Sunday 27 September 2015

साफल्य


           शिंदे सर लगबगीने घराकडे निघाले होते. हातात भाजीची पिशवी होती. आज जरा उशीरच झाला होता. आता जेवून कॉलेजला जायला मिळणार नव्हते. निवृत्तीचे दिवस जवळ आले होते. वक्तशीरपणा आयुष्यभर पाळला होता. त्याला अखेरच्या दिवसात गालबोट लावून चालणार नव्हते.
          
ते घराच्या कोप-यावर वळणार तेवढ्यात समोरून महेश कावरे व त्याचे चेलेचपाटे आले. महेशने दोन्ही हात जोडून मानभावीपणे नमस्कार केला. 
          "
नमस्कार सर ! भाजी घेतलेली दिसतेय्. स्वस्त मिळाली ना ! भाव जास्त लावला असेल तर आपल्याला सांगायचं हं ! दुकान बंद करुन टाकू त्याचं...."
          "
ठीक आहे. मला जरा घाई आहे." असे म्हणून त्यांनी पुढे पाऊल टाकले तोच महेश आडवा आला. 
         "
अहो सर, कुठे जाताय ? तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय्. "
   "
मला कॉलेजला जायचंय, उशीर होतोय. " त्यांनी पुढे जाण्याचा प्रयत्न केला पण महेशच्या टोळक्याने संपूर्ण वाटच अडवली होती. त्यांचा नाईलाज झाला. 
   "
बोल, काय म्हणायचंय तुला ?" त्यांनी त्याच्या नजरेत रोखून पाहत विचारले.
    "
आता पुन्हा निवडणुका जाहीर झाल्यात. यावेळी जिल्ह्याच्या राजकारणात नशीब आजमावयाची इच्छा आहे. तुमच्या आशीर्वादाने गेली पंधरा वर्षे सरपंच म्हणून गावाची सेवा करतोय. म्हटलं आता जिल्ह्याची सेवा करावी. " महेशने परत हात जोडून मान झुकवली. त्याच्या चेह-यावरचं छद्मी हास्य सरांच्या नजरेतून सुटलं नाही. तरीही संयम राखून ते म्हणाले, 
"
काय करायचे ते करा. मला काय त्याचं." 
"
असं कसं म्हणता सर ? तुम्ही राज्यशास्त्र शिकवलंत, त्याचाच तर हा परिणाम. तुम्ही शिकवलं, आम्ही आचरणात आणलं. काय रे पोरांनो ?" 
"
खरं आहे भाऊ..." सगळे एकजात ओरडले.
"
हे मी शिकवलेलं राज्यशास्त्र आहे ? लोकांना लुबाडणं शिकवलं मी ? अडाण्यांचा हक्क हिरावणं शिकवलं मी ? मतं विकत घेऊन निवडून यायला शिकवलं मी ? " शिंदे सरांचा संयम सुटत चालला. " गेली १५ वर्षे तू काय चालवलंय ते कोणीही विसरलेलं नाही. पण सगळे एकजात षंढ. विरोध करायची हिंमत नाही. मुकाट सोसताहेत सारे."
"
अहो सर, चाणक्याची नीती तुम्हीच शिकविली. कौटिल्याचं अर्थशास्त्र तुम्हीच शिकवलं. विसरलात !"
   "
अरे चाणक्य म्हणजेच कौटिल्य रे ! कौटिल्याचं अर्थशास्त्र म्हणजे धन कमावण्याचं शास्त्र नव्हतं . राजकारणाचा अर्थ त्यात समजावून सांगितला होता. मात्र मौर्यकालीन कुटील डावपेच तुझ्या लक्षात राहिले. लाज वाटते रे मला तू माझा विद्यार्थी आहेस हे सांगायला." शिंदे सर तळमळीने म्हणाले, तसा तो खदखदा हसू लागला. 
   "
सर, माझ्या विरोधात तुम्ही बरेच प्रयत्न केलेत. मी तरीही तुम्हाला दुखावलं नाही. आपण मानतो तुम्हाला. तुम्ही आपले गुरु आहात. याही निवडणुकीत माझ्या विरोधात काय करायचं ते करा. पण तुम्ही प्रत्येक वेळी हरता तेव्हा आपल्याला फार वाईट वाटतं. चला, यावेळी पुन्हा एक संधी तुम्हाला." त्याचे टोळके  जोरजोरात हसू लागले.
     "
विनाशकाले विपरीत बुद्धी " असे पुटपुटत शिंदे सर घराकडे निघाले.
आज कॉलेजला जाणे शक्यच नव्हते. त्यांनी आजवर कधी उशीर केला नव्हता. तशीच वेळ आली तर ते सुटी टाकत. पण अशी वेळ फारशी येत नसे.
     
जेवण झाल्यावर शतपावली करताना त्यांच्या डोळ्यापुढून सगळे प्रसंग सरकू लागले.
           
         
महेश कावरे हा गावपाटलाचा मुलगा. पाटील सज्जन माणूस होता. लोकांच्या अडीअडचणीला सदैव धावून जात असे. लोक त्याना मान देत, त्यांचा सल्ला घेत. गावकरी खाऊन पिऊन सुखी होते.
         
महेश जात्याच थोडा गर्विष्ठ होता. पाटीलकी त्याच्या अंगात मुरलेली होती. लोकांशी तो मग्रूरीने वागत असे. एखाद्या चित्रपटात दाखवल्याप्रमाणे सारा गाव आपल्याला टरकला पाहिजे, अशी त्याची भावना होती. मात्र पाटील त्याला मनमानी करू देत नसत. शाळेत असताना त्याची मग्रूरी वाढली होती. पाटील शिक्षण समितीचे अध्यक्ष असल्यामुळे शिक्षक त्याची मग्रूरी खपवून घेत. पण तो अकरावीत आला आणि शिंदे सरांशी त्याची गाठ पडली. गृहपाठ, शिस्तपालन, गैरहजेरी सर्वच बाबतीत त्यांनी महेशचा ताठा उतरवला. त्यांच्या बाबतीत महेशने धनराज पाटलांकडे बरेचदा तक्रार करुन पाहिली. पण, शिंदे सरांचं स्वच्छ चारित्र्य प्रबळ ठरलं. महेशला ११ वी व १२ वीच्या दोन वर्षात सरळपणे वागावं लागलं. त्याला चांगल्या सवयी लागल्या. परिणामी पुढे पदवीपर्यंत त्याचं शिक्षण सहज पार पडलं. पाटलांचा वचक असल्यामुळे त्याला मनमानी करता आली नाही.
          
पदवी घेवून गावात आल्यावर हळूहळू रिकामटेकड्या टोळभैरवांची फौज त्यानं तयार केली. ग्रामपंचायतची निवडणूक जाहीर होताच त्यानं पाटलांना उमेदवारीसाठी गळ घातली. तरण्या पोराच्या हाती कारभार जाऊ द्यावा, या उद्देशाने पाटलांनीही होकार दिला. 
           
गावातला महेशच्याच वर्गात शिकणारा सुताराचा मोहन हुशार आणि तल्लख बुद्धीचा होता. अतिशय सरळमार्गी. तो शिंदे सरांचा आवडता विद्यार्थी होता. घरच्या गरीब परिस्थितीमुळे त्याचं शिक्षण थांबलं. सरांच्या प्रेरणेनं त्यानं गावात राहून व वडिलांना सुतारकामात मदत करून पदवीपर्यंत शिक्षण घेतलं. तो नेहमी लोकांच्या मदतीला धावून जात असे.
               
ग्रामपंचायतच्या निवडणुकीत त्यानं उभं रहावं असं शिंदे सरांनी सुचवलं. त्यावर्षीच्या निवडणुकीत मोहनला सर्वाधिक मतं मिळाली होती. मात्र पाटलांच्या पुण्याईनं सरपंचपदाची माळ महेशच्या गळ्यात पडली होती.
            पुढील दोन्ही निवडणुकीत साम दाम दंड भेद वापरून महेशनं सरपंचपद प्राप्त केलं होतं. मोहनला सर्व गावाचा पाठिंबा असे. शिंदे सर त्यालाच झुकतं माप देतात व यापुढे त्याच्याशी सामना करणे फार जड जाईल, याची कल्पना आल्यानं महेशनं मोहनला एका खोट्या खटल्यात गोवलं. गरिबाला कोर्टाचे खेटे घालणं झेपत नाही, हे तो जाणून होता. म्हणून आज त्याने शिंदे सरांना खुलं आव्हान दिलं होतं.
             • • • • •
    
शिंदे सर घरात येऊन आरामखुर्चीत बसत नाही तोच मोहन आत आला. 
"
अरे, ये मोहन ये. बरे झाले तू आलास. आता तुझीच आठवण काढत होतो."
"
काही विशेष सर?" मोहनने विचारले.
"
अरे, जिल्ह्याच्या निवडणुका जाहीर झाल्याचे कळले. तू उमेदवारी भरावीस असे वाटते."
"
मी उमेदवारी अर्ज भरू नये याची आधीच तरतूद केली गेली आहे ना सर !" तो विषण्णपणे हसून म्हणाला.
"
एवढ्यात हिंमत हरलास ? " 
"
पण काही इलाज आहे का ?"
"
म्हणूनच तुला बोलावले आहे. तुझ्यावरचा आळ खोटा आहे हे सर्व जनतेसमोर सिद्ध करायची तुला संधी मिळत आहे. ती सोडायची आहे का तुला ? " सरांनी विचारले.
"
पण सर मी काय करू शकतो ?" तो हतबलतेने म्हणाला.
"
तू जनतेसमोर सभा घेऊन आपले निरपराधित्व सिद्ध करायचेस.  त्याने दोन फायदे होतील. तुझी प्रतिमा उंचावेल. लोक तुझं कार्य जाणतातच. तू निर्दोष आहेस हे कळल्यावर तुला भरभरून मते मिळतील. अरे, तुझ्यासारखे निगर्वी, निर्लोभी व सचोटीचे लोक जर राजकारणात आले तर या देशाचं चित्रच पालटून जाईल." सरांच्या डोळ्यातील उज्ज्वल भारताचं चित्र त्याला दिसू लागलं तसा तो मोहरला.
"
हे शक्य होईल का सर ? " त्याने आशाळभूतपणे विचारले.
"
होईल... नक्की होईल. " सर घड्याळाकडे पाहत म्हणाले. 
"
कोणाची वाट बघताय का ? कोणी येत आहे का ? " त्याने सहज विचारले.
तसे सर हसून म्हणाले, " हो, माझा बहिर्जी नाईक येत आहे. "
     
शिंदे सरांनी मोहनला थोडक्यात कल्पना दिली. चार पाच वर्षापूर्वी एक चुणचुणीत मुलगा त्यांचा विद्यार्थी होता. खूप चांगल्या गुणांनी बारावी उत्तीर्ण झाल्यावर पुढे काय करावे हे विचारायला तो सरांकडे आला होता. त्याच्यातील गटस् पाहून सरांनी त्याला शोध पत्रकारितेकडे जायला सांगितले होते. त्यालाही ते आवडले. तो त्यात खूप रमला. आज त्याच्याकडे पत्रकारितेची पदवी आहे. निरनिराळ्या वर्तमानपत्रांसाठी तो स्तंभलेखन करतो. विविध चॅनलवर त्याच्या सनसनाटीं बातम्या झळकत असतात. 
त्यालाच मोहनवरील खोट्या आरोपाबाबत चौकशी करायला सरांनी सांगितले होते.
   " सर, तुम्ही चैतन्यबद्दल तर बोलत नाही ना " मोहनने आतुरतेने विचारले. सर दिलखुलास हसले. तेवढ्यात चैतन्य आत दाखल झाला. मोहनने त्याला घट्ट मिठी मारली. चांगला उंचपुरा, धिप्पाड, रुबाबदार चैतन्य मोहनच्या मिठीने भारावून गेला. त्याला कोचावर बसवीत तो म्हणाला, " दादा, तुम्ही माझे आदर्श आहात. तुमच्याविषयी सर नेहमी भरभरुन बोलायचे. तुमच्यावर किटाळ आल्याचे कळताच मी सर्व कामे बाजूला ठेवून आधी हे काम हाती घेतले व पूर्णही केले."
         
चैतन्यने मोहनवरील आरोपांच्या संदर्भात चौकशी करताना बोलणे रेकॉर्ड करीत पुरावे गोळा केले होते. महत्वाचे पुरावे विडियोमध्ये शूट केले होते.
  " दादा, तुम्ही या सर्व पुराव्यांचा अभ्यास करा. त्यानुसार भाषणांची टिपणं तयार करा. जनतेसमोर तुम्हाला या गोष्टी मांडायच्या आहेत. सर्व आरोप हाणून पाडायचे आहेत. तुमचं निर्दोषत्व सिद्ध होताच सर्व स्तरातला पाठिंबा तुम्हाला मिळेल."
"
उमेदवारीचे काय ? मला तर अर्जही भरता येणार नाही." मोहन अजूनही साशंक होता.
चैतन्य हसून म्हणाला, " अहो दादा, २५ तारीख उमेदवारी अर्ज भरायची शेवटची तारीख आहे. २४ तारखेला सर्व चॅनल्सवर  हे व्हिडिओ दाखवण्यात येतील. २५ तारखेच्या सर्व प्रमुख वृत्तपत्रात बातम्या झळकतील. तुमचा अर्ज मान्य होईल आणि महेश कावरेचा अर्ज नामंजूर होईल. चला लागा तयारीला. मोहनने चैतन्यचा हात घट्ट धरला. तो भारावून गेला होता.
   
शिंदे सर कौतुकाने दोघांकडे पाहू लागले. त्यांच्या डोळ्यातील स्वप्न गिरक्या घेऊ लागले होते. सचोटीच्या चारित्र्यवान नेत्यांचा भारत त्यांना दिसू लागला होता. दोघेही पाया पडू लागले तसे ते भानावर आले. दोघांनाही जवळ घेत ते म्हणाले, "तुमच्यासारखी मुलं असताना कोण म्हणेल मी निपुत्रिक आहे म्हणून " क्षणभर थांबून ते म्हणाले, " निवडणुका संपताच पुढच्या महिन्यात माझी निवृत्ती आहे. माझा निवृत्ती सत्कार तुमच्या हस्ते व्हावा ही माझी आंतरिक इच्छा आहे."
   
चैतन्य लगेच म्हणाला, " सर, तुमचा सत्कार  जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्षांच्या हस्ते होईल."
तिघेही खळखळून हसू लागले.

                              सुरेश पुंडलिकराव इंगोले
                                 
शहापूर    जि. भंडारा
                                  9975490268

No comments:

Post a Comment