पाहुणे गेल्यावर घरात चर्चेला उधाण आले. मुलाचे नांव रघुनंदन होते. तो नुकताच सैन्यात अधिकारी म्हणून रुजू झाला होता.
          दोन दिवसांनी शाळेतून घरी येताच नंदिनीला जाणवले की काहीतरी अघटित घडले आहे. ताई रडत होती, आई कपाळाला हात लावून बसली होती व अण्णा नंदिनीकडे रागाने पाहत होते. ती दिसताच आई चवताळून उठली व तिच्या पाठीत धपाटे घालत ओरडली, " कार्टे, कशाला कडमडली होतीस मधे ? झालं का समाधान ताईचं लग्न मोडून ? " नंदिनीला काही कळेना काय झालं ते !
  ......... झाले असे की, दशरथ पाटलांनी निरोप धाडला होता की त्यांना सुमतीचं स्थळ रघुनंदन करीता योग्य वाटत नाही. मात्र धाकटी नंदिनी त्यांच्या मुलाला पसंत आहे व तो तिच्याशी लग्न करण्यासाठी दोन तीन वर्षे थांबायला तयार आहे......
         नंदिनीला कळेना की यात तिची काय चूक होती ? सुमतीपेक्षा ती उजवी होती, गोरी होती, नाकी डोळी नीटस होती हा काय तिचा गुन्हा होता ? रघुनंदनला ती आवडली आणि त्याने सुमतीला नकार दिला यात तिचा काय दोष होता ? पण सुमतीच्या मनाला जी गाठ पडली ती कायमचीच !
......... श्रावणझड हळूहळू थांबली व लख्ख ऊन पडले. एखाद्या सुस्नात षोडषीने ओले केस झटकावे तशी ओलेती सृष्टी मरगळ झटकून आनंदाने हसत होती. पिवळ्याधम्मक उन्हात पानांवरचे थेंब  चमकत होते. श्रावण किती आल्हाददायक असतो ! मनाला उभारी देणारा..... तिच्या मन:चक्षुपुढे सारा घटनाक्रम हलू लागला........
    दोनच महिन्यात ताईचे लग्न झाले. नवरा मुलगा कुठल्याशा कारखान्यात कामाला होता. कुटुंब फार मोठे होते. ताईला सासरी सगळ्यांचे करावे लागत होते. माहेरपणाला आली तरी ती नंदिनीशी मोकळी बोलत नसे. तिला फार वाईट वाटत असे पण सुमतीच्या मनातील अढी काही निघेना.
        रघुनंदन सुटीवर आला की तिची माहिती काढीत असे. तिला ही ते कळे. ती मनातून हरखून जाई. तिच्या डोळ्यासमोर त्याची ती राजबिंडी मूर्ती उभी राही.......
      ....… आणि तिच्या कॉलेजच्या दुस-याच वर्षी दशरथ पाटलांनी तिला रघुनंदनकरिता मागणी घातली.  अण्णांच्या डोक्यावरचे ओझे आपोआप उतरले.  लग्न पार पडले. नंदिनी सासरी जाताना खूप आनंदात होती. मनोरथ पूर्ण झाल्याचे साफल्य तिच्या चर्येवर विलसत होते. सुमती समोर दिसताच नंदिनीने तिला ' ताई ' म्हणून मिठी मारली तेव्हा तिच्या कानात तप्त तेलासारखे सुमतीचे शब्द शिरले, " माझा नवरा पळवीन असे बोलली होतीस ना, आणि खरे ही करून दाखवले तू ! पण लक्षात ठेव नंदे, मला दु:खी करुन तू सुखी होणार नाहीस."
रडत रडत ती बोलली, " नाही गं ताई, माझ्या मनात तसे कधीच नव्हते. आईशप्पथ !"
.........   सुमतीचे ते शब्द सतत तिचा पाठलाग करू लागले. तिची मानसिक शांतताच त्यामुळे भंग पावली. तिच्या हातून नेहमी चुका होऊ लागल्या. त्यामुळे तिला सासरी पदोपदी बोलणी खावी लागायची. लग्न होताच नव्याची नवलाई चारच दिवसात संपली व रघुनंदनला लष्करात परत जावे लागले. एक महिन्यात परत येतो असे सांगून गेलेला रघुनंदन बदली होऊन तातडीने काश्मिरला रुजू झाला तेव्हा त्याला घरी यायला मिळालेच नाही. त्यावेळी नंदिनीला ताईचे शब्द काळीज चिरताहेत असे वाटले होते.
     ........ दोन महिने उलटूनही जेव्हा रघुनंदनचा फोन किंवा निरोप आला नाही तेव्हा दशरथ पाटलांनी अधिका-यांना पत्रे पाठवून विचारणा केली होती पण समाधान कारक उत्तर न आल्यामुळे सर्वांच्याच काळजात चर्रर्र झाले. तो सुखरूप परत यावा म्हणून पाटलांनी घरी पूजा घातली. त्या रात्री सासुबाईच्या कुशीत शिरून नंदिनीने त्यांना सगळे सांगून टाकले.
    त्यांनी मायेने तिच्या पाठीवरून हात फिरवून तिची समजूत काढली. "अगं वेडाबाई, म्हणून तू अशी अस्वस्थ असायचीस होय ? असं काही नसतं बरं ! तुझा दोष नसल्यामुळे तुझे काहीच वाईट होणार नाही. बघ, उद्या तुला रघूचा फोन येतो की नाही ? " ती खुदकन हसली.
     •••••
       ...... पुन्हा पावसाला सुरवात झाली तशी ती भानावर आली. सासुबाईंनी म्हटल्याप्रमाणे आज रघुनंदनचा फोन किंवा निरोप येईल का ?
त्याचवेळी रेडियोवर गाणे लागले होते.....
' हाय हाय ये मजबूरी । ये मौसम और ये दूरी । मुझे पल पल है तडपाये । तेरी दो टकिया दी नौकरी वे मेरा लाखों का सावन जाये ।
     बाहेर असा पाऊस कोसळतोय अन् इकडे माझ्या अंतरात आग पेटलीय. ती विझवणारा श्रावण कधी बरसणार ? तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या.
रेडियोवर दुसरे गाणे लागले होते.
' भिर भिर बरसे सावनी अंखियाँ, साँवरिया घर आये'
......... गाणे संपत नाही तोच दारावर थाप पडली.
तिने डोळे पुसतच दार उघडले..... आणि बेभान होऊन पाहत राहिली.
   दारात तिचा साँवरिया, तिचा रघुनंदन साक्षात उभा होता...... हसत.. हसत ....!
       हातातली सूटकेस खाली टाकत त्याने बाहू पसरले. ती त्याच्या छातीवर बुक्क्या मारत रडू लागली. त्याने तिला मिठीत घेतले व तिच्या पाठीवर थोपटत राहिला.
     " सॉरी ! सरप्राईज देण्याच्या नादात तुझी काय अवस्था होईल याचा मी विचारच केला नव्हता."
    ...... श्रावण खूप जोरात बरसू लागला होता, सृष्टीची आणि नंदिनीची दाहकता शांत करण्यासाठी........
                       
                     सुरेश पुंडलिकराव इंगोले
                          9975490268

2 comments: