Sunday 27 September 2015

गुरुदक्षिणा


         दुपारचं रणरणतं ऊन. झाडाचं पान सुद्धा हलणार नाही इतकी नीरव शांतता पसरलेली. सारं शिवार गपगार पडलेलं. गुरं ढोरं वडाच्या झाडाच्या सावलीत रवंथ करीत निवांत बसलेली. त्याच झाडाच्या बुंध्याशी पंचा अंथरून कृष्णा पुस्तक वाचत बसलेला. त्याची तंद्री लागली होती. एक पुस्तक संपवून दुसरे, दुसरे संपवून तिसरे.... तो अधाशासारखा वाचत सुटला होता.
      
          उन्ह कलली. गुरं जागची उठायला लागली तसा तो भानावर आला.त्याने पुस्तके पिशवीत घातली. पंचा झटकून खांद्यावर घेतला. बाटली तोंडाला लावून पाणी संपविले व गुरांना एकत्र करून गावाकडे निघाला. गुरं रेंगाळत होती, कुठे हिरवळ दिसली की थबकत होती.गुरं चरत असताना उभ्या उभ्याने कृष्णा एखादे पुस्तक काढून वाचत होता. वाचताना भान नसायचे त्याला.
          कृष्णाचा बाप अशिक्षित होता. त्याला शिक्षणाचे काही महत्व नव्हते. कृष्णाने कामाला जाऊन चार पैसे मजुरी कमवावी म्हणून तो त्याचे नाव शाळेत टाकायलाही तयार नव्हता. पण यशोदा त्याला स्वत: शाळेत घेऊन जायची. त्यासाठी तिने कितीदा तरी नव-याचा मार खाल्ला होता. पण हट्ट सोडला नव्हता.
" मी सोता मजुरी करीन पन माह्या किसनाले शिकू द्या " अशी तिने वारंवार बळवंताची विनवणी केली होती.
       आई शाळेत नेऊन द्यायची आणि वडील शाळेतून मारत मारत त्याला मजुरीला घेऊन जात असे. कोणत्याही वर्गात तो कधीच नियमित नसायचा. मात्र शाळेची प्रत्येक विषयाची पुस्तके तो वाचून काढत असे.
     कृष्णा हुशार होता. एकपाठी होता. तो कुणाचीही कामे करीत असे. सदानंद काळे हा जिल्ह्याच्या वर्तमानपत्राचा पत्रकार होता. कृष्णा त्याची सगळी कामे आनंदाने करी. कृष्णाची हुशारी सदानंद जाणत होता. त्याची वाचनाची आवड त्याला माहीत होती. सदानंदने त्याला घरोघरी वर्तमानपत्र टाकण्याचे काम दिले होते. वेळ मिळेल तेव्हा तो हाती पडेल ते वर्तमानपत्र वाचून काढत असे. सर्व ताज्या घडामोडी त्याला माहित असायच्या.
       कृष्णाचे शाळेचे होत असलेले नुकसान सदानंदाला दिसत असे. त्याला थोडी शाळाबाह्य शिकवणी मिळाली तर तो जिल्ह्याचे नांव काढील असे त्याला वाटे. तसे त्याने अनेकदा यशोदेला बोलून दाखविले होते. त्यांच्या झोपडीला लागूनच गिरडे मास्तरचे घर होते. अनेक मुले त्यांच्याकडे शिकवणीला येत. पण ते आधी पैसे घेतल्याशिवाय कोणालाही क्लासमध्ये बसू देत नसे.
        यशोदेने तरीही हिंमत करून एक दिवस गिरडे मास्तरला कृष्णाच्या शिकवणीबद्दल भीत भीत विचारले, तसे ते एकदम भडकले.
     " शाळेची फी भरायची ऐपत नाही, शिकवणीचा कसला विचार करता ? माझ्या कडे येणारे विद्यार्थी एका विषयाच्या कोर्सचे दोन हजार रुपये देतात. तुमची आहे का तेवढे पैसै भरायची तयारी ?"
       बिचारीने शिकवणीसाठी गिरडे मास्तरच्या किती नाकदु-या काढल्या होत्या. पण त्यांनी तिला हाकलून लावले.
        कृष्णाने तिची समजूत घालून एक सोपा पर्याय निवडला होता. त्याच्या कुडाच्या झरोक्याजवळ त्यांचा प्रत्येक शब्द न् शब्द ऐकू येत होता. तेवढा वेळ कोणतेही काम सांगायचे नाही अशी त्याने मायला अट घातली होती. आणि अशी त्याची शिकवणी सुरु झाली होती.
                  × •×•×•×•×•×•×•×•
       कृष्णा आता कॉलेजच्या दुस-या वर्षाला होता. त्याला सदानंदच्या मदतीने कॉलेजची फी माफ झाली होती. दहावीला सत्तर टक्के मार्कस् मिळाल्यावर  कृष्णाच्या वडिलांची सदानंदने समजूत घातली होती. त्यांनी त्याला कामावर पाठवणे बंद केले होते. परिणामी बारावीत कृष्णाला नव्वद टक्के मार्क्स मिळाले होते. तो आताशा सदानंदसोबतच असायचा. त्याची पत्रकारिता व त्याचे सामाजिक कार्य कृष्णाला फार आवडायचे.
        हल्ली सदानंद त्याला रोज सामान्य ज्ञानाचे प्रश्न विचारायचा व कृष्णा त्याचे अचूक उत्तर द्यायचा. अवांतर वाचनाने आणि वर्तमानपत्रामुळे त्याचे ज्ञान समृद्ध झाले होते.याच ज्ञानाच्या जोरावर कृष्णा एक दिवस खूप मोठ्ठ्या पदावर जाईल असे सदानंदला वाटे. त्याने कृष्णाला एक मोबाईल घेऊन दिला होता. पण त्याला तो वापरण्याची लाज वाटायची. बहुधा तो मोबाईल सदानंद जवळच असायचा.
      एके दिवशी सदानंद आनंदाने धावत आला व कृष्णाला मिठी मारून म्हणाला, " मुंबईची तयारी कर, दोस्ता !". त्याला काही कळेना. सदाने यशोदेला व बळवंताला जवळ बसवले व त्यांना समजेल अशा भाषेत तो सांगू लागला. ' कौन बनेगा करोडपती ' या कार्यक्रमासाठी विचारल्या गेलेल्या प्रश्नांची
कृष्णाने अचूक उत्तरे दिली होती आणि लाखो करोडो लोकांतून जे भाग्यवान निवडले गेले त्यांत कृष्णाची वर्णी लागली होती. एक दोन दिवसात मुंबईहून गाडी येऊन त्यांची मुलाखत, गावाचे, शिवाराचे शूटिंग करणार होते. मग बोलावणे येताच त्याना सर्वांना मुंबईला जायला मिळणार होते. थाटात राहायला मिळणार होते.
      साक्षात अमिताभ बच्चनशी बोलायला मिळणार म्हणून कृष्णा खूपच आतुर झाला होता. जन्मात कधी रेल्वेतही न बसलेल्या या तिघांना विमानाने मुंबईला जायला मिळाले. त्यांची अवस्था अनाकलनीय होती. कृष्णाने गळ घातल्यामुळे सदानंदने नागपुरातून त्यांना विमानात बसवून ट्रेनने मुंबई गाठली.
      अखेर तो दिवस उजाडला. फास्टेस्ट फिंगर फर्स्ट चा राउंड जिंकून कृष्णा अमिताभ बच्चन समोर हॉट सीटवर बसला. आणि आपल्या धीरगंभीर आवाजात अमितजी बोलू लागले," अब हमारे सामने हॉट सीटपर बैठे है के बी सी. केबीसी में केबीसी यानि कौन बनेगा करोडपती में कृष्णा बलवंत चव्हान"
प्रेक्षकांत हास्याची लाट उसळली. अमितजींनी त्याचा परिचय दिला. गुरे राखणारा एक मुलगा कसा येथवर आला हे सांगत त्याच्या शिरपूरचा विडियो दाखवला. त्यांनी कौशल्याने त्याचा बुजरेपणा घालवला. त्याचे आईवडील बोलूच शकले नाहीत. त्यांच्या वतीने सदानंद बोलला.
        प्रश्नांना सुरुवात झाली. अचूक उत्तरे देत कृष्णा एक एक पायरी चढू लागला. हळूहळू धीटपणे तो बोलू लागला. त्याने दोन्ही पडाव पार केले. चार ही लाईफलाईन संपल्यावर तो निग्रहाने पंचवीस लाखांपाशी थांबला. त्याने खेळ सोडल्यावर अमितजींनी त्याला पन्नास लाखाच्या प्रश्नाचे उत्तर विचारले. त्याने दिलेले उत्तर बरोबर होते. परंतु पंचवीस लाख गमावल्याचे त्याला दु:ख झाले नाही.
       " क्या करेंगे आप इन पैसों का ?" सही करून त्याला चेक देताना अमिताभ बच्चननी विचारले. कृष्णा क्षणभर स्तब्ध झाला. कदाचित त्याचा जीवनपटाची झलक त्याला दिसली असावी. विचारपूर्वक तो बोलू लागला,
" मनुष्य के लिये ज्ञान सर्वोपरी है | मैं मवेशिया ही चराता रहता तो यहाँतक कतई नही आ पाता | यह ज्ञान देने वाले मेरे पहले गुरू हैं, पडोस के गिरडे सर ! उनकी शिक्षासे मेरी पढ़ाई की नींव रखी गयी | मैं उन्हें इस राशी से एक लाख रुपये प्रदान करता चाहता हूँ | मेरे माँ बाप के लिये अच्छासा पक्का मकान बनवाना है | पिताजी को अब मेहनत ना करना पड़े इसलिये एक डेली नीडस् की दुकान लगवा देना है और ......." थोडे थांबून त्याने प्रेक्षकात बसलेल्या सदानंदकडे पाहिले. त्याच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.
      " जीवन में नेक मार्गदर्शक ना हो तो जीवन दूभर हो जाता है | मुझ अनपढ़ को सही दिशा दिखानेवाला मेरा मार्गदर्शक सदानंद भैया, जो यहाँ भी मेरा आधारस्तंभ बनकर मौजूद है, उसे खुद का अखबार शुरू करने के लिये बची खुची सारी राशी मैं देना चाहता हूँ |" कृष्णाने सदानंदला तेथे बोलावण्याची परवानगी मागितली. स्वत: अमिताभ बच्चन यांनी सदानंदला नांव घेऊन बोलावले. सदानंद भरल्या डोळ्यानेच आला व त्याने कृष्णाला कडकडून मिठी मारली. दोघेही रडू लागले. अमिताभ बच्चन कौतुकाने दोघांकडे पाहत होते.
      गावात आधीच बातमी पोचली होती. सगळ्या गावाने कृष्णाला डोक्यावर घेतले. त्याच्या सत्काराच्या कार्यक्रमात मंचावर अचानक गिरडे सर आले व त्यांनी माईक हातात घेऊन अपराधीपणाने कबूल केले, " कृष्णा खरोखरच एकलव्य आहे व त्याने त्याची जाणीव ठेवली पण मी कधी ही द्रोणाचार्य होऊ शकलो नाही. कृष्णाने कृतज्ञपणे देऊ केलेली रक्कम घेण्याचा मला काहीच अधिकार नाही व तो परत ही घेणार नाही म्हणून मी त्याच्याच नावाने ही रक्कम शाळेला दान करीत आहे. कृष्णासारख्या होतकरू मुलांच्या शिक्षणाला त्या रकमेची मदत व्हावी."
                            सुरेश पुंडलिकराव इंगोले....
                             शहापुर.. जिल्हा...भंडारा
                               ( 9975499268 )

1 comment:

  1. अतिशय सुंदर पोस्ट सर जी..
    असेच लिखाण लिहीत राहा आणि आम्हाला असेच वाचणीय आणि शिकण्यासारखे कथा वाचायला भेटू द्या.
    धन्यवाद सुरेश सर जी...
    ...... सुभाष राणे....

    ReplyDelete